Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १८)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १८) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

             इकडे मधुरिमा दिग्विजयच्या बंगल्यापाशी पोहोचली होती. ती टॅक्सीतून खाली उतरली. पैसे वैजयंतीने आधीच दिलेले असल्यामुळे तिला काही खटपट करायची नव्हतीच. या मानवी जगात जगणे कठीण असल्यासारखे तिला वाटायचे. बंगल्याच्या फाटकाजवळ एक वॉचमन उभा होता. आता या माणसाचे काम काय असते याचीही तिला कल्पना नव्हती. त्यात ती होती मोहिनींची युवराज्ञी! आत जाण्यासाठी कोणाची परवानगी घेणे हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते. ती फाटकाजवळ आली व तिने उघडण्यासाठी फाटकाला हात लावला. तसे वॉचमनने तिला थांबवले. पायघोळ पोशाख, गळ्यात केवळ एक सोन्याची चेन, हातात काही कंकणे आणि बोटांत धातूंच्या अंगठ्या, मानवी जगात आल्यामुळे पायात घातलेल्या चपला... ह्यावरून ती एखाद्या नाटकातली नटी असावी अशी वॉचमनची कल्पना होती. एवढ्या मोठ्या उद्योगपतीकडे ती का आली असावी याची त्याला काय कल्पना? तिच्या शक्ती आणि तिच्या ताकदी मानवी जगात कोण्या निष्पापावर वापरणे तिलाही पटणार नव्हते.

“कोण आहेस तू? पुरातन काळातले ड्रेस घालून कुठले नाटक करत आहेस काय? हा मोठ्या उद्योगपतीचा बंगला आहे. इथे तुझे काय काम?”

“मी मधुरिमा. काय म्हणालात नाटक? नाही. मी नेहमी असाच वेश परिधान करते. तुम्हांला काही हरकत आहे का?”

मधुरिमा काहीसे चिडत म्हणाली.

“काही हरकत नाही. इथून निघा.”

वॉचमन वैतागला होता.

“मला इथे दिग्विजयजींनीच बोलावले आहे. आपण एक काम करता का? आपण त्यांना जाऊन सांगा, की मधुरिमा आली आहे. मग त्यांना ओळख पटली नाही, तर मी निघून जाईन.”

          शक्य असते तर ह्याच्यावर संमोहन टाकून निघून जाणे तिला अशक्य नव्हते; पण त्यामुळे दिग्विजयला संशय येऊ शकत होता. त्यामुळे मानवी जगात मानवप्रमाणे वागणे तिला क्रमप्राप्त होते.

“वा गं! मला काय मूर्ख समजलीस काय? मी इथून निघून गेल्यावर तू बंगल्यात शिरलीस, तर मी काय करू?”

“माझे वचन आहे. मी या जागेवरून हलणार नाही. आपण केवळ त्यांना सांगून या.”

“आजकालच्या जगात वचनं कोण पाळतं ? तू निघ बरं इथून. उगाच माझा वेळ वाया घालवत आहेस.”

“मी इथून जाणार नाही. मी वचन दिले आहे, तर मी ते पाळेन. विश्वास ठेवा.”

“विश्वास? थांब तुला दाखवतो. जातेस का...”

वॉचमनने हातातील स्टिक तिच्यावर उगारली. तिने ती एका हाताने घट्ट पकडली. त्याला लक्षात यायच्या आत तिने ती स्टिक त्याच्या हातातून काढून घेतली आणि त्याच्या डोळ्यांदेखतच त्या लोखंडी स्टिकचे दोन भाग केले. तिच्या नाजूक दिसणाऱ्या दंडातील ताकद वॉचमनला आश्चर्यचकित करून गेली. आता जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याला समजले.

“मी जातो. सांगून येतो. तोपर्यंत तू इथेच थांब. वचन पाळतेस ना?”

इकडे वॉचमन बंगल्यात आला. दिग्विजय दिवाणखान्यातच बसला होता.

“साहेब, बाहेर एक तरुणी आली आहे. तिने लोखंडाची स्टिक हातात घेऊन त...त्याचे दोन तुकडे केले. तुम्ही बोलवलं आहे म्हणाली. मी थांबवलं प...पण थांबत नाही आहे. जुनेपुराणे कपडे घालून आली. काय बरं नाव...म...मधुरिमा.”

वॉचमन तिचा मगाचचा अवतार पाहून अजून घाबरलेला होता.

“मधुरिमा आली आहे. जा, तिला आत घेऊन ये. मीच बोलवलं आहे. नको, मीच जातो.”

दिग्विजय धावत बंगल्यातून बाहेर आला.

“मधुरिमा, ये ना. तिथेच का उभी आहेस?”

“मी त्या व्यक्तीला वचन दिले होते. म्हणून थांबावे लागले.”

            दिग्विजयने तिच्या पायाशी दोन भाग होऊन पडलेली लोखंडाची स्टिक पाहिली. त्याने थोडेसे चमकून तिच्याकडे पाहिले; पण तो तिला घेऊन आत बंगल्यात गेला. त्याचाही बंगला फार आलिशान होता. ते सध्या दिवाणखान्यात बसले होते.

“मधुरिमा, बी कन्फर्टेबल. वूड यू लाईक टू हॅव कॉफी?”

“काय म्हणालात?”

मधुरिमाने न समजून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्याही चेहऱ्यावर गोंधळ होता. तिला लक्षात आलं, की ही मानवी जगात वापरली जाणारी दुसरी कोणतीतरी भाषा असावी.

“क्षमा करा. मला ही भाषा येत नाही. मी मातापित्याशिवाय वाढलेली आहे. माझे आणि अरुंधतीचे सारे जीवन वनातच गेले आहे. त्यामुळे आमचे शिक्षण झालेले नाही. इथली सामान्य भाषा सोडल्यास आम्हांला दुसरी भाषा येत नाही. मला तुमची भाषा लगेच लक्षात येत नाही.”

“काही हरकत नाही. आपण तुमच्या भाषेत बोलू. मी समजू शकतो.”

“तुमची हरकत नसेल, तर मी आजच्या दिवस विश्रांती घेतली तर चालेल का? आपण उद्या बोलूया.”

“काही हरकत नाही. तुझ्या खोलीचं...”
दिग्विजय अडखळत म्हणाला.

“वेगळी असेल, तर उत्तम. माझ्यावर जबरदस्ती करणे योग्य नाही. वनात वाढलेली असल्यामुळे माझ्यात अफाट ताकद आहे. तेव्हा...”

“काही काळजी नको. सर्व तुझ्या मर्जीप्रमाणे होईल. सुषमा, ह्या तुझ्या होणाऱ्या मालकीणबाई आहेत. त्यांना वरच्या मजल्यावरची खोली व्यवस्थित लावून दे.”

            सुषमासोबत मधुरिमा वरती निघून गेली. दिग्विजय फार खुशीत होता, की मधुरिमा त्याच्या बंगल्यात आली होती. त्याच्याही नकळत त्याचा मोहिनींच्या सापळ्यात सहजगत्या प्रवेश झाला होता.

___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all