Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३७)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३७) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

त्यांच्या चेहऱ्यावरचा संभ्रम पाहून अचानक प्रभृती आणि रक्तिमा एकमेकांकडे पाहत हसायला लागल्या.

“खरेच किती मोठा प्रलय झाला असता ना, जर आपण असे वाद घातले असते?”

रक्तिमा हसत म्हणाली.

“म्हणजे?”

सर्व मोहिनींच्या तोंडून एकाच वेळेस निघाले.

“आम्ही खरोखर वाद घालत नव्हतो, देवी. फक्त वाद घालून पाहत होतो. म्हणजे जर खरेच आम्ही वाद घातले आणि आमचे वाद विकोपाला गेले, तर काय होईल तर पाहत होतो.”

         सर्व मोहिनींनी सुटकेचा श्वास सोडला. त्यांच्या चेहऱ्यावरील सुटकेची भावना पाहून रक्तिमा आणि प्रभृतीही परत गंभीर झाल्या.

“आम्ही कधीही आपल्या आज्ञेबाहेर नाही, माता. आपण जे सांगाल ते आम्हाला सदैव मान्य होते आणि राहील.”

“आमचे तर मत आहे आपण रक्तिमांना हे राज्य द्यावे. कुठल्याही संकटाला त्यांच्याइतके शौर्य आणि क्रोधाने आम्ही तोंड नाही देऊ शकत. आमच्या क्रोधाला असणाऱ्या मर्यादा मोहिनींच्या ताकदीच्या मर्यादा ठरलेल्या आम्हांला आवडणार नाहीत. आम्ही आमच्या राजकन्येच्या अधिकारावरच आनंदी आहोत. आपण यौवराज्ञीपदाचा अभिषेक रक्तिमांनाच करावा.”

प्रभृती म्हणाली. त्या दोघी राजकन्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि साम्राज्याप्रती त्यांचे असणारे विचार पाहून सर्व मोहिनी भारावून गेल्या होत्या. शेवटी काहीही झाले तरी त्या दोघीही मधुरिमाच्या अंश होत्या. तिचे काही गुण त्यांच्यात उतरणे अगदीच साहजिक होते. 

“ठीक आहे. आपल्या इच्छेप्रमाणे उद्या सूर्यास्तानंतर रक्तिमा यांना युवराज्ञीपद प्रदान केले जाईल. चला, सर्वांनी उद्या सायंकाळच्या समारंभाच्या तयारीला लागा.”

अलकनंदा सर्वांना म्हणाली.

“राजकुमारी, तोपर्यंत आपण विश्राम करा आणि हो, कोणत्याही खोड्या न करता स्वस्थ बसा.”

रागिणी दोघींनाही दटावत म्हणाली.

“आमच्या प्रश्नांची उत्तरे आम्हांला कधी मिळतील?"

“चिंता नसावी, प्रभृती. तीही मिळतील.”

इतर मोहिनींनी आश्वस्त केले. प्रभृती आणि रक्तिमा एकमेकांकडे पाहत तलावाकाठी जाऊन बसल्या.

________________

         आज कधी नव्हे ती भल्या सकाळी आदिरा अरुंधतीच्या खोलीत आली होती. पलंगावर आरामात झोपलेल्या अरुंधतीला ती गदागदा हलवत होती.

“मॉम, अगं उठ ना. दहा वाजत आले. मला शाळेत जायचं आहे. मॉम!”

आदिरा वैतागली होती. अरुंधतीने कसेबसे डोळे उघडले आणि दचकल्यासारखी ती उठली.

“काय? दहा कसे वाजले? तुमचं आवरलं का गं?”

“हो काकी. आम्ही तयार झालो आहोत.”

मागून आलेली ताहिरा पटकन म्हणाली.

“मॉम, तू तयार हो आणि आम्हाला शाळेत सोड. आज डॅड आणि नचिकाका सकाळीच कामाला बाहेर गेले आहेत. तुला आज कसा काय उशीर झाला?”

“आदू, उशीर होऊ शकतो. आपण नाही का दररोज उशिरा उठतो? काकी, आज आम्हांला शाळेतून दोन दिवसांच्या सहलीला नेणार आहेत. चल ना लवकर.”

ताहिरा म्हणाली.

“सहलीला कुठे नेणार आहेत? मग सामानाचं काय केलंत? अरे देवा! आजच नेमकी मी उशिरा उठले. काय गं... तुम्हांला माहित होतं तर लवकर उठवायचं. हा सिद्धांतसुद्धा मला न उठवताच गेला.”

अरुंधती वैतागतच उठली.

“काकी, मॉमसुद्धा चेकअपसाठी गेली आहे. जायच्या आधी तिने सामान भरून दिलं.”

“मॉम, अगं चल ना. उशीर होतोय.”

आदिरा तिला हाताने खेचत म्हणाली.

“ठीक आहे. ही वेदश्रीही मला न उठवता गेली. तुम्ही खाली जाऊन थांबा. मी दहा मिनिटात येते.”

अरुंधती आदिराचा हात सोडवत म्हणाली. अरुंधती तयार होऊन खाली आली आणि त्या दोघींना शाळेत सोडायला निघून गेली. तिच्या मनात कसलीशी हुरहूर होती. तिच्या आयुष्यात एक अनामिक, अगम्य वळण येणार होतं, जे तिचं आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार होतं.
___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all