डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १९) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १९) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
बंगल्यात सर्वांवर संमोहन कोणीही उठणार नव्हते. घरात कधी असे काही होईल याची कल्पना नसल्याने सीसीटीव्हीही नव्हते. अरुंधती, वैजयंती आणि अलकनंदा वेगवेगळ्या खोलीत ठिकठिकाणी शोध घेत होत्या; परंतु कोणती गोष्ट हाताला लागत नव्हती. सर्वजणांवर निद्रिस्त मोहिनी असल्याने त्यांपैकी कोणी संमोहित होऊन त्यांना काही सांगेल अशीही शक्यता नव्हती. तासाभरात त्या तिघींनी बंगल्याचा कानाकोपरा शोधून पूर्ण केला. मात्र त्यांच्या हाती काहीही लागू शकले नाही. त्या निराश झाल्या होत्या. त्यांना रिकाम्या हाताने मध्यरात्री वनाकडे प्रस्थान करावे लागले.
________________________
शाश्वती आज बंगल्यात एकटीच होती. दोन्ही मुलं फिरायला गेलेली होती आणि नवरा काय नेहमीप्रमाणे मित्रांसोबत पार्टी करायला बाहेर होता. तसं तिला एकटी राहायची सवय असल्यामुळे काही भीती नव्हती. रात्रीचा दीड वाजला होता; पण झोप न आल्यामुळे ती टीव्हीसमोर बसून कसलासा भयानक चित्रपट बघत होती. चित्रपटातील घराची आणि तिच्या बंगल्याची डोअरबेल एकाच वेळी वाजली. तिचा भीतीने थरकाप उडाला; पण यावेळेस जास्तीत जास्त कोण तर नवराच असणार हे लक्षात घेऊन तिने दरवाजा उघडला. बाहेर लालसर पायघोळ वस्त्रे परिधान केलेली, शरीरावर धातूंचे अलंकार असणारी, काळ्याभोर डोळ्यांची युवती उभी होती.
“कोण आहेस तू?”
शाश्वतीने घाबरून तिच्या डोळ्यांत पाहिले. झाले. त्याक्षणी तिला विसर पडला होता की ती कोण आहे. रागिणीने तिच्यावर संमोहनाचा प्रयोग केल्याने, ती आता केवळ रागिणीच्या हातातील बाहुली होती.
“मी तुझा काळ आहे; परंतु आज मी तुझे प्राण घ्यायला आलेले नाही. माझी एक वस्तू तुझ्याकडे आहे. तीच परत न्यायला आले आहे. सांग, मोहिनींची कोणती वस्तू आहे तुझ्याकडे आणि कोठे आहे?”
रागिणी तिच्या डोळ्यांत बघून बोलत होती.
“माझ्याकडे मोहिनींचे पैंजण आहेत. त्यावर अनमोल रत्ने आहेत. त्यामुळे माझ्याकडे ठेवून घेतले होते. ते अजूनही कपाटातच आहेत.”
शाश्वती यंत्रवत बोलत होती. तिच्या सर्व इंद्रियांवर रागिणीचा कब्जा होता. ती फक्त रागिणीच्या हुकुमाची गुलाम होती.
“जा, ते पैंजण त्वरित माझ्यासमोर घेऊन ये. विलंब करायचा नाही.”
“जी.”
शाश्वती तिला होकार देत आतल्या खोलीत रवाना झाली. मिनिटा-दोन मिनिटांत तिने ते पैंजण आणून रागिणीच्या हातात दिले. ते पैंजण पाहताच रागिणीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले.
“तुमच्यामुळे आम्ही खूप वेदना सहन केल्या. आता अश्रू ढाळण्याची वेळ तुमची आहे. माझ्याकडे पहा. मी इथे आलेच नव्हते. मी तुझ्याकडे काही मागितलेच नाही. विसरून जा याक्षणी काय घडले. माझा चेहरा विसरून जा."
रागिणी संमोहनातच तिला सर्व विसरायला भाग पाडत होती. शाश्वती डोक्याला घट्ट पकडून डोळे मिटून खाली बसली. तिच्यावर असलेले संमोहन उतरत आहे हे लक्षात येताच, रागिणी वायूवेगाने तिथून वनाच्या दिशेने निसटली. एवढ्या मध्यरात्री आपण दरवाजा उघडून असे का बसलो आहोत ह्या विचारानेच थरारून शाश्वतीने दार बंद केला व ती पुन्हा सोफ्यावर जाऊन बसली.
___________________________
रात्र झाली होती. आपल्या खोलीचे दार बंद करून मधुरिमा जागीच होती. तिचे इथे येण्याचे कारण विश्रांती घेणे हे नव्हतेच. कंकणाचा शोध घेणे आवश्यक होत्र. इतक्या रात्री ती कंकणाचा शोध घ्यायला बाहेर पडणार होती. स्वतःच्या ताकदीने ती काही क्षणांत हवेत अदृश्य झाली. ती अजूनही तिथेच उभी होती. मात्र कोणाच्या दृष्टीला पडणे कठीण होते. जिना उतरत ती खाली आली. वरच्या मजल्यावर फारशा खोल्या नसल्याने, वरती काही असण्याची शक्यता कमीच होती. तिने खालच्या एकेका खोलीत शोधयला सुरुवात केली. बराच वेळ शोध घेऊनही तिच्या हाती काहीच लागले नाही. सरतेशेवटी ती स्टोअररूमजवळ येऊन थांबली. एवढ्या सामानाच्या पसाऱ्यात काही असेल अशी कोणी कल्पनाही केली नसेल. ती तिथे धुंडाळू लागली. तिला तिथे एका कोपऱ्यात एक लॉकर दिसला. त्याची चावी तिच्याकडे नव्हती; परंतु तिचा हात लागताच आतल्या कंकणाचा ताप वाढू लागला आणि लॉकर आपोआप उघडला गेला. लॉकर उघडताच तिची नजर त्याच्यावर पडली, ज्याच्या शोधात ती इतका वेळ भटकत होती. मोहिनींच्या अस्तित्वाची जाणीव असणारे त्यांचे रत्नजडित कंकण. तिने स्पर्श करताच त्या कंकणाचा ताप कमी झाला होता. त्याच्यावर जडलेल्या रत्नांचा प्रकाश संपूर्ण खोलीत पसरला होता. मधुरिमा एक क्षणही तिथे न थांबता आपल्या खोलीत आली. खोलीत येताच तिने आपले मूळ रूप धारण केले व खिडकीतून आकाशमार्गे ती वनांमध्ये आली. युवराज्ञीच्या पावलांची चाहूल लागताच तिथे आजूबाजूला असणाऱ्या मोहिनी तिच्या स्वागताला एकत्र आल्या. पद्मिनीही सायंकाळ झाल्यावर आसनावरून उठली होती. त्यामुळे ती ही त्यांच्यात सामील होती.
“युवराज्ञी, इतक्या रात्री आपण वनात आला आहात?”
पद्मिनीने विचारले. मधुरिमाने तिच्या वस्त्रात त्याचे तेज झाकण्यासाठी लपवलेले कंकण बाहेर काढले व तिच्या हातावर ठेवले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना लपवता येत नव्हता. इतक्यात अरुंधती, वैजयंती, अलकनंदा आणि रागिणीही वनात आल्या. रागिणीने आपल्यासोबत आणलेले पैंजण मधुरिमासमोर धरले. मधुरिमाने ते पैंजणही पद्मिनीच्या हातात सोपवले. तिची नजर इतर तिघींवर गेली. त्या मान झुकवून उभ्या होत्या.
“युवराज्ञी, आम्ही बंगल्याचा छोट्यात छोटा भागही शोधला. आपल्या राजमुकुटाचा कुठेही शोध लागला नाही.”
अरुंधती शांतपणे म्हणाली.
“त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? त्या वस्तू इतक्या बहुमोल आहेत, की ह्या शलाकाने त्या अधिक जपून ठेवल्या असणार हे तर निश्चित आहे. चिंता नको. तुमच्या शोधकार्यामुळे मला एवढे तर लक्षात आले आहे, की वस्तू बंगल्यात नाही. त्यामुळे माझ्या शोधकार्याचा वेळ वाचला. अलकनंदा, तुझे कार्य इथे समाप्त होतेय. खऱ्या सुधाला सारे पढवून तिला बंगल्यात पाठवून द्या आणि तू आणि रागिणी राज्याभिषेकाची सज्जता करत घ्या.”
मधुरिमा अतिशय शांत दिसत होती.
“परंतु युवराज्ञी, राजमुकुटाविना...”
अलकनंदाला मात्र फार वाईट वाटले होते.
“आता त्याचा शोध मी घेईन. पौर्णिमा समीप येत आहे. तुम्ही केवळ सज्जता करा.”
सर्वांनी होकारार्थी मान डोलावली. मधुरिमा, अरुंधती आणि वैजयंती आपापल्या स्थानी परतल्या होत्या. अलकनंदाही खऱ्या सुधाला घेऊन बंगल्यावर गेली होती. रागिणी इतर सर्व मोहिनींना कार्य वाटून देत होती. त्यांच्या युवराज्ञीचा राज्याभिषेक म्हणजे दुर्धरवनात सोहळा होणार होता. अतिशय दुःखमय काळ समाप्त होत आला होता. त्यांची युवराज्ञी खऱ्या अर्थाने अभिषिक्त होणार होती आणि या कार्यात त्यांना कोणतीही कसर सोडायची नव्हती.
___________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा