Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३०)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३०) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

गुरुदेव दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उठले व बंगल्याबाहेर थांबले. शलाकाही तयार होऊन बाहेर आली. तिने शाश्वती आणि दिग्विजय बंगल्यात नाहीत, हे गुरुदेवांना सांगितले. हे पाहून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच होती. आता फक्त शलाकाच होती. तिच्याच जीवाला मोहिनींकडून धोका होता. मोहिनी दैवी शक्तीच्या साथीने हा शक्तीप्रयोग करत असल्याने त्या नचिकेत किंवा सिद्धांतवर निष्कारण वार करणार नाहीत, हे गुरुदेव समजून चुकले होते. गुरुदेव आणि शलाका घरातून निघून गेल्यावर नचिकेत आणि सिद्धांत हे गूढ नक्की काय आहे ह्याचा शोध घ्यायला बाहेर पडले. आपल्या जीवाला काहीही धोका होणार नाही असे काहीसे गुरुदेव शलाकाला सांगत असलेले, त्यांनी ऐकले होते. ते जंगलाच्या सीमारेषेपाशी आले. त्यांना त्यात गूढ, निर्दयी असे काहीच जाणवत नव्हते. त्या जंगलाच्या रोमारोमात आणि मोहिनींच्या वास्तव्यातील त्या परिसरात एक पवित्रता होती. सर्वांसाठी हे वातावरण पवित्र असले, तरी हीच पवित्रता केवळ शलाकासाठी काळ बनून उभी ठाकली होती. कारण ती त्यांची अपराधी होती. ती पवित्रता त्यांना मोहवून टाकत होती. त्यांना आत जाण्याचा मोह आवरला नाही. ते दोघे सतत आत ओढले जाऊ लागले. हे जंगल त्यांना जणू आश्वस्त करत होते, की ते त्यांना कोणतीही हानी पोहचवणार नाही. ते तलावाच्या काठापर्यंत आले होते. आज लाखो मुली तलावाच्या काठी बसलेल्या त्यांना दिसत होत्या. ह्या दोघांना पाहताच मोहिनींच्यात कुजबुज सुरू झाली. अलकनंदा व रागिणी त्यांना नावाने साद घालू लागल्या. सिद्धांत मान वर करून पाहणार इतक्यातच नचिकेतने त्याचा हात दाबला व त्याला त्यांच्या डोळ्यांत न पाहण्यास सांगितले. त्या त्यांना मारू शकत नव्हत्या आणि डोळ्यात पाहीपर्यंत दोघेही त्यांच्या संमोहनाखाली येणेही अशक्य होते. गुरुदेव आणि शलाकाच्या बोलण्यातून त्यांनी लपून बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या.
इतक्यात त्यांच्या परिचयाच्या पैंजणांचा आवाज आला. पैंजणांचा आवाजही इतका मोहित करत होता, की ती कोण असावी याची उत्सुकता त्यांना होती.

“मला तुमचे धाडस आवडले. खरेतर मोहिनींच्या ह्या साम्राज्यात पवित्र जीवांना कधीच काही हानी पोहचवली जात नाही. तुम्ही दोघेही अतिशय चांगल्या मनाचे आहात. त्यामुळे मृत्यूचक्रात उभे असूनही तुमची विवेकबुद्धी जागृत आहे. मी तुम्हांला अभय देते. तुम्ही वर पाहू शकता.”

मधुरिमा शांत स्वरात म्हणाली. नचिकेतची बुद्धी आता त्याला वर पाहायला आग्रह करू लागली. तो आवाज, ते आश्वासन, तिच्या रोमारोमांत संमोहन होते; पण सिद्धांतनेही त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता.

“सावध हो, नचिकेत. शत्रूच्या बोलावर विश्वास ठेवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे.”

“मी तुमची शत्रू नाही, सिद्धांत. माझे अभयदान म्हणजे वचन समजा. मोहिनींची राज्ञी तुमच्याशी कोणताही शब्द असत्य बोलणार नाही.”

मधुरिमाचा शांत आवाज पुन्हा घुमला. अखेर तिच्या शब्दांनी आश्वस्त होऊन दोघांनीही नजर वर उचलली. तिच्या डोळ्यांत फक्त शांतपणा होता. तिने आपलं वचन पाळलं होतं. मोहिनीची कोणतीच झाक तिच्या डोळ्यांत नव्हती.

“मधुरिमा, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही एक मोहिनी आहात का? मग तुम्ही हे सगळं का करताय?स्वतःच्या बहिणीच्या घराचा असा विनाश करताना काहीच कसं वाटत नाही तुम्हांला?”

नचिकेत काहीसा चिडला होता.

“मी याचे उत्तर तुला आता देऊ शकत नाही; पण तुम्हांला हे कधी ना कधी कळणे गरजेचे आहे. तुम्ही या वृक्षावर कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने बसा. आज रात्री तुम्हांला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. विश्वास ठेवा.”

             मोहिनींनी त्या दोघांना वृक्षावर चढण्यास मदत केली. आज त्यांच्या जीवनातील मोठी रात्र होती. आजच्या रात्री त्यांच्या सुडाग्नीत तथा मृत्यूचक्रात शेवटच्या आहुत्या पडणार होत्या.
         
___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all