Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २९)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २९) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

दिग्विजय आणि शाश्वती थरारून इकडेतिकडे पाहत असतानाच, त्यांना आपल्या आजूबाजूला पैंजणांचे आवाज येऊ लागले. त्या प्रदेशात अदृश्य असणाऱ्या मोहिनी एकेक करून त्यांच्यासमोर प्रकट होऊ लागल्या होत्या. त्या सर्वांच्याच नजरेत अतीव क्रोध दिसून येत होता. आपल्यावर रोखलेल्या लाखो नजरा पाहून दिग्विजय आणि शाश्वती एकमेकांना धरून उभे राहिले

“तुम्ही कोण आहात? तुम्ही मोहिनी आहात का?”

शाश्वती त्यांच्याकडे पाहत म्हणाली. इतक्यात त्यांना त्या घोळक्यात अरुंधती आणि वैजयंती दिसल्या. सर्व घटना त्यांच्या डोळ्यांसमोरून सरसर निघून गेल्या.

“काय झाले? काही स्मरत आहे का? हे स्थान, तुम्ही खेळलेली खेळी, यापैकी काहीतरी स्मरणात असेलच ना?”

वैजयंती कुत्सितपणे म्हणाली.

“तू इथे असणं कसं शक्य आहे?”

दिग्विजयचा अजूनही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

“अशक्य तर काहीच नाही. काही क्षणांत मोहिनींचे साम्राज्य आपल्या सर्वस्व मुकले होते. त्यामानाने हे तर काहीच नाही.”

त्या घोळक्यातून चालत मधुरिमा पुढे आली. तिच्या पैंजणांचा आवाज येताच सर्व मोहिनी दुतर्फा उभ्या राहिल्या होत्या. शाश्वती आणि दिग्विजयच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले होते. ती तीच होती; पण तिचा पेहराव बदलला होता. वनात राहणारी, वनकन्येसारखी दिसणारी ती नव्हतीच. राजवस्त्रे परिधान केलेली, आभूषणे ल्यालेली, मोहिनींची सम्राज्ञी त्यांच्यासमोर उभी होती. तो चेहरा ओळख दाखवत होता. कोणाची तरी प्रकर्षाने आठवण येत होती. इतके दिवस त्या चेहऱ्याला निरखूनही कधी आभास झाला नव्हता; पण आज, तिने तिचं संमोहन काढून घेतलं होतं. त्यांना जाणवत होतं की ती कोण आहे.

“तू कर्णिका आहेस ना?”

शाश्वती आणि दिग्विजयच्या तोंडातून एकाच वेळेस शब्द बाहेर पडले आणि तिची धीरगंभीर मुद्रा क्रोधाच्या परिवर्तित झाली. तिने चटकन पुढे येऊन शाश्वतीचा गळा आपल्या एका पंज्यात पकडला.

“मूढ स्त्री! कर्णिका हे मोहिनींसाठी पवित्र नाव आहे. ते तुझ्या अपवित्र मुखातून बाहेर पडणे हाही अपराध आहे.”

तिच्याकडे रागाने पाहत मधुरिमाने तिला जोरात सोडले. वेगाने ती वृक्षावर जाऊन आपटली. पाठीच्या कण्याची सारी हाडे मोडली असावीत, इतकी तीव्र वेदना तिच्या मणक्यात गेली होती. ती विव्हळत होती. दिग्विजय डोळे विस्फारून ते पाहत होता.

“मधुरिमा, तू काय करत आहेस? जरा ऐक.”

दिग्विजय तिला थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता.

“रागिणी.”

मधुरिमाचा तीव्र आणि क्रोधयुक्त आवाज वनात घुमत होता. रागिणीने लगेच मधुरिमाकडे पाहिले.

“ह्याला संपवण्यासाठी माझी आवश्यकता आहे का?”

तिने प्रश्न विचारला.

“नक्कीच नाही, राज्ञी.”

रागिणीच्या मुखातून शब्द बाहेर पडले न पडले तोच पापणी मिटायच्या आत रागिणी वाऱ्याच्या वेगाने दिग्विजयसमोर आली. तिच्यामागोमाग बऱ्याच मोहिनींनी त्याला वेढा घातला. वाटलं तर त्या त्याला क्षणांत नष्ट शकत होत्या; परंतु त्याला मारण्यासाठी त्यांना निर्दय बनायचं होतं. आपलं शांत रूप विसरून त्या निर्दयी बनल्या होत्या. त्यांच्याकडे एकवार पाहून मधुरिमाने आपली नजर पुन्हा शाश्वतीकडे वळवली. ती वेदनेने ओरडत होती. ती उठून उभी राहण्याचा प्रयत्न करणार तोच तिच्या पोटात लाथ बसली व ती परत कोलमडून पडली.

“मी काय केलं आहे?”

ती बोलण्याचा प्रयत्न करत होती.

“तुला खंजीर खूप प्रिय आहे ना? अगदी सराईतपणे तू खंजीर चालवतेस. त्याच खंजीराने आज तुला संपवू का? की माझ्या पावलांखाली झिजूनच मृत्यू हवा आहे?”

मधुरिमा अतिशय क्रूर आवाजात म्हणाली. किती विरोधाभास होता तो! “मी मधुरिमा.” म्हणून शांतपणे त्यांच्या आयुष्यात आलेली ती, क्रूरतेच्या अंतिम सीमेवर उभी होती.

“पद्मिनी.”

मधुरिमाने हाक दिली. इशारा लक्षात येताच पद्मिनीने खंजीर आणून मधुरिमाच्या हातात दिला. चंद्राच्या प्रकाशात तो खंजीर चमचमत होता. पापणी लवते न लवते तोच तो खंजीर शाश्वतीच्या उरात घुसला होता. एक हृदयद्रावक किंकाळी वनात घुमली. दिग्विजयच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मृत्यू जिवंतपणे समोर दिसत होता. त्या किंकाळीने तिथे कोणाचे मन हेलावले नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर तीच शांतता होती. इकडे मोहिनी दिग्विजयवर सतत शक्तींनी वार करत होत्या. त्याच्या शरीरातून रक्ताचे पाट वाहू लागले होते. मात्र मोहिनींच्या मनातील करुणा पार विरून गेली होती. उरला होता निव्वळ क्रोध! दिग्विजयवर केलेला प्रत्येक वार सूड होता. मोहिनींच्या बारा वर्षांपूर्वीच्या हानीबद्दलचा प्रतिशोध होता. मोहिनींची शक्तीस्थाने जाणून घेऊन दुर्धरवनात सर्वांना घेऊन येण्याबद्दल, मोहिनींचे सर्वस्व हिरावून घेण्याबद्दल, त्यांच्या अस्तित्वाचे, मान-मर्यादेचे प्रतीक असणाऱ्या वस्तू मानवी जगात नेण्याबद्दल,
त्यांच्या राज्ञीशी विवाहाची स्वप्ने पाहिल्याबद्दल, त्या त्याच्यावर वार करत होत्या. शक्तीचा उर्जाप्रवाह सहन न झाल्याने दिग्विजयचा मृत्यू झाला होता. मोहिनींनी त्या दोघांचे मृतदेह तलावात फेकले. मृत्यूचक्र आधीच पेटलेले असल्यामुळे त्या पाण्याने निसर्गाचे नियम उल्लंघले होते. पाण्यात अग्नी पेटला होता. काही क्षणांत ते देह भस्मसात झाले. मधुरिमाने एकवार तलावाकडे पाहिले व ती कोणाशीही काहीही न बोलता निघून गेली. तिच्या मौनाचे कारण मोहिनींना ज्ञात होते. अजूनही सर्वोच्च आहुती शेष होती.            
___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all