डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३३) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
“ती अमावस्या होती. माझे माता-पिता राजमहालात स्वस्थ बसले होते. नुकताच माझा यौवराज्याभिषेक करण्यात आला होता. मातेने तिच्या साऱ्या शक्ती मला प्रदान केल्या होत्या. माझी माता कर्णिका मोहिनींची अभिषिक्त राज्ञी होती. खरेतर तिला स्वप्नांमध्ये संकेत मिळाला होता, की मोहिनींच्या राज्यांवर मोठे संकट येणार आहे. त्यामुळे तिने हा यौवराज्याभिषेक घाईनेच उरकला होता. हे संकट तिच्यावर येऊ शकेल याचा तिळमात्रही विचार तिने केला नव्हता. मी राजमहालात माता-पित्यासोबत बसले होते. त्यांच्यात चाललेला संवाद पूर्णतः समजत नसला, तरी मनःपूर्वक ऐकत होते.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३३) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
“ती अमावस्या होती. माझे माता-पिता राजमहालात स्वस्थ बसले होते. नुकताच माझा यौवराज्याभिषेक करण्यात आला होता. मातेने तिच्या साऱ्या शक्ती मला प्रदान केल्या होत्या. माझी माता कर्णिका मोहिनींची अभिषिक्त राज्ञी होती. खरेतर तिला स्वप्नांमध्ये संकेत मिळाला होता, की मोहिनींच्या राज्यांवर मोठे संकट येणार आहे. त्यामुळे तिने हा यौवराज्याभिषेक घाईनेच उरकला होता. हे संकट तिच्यावर येऊ शकेल याचा तिळमात्रही विचार तिने केला नव्हता. मी राजमहालात माता-पित्यासोबत बसले होते. त्यांच्यात चाललेला संवाद पूर्णतः समजत नसला, तरी मनःपूर्वक ऐकत होते.
“आज अमावस्येची रात्र आहे. माझ्या स्वप्नांतील संकेतानुसार मोहिनींवर खरेच खूप मोठे संकट येणार नसेल ना? आपल्या राज्यात हाहाकार होईल असे काही घडणार आहे का?”
“नाही कर्णिका. तू मोहिनींची राज्ञी आहेस. तू असताना आपल्यावर कोणतेच संकट येणार नाही.”
शिवांश आश्वस्त शब्दांत म्हणाला.
“मी मोहिनींची राज्ञी असले, तरी आता खरे पाहता एक सामान्य मनुष्य आहे. आपणाशी विवाह केल्यावर मला मानवरूप प्राप्त झाले, तरी माझ्याकडे माझ्या अमाप शक्ती होत्या. त्याही मी काल मधुरिमाला प्रदान केल्या. कारण माझी मधू जगणे महत्वाचे आहे. तिच्यापुढे मला माझ्या जीवाची पर्वा नाही.”
त्यांचा संवाद चालू असेपर्यंतच मी निजले होते. इतक्यात त्यांना एक मोठी आरोळी ऐकू आली. कुठल्या तरी मोहिनीच्या किंकाळीचा आवाज होता. माझे माता-पिता धावतच राजमहालातून बाहेर पडले व याठिकाणी आले. अचानक आवाज आल्याने व मातापित्याला धावतच बाहेर जाताना पाहून मीही धावतच त्यांच्या मागोमाग जात होते. त्यांना मी मागे असल्याची कल्पना नव्हती. ते इथेच या तलावाकाठी आले होते. त्यांना दिसू नये म्हणून मी वृक्षामागे उभी होते.”
मधुरिमा त्या वृक्षाकडे बोट दाखवून बोलत होती. अचानक ती वेगाने त्या दोघांजवळ आली व आपल्या क्रोधयुक्त नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हणाली.
“तू इथेच होम करत होतास, मांत्रिका. तुझ्या होमात एकेक मोहिनी खेचली जात होती व तिची त्यात जणू आहुती पडत होती. हे पाहून माझी माता तुझ्यावर कडाडली.
“मूढ मांत्रिका! मी जिवंत असताना तू माझ्या मोहिनींवर मृत्यूचे सावट आणू शकत नाहीस.”
“माझी माता पूर्ण शक्तीनिशी तुझ्यावर तुटून पडली. तिची अफाट शक्ती तुझ्यावर भारी पडत होती. इतक्यात तिच्या कानावर आणखी एक किंकाळी ऐकू आली. ती माझ्या पित्याची होती. माझे पिता रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शाश्वतीने त्यांच्या छातीत खंजीर खुपसून त्यांचा वध केला होता. ती शलाका तिच्या बाजूला उभे राहून हे पाहत होती. माझे पिता एक सामान्य मनुष्य होते. का वध करण्यात आला त्यांचा? का? माझी माता शक्तीप्रयोग थांबवून माझ्या पित्याजवळ गेली. त्या साध्यासुध्या खंजीराने माझ्या मातेला मारणे शक्य नव्हते. म्हणून तू शाश्वतीजवळ येत तो खंजीर तिच्या हातातून घेतलास आणि काहीतरी मंत्र पुटपुटून शलाकाच्या हातात दिलास. माझी माता माझ्या पित्याच्या देहाला कवटाळून शोक करत असताना तू तिच्यावर मागून वार केलास. माझी माताही माझ्या पित्याशेजारी मृतवत पडली होती. मातेच्या आज्ञेमुळे मी ही वृक्षाची सीमारेषा ओलांडू शकत नव्हते. माझ्या मातेचा रत्नजडित मुकुट व इतर दागिने काढून घेऊन तू हातात घेतलेस. मोहिनींच्या राज्ञीच्या त्या सर्व बहुमोल अलंकारांना घेऊन तुम्ही जीपमध्ये बसलात. त्या जीपमध्ये विक्रमदेव आणि एक मानव होता. तो दिग्विजय होता हे मला काल समजले. मोहिनींकडील त्या अमूल्य वस्तूंसाठी तू माझ्या मातेचे मृत्यूकांड रचलेस. माझ्या मातेच्या उरल्यासुरल्या शक्ती या मांत्रिकात सामावताना मी पाहिल्या. तुम्ही निघून गेलात. त्यानंतर आम्ही सर्व धावतच तेथे गेलो. माझे पिता कधीच मृत झाले होते; पण माझी माता अजूनही शेवटच्या घटका मोजत होती. तिने तिचे क्षीण होत आलेले डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि ती म्हणाली,
“मधू...प्रतिशोध!”
पुढे काही बोलण्याच्या आत माझ्या मातेने मला आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेला, रक्ताळलेला तळहात माझ्या हातावर पडला. मातेला गतप्राण झालेले पाहून मी टाहो फोडला होता. मातेच्या रक्ताने माझे हात भरले होते.”
दोन्ही हातांनी गुरुदेव आणि शलाकाची मान पकडत मधुरिमा जवळजवळ किंचाळत म्हणाली,
“तब्बल बारा वर्षे तुमच्या रक्ताने माखायला हे हात आसुसलेले आहेत. तुम्ही केवळ माझ्या मातेला माझ्यापासून हिरावले नव्हते, तर लाखो मोहिनींच्या राज्ञीला, त्यांच्या सुरक्षाकवचाला, त्यांच्या छत्रछायेला त्यांच्यापासून हिरावून नेले होते. आता माझा प्रतिशोध पूर्ण होणार. आज तुमचा मृत्यू अटळ आहे.”
मधुरिमाने त्यांच्या धरलेल्या माना सोडल्या व अरुंधतीकडे पाहून इशारा केला. अरुंधती आधीच हातात खंजीर घेऊन उभी होती. तिने तो खंजीर मधुरिमाच्या हातात आणून दिला. मधुरिमाने गुरुदेवाच्या तथा त्या मांत्रिकाच्या हातात खंजीर दिला.
“मांत्रिका, आता स्वतःहून स्वतःच्या छातीत खुपसून घे तो खंजीर. कारण मी एका राज्ञीची पुत्री आहे. तुझ्यावर एवढे उपकार करूच शकते.”
गुरुदेवांच्या हातात खंजीर येताच त्यांनी तोंडाने काहीतरी पुटपुटायला सुरुवात केली. ते पाहून शलाकाच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. त्यांनी तोच मंत्र म्हणून खंजीराचा वार मधुरिमावर केला. पण कोण आश्चर्य, मधुरिमाच्या शरीरातून आरपार होऊनसुद्धा तिला हानी झाली नाही. मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने त्याच्या हातातून खंजीर खेचून घेतला व त्याला लाथेने ढकलत ती त्याच्या उरावर बसली.
गुरुदेवांच्या हातात खंजीर येताच त्यांनी तोंडाने काहीतरी पुटपुटायला सुरुवात केली. ते पाहून शलाकाच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. त्यांनी तोच मंत्र म्हणून खंजीराचा वार मधुरिमावर केला. पण कोण आश्चर्य, मधुरिमाच्या शरीरातून आरपार होऊनसुद्धा तिला हानी झाली नाही. मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने त्याच्या हातातून खंजीर खेचून घेतला व त्याला लाथेने ढकलत ती त्याच्या उरावर बसली.
“मांत्रिका, मी काही मनुष्य नाही की खंजीराने तू माझा अंत करू शकशील.”
मधुरिमाने निर्दयीपणे त्याच्या छातीत खंजीर खुपसला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. शलाकाच्या अंगावर तो थरार पाहून काटाच आला. मोहिनींनी कसेबसे मधुरिमाला त्या मांत्रिकापासून दूर आणले. तिचा चेहरा रक्ताने भरलेला होता. तशाच अवतारात ती शलाकाकडे वळली.
“तुझा मृत्यू तर माझ्याच हातून लिहिला आहे.”
तिच्यावरही तिने तसाच वार केला. मातापित्याच्या मृत्यूच्या वेदना तिच्या प्रत्येक वारात उमटत होत्या. प्रातःकाळ होत आली होती. सिद्धांत आणि नचिकेत हा थरार त्या वृक्षावरून बघत होते. मधुरिमा काहीशी शांत झाल्यावर ते वृक्षावरून खाली उतरले. त्यांनी मधुरिमासमोर हात जोडून आपल्या मातेच्या चुकीची क्षमा मागितली.
“सिध्दांत, नचिकेत, वैजयंती आणि अरुंधतीला घेऊन इथुन निघून जा. ह्या वनाची सीमारेषा ओलांडताच अरुंधती आणि वैजयंती हे सर्व विसरून जातील आणि तुम्हीही सर्व विसरून जाल. योग्य वेळेस तुम्हांला सर्व नक्की आठवेल. या आता.”
चौघांनीही मधुरिमाला वंदन केले. अरुंधती आणि वैजयंतीने भरलेल्या नेत्रांनी तिच्या चरणांवर मस्तक ठेवले व ते चौघेही बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. मधुरिमा हळूहळू तलावात उतरली. तिच्या शरीराला लागलेल्या रक्ताने पाण्याचा रंग लाल झाला होता. ती तलावातून वर आली तेव्हा तिचे शरीर पुन्हा नव्या तेजाने चमकत होते. तिच्या मातापित्याच्या बारा वर्षांपूर्वीच्या मृत्यूचा सूड तिने घेतला होता. तिने उगवत्या सूर्याला पाहून हात जोडले. तिने आपले दोन्ही हात आसमंतात फैलावून आपली शक्ती एकवटली. आपल्या शक्तीपासून तिने एक शक्तीपुंज निर्माण केला. त्या शक्तीपुंजाचे तेज साऱ्या दुर्धरवनात व्यापले होते. त्या शक्तीपुंजाचे पाहता पाहता दोन भाग झाले. सर्व मोहिनींच्या चेहऱ्यासमोर विलक्षण तेज पसरले. त्या तेजापासून संरक्षण होण्यासाठी त्यांनी आपल्या डोळ्यांवर हात धरले. तेजाचा आवेग कमी झाल्यावर सर्वांनी पाहिले. मधुरिमाच्या हातात दोन नवजात अर्भके होती.
“माझे येथवरचे कार्य समाप्त झाले. मला काही कालावधीसाठी जाणे गरजेचे आहे; पण पुन्हा मोहिनींच्या राज्याला राज्ञीला मुकायला लावण्याचा अधिकार मला नाही. म्हणून या दोन शक्तीपुंजाना इथे सोडून जातेय. तुम्ही आजीवन यांचे रक्षण कराल हा विश्वास आहे. हिरव्या आणि लाल वस्त्रात गुंडाळलेल्या ह्या मोहिनींची नवे अनुक्रमे प्रभृती व रक्तिमा ही असतील.”
त्या दोन्ही मोहिनींना राजसिंहासनावर ठेवीत मधुरिमाने सर्व मोहिनींकडे पाहिले. सर्वांचे डोळे पाणावले होते. तिने त्यांच्याकडे मी परत येईन अशा आश्वस्त नजरेने पाहत, तिने दोन्ही हातात खांद्याला समांतर आणले व पाहता पाहता ती त्या अफाट आसमंतात विरून गेली.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा