डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १७) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १७) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
आज पाऊस पूर्णतः थांबला होता. सर्वत्र शांत वातावरण होते. दोन दिवस पावसाने हाहाकार माजवलेला असल्याने काही उन्मळून पडलेली झाडे, वाहून येणाऱ्या मातीचे ढीग सर्वत्र दिसत होते. सुधाच्या रूपात असणाऱ्या अलकनंदाने सर्व खिडक्या, दारे उघडली. आल्हाददायक, थंड हवेची झुळूक तिला स्पर्श करत आत आली. दुसरे कोणी असते तर आळस झटकून मस्त आनंद घेतला असता. मात्र अलकनंदाच्या चेहऱ्यावर चिंता होती. तिच्या युवराज्ञीची, बारा वर्षांपासून पेटलेल्या तिच्या प्रतिशोधाच्या आसेची चिंता तिला लागून राहिली होती. प्रत्येक रात्र वैऱ्याची आहे हे शलाकाच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी ती प्रत्येक रात्र जागली होती.
“सुधा, कुठे हरवली आहेस? मी पूजा करायला आलेय, तरी तुम्ही नाश्ता बनवायला सुरुवात केली नाहीत. जा लवकर.”
“हो.”
सुधाच्या रूपात पुन्हा कोणीतरी वेगळं आहे हे शलाकाला जाणवतच नव्हतं
“एवढे नोकर घरात आहेत; पण सगळे आळशी झाले आहेत. कोणाला काम करायला नको.”
स्वतःशीच पुटपुटत शलाकाने देवघरात प्रवेश केला.
शाश्वती आणि दिग्विजय भल्या पहाटेच बंगल्यातून निघून गेले होते. दिग्विजय जाण्यापूर्वी मधुरिमाला देण्यासाठी सुधाकडे कार्ड देऊन गेला होता. शलाका सोडून बंगल्यात इतर कोणीही उठले नाही असे भासत होते. इतक्यात अरुंधती शलाकाच्या मागोमाग देवघरात आली. तिने देवाला नमस्कार केला व लगेच जायला निघाली.
“आज लवकर उठलीस का?”
“मी दररोजच लवकर उठते, देवीजी. फक्त देवघरात आले नव्हते.”
“अजून देवीजीच म्हणते आहेस. ती वेदश्री बघ, तुझ्यासारखीच या घरात आली; पण आल्यापासून मला मॉम म्हणतेय. तूही तसंच म्हण.”
“तिचं काय झालंय, सगळीकडे उतावळेपणा आहे. असो. ठीक आहे. मी आजपासून मॉम म्हणेन.”
अरुंधती हसत म्हणाली. अरुंधती आणि वेदश्रीमध्ये असलेला राग शलाकाच्या लक्षात आला होता.
“अरुंधती, वेदश्री जरा मॉडर्न राहणीमानात राहिलेली आहे. त्यामुळे ती तुला घालूनपाडून बोलत राहते; पण तिचं बोलणं तू मनावर घेत जाऊ नकोस. घरात शांतता राहणं उत्तम आहे. वाद नकोत.”
‘म्हणजे आमच्यातील वाद हिच्या लक्षात आले तर! चला, युवराज्ञीनी दिलेली आणखी एक जबाबदारी पार पडली, याचा आनंद आहे.’
अरुंधती स्वतःच्या मनात विचार करत होती.
“ठीक आहे, मॉम.”
शलाकाचा निरोप घेऊन अरुंधती जवळजवळ धावत मधुरिमा राहत असलेल्या खोलीत आली. मधुरिमा निवांतपणे पलंगावर बसून होती. खिडकीतून बाहेर कुठेतरी नजर एकाग्र करून काहीतरी विचार करत असावी.
“प्रणाम युवराज्ञी.”
मधुरिमाने नजर अरुंधतीकडे वळवली. इतक्यात तिच्यामागोमाग वैजयंतीही खोलीत आली होती. त्यांनी दरवाजा आतून लावून घेतला. त्या दोघीही गुडघे टेकून, हात जोडून तिच्यासमोर बसल्या होत्या. मधुरिमाने नजरेनेच प्रणामचा स्वीकार केला.
“आदर्श सुना आहात ना तुम्ही? आज पहिला प्रणाम तुम्ही तुमच्या सासूला केला पाहिजे होता.”
मधुरिमा हसत म्हणाली.
“कदापि शक्य नाही, युवराज्ञी. त्या शलाकासमोर आम्ही झुकावे? अशक्य!”
“आमच्यासाठी देव्हारातल्या देवाहून आधीही तुम्हीच दैवत आहात. मात्र आपल्या संघर्षात दैवी ताकद आपल्यासोबत असणे आवश्यक असल्यामुळे प्रथम देवघरात आणि मग आपल्याला प्रणाम करायला आलो आहोत.”
अरुंधती निश्चयाने म्हणाली. मधुरिमाला तिच्या मोहिनींची तिच्यावरील निष्ठा माहित होती. ती फक्त त्यांच्याकडे बघून किंचितसे हसली.
“आज तुम्हांला ह्या बंगल्यातून काहीही करून बाहेर पडायचे आहे. अगदी अलकनंदालाही! आज वनात जाऊन आपण निश्चित करणार आहोत, की आपल्याला पुढे काय करायचे आहे. यज्ञ संपण्यास खूप कमी दिवस शेष आहेत.”
“आपण चिंता करू नये. व्यवस्थित कारणे देऊन आपण सर्व इथून बाहेर पडू.”
अरुंधती म्हणाली. मधुरिमाने केवळ पापण्यांची हालचाल करत संमती दिली. अरुंधती आणि वैजयंती खोलीतून बाहेर निघून गेल्या. अरुंधती डायनिंग टेबलजवळ आली. सर्वजण नाश्ता करायला बसतच होते. तीही एक खुर्ची ओढून त्यावर बसली.
“मॉम, आज मी ही सुधासोबत घरातील आवश्यक साहित्य आणायला जाऊ का?”
“नको. तू कशाला जातेस? आपल्या घरात इतरही नोकर आहेत. तुम्हांला ही कामं करण्याची गरज नाही, बाळा.”
“मॉम, मला असंच बसून फार विचित्र वाटतंय. कदाचित सतत काम करण्याच्या सवयीमुळे आणि हे काम करायला मला आवडतं. कृपया नाही म्हणून नका.”
अरुंधती विनंती करत म्हणाली.
“मॉम, जाऊ द्या तिला. तिला अशी कामं केल्याशिवाय चैन पडणार नाही.”
वेदश्री तोंड वेंगाडत म्हणाली.
“तुझे शब्द तुझ्याकडे ठेव. मी तुला नाही विचारलं. प्रत्येक वेळेस मधे नाक खुपसण्याची गरज नाही.”
अरुंधती चिडून म्हणाली.
“वहिनींनो, किती भांडाल पहिल्याच दिवशी? मॉमला अशा गोष्टी विचारण्याची गरज नाही. तुम्हांला जिथे जायचं असेल तुम्ही बिनधास्त जाऊ शकता. मॉम कोणाला अडवत नाही.”
नचिकेत हसत म्हणाला. शलाकाने होकार दर्शवला.
“अरुंधती आणि वेदश्री, तुम्हांला कुठेही जायला माझी परवानगी घ्यायची गरज नाही. बिनधास्तपणे जा. फक्त गरज वाटली तर ड्रायव्हर किंवा एखादा नोकर सोबत नेलात तरी चालेल. जायच्या आधी फक्त कळवून जा.”
“हं. बाहेर वातावरण ठीक नाही. तुम्ही कुठे आहात हे माहित असलेलं बरं.”
विक्रमदेवही शलाकाच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाले.
“डोन्ट वरी गाईज! लोकेशन शेअर करता येईल.”
वेदश्री उपम्याचा घास तोंडात घालत म्हणाली. तिने सर्वांकडे पाहिलं. तिचं ‘गाईज’ कोणाला फार पटलेलं दिसत नव्हतं. ती जरा जास्तच मॉडर्न होती असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहून तिने मुकाट्याने खायला सुरुवात केली. अरुंधतीने सर्वांच्या नकळत तिच्याकडे 'काय चाललंय?' अशा नजरेने पाहिलं. तिलाही लक्षात आलं, की आपल्याला सावध वागायला पाहिजे. काही वेळाने सर्वजण ऑफिसला निघून गेले होते. सुधा आणि अरुंधती किराणा सामान आणायला निघाल्या होत्या, तर वेदश्रीला शॉपिंगला मॉलमध्ये जायचं होतं. सर्वजणी निघून गेल्यावर मधुरिमा खोलीतून बाहेर आली. तिला शलाका सोफ्यावरच बसलेली दिसली. तिच्याकडे लक्ष न देता बाहेर जाणार तोच शलाकाची हाक तिच्या कानावर पडली.
“मधुरिमा.”
मधुरिमा शलाकाच्या दिशेने वळली.
“तू कुठे चाललीस?”
“मी कुठे जाणार? अरुंधतीसुद्धा घरात नाही, तर फारच कंटाळा आला होता. म्हणून मी फिरून येणार होते. एखाद्या बागेत वगैरे जाईन.”
“बरं. तू जेवायला दुपारी घरी येणार आहेस, की बाहेरच जेवणार आहेस? पैसे घेतलेत का सोबत?”
“बाहेरच जेवेन.”
शलाकाने पाहिलं. मधुरिमाच्या हातात ना पर्स होती ना आणि काही... केवळ तिने घातलेला ड्रेस आणि तिच्या हातात असणारी धातूची कंकणे आणि अंगठ्या होत्या.
“पैसे तर घेतले नाहीस. कशी जेवणार आहेस बाहेर?”
मधुरिमाने काही न समजून इकडेतिकडे पाहिलं. शलाकाला वाटलं तिला पैसे मागायला लाज वाटत असावी. शलाकाने एका नोकराकडून कपाटातले दोन हजार रुपये काढून आणायला सांगितले आणि ते तिच्या हातात दिले.
“हे घे. पुढच्या वेळेपासून पैसे मागायला लाजू नकोस.”
शलाका मधुरिमाकडे पाहून स्मितहास्य करत म्हणाली. काहीही न समजून मधुरिमाने ते हातात घेतले व ती घराबाहेर पडली. जसा तिने वनाच्या मध्यभागात प्रवेश केला, लाखो मोहिनी घोळका करून तिच्याभोवती उभ्या राहिल्या. ती तलावाकाठच्या वृक्षाखाली असणाऱ्या आपल्या आसनावर बसली. तिची नजर अजूनही तिच्या हातातील नोटांवर होती.
“हे काय आहे?”
मधुरिमाने त्या नोटा बोटांच्या चिमटीत पकडत सर्व मोहिनींना दाखवल्या; पण कोणालाच काहीच माहित नसलेले दिसून येत होते. इतक्यात धावत वैजयंती वनात पोहोचली. तीच मागे राहिली होती. तिने मधुरिमाच्या हातातील नोटा आणि तिच्या चेहऱ्यावरील गोंधळ पाहिला.
“युवराज्ञी, आपण मूल्य चुकवण्यासाठी सुवर्णमुद्रांचा वापर करतो, तसे ते मानवी जगातले मूल्य आहे. त्याला रुपया म्हणतात. तुमच्या हातात आता दोन हजार रुपये आहेत. म्हणजे आपल्या जगातील दोन सुवर्णमुद्रा.”
वैजयंती वेदश्री म्हणून गेला महिनाभर शाश्वतीच्या ऑफिसमध्ये काम करत असल्याने तिने बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या होत्या. मधुरिमाने तिला जवळ बोलावून त्या नोटा तिच्या हातात दिल्या. एकूणच त्यांच्यात फक्त तीच त्या नोटांचा वापर जाणत होती. सर्वजणी मानवांच्या मूढपणावर हसत होत्या. मोहिनींच्या युवराज्ञीला दोन सुवर्णमुद्रा हे काय आमिष होते?
“आपण आज इथे खूप महत्वाच्या उद्देशाने जमलो आहोत. जितके आपल्याला माहित होते त्याप्रमाणे विक्रमदेव, शाश्वती, शलाका आणि मांत्रिक सूर्यभान हे आपले अपराधी आहेत. मात्र काल मला एका नव्या मोहऱ्याचा शोध लागला. तो कसा सामील होता, त्याने काय केले, हे मला स्पष्ट आठवत नाही; परंतु ते मी शोधेनच.”
“युवराज्ञी, त्या वस्तू जितक्या लवकर सापडतील, तितक्या लवकर राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे आपण वस्तू शोधण्यास सुरुवात करू.”
अरुंधती म्हणाली.
“हो. मीही तेच निश्चित केले आहे; परंतु स्थान एक नाही, तीन आहेत. आपण आता राहतोय त्या बंगल्यात काहीतरी असणार हे नक्की आहे. अरुंधती, वैजयंती आणि अलकनंदा तिघीहीजणी तिथे असल्याने त्यांना त्या वस्तू शोधता येतील. शाश्वतीच्या घरी रागिणीला जायचे आहे आणि दिग्विजयला मी पाहून घेईन.”
“युवराज्ञी, विवाहाच्या वेळेस उपस्थित असणारी तीच शाश्वती ना? तिच्याकडे काही असेल असे मला वाटले नाही.”
वैजयंती म्हणाली.
“अपराध्याच्या चेहऱ्यावर अपराध लिहिलेला नसतो. हे लोक जितके साधे आणि निष्पाप वाटत आहेत, तितकीच वाईट कृत्ये यांच्या हातून घडली आहेत आणि याचे साक्षीदार आपण सर्व आहोत. आता केवळ येत्या पौर्णिमेची प्रतीक्षा आहे.”
मधुरिमा शांतपणे बोलत होती.
“हे कार्य येत्या पौर्णिमेपर्यंत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. या पौर्णिमेला आपला राज्याभिषेक सोहळा व्हायलाच हवा.”
“चिंता नसावी, अलकनंदा. ह्या वस्तूंचा शोध येत्या दोन दिवसांतच आपण घेणार आहोत. केवळ योग्य नियोजन गरजेचे आहे. मी तुमच्या हाती ही जबाबदारी दिली आहे, तर तुम्ही ती उत्तमरित्या पार पाडाल अशी मी आशा करते.”
मधुरिमा आश्वस्त नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हणाली.
“निर्धास्त रहा, युवराज्ञी. या पौर्णिमेला आपला राज्याभिषेक आणि यज्ञाचा अंत होईलच. महायज्ञातली शेवटची आहुती दुसऱ्या रात्री पडणारच. संघर्षाला आपण सुरुवात केली आहे आणि आपल्या अस्तित्वाचा हा संघर्ष आमच्यापैकी कोणीही मोहिनी विरून जाऊ देणार नाही.”
रागिणी निश्चयी स्वरात म्हणाली.
“हो, युवराज्ञी. आपण केवळ सुरक्षित रहा. पहिल्या मानवी आहुतीचा समय समीप येत आहे.”
अलकनंदाही आनंदी स्वरात म्हणाली. मधुरिमाने सर्वांकडे पाहिले. तिच्या या पाच सखी आणि इतर लाखो मोहिनी तिच्याकडे प्रचंड निष्ठेने पाहत होत्या. त्यांच्यासाठी ती सर्वस्व होती आणि तिच्यासाठी हा सूड तिच्या आयुष्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट्य होते. तिने यज्ञकुंडाजवळ डोळे मिटून बसलेल्या पद्मिनीकडे पाहिले. त्यांची साथ ही तिची सगळ्यात मोठी ताकद होती. त्यांनी सापळा रचला होता. आता त्यात एकेकजण नकळत अडकत जाणार होता. यज्ञ अविरत सुरू राहावा म्हणून लाखो मोहिनी त्या प्रदेशाच्या संरक्षणाला सज्ज होत्या.
“चला. मला दिग्विजयच्या बंगल्याकडे प्रस्थान करावे लागणार आहे. पद्मिनीचे आजचे ध्यान संपल्यावर तिला माझा निरोप द्या. तिच्या कार्याने मी अतिशय प्रसन्न आहे.”
“युवराज्ञी, आपणाला असेच जाता येणार नाही. म्हणजे आकाशमार्गे आपण तिथे गेलात, तर त्यांना आपण मोहिनी आहात हे लक्षात येईल.”
अरुंधतीला अचानक आठवले.
“मग? मी आम्ही इतके अंतर पायी जायचे आहे का?”
“नाही. चला मी आपल्यासोबत येते. वनातून बाहेर गेल्यावर मुख्य मार्गावर एखादे वाहन मिळेल. आपल्याकडे मानवी मूल्य आहेच. ते देऊन आपल्याला त्या स्थानी जाता येईल.”
वैजयंती म्हणाली. कुठून या मानवी जगात अडकलो आहोत असे मधुरिमाच्या चेहऱ्यावरील भाव पाहून सर्वजणी मनापासून हसू लागल्या. वैजयंतीने मधुरिमाला टॅक्सीत बसवून दिले व बाकीच्या पुन्हा बंगल्याकडे निघाल्या.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा