डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४०) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४०) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
आज जंगलातील मध्यभागाला हजारो काजव्यांनी आपल्या प्रकाशाने उजळून टाकले होते. तलावाच्या आसपास खूप सुंदर सजावट करण्यात आलेली होती. सर्वजणी राजकुमारींच्या आगमनाची प्रतीक्षा करत होत्या. रक्तिमा आणि प्रभृती दुरून एकमेकांच्या साथीने चालत येताना त्या पाहत होत्या. रक्तिमाने पिवळसर रंग व त्यावर असणाऱ्या लाल रंगछटांनी उठून दिसणारी राजवस्त्रे परिधान केली होती. तिच्या मागून प्रभृती पुढे आली. रक्तिमाला पाहून भारावलेल्या नेत्रांनी सर्वांनी प्रभृतीकडे पाहिले. सर्वांचेच डोळे पाणावले होते. प्रभृती आज थेट आपल्या मातेचं रूपच भासत होती. तशीच केशरचना, नजरेत तशीच शांतता! या दोघींना पाहून मधुरिमाची आठवण सगळ्याच मोहिनींच्या डोळ्यात दाटली होती. सर्वजणी त्यांच्याभोवती जमल्या. रागिणीने पुढे होऊन रक्तिमाला तलावाकाठी उभे रहायला सांगितले.
चंद्राचा प्रकाश तिच्यावर पडताच ती एका दिव्य तेजाने चमकू लागली. तलावाच्या आतील भागातून एक राजसिंहासन बाहेर आले. आज ती राज्ञी बनणार नसली, तरी युवराज्ञी बनणार होती. सर्व शक्ती जरी तिच्या ठायी वसणार नसल्या, तरी तिच्यातल्या शक्तीला सिंहासनाच्या शक्तीची जोड मिळणार होती. सर्व मोहिनींनी तिला अभिषेक केला. राजसिंहासनावर बसताच शरीरात एक शक्तीयुक्त लहर गेल्याचं रक्तिमाला जाणवलं. त्या विशालकाय राजसिंहासनावर ती विराजमान झाली होती. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसून येत होते. सर्व मोहिनी तिच्यासमोर हात जोडून उभ्या होत्या. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत तिने राज्याचे रक्षण करण्याचे वचन दिले. काही कालावधीनंतर ती राजसिंहासनावरून खाली उतरली.
“युवराज्ञी, एवढ्यावर आपले कर्तव्य संपत नाही. आपणाला आजपासून सात दिवस अखंड याग करावा लागेल. आपल्यातल्या शक्तींना जागवावे लागेल. कितीही काहीही घडले तरी आपण हा नियम भंग करणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे.”
“नक्कीच माता. उद्या प्रातःकाळी आम्ही यज्ञाचा आरंभ करू.”
“आता तरी आपण आम्हांला आमच्या प्रश्नांची उत्तरे द्याल का देवी?”
प्रभृतीने उत्सुकतेने विचारले.
“हो, आता आम्ही सर्वजणी मिळून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ; पण त्याआधी आपण आम्हांला देवी किंवा माता म्हणणे सोडाचे. आपण आम्हांला आमच्या नावानेच हाक द्यावी आणि हे राजघराण्याचे नियम आपण जाणून घेणे अनिवार्य आहे.”
अलकनंदा शांतपणे म्हणाली.
“ठीक आहे.”
सर्व मोहिनी तलावाच्या परिसरातच धरणीवर बसल्या. दोन्ही राजकन्यांना बसायला त्यांनी आसने आणून दिली.
“आमची खरी माता कोण आहे? ती आता कोठे आहे? ती आम्हांला सोडून का गेली?”
प्रभृतीने विचारले.
“अलकनंदा, मला वाटते राजकुमारी आणि युवराज्ञी दोघींच्याही प्रश्नांची उत्तरे तू द्यावीस. जेणेकरून प्रश्नोत्तराच्या या मालिकेत कुठे खंड पडू नये.”
रागिणी अलकानंदाकडे पाहत म्हणाली.
“ठीक आहे. राजकुमारी, आपली माता म्हणजे आम्हां सर्वांची राज्ञी मधुरिमा या आहेत. त्या आता कोठे आहेत हे आमच्यापैकी कोणालाच ज्ञात नाही; पण त्या परत येतील असा विश्वास इथल्या प्रत्येकाच्या मनात आहे आणि तुम्हांला सोडून त्या का गेल्या याचेही उत्तर माझ्याकडे नाही. याचे उत्तर त्या परत आल्यावर तुम्हांला देतील. याबद्दल विश्वास बाळगा.”
सर्व मोहिनींनी त्यांना मधुरिमाच्या जाण्याआधीचे सारे प्रसंग सांगितले.
“परंतु ह्यात त्या अरुंधती आणि वैजयंती कोठे आहेत? शलाकाच्या घरचे बाकीचे आता कोठे असतात?”
प्रभृतीच्या मनात अतीव जिज्ञासा होती.
“शलाकाच्या घरचे इतरजण कोठे आहेत ते ज्ञात नाही आणि अरुंधती व वैजयंती कोठे आहेत हे आम्हांला सांगण्याची अनुमती नाही. क्षमा करा.”
“ठीक आहे. आपणांस जे सांगण्याची अनुमती नाही, ते आम्ही आपणाला सांगायचा आग्रह करणार नाही. आपण आम्हाला आमच्या मातेचे दर्शन घडवू शकता का?”
रक्तिमाने विचारले.
“प्रत्यक्ष तरी नाही; पण राजमहालात त्यांचे चित्र नक्कीच आहे. ते आम्ही आपणांस दाखवू शकतो.”
“कोणता राजमहाल? कोठे आहे?”
प्रभृतीने चमकून विचारले.
“राजकुमारी, मोहिनींचा स्वतःचा विशालकाय राजमहाल आहे; पण आपण त्यात प्रवेश करायला पात्र होत नाही, तोपर्यंत आपणाला त्यात प्रवेश मिळणे अशक्य आहे.”
रागिणी मधुरिमाचे महालातील चित्र घेऊन आली होती. तिने ते चित्र त्या दोघींच्या हातात दिले.
“हे राज्ञी मधुरिमांच्या यौवराज्याभिषेकाच्या वेळेचे चित्र आहे.”
रागिणी हसतमुखाने म्हणाली. रक्तिमा आणि प्रभृती त्या चित्राकडे पाहतच राहिल्या. हिरव्याजर्द रंगाची राजवस्त्रे परिधान केलेली, निळेशार डोळे असणाऱ्या मधुरिमाच्या रूपाची त्यांच्यावरही मोहिनी पसरली होती जणू! ती प्रत्यक्षात समोर आली तर कशी दिसेल, ह्या विचारानेच त्यांच्या अंगावर शहारा आला होता.
“प्रभृती, तर थेट यांच्यासारख्याच दिसतात. तेच रूप आणि तसाच शांत चेहरा आहे.”
रक्तिमा कुतूहलाने हातातील चित्राकडे आणि प्रभृतीकडे पाहत म्हणाली.
“ह्या आमच्या माता आहेत असे वाटतच नाही. ह्या अप्रतिम सुंदर आहेत. आम्हांला यांच्या रूपाची सर नाही. किती शांत डोळे आहेत त्यांचे! पाहताच कोणीही हरवून जाईल.”
प्रभृतीही त्याच चित्रात हरवली होती.
“युवराज्ञी, मध्यरात्र होत आली आहे. आपण दोघींनीही विश्राम करावा. उद्या प्रातःकाळी अनुष्ठान करून यज्ञास आरंभ करावा लागेल.”
अलकनंदा दोघींनाही चित्राच्या आकर्षणातून बाहेर आणत म्हणाली. दोघींनी ही होकारार्थी मान डोलावल्या. त्या दोघीही निजण्यासाठी जात तर होत्या; परंतु त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त तिचा चेहरा येत होता.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा