Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २५)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २५) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

सकाळ झाली होती. शलाका पूजा आटपून बाहेर आली. अरुंधती नाश्त्याची तयारी करत होती. काल रात्री झालेला थरार कोणालाही ज्ञात नव्हता. अर्थात अरुंधती आणि वैजयंतीला त्या थराराची कल्पना होती. त्यांनी मधुरिमाचं विक्राळ रूप पाहिलं नसलं, तरी रात्रभर आसमंतात गुंजणाऱ्या तिच्या भयाण आवाजाच्या लहरी त्यांच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचल्या होत्या.

“अर्णव, तुझे डॅड कुठे गेलेत रे?”

“मॉम, डॅड सकाळपासून घरात नाही आहेत. मी सकाळी त्यांना डीलबद्दल सांगायला खोलीत आलो होतो; पण तिथे तर फक्त तू होतीस ना?”

“हो. ठीक आहे, असुदे. नाश्ता झाल्यावर मी कॉल करून पाहीन.”

“शलाका, मला फार अस्वस्थ वाटतं आहे गं.”

शाश्वती उदास दिसत होती.

“काय झालं? डॉक्टरला बोलवायचं का?”

“नाही गं. शारीरिक त्रास नाही. माझ्या मनात वेगवेगळ्या शंका येत आहेत. खूप अस्वस्थ वाटतंय. काहीतरी अघटित घडत आहे असा आभास होतो.”

“ते सगळे मनाचे खेळ आहेत, शाश्वती. रात्री झोप पूर्ण झाली नसेल किंवा वातावरणातील बदलामुळेही असू शकतं.”

दिग्विजयचं बोलणं पूर्ण झालं नव्हतं. इतक्यात मांत्रिक सूर्यभान धावतच बंगल्यात आला.

“शलाका ss...शलाका ss...”

          शलाका धावतच दाराजवळ आली. गुरुदेवांना एवढ्या सकाळी बंगल्यावर आलेले पाहून ती आश्चर्यचकित झाली होती. तिने त्यांना घरात बोलावून आसनावर बसवले. त्यांचा चेहऱ्यावर घाम साचला होता. पाणी पिऊन शांत होत ते म्हणाले.

“शलाका, मला माफ कर.”

         काहीतरी गंभीर विषय आहे हे लक्षात आल्याने शलाकाने सर्व मुलांना ताबडतोब घराबाहेर जायला सांगितले. मधुरिमा घरात आहे का नाही याची तिला कल्पनाही नव्हती.

“काय झाले गुरूदेव?”

दिग्विजयही त्यांच्या पायाशी बसत म्हणाला.

“मी विक्रमला नाही वाचवू शकलो. मोहिनींनी त्याचा बळी घेतला. मी आज सकाळी जागा झालो तेव्हा मला आठवतच नव्हते, की काल मला कधी झोप लागली. एका शिष्याकडून कळले, की काल तू आश्रमात आली होतीस; पण काल सकाळीच दिग्विजय येऊन गेलेला असताना तू आश्रमात येणे कसे शक्य होते? म्हणजे तुझ्या रूपात एखादी मोहिनी येऊन माझ्यावर संमोहनाचा प्रयोग करून गेली असावी. मी विक्रमचा मृत्यू नाही थांबवू शकलो, मुली.”

गुरूदेव उद्विग्न होऊन म्हणाले. शलाकाच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या जीवनसाथीच्या मृत्यूने ती आतून कोलमडली होती. दिग्विजय आणि शाश्वतीने तिला सावरलं; पण का कोणास ठाऊक आज ती दुर्बल दिसत नव्हती. विक्रमचा मृत्यू हे सांगत आहे की आपला मृत्यू जवळ आला आहे, हे तिच्या लक्षात येत होते. आता विक्रमदेवांच्या मृत्यूविषयी शोक करण्यापेक्षा स्वतः यापासून मुक्त होणे जास्त आवश्यक आहे, हे तिने जाणले होते. नाहीतर एकेक करून सर्वांचा जीव जाणार होता. ती गुरुदेवांसमोर हात जोडून बसली.

“गुरुदेव, आता मी काय करू? विक्रम गेले याचा अर्थ आता पुढची बळी मी आहे ना? मी किंवा शाश्वती किंवा दिग्विजय, हो ना?”

“हो मुली, हो. मोहिनींनी मृत्यूचा तांडव रचला आहे. एकेक करत सर्वांना त्या मृत्यू प्रदान करतील. अगदी मलाही मृत्यू देण्यासाठी त्या प्रयत्न करू शकतात; पण त्यांना ते शक्य नाही असे मला वाटत आहे. त्यांच्यापैकी कोणातच आता एवढी ताकद नाही, की त्या मला मारू शकतील. म्हणूनच त्यांनी मला निजवून विक्रमला मारले.”

“गुरुदेव, राहून राहून माझ्या मनात एक प्रश्न डोकावत आहे. हे का होतंय? कर्णिका परतलीय का?”

शाश्वती थरारून विचारत होती.

“असंभव! ती परत येणे संभव नाही; पण ह्या अनामिक मृत्यूतांडवाचा काहीतरी संबंध तिच्याशी नक्कीच आहे. आता तुम्ही घाबरू नका. मी आलो आहे. ती कितीही शक्तिवान असली, तरी माझी ताकद तिच्यापेक्षा अंमळ जास्तच आहे. मी ह्या चक्राचा अंत करेन. फक्त तुम्हांला आतापासून मी सांगतो तसंच करावं लागेल. दोन दिवस आपण मोहिनींची पुढे काही हालचाल होतेय का ते पाहू आणि मग पुढची पावले टाकू.”

“जशी आज्ञा गुरुदेव.”

तिघेही एकत्रच म्हणाले.

“तू एक काम कर. बंगल्याच्या तळघरात ठेवलेली ती हिरवीजर्द रत्नजडित पेटी घेऊन ये. कदाचित आपण तिच्या साहाय्याने काहीतरी करू शकतो.”

         गुरुदेवांच्या आज्ञेसरशी शलाका त्वरेने तळघरात गेली. तळघरात त्या अंधाऱ्या कोपऱ्यात आज प्रकाश होता. ते पाहून तिचं मन काहीसं साशंक झालं होतं. तिने ती पेटी उचलली व ती तळघरातून वर आली. इतक्या गुरुदेव देवखोलीतून दरदरून घाम फुटलेल्या अवस्थेत बाहेर पडताना तिला दिसले. तिने सोफ्यासमोरील कोचावर पेटी ठेवली व ती धावतच गुरुदेवांकडे गेली. शाश्वती आणि दिग्विजय गुरूदेवांच्या हाताला धरून त्यांना आसनावर बसवत होते.

“काय झाले गुरुदेव? आपण इतके घाबरला का आहात?”

दिग्विजय त्यांच्या पायाशी बसून विचारत होता.

“मुलांनो, मला वाटली त्यापेक्षा ही भीषण खेळी आहे. त्या मोहिनींसोबत कुठली काळी जादू किंवा अघोरी विद्या नाही, तर देवाची ताकद जोडली गेलीय. त्या मोहिनीने तुझ्या अनुपस्थित ह्या देवघरातही पाऊल टाकले होते. मुली, हा खेळ वाटतो तेवढा सोपा नाही.”

           गुरुदेवांचे बोल ऐकून शलाकाही पूर्णतः घाबरली होती. तरी तिला धीर देत गुरुदेव स्थिर बसले. कोचावर ठेवलेल्या त्या पेटीला त्यांनी हात लावला व चटका लागल्याप्रमाणे त्यांनी हात मागे घेतला.

“शलाका, ह्याभोवती मोहिनीचं शक्तीकवच वेढलं गेलं आहे. म्हणजे ती ह्यापर्यंतही पोहोचली होती. मी हे उघडू शकत नाही आणि ना ही तू उघडू शकतेस. ह्यातील तिच्या वस्तू ती कधीच घेऊन गेली आहे. तू म्हणालीस त्यात थोडं तथ्य आहे. कर्णिका परत आलेली नाही; पण तिची कोणीतरी निकटवर्तीय आहे, जी तिच्या मृत्यूची साक्षीदार आहे आणि तिनेच हा भयाण मृत्यूतांडव रचला आहे.”

गुरूदेव उदास चेहऱ्याने म्हणाले.

“गुरुदेव, आपली मुद्रा चिंतायुक्त दिसतेय. आता आपण कोणीच वाचणे शक्य नाही का?”

शलाका खिन्नपणे विचारत होती.

“इथून तरी नाही. त्यांच्या संमोहनाने त्या एकेक करत सर्वांना खेचून घेऊन जाणार. आपण शेवटचा प्रयत्न म्हणून त्या जंगलात प्रवेश करायला हवा. कदाचित ह्याचा उपाय तिथेच मिळेल.”

           असं म्हणून गुरुदेव शांत झाले. शलाकाने त्यांना हवी ती खोली घेण्यास सुचविले; पण त्यांनी देवघरातच राहणे पसंत केले. शलाकाही आपल्या खोलीत निघून गेली. ती निघून जाताच दिग्विजय आणि शाश्वतीही मुलांना आत बोलावून आपापल्या खोलीत निघून गेले आणि त्यांचा संवाद आपल्या खोलीतून ऐकणारी मधुरिमा हसली. ती मनातल्या मनात म्हणाली,

‘शेवटी तुम्ही अतीव भीतीच्या पडछायेखाली तोच निर्णय घेतलात, जो मला अपेक्षित होता. शलाका, तुझा दुर्धरवनात प्रवेश निश्चित आहे. तुझ्यासोबत हे तुझे मोहरेही वनात प्रवेश करणार. तुझ्या आयुष्यातली यापुढील तुझ्या मृत्यूपर्यंतची प्रत्येक रात्र वैऱ्याची आहे.’
                 
___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all