Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १६)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १६) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

“शलाका...ss”

मोठ्याने साद घालतच तो मांत्रिक दारापर्यंत पोहोचला.

“गुरुदेव, यावे. आम्ही आपणापर्यंत पोहोचण्याची पराकाष्ठा केली. कित्येक अघटित गोष्टी घडल्याने मला हे दोन्ही विवाह उरकून घ्यावे लागले.”

शलाकाने त्यांना आसनावर बसवत म्हटलं.

“पराकाष्ठा केलीत; पण पोहचू शकला नाहीत. असेच ना?”

“गुरुदेव, आपणास सर्व ज्ञात आहे का?”

विक्रमदेव चमकून त्यांच्याकडे पाहत होते.

“आम्ही अतिशय अडचणीत सापडलो आहोत. कृपया आमची मदत करा.”

दिग्विजय हात जोडत म्हणाला.

“हो गुरुदेव. या विवाहकरिता इकडे यायला निघालेली शाश्वतीही अजून पोहोचली नाही.”

“शलाका, फसलीस तू मुली. तू तुझ्या दुर्भाग्याला स्वतःहून खेचून आणलंस.”

गुरुदेव उदास आवाजात म्हणाले.

“म्हणजे? तुम्हांला काय म्हणायचं आहे, गुरुदेव? काय घडलंय नक्की?”

शाश्वती आत प्रवेश करत म्हणाली. तिला सुरक्षित आलेलं पाहून शलाकाने सुटकेचा निश्वास सोडला.

“शलाका, मोहिनींनी तुझ्या घरात प्रवेश करून जीवघेणी खेळी कधीच आखली आहे. त्यांनी तुझा मृत्यू तुझ्या घरात प्रवेश केल्यावरच रेखला आहे.”

“गुरुदेव, म्हणजे तुम्हांला असं म्हणायचं आहे का की अरुंधती एक मोहिनी आहे?”

शलाकाने चमकून विचारलं.

“एकेकाने पुढे या व माझ्या हातावर हात ठेवा. मी माझ्या ताकदीने मोहिनीला नक्कीच ओळखू शकतो. तुझ्या घरात मोहिनीने कोणत्या रूपात प्रवेश केला आहे, हे समजायला मला वेळ लागणार नाही.”

          एकेकाने पुढे येऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केली. सरतेशेवटी अरुंधती आणि वैजयंतीने एकेक करून त्यांच्या हातावर हात ठेवला. सर्वांच्या नजरा तिथेच रोखल्या गेल्या होत्या.

“नाही, ह्या दोघीही मोहिनी नाहीत. या घरात मोहिनींचं अस्तित्व तर नक्कीच आहे. अजून कोण आहे का?”

“शलाका, ती मधुरिमा कुठेय?”

विक्रमदेवनी विचारलं.

“मी बोलावते. मधु...”

अरुंधतीने हाक मारली. मधुरिमा आवाज ऐकताच पलंगावरून उठली व आरशात पाहून ती निर्धास्त मनाने ती बाहेर आली. मगाशी विवाहाच्या गडबडीत कोणाचेही मधुरिमाकडे लक्ष गेले नव्हते; पण आता तिला पाहून सर्वजण पुन्हा थक्क झाले होते. घाबरलेली मने पुन्हा एकदा पवित्रतेच्या आनंदाने शांत झाली होती. तिने पुढे येत गुरुदेवांच्या हातावर हात ठेवला.

“नाही, हीसुद्धा मोहिनी नाही. उलट हिच्या रुपात एक पवित्रता तुमच्या घरात आली आहे.”

           गुरुदेव निराश होऊन आश्रमात परत जायला निघाले. शाश्वती, शलाका, विक्रमदेव आणि दिग्विजय थरारून त्यांच्याकडे पाहत होते. सर्व मुलं काहीच कळत नसल्याने शांत उभी होती. शलाकाने गुरुदेवांना रोखण्याचा प्रयत्न केला.

“शलाका, मुली तू घाबरू नकोस. मी काही दिवसात परत येईन. तेही पूर्ण तयारीसहित येईन. तोपर्यंत निश्चित रहा. तुझ्या घरात अखंड पवित्रता भरलेली आहे. काहीही अघटित होणार नाही याचा विश्वास बाळग.”

             गुरुदेव निघून गेले होते. सर्वजण जेवून मग आपापल्या खोलीत निघून गेले. बाकी सर्व शलाकाच्या खोलीत होते. जुने मित्र बऱ्याच दिवसांनी एकत्र भेटत होते.

“शाश्वती, तुला लग्नाच्या मुहूर्तावर यायला सांगितलं होतं. तू तर आता येत आहेस. कुठे राहिली होतीस?”

“अगं शलाका त्या मोहिनींचं अस्तित्व खरंच आहे. एवढ्या प्रचंड वेगाने पडणाऱ्या पावसापेक्षा कोणीतरी आपल्याला रोखत आहे, असाच आभास होत होता.”

“माझ्यासोब ही परवा तेच झालं. प्रचंड काळा धूर, तुफानी पाऊस आणि शक्तीचं अस्तित्व जाणवत होतं.”

विक्रमदेव थरारून म्हणाले.

“मला तर लवकरात लवकर इथलं काम आटपून परत फॉरेनला निघून जावंसं वाटतंय.”

दिग्विजयही घाबरलेला होता.

“त्या जर खरंच परत आल्या असतील ना, तर त्या पाताळातसुद्धा तुझी पाठ सोडणार नाहीत. त्यापेक्षा इथे आहेस, तो सुरक्षित आहेस. गुरुदेव असताना आपल्यापैकी कोणालाच काहीच होणार नाही.”

शाश्वती म्हणाली.

“शलाका, उद्या सकाळी मला निघणं भाग आहे. त्या डीलरला ते कंकण दाखवायचे आहेत.”

दिग्विजयने सांगितलं.

“तू कंकणाचं डील सुरूही केलंस. वा! मला अजून डीलरचं मिळत नाही.”

शाश्वती वैतागली होती.

“शाश्वती, तू काय करणार आहेस? तूही उद्या निघणार आहेस का?”

शलाकाने विचारलं.

“हो. शलाका, गुरुदेव परत येईपर्यंत मीही इथेच राहणार होते. काय माहित बाहेर पडल्यावर माझा जीवही जाईल; पण मुलं घरी एकटी असणार. त्यांना असंच सोडून नाही येऊ शकत ना?”

“अगं काही नाही होत. जा तू घरी. आता तर तुफानाचा जोरही कमी वाटतोय. आता आपल्या हातात फक्त गुरुदेवांवर विश्वास ठेवून काय होतंय याची वाट पाहणे, एवढंच आहे. सगळं विसरा आणि आनंदाचं वातावरण आहे घरात, ते जगून घ्या. उगाच मुलांना संशय येत राहील.”

विक्रमदेव हळू आवाजात म्हणाले. सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या व ते आपापल्या खोलीत निघून गेले.

___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all