Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३८)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३८) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

त्या दूरवर पसरलेल्या कड्याकपारींमध्ये तिचा आवाज घुमला.

“अरुंधती, तुझ्याही नकळत तू काय करत आहेस, हे तुझ्या लक्षात येत नाही. कदाचित हे सारे मोहिनींना खूप मोठ्या प्रलयाकडे घेऊन जाणार आहे.
तुझे हे एक पाऊल घातक ठरणार आहे.
मोहिनींना आता धोका नाही. तरी कुठेतरी, कोणीतरी पुन्हा नव्या मृत्यूच्या सापळ्याचा आरंभ करत आहे. कोणीतरी अफाट शक्तीसहित चालून येणार आहे.
आता ना मी तुम्हाला वाचवू शकते आणि ना ही येणाऱ्या संकटाचा इशारा देऊ शकते. माझ्या हातात फक्त पाहत राहणे राहिले आहे. मला जाणवत आहे, की ठिणगी पडून गेली आहे. एका भीषण चक्राचा आरंभ झाला आहे.”

            तिचा आवाज थेट कोणापर्यंत पोहोचत नव्हता; पण तिचा आवाज आसमंतला साद घालत होता. तिचा संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे सध्यातरी अशक्य होते; पण कदाचित कधीतरी, कशाच्यातरी स्वरूपात, तो संकेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल हा तिला विश्वास होता. तिच्या पुनरागमनाने पूर्ण सृष्टी पुन्हा पल्लवित झाली होती. ती येणार हे निश्चित होते; परंतु काळ अनिश्चित होता.

____________________________

नचिकेत निरखून ते पुस्तक पाहत होता.

“बाळ, मी हे पुस्तक वाचायला नेलं तर चालेल का?”

“चालेल काका. आमचं तसंही वाचून झालं आहे.”

           आदिराने असं म्हणताच अरुंधती अविश्वासाने त्यांच्याकडे बघत होती. हा काही काळ्या जादूचा प्रकार आहे का, असे प्रश्न तिच्या मनात डोकावायला लागले होते. नचिकेतने त्यांच्या खोलीतून बाहेर येत ते पुस्तक अरुंधतीच्या हातात दिलं.

“वहिनी, मला आणि दादाला कामामुळे वाचता येणार नाही. तुम्ही शक्य तेवढं वाचा आणि आम्हालाही सांगा.”

“ठीक आहे.”

“अरु, तू आता फक्त या प्रकरणावर लक्ष केंद्रित कर. बाकी त्यांचा नाश्ता, डबे वगैरे मी पाहीन.”

वेदश्रीही नचिकेतच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. होकारार्थी मान डोलावत अरुंधती ते पुस्तक घेऊन स्टडीरूमच्या दिशेने जाऊ लागली.

“अगं स्टडीरूममध्ये जाण्यापेक्षा मॉमच्या खोलीत जाऊन वाच ना. सज्ज्यात बसून छान वाचता येईल.”

सिद्धांतने सुचवलं.

“अरे दादा, काय सांगत आहेस? त्यांना उद्या वाचायला सांग. आता एवढ्या रात्री कुठे चालल्या वाचायला?”

नचिकेतने म्हटलं.

“ती खूप हट्टी आहे. ती ते आताच वाचल्याशिवाय राहणार नाही, हे मला माहित आहे.”

          सर्वचजण मनापासून हसायला लागले. अरुंधती हट्टी होती हे अगदी खरं होतं.

“दादा, मॉम आठवते का रे तुला?”

नचिकेतने अचानक विचारलं. सिद्धांतचाही चेहरा पडला.

“नाही. ते एक नवलच आहे ना? मॉमचे आपल्यासोबत खूप फोटो आहेत. मात्र ती आता कुठे आहे? डॅड कुठे आहेत? हे काहीच आपल्याला आठवत नाही. असं कसं काय?”

तोही ह्या विचाराने अस्वस्थ व्हायचा.

“आता आपलं आयुष्य छान आहे ना? कशाला माहित नाही ते उकरून काढायचं? उगाच अस्वस्थता तेवढी वाढते आणि पर्यायाने भीती वाटत राहते.”

वेदश्री नेहमीप्रमाणे खराब मूडमध्ये होती.

“खरं आहे. आधीच काही कमी कोडी आहेत का, जी जास्त प्रकरणं उरकून काढत आहात? जा, जेवून घ्या. आदिरा आणि ताहिरालाही घेऊन जा. मला भूक लागली, की मी नंतर जेवून घेईन.”

           एवढं बोलून अरुंधती शलाकाच्या खोलीकडे वळली. तिने खोलीची कडी काढून दार लोटले. आत धूळ साचली होती. सुधाने ही खोली साफ केली होती की नाही, याचा विचार करत अरुंधती आत गेली. तिने लाईटचे बटण दाबले आणि सज्ज्याचा दरवाजा उघडला. बाहेर मंद वारा वाहत होता. अचानक वाऱ्याची सुंदर झुळूक तिला स्पर्शून गेल्यासारखं वाटलं. सज्ज्यातून दूरवर जंगल दिसत होतं. ते पाहताच तिला हातातून घेऊन आलेल्या पुस्तकाबद्दल आठवलं. तिने खोलीतून एक खुर्ची आणून बाहेर ठेवली व ती बाहेर सज्ज्यातच वाचत बसली. तिने पुस्तकाचं पहिलं पान उघडलं. पहिल्या पानावर राजवस्त्रे परिधान केलेल्या एका स्त्रीचं चित्र होतं. अरुंधतीने कथा वाचायला सुरुवात केली. तिचा भूतकाळ उलघडणारा खजिना तिच्या हातात होता.
___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all