Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २७)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २७) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

सर्वजण झोपी गेल्यावर सर्व मोहिनी मधुरिमाच्या खोलीत आल्या. ती शांतपणे बसलेली होती.

“राज्ञी, आपण आम्हांला बोलावलेत का?”

अरुंधतीने विचारले.

“हो. त्या चारही जणांना उद्या एकाच वेळी मारणे मला योग्य वाटत नाही. प्रत्येकाच्या कर्मांचे फलित वेगळे आहे. उद्याचा दिवस फारच भयाण असणार आहे. तेव्हा आज मध्यरात्री आहुत्या पडणार हे नक्की आहे.”

“राज्ञी, फक्त नाव घ्या. त्यांना दुर्धरवनात कसे घेऊन जायचे, ही पूर्णतः आमची जबाबदारी आहे.”

रागिणी सेनापतीच्या साजाला योग्यच असे बोलली होती.

“शाश्वती आणि दिग्विजय.”

मधुरिमा आपला क्रोध कसाबसा आवरत म्हणाली. सर्वांचेच डोळे क्रोधाने पेटले होते.

“राज्ञी, आपण प्रस्थान करा. चंद्र वनाच्या मध्यभागी येण्याच्या आत दोघेही आपल्या चरणांपाशी असतील.”

वैजयंतीने तिला आश्वस्त केलं. मधुरिमाने होकारार्थी मान डोलावली.

“रागिणी, तुला माझे रूप घ्यायचे आहे. ते अतिशय योग्य ठरेल.”

मधुरिमा रागिणीकडे कटाक्ष टाकत म्हणाली. रागिणी आणि इतर सर्वजणी लहानपणापासून मधुरिमासोबत राहिलेली होत्या. तिच्या मनाची स्पंदने त्या ओळखू शकत होत्या. तिचा हा इशारा म्हणजे संकेत होता. त्या सर्वांकडे एक कटाक्ष टाकत मधुरिमा बाहेर पडली.

“मी राज्ञीचे रूप घेऊन माझे कार्य पूर्ण करून येईन. तुम्ही तोवर शाश्वतीला नेण्याचा आणि शलाकाचा बंदोबस्त करा.”

रागिणी इतर मोहिनींकडे पाहत म्हणाली. सेनापतीचा आदेश म्हणून सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या. त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे, हे त्यांना माहित होते. सेनापती किंवा राज्ञी दोघांपैकी एकीने ठरवलेली तीच योजना, इतकेच त्यांना ज्ञात होते. रागिणी मधुरिमाच्या रुपात दिग्विजयच्या खोलीत रवाना झाली. तिने दरवाजा ठोठावला. एक-दोनदा आवाज आल्यावर दिग्विजयने दार उघडला. बाहेर मधुरिमाच्या रूपात असणाऱ्या रागिणीला पाहून, त्याने तिला आत यायला सांगितले. ती ही खोलीत जाऊन पलंगावर शांतपणे बसली.

“मधुरिमा, तू आता इथे का आलीस? काय झालं, काही काळजी आहे का?”

दिग्विजयने काळजीने विचारलं.

“नाही. आज घडलेल्या प्रकारामुळे अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे मी तुमच्याजवळ आले.”

रागिणी उदास चेहरा ठेवून सांगत होती.

“ठीक आहे. हवं तर आज इथेच झोप.”

दिग्विजय तिच्याकडे पाहत म्हणाला. एकच चूक सर्वांच्या नकळत वारंवार होत होती. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताना माणूस पटकन त्याच्या डोळ्यात पाहतो आणि ही मोहिनींची सर्वात मोठी ताकद होती. रागिणीच्या डोळ्यांतील संमोहन दिग्विजयवर कधीच हावी झालं होतं. रागिणी उठून उभी राहिली आणि त्याला आपल्यामागोमाग येण्याचा इशारा करून ती बंगल्याच्या बाहेरच्या दिशेने चालू लागली. तोही तिच्या संमोहनाचा गुलाम असल्याप्रमाणे तिच्यामागून चालत होता. त्याला काहीही जाणीव नव्हती, की तो कुठे जात आहे. रागिणीची पावले जलद गतीने दुर्धरवनाच्या दिशेने पडत होती. दिग्विजयने तिच्यामागोमाग चालत काही वेळातच वनाच्या मध्यभागाची सीमा ओलांडली होती. सर्व मोहिनी मध्यभागात एकत्र झालेल्या होत्या. मधुरिमा तलावाकडे उद्विग्नपणे पाहत उभी होती. दिग्विजय त्यास्थानी आल्यावर रागिणीने त्याच्यावरील संमोहन काढून घेतले होते. संमोहन काढून घेतल्यावर त्याच्या प्रचंड प्रभावामुळे तो मूर्च्छित पडला. काही वेळात तो शुद्धीवर येणार होता.

___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all