Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३४)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३४) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

बारा वर्षे लोटली होती. मृत्यूचक्राचा अंत झाल्यावर सर्व काही सुरळीत आणि शांत वाटत होते. सकाळ झाली होती. तो एक प्रसन्न दिवस होता. सकाळी साडेपाचचा गजर बंद करत अरुंधती खाली आली व तिने वैजयंतीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला.

“वेदा, उठ गं. किती वाजले बघ!”

           वैजयंतीला उठवून तिने आपली आंघोळ आटोपली. ती पूजेचं साहित्य तयार करत असताना आंघोळ न केलेली, डोळे अर्धवट उघडे असणारी वैजयंती म्हणजेच वेदश्री किचनमध्ये शिरली. तिची अवस्था पाहून अरुंधती हसायला लागली. बंगल्यात एकेक नमुने आहेत याची तिला खात्रीच होती. अरुंधती पूजा आटोपून बाहेर येणार तोवर वरच्या मजल्यावरून गजरचा आवाज येत होता.

“ए अरु, तो गजर बंद करा जा. ह्या गधड्या उठणारही नाहीत आणि गजरही बंद करणार नाहीत.”

वेदश्री स्वयंपाकघरातून ओरडत म्हणाली. अरुंधतीच्या संयमाची सीमा पार झाली होती. पूजेचं साहित्य व्यवस्थित ठेवत ती पहिली स्वयंपाकघरात आली. वेदश्रीच्या डोक्यात एक टपली मारत तिने गॅसचं बटण बंद केलं.

“नाश्ता जरा शुद्धीत तयार कर. जळका नाश्ता खायला घालायचा आहे का त्यांना? आणि हा काय अवतार आहे? आंघोळ कर जा.”

बाजूला भाज्या चिरत असणारी सुधा हे पाहून हसत होती.

“तू काय हसतेस? पटकन चहा ठेव. हिने नाश्ता तयार केला आणि चहा मला करायला ठेवलाय.”

अरुंधती तणतणत स्वयंपाकघरातून बाहेर पडली. भरभर जिना चढत ती आपल्या खोलीत आली. सिद्धांत काही काळजी नसल्यासारखं झोपलेला होता. बाजूची उशी घेऊन तिने त्याला फेकून मारली. तशी त्याची झोप चाळवली.

“सिद्धांत, उठ लवकर. गजर काय पूजेला ठेवलेत का? तुम्ही कोणी उठत तर नाहीत. उठ लवकर.”

“अगं अरु, मी आज ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. ह्यांच्या पॅरेन्ट्स मीटिंगसाठी जायचंय ना?”

“पॅरेन्ट्स मीटिंग इथेच होईल. उठ लवकर आणि जा त्या महाराणींना उठव. मला उठवायला यायला लागलं, तर इथेच मीटिंग होईल.”

अरुंधती बेडशीट आवरत म्हणाली. सिद्धांत जवळजवळ उडी मारत उठला आणि बाजूच्या खोलीकडे धावला. अरुंधती पुन्हा खाली आली. तिने नचिकेतच्या खोलीचा दरवाजा ठोठावला.

“नचिकेत...नचि...sss केत...sss”

            अरुंधतीचा चढलेला आवाज पाहून एक मिनिटांत दरवाजा उघडला. दुसऱ्या बाजूने वैजयंती नुकतीच आंघोळ करून येत होती.

“चला, तयार व्हा. ऑफिसमध्ये डील आहे ना आज तुझं? आणि तू गं. जा ते सँडविच बनव.”

अरुंधती सांगत होती.

“हो गं. ह्या घरात मी ना नोकरच झाले आ...”

वेदश्री अरुंधतीची खुन्नस पाहून न बोलताच स्वयंपाकघराकडे पळाली. नचिकेतही दहा मिनिटांत तयार होईन सांगून खोलीत गेला. शलाका आणि इतरजणांच्या मृत्यूनंतर हे सर्वजण परत आले होते. कोणालाही काहीही आठवत नव्हतं. अगदी हेही नाही, की त्या दोघी मोहिनी होत्या. शलाकाच्या मृत्यूपासून गायब झालेला अर्णव परत आलाच नव्हता. त्यावेळेस काही महिन्याची गर्भवती असणारी वैजयंती त्यांनंतर एकटीच मुलीचा सांभाळ करत होती. तसं म्हणायला एकटी नाहीच. अरुंधतीच वैजयंती, सिद्धांत, नचिकेत आणि दोन मुलींचं सारं पाहत होती. एक दिवस ती नसली तर सगळं रुटीन चुकेल, एवढी सर्वांना तिचा ओरडा खायची सवय झाली होती. सिद्धांत त्यांच्या राजकुमाऱ्यांच्या खोलीत गेला होता.

“गुड मॉर्निंग किडोज! हे काय आज तुम्ही एवढ्या लवकर उठलात?”

त्या दोघींनी पसरून ठेवलेली पुस्तकं पटकन मिटली.

“हो डॅड. आम्ही सध्या पुस्तकं वाचत आहोत. त्यामुळे आम्हांला लवकर उठावं लागतं.”

आदिरा अगदी नाटकी स्वरात म्हणाली.

“असं काय वाचत होतात? अभ्यास तर नक्कीच नसेल ना?”

सिद्धांतने हसत विचारले.

“नाही काका. आम्ही गोष्टीची पुस्तकं वाचत होतो.”

ताहिरा दात दाखवत म्हणाली.

“आदिरा आणि ताहिरा, तुम्ही खाली येताय का मी वर येऊ?”

अरुंधतीचा मोठ्याने आवाज आल्यावर दोघींनीही गडबडीने आवरायला घेतलं. सिद्धांत हसत खाली निघून आला. थोड्याच वेळात सर्वजण नाश्ता करण्यासाठी एकत्र जमले होते.

“मॉम, मला एक प्रश्न पडला आहे. विचारू का?”

“काही नको, ताहिरा. तू काय विचारणार आहेस? तुझे डॅड कुठे आहेत मला माहित नाही. त्यापेक्षा दुसरा काही प्रश्न असेल, तर तो अरुकाकीला विचार. ती हुशार आहे.”

वेदश्री आपल्यावरचं संकट अरुंधतीवर सोपवत होती. अरुंधतीने तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकला.

“काकी, तुला विचारू का?”

ताहिराने साळसूदपणे विचारलं.

“आता मी नाही म्हटलं, तर तुम्ही विचारणार नाही का? विचारा.”

अरुंधती वैतागत म्हणाली. दर दिवशीच्या वेगवेगळ्या प्रश्नांमुळे खरंच वैताग यायचा. त्या छोट्याशा मेंदूमध्ये किती ती जिज्ञासा!

“मोहिनी म्हणजे काय? त्या ज्या जंगलात राहतात, ते आपल्या शेजारी आहे का?”

अरुंधतीचा घास घशातच अडकला. तिने चमकून त्या दोघींकडे पाहिलं.

“तुम्हांला हे कोणी सांगितलं? कितीदा सांगितलं काहीतरी वाचत जाऊ नका. मी आज त्या पुस्तकांना फेकूनच देणार आहे.”

अरुंधती भयंकर चिडली होती.

“जाऊ दे, वहिनी. बाळांनो, तुम्ही पटकन तयार व्हा. आज तुम्हांला तुमचा काका सोडायला येणार आहे.”

आनंदी होत त्या दोघीही आपल्या खोलीकडे धावल्या.

“अरु, कशाला एवढी काळजी करतेस? त्या लहान आहेत. त्यांना त्यातलं काय कळतंय?”

“मला भीती वाटते गं. मोहिनी कोणी काळी शक्ती आहे म्हणे. शेजारीपाजारी बोलत असताना मी ऐकलंय. काही काळापूर्वी या जंगलातून त्या मोहिनींच्या विचित्र किंकाळ्यांचे आवाज यायचे म्हणे. आदिरा आणि ताहिराच्या डोक्यातून ते खूळ गेलं नाही, तर त्या नसत्या उपद्व्यापी आहेत.”

अरुंधती म्हणाली.

“अगं ठीक आहे. किती वेळ लक्षात ठेवणार त्या हे सगळं? थोड्या वेळाने विसरतील.”

सिद्धांत तिला समजावत म्हणाला.

“पण त्याआधी एकदा त्यांना विचारून घ्यायला पाहिजे, की त्यांना हे कुठून कळलं.”

वेदश्रीही शांतपणे म्हणाली.

“ठीक आहे. आपण त्यांना आज संध्याकाळी विचारू. चला, आता आवरूया. जायचं आहे.”

            सर्वजण आपापलं आवरत होते. अरुंधती मात्र फार चिंताग्रस्त होती. संध्याकाळी आदिरा आणि ताहिरा घरी आल्या. अरुंधती आणि वेदश्री जेवणाची तयारी करत असल्यामुळे त्यांना काही वेळ शांत राहावे लागले होते. आदिरा आणि ताहिरा थेट खोलीत गेल्या. आजकाल त्या शाळेत काय घडलं हे सांगत बसण्यापेक्षा खोलीत जाणं जास्त पसंत करत होत्या, हे अरुंधतीच्या नजरेतून सुटलं नव्हतं. रात्री जेवणापर्यंत घरातील सर्व वातावरण शांत होतं. जेवणानंतर हे चौघेही त्या दोघींच्या खोलीत आले. त्यांना आलेलं पाहताच आदिराने पटकन काहीतरी आपल्यामागे लपवलेलं अरुंधतीने पाहिलं. मात्र आता ओरडलो तर त्या काही एक सांगणार नाहीत, याची तिला कल्पना होती आणि खरोखरच त्या घाबरल्या होत्या.
       
___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all