डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३६) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
इकडे पद्मिनी आणि अलकनंदा प्रभृतीला शोधून शोधून थकल्या होत्या. रक्तिमासमवेत रागिणी तिथे येऊन पोहोचली. सर्व मोहिनी व्यथित दिसत होत्या.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३६) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
इकडे पद्मिनी आणि अलकनंदा प्रभृतीला शोधून शोधून थकल्या होत्या. रक्तिमासमवेत रागिणी तिथे येऊन पोहोचली. सर्व मोहिनी व्यथित दिसत होत्या.
“काय झाले? तुम्ही सर्वजणी अशा उदास का आहात? प्रभृती कोठे आहेत?”
रागिणीने विचारले.
“प्रभृती कुठेच दिसत नाही आहेत. आम्ही शोधून शोधून थकलो.”
पद्मिनीने चिंतेने म्हटलं. त्यांचे अवतार पाहून रक्तिमा मात्र हसू लागली. सर्वांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या.
“आपण प्रभृतीला कोठे शोधत होतात?”
रक्तिमाने हसत विचारले.
“येथेच या तलावाआसपासच शोधत होतो. शक्यतो त्या येथेच असतात; परंतु आज कोठेही दिसत नाहीत.”
पद्मिनीने सांगितले. रक्तिमा फारच जोरजोरात हसायला लागली. सर्वजणी चकित होऊन तिच्याकडे पाहत होत्या.
“तुम्ही याच परिसरात इतका वेळ शोधत होतात, तरी तुम्हांला प्रभृती दिसल्या नाहीत असे कसे झाले?”
रक्तिमा चालत चालत तलावाकाठी गेली. तिथे वृक्षांच्या पानांचा सडा पडला होता. तिने जमिनीकडे पाहून हात दिला. सर्व मोहिनी अजूनही विस्मयकारक नजरेने रक्तिमाकडे पाहत होत्या. अचानक जमिनीतून हात वर आला. ती जमिनीत अदृश्य झालेली प्रभृती होती. हिरव्याजर्द रंगाची वस्त्रे परिधान केली ती गौरवर्णी राजकन्या जमिनीत जणू विरून गेली होती. धरणीला तिच्यापासून विलग करणे कोणालाही सहजशक्य नव्हते. त्यामुळे मोहिनींना प्रभृतीला शोधणे कठीण गेले होते. रक्तिमाच्या हाताला हात देत प्रभृती उठून उभी राहिली. त्या दोघीही एकमेकांकडे पाहत हसत मोहिनींजवळ आल्या.
“हा काय प्रकार आहे, प्रभृती? तुम्ही दोघी आमच्या जीवाला व्यर्थ घोर का लावत होतात?”
रागिणी थोडेसे क्रोधित होत म्हणाली.
“देवी रागिणी, आपणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता. आम्ही फक्त आम्हांला नव्याने जाणवलेल्या शक्तींची परिपूर्णता तपासत होतो. क्षमा असावी. आमच्याकडून पुन्हा असे होणार नाही.”
प्रभृती अतिशय शांतपणे म्हणाली.
“ठीक आहे, प्रभृती. आपण कृपया क्षमा मागू नये. दोघींनीही यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपण राजकन्या आहात आणि आम्ही राजसिंहासनाच्या तथा आपल्या निष्ठावान सेविका आहोत. तेव्हा तुम्ही एखादा अपराध केलाही, तरी क्षमा करण्या न करण्याचा अधिकार आमचा नाही.”
अलकनंदा शांतपणे म्हणाली.
“आता आपल्या दोघांमध्ये सिंहासनारूढ कोण होणार एवढेच ठरवायचे आहे.”
पद्मिनी हसत म्हणाली. एवढे म्हणून सर्व मोहिनी त्यांच्याकडे पाहू लागल्या. त्या दोघीही एकमेकांकडे पाहत होत्या. क्षणांत त्या एकमेकींपासून काही अंतर दूर उभ्या राहिल्या. त्यांच्या वागण्यातला हा विरोधाभास न समजल्याने इतर मोहिनी व्यथित होऊन पाहत होत्या. रक्तिमा आणि प्रभृती एकमेकींकडे रागाने पाहत उभ्या होत्या.
“प्रभृती, तुम्ही मातांना देवी म्हटलेले आम्हांला पसंत नाही. तुम्ही त्यांना माता म्हणा.”
“त्या काय म्हणाल्या ऐकले नाहीत का आपण? त्या सेविका आहेत. खरेतर आम्ही देवी म्हणून त्यांना मान देतोय. आम्ही माता म्हणणार नाही.”
प्रभृती मान फिरवत म्हणाली.
“आम्ही तुमच्या ज्येष्ठ आहोत. तुम्हांला आमचा आदेश मानावाच लागेल. अन्यथा ह्याला आम्ही आमचा अपमान समजू.”
“तुम्ही ज्येष्ठ आहात ह्याला काय पुरावा? आणि आम्हीही राजकन्या आहोत. तुमच्या आदेशाचे पालन करायला आम्ही तुमच्या सेविका नाही. आम्हांला आदेश देण्याचा प्रयत्न करून तुम्हीही आमचा अपमान करीत आहात.”
“तुम्ही आमच्या क्रोधाला आमंत्रण देत आहात, प्रभृती. ह्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याची तुम्हांला कल्पना आहेच.”
“तुमच्या क्रोधाला जग घाबरत असेल; पण आम्ही नाही. तुमचा क्रोध आमच्या नखालाही धक्का लावू शकत नाही. तेव्हा आम्ही तुम्ही दिलेला कोणताही आदेश पाळणार नाही.”
रक्तिमाचे डोळे क्रोध ओकत होते. प्रभृतीच्या नजरेतही क्रोध दाटत होता. त्या दोघी एकमेकींसमोर आक्रमक पवित्रा घेऊन उभ्या होत्या.
“राजकुमारी, शांत व्हा. निर्णय घ्यायचे अधिकार राज्ञी आम्हांला देऊन गेल्या आहेत. तेव्हा तुम्ही व्यर्थ वाद घालू नये.”
अलकनंदा त्यांना थांबवत म्हणाली.
“अतिउत्तम! जर अधिकार तुम्हांला दिले आहेत, तर आम्ही तुम्हालाच सांगत आहोत. सिंहासनारूढ आम्हीच होणार. ह्या शांत आणि सहनशील वृत्तीच्या राजकुमारी (प्रभृती) वनाचे काय रक्षण करणार? ह्या स्वतःचे रक्षण करू शकल्या तरी उत्तम.”
“आम्हांला कमी लेखत जाऊ नका आणि खरेतर वनाला छोट्या छोट्या कारणावरून प्रलय आणणाऱ्या राजकन्येची गरज नाही. अशाने त्यांचे अतीव नुकसान होईल. तुम्ही आम्हालाच सिंहासनारूढ होण्याचा अधिकार द्याल अशी आशा आम्हांला आहे, देवी अलकनंदा.”
प्रभृती आणि रक्तिमाचे वाद विकोपाला गेलेले पाहुन मोहिनी संभ्रमित होऊन एकमेकांकडे पाहू लागल्या. अशा वेळेस कोणत्या राजकन्येच्या बाजूने उभे राहायचे, हे काही त्यांची राज्ञी सांगून गेली नव्हती.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा