Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २८)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २८) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

             इकडे अरुंधती, वैजयंती आणि अलकनंदा शांतपणे शलाकाच्या खोलीत शिरल्या. शाश्वती शलाकाच्या खोलीत झोपलेली असल्यामुळे थोडं चिंतेचं काम होतं. कोणाचीही चाहूल लागली, तर बंगल्यातील इतर सर्व नोकरचाकर जागे झाले असते. अलकनंदा आणि वैजयंतीने मिळून शाश्वतीला अलगद उचलले. त्यांनी आपल्या पायावर दाब देऊन ते उंचावताच, त्यांचे पाय हवेला समांतर तरंगू लागले होते. शाश्वतीला घेऊन त्या प्रस्थान करणार तोच शलाकाला जाग आली. तिला कित्येक दिवस रात्री न झोपण्याची सवय लागलेली असल्यामुळे ती उद्विग्नच असायची. मात्र पहिलं तिचं लक्ष तिच्यासमोर उभ्या असणाऱ्या अरुंधतीवर गेलं. एवढ्या रात्री अरुंधती इथे काय करत आहे, हा प्रश्न तिच्या मनात आलाच.

“अरुंधती, तू इथे काय करत आहेस?”

शलाका तिच्याकडे पाहत म्हणाली.

“झोप. निर्धास्तपणे झोप. मी तुझ्यासमोर आलेच नव्हते. तुला रात्री जाग आलीच नव्हती. तू झोपली होतीस आणि थेट उद्या सकाळीच उठणार आहेस.”

अरुंधती शलाकाच्या नजरेत पाहत संमोहनाचा प्रयोग करत होती. शलाकाने हळूहळू मान डोलावली व ती पुन्हा निद्राधीन झाली. डाव्या बाजूला अलकनंदा आणि वैजयंती शाश्वतीला घेऊन अजूनही तशाच होत्या. शलाकावर संमोहनाने त्याचे काम व्यवस्थित केलेले पाहून त्या तिघींनीही वनाकडे प्रस्थान केले. वनात येताच त्यांनी शाश्वतीला मूर्च्छित पडलेल्या दिग्विजयच्या बाजूला जमिनीवर ठेवले. त्या थंडगार जमिनीचा स्पर्श होताच शाश्वती शहारली. दिवसभराच्या ताणातून तिला गाढ झोप लागल्यामुळे जाग आली नव्हती. मात्र तितके थंड वातावरण पाहून तिने चटकन डोळे उघडले. ती एका दुर्गम वनात जमिनीवर झोपली होती. आपल्या शेजारी दिग्विजयला पाहून ती उठून बसली.

“दिग्विजय...अरे ए दिग्विजय, उठ. हे कुठे आलोय आपण? उठ रे.”

शाश्वती दिग्विजयला जोरजोरात हलवत होती. त्यामुळे दिग्विजयनेही कसेबसे डोळे उघडले. डोळे चोळत तो उठून बसला.

“काय झालं गं? एवढ्या रात्री का ओरडत आहेस? हे काय? कुठे आहोत आपण?”

त्यानेही आजूबाजूला पाहत विचारलं. दोघेही संभ्रमित झाले होते. आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं. इतक्या रात्री इतक्या दुर्गम वनात आपण का आणि कसे आलो ह्याचाही अंदाज लावता येत नव्हता. काही वेळात पूर्णतः शुद्धीवर आल्यावर दिग्विजयने, इकडेतिकडे पाहायला सुरुवात केली. तो तलाव, तो वृक्ष आणि तीच जागा त्याला दिसली. दिग्विजय थरारून उठून उभा राहिला.

“काय रे?”

शाश्वतीने त्याच्याकडे पाहत विचारलं.

“शाश्वती, अगं हे दुर्धरवन आहे. आपण मोहिनींच्या दुर्धरवनात आलो आहोत.”

“आपण मोहिनींच्या दुर्धरवनात कसे येऊ?”

शाश्वतीही उठून उभी राहिली. तिची उरलीसूरली झोपही उडाली होती.

“हो. हे बघ, इथेच आपण जीप पार्क केली होती. मी जीपमध्ये बसलो होतो. विक्रमसोबत तू व शलाका ते बघ तिथे होतात. तिकडे गुरूदेव होम करत होते. ह्या त्याच सगळ्या जागा आहेत. आपण अगदी त्याच ठिकाणी आहोत.”

त्याच्या घशाला कोरड पडली होती.

“दिग्विजय, अरे मग आपण एवढ्या रात्री इथे काय करतोय? मोहिनींनी तर...”

शाश्वती बोलता बोलता विचारानेच थरारली होती. मोहिनी त्यांना घेऊन आल्या होत्या हा विचारच किती थरारक होता. त्यांना कल्पनाही नसताना ते दूर्धरवनात पोहोचले होते.
___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all