Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३५)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३५) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

“चला, आम्हाला सांगा. सकाळी जे मोहिनींबद्दल सांगितलंत ते कुठून कळलं?”

वेदश्रीने विचारलं.

“वहिनी, जरा शांत व्हा. तुम्ही विचारताय की धमकी देताय त्यांना?”

नचिकेत वेदश्रीला शांत करत म्हणाला.

“आम्ही नाही सांगणार.”

ताहिरा आदिरामागे लपत म्हणाली.

“डॅड, मॉम बघ ना कशी बघतेय.”

आदिरा एकदा सिद्धांत आणि एकदा अरुंधतीकडे पाहत बोलत होती.

“आदिरा, काळजी करू नकोस. मॉम काहीही बोलणार नाही. ठीक आहे ना? डॅड असताना मॉम ओरडते का कधी? नाही ना?”

सिद्धांत आदिराला आश्वस्त करत म्हणाला. सिद्धांतच्या बोलण्यावर अरुंधतीचा शांत पवित्रा पाहून आदिरा शांत झाली. तिने आपल्यामागे लपलेल्या ताहिराला पुढे ढकललं.

“चल, आपण सगळ्यांना सांगायचं आहे.”

“हा. तू सांग.”

ताहिराची नजर वेदश्रीवरच खिळलेली होती.

“ठीक आहे.”

त्यांची आपापसात चर्चा सुरू होती.

“बरं, सांगा बघू तुम्हांला हे कसं कळलं?”

अरुंधतीला लवकरात लवकर ते जाणून घ्यायचं होतं.

“मॉम, आम्हांला ना एक जादूचं पुस्तक सापडलं. त्यातली अक्षरं ना, फक्त सूर्यास्तानंतरच दिसतात. बाकी वेळेस गायब होतात. दिवसा वाचायचा आम्ही खूप प्रयत्न केला; पण असं काही होत नाही. फक्त संध्याकाळ झाल्यानंतरच वाचू शकतो.”

“हे काय सांगत आहात तुम्ही?”

नचिकेतने चमकून त्यांच्याकडे पाहिले. नचिकेत मनातून घाबरला होता. त्याने अरुंधती, वेदश्री आणि सिद्धांतकडे पाहिले, तर त्यांची अवस्थाही काही वेगळी नव्हती; पण तसे न दाखवता नचिकेत म्हणाला,

“अरे वा! मग ही जादुई गोष्ट आम्हीसुद्धा वाचायला हवी. मलाही ते पुस्तक दाखवा.”

           आदिराने गादीखालून जाडजूड पुस्तक काढून नचिकेतच्या हातात दिलं. पुस्तकावर नाव होतं.

             मोहिनी - अदृश्य संमोहित साम्राज्य.

*****

             प्रातःकाळी सूर्यकिरणे वेगाने पसरू लागली होती. रक्तिमा आणि प्रभृती स्नान करून तयार झाल्यानंतर जणू गायबच झाल्या होत्या. साऱ्या मोहिनी त्यांना शोधत होत्या. मोहिनींचे रूप हे प्रकृतीला साजेसे असायचे. त्यामुळे या निसर्गात त्या सहज हरवून जात. रागिणी, अलकनंदा आणि पद्मिनी या मधुरिमाच्या सहकारी होत्या. लहानपणापासून त्यांनी रक्तिमा आणि प्रभृतीला अगदी जीव की प्राण करून जपले होते. मोहिनींच्या राज्ञीचे रक्षण हा त्यांचा धर्म होता आणि त्यासाठी आपली सर्व ताकद एकवटण्याची तयारी ठेवणाऱ्या त्या राजनिष्ठ मोहिनी होत्या. रक्तिमा आणि प्रभृतीच्या साऱ्या खोड्या आणि स्वभाव त्या अगदी बरोबर ओळखून होत्या. रागिणी, तसेच पद्मिनी आणि अलकनंदा वेगवेगळ्या वाटांनी त्यांच्या अपेक्षित ठिकाणी त्यांना शोधू लागल्या. रागिणी तलावापासून अतीव पश्चिमेकडे असणाऱ्या दाट वृक्षांमध्ये शोधत होती. इतक्यात रागिणीच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. समोर असणाऱ्या एका उंचशा वृक्षावर ती निवांत झोपली होती.

“रक्तिमा.”

           रागिणीचा आवाज कानी पडताच तिने बंद असलेले डोळे उघडले व रागिणीकडे पाहिले. लालभडक रंगाची तलम वस्त्रे परिधान केलेली रक्तिमा आपल्या लाल आणि गहिऱ्या डोळ्यांनी रागिणीकडे पाहत होती. जन्मतःच लालसर असणारे तिचे डोळे तिच्या स्वभावाला आणि रुपाला अगदी साजेसे होते. तसे पाहता सर्व मोहिनींचे डोळे काळेभोर असत; पण राजघराण्यातील या मोहिनींचे डोळे मात्र वेगळे आणि तेजयुक्त असायचे. महाराज्ञी कर्णिकांच्या डोळ्यांचा रंग थोडासा भुरा होता. तर त्यांच्या राज्ञी मधुरिमाचे जन्मतःच नीलवर्णी नेत्र होते. आता तिच्या या दोन्ही अंश आपापले भिन्न स्वभाव आणि भिन्न नेत्रांनी सर्वांना मोहित करत होत्या. रक्तिमा उठून उभी राहिली व जणू हवेत पायऱ्या उतरत असावी तशी वृक्षावरून खाली उतरली. रागिणीचे डोळे विस्फारले होते. मोहिनींच्यात ही कला फार नवीन होती.

“हे आपण कसे केलेत, रक्तिमा?”

रागिणी आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाली. रक्तिमा हसू लागली.

“ज्ञात नाही, माता. गेले काही दिवस पाहतोय. आम्हांला खूप काही करत येत आहे, जे खरेतर करणे अशक्य आहे.”

त्याच्या शक्ती समक्ष येत आहेत हे लक्षात आल्याने, रागिणी फक्त हसली.

“चला आता. सर्वजणी आपली आतुरतेने वाट पाहत आहेत.”      
___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all