Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४१)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४१) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

आज सूर्यास्तानंतर अरुंधती पुन्हा ते पुस्तक वाचायला बसली होती. तिला फार उत्सुकता होती.

            आज आम्ही सहजच वनात विहार करत होतो. आम्हांला वनाच्या सीमेबाहेर काही घरे आणि वस्ती दिसली. मानव म्हणजे काय हे आम्ही मातेकडून ऐकून होतो; पण प्रत्यक्षात मानवाला पाहिले नव्हते. कुतूहलापोटी आम्हांला मातेच्या आज्ञेचे विस्मरण झाले होते. आम्ही साधा वेश परिधान करून वनाच्या सीमेबाहेरील मानवी जगात प्रवेश केला. आम्ही अनेक रस्त्यांवरून फिरलो; पण आम्हांला कोणी ओळखू शकले नाही. आम्ही दुपारच्या प्रहराला एका घराजवळच्या उद्यानात होतो. त्या घरात मोजकीच माणसे राहत असावीत. ती एक वृद्ध स्त्री एका मुलाला मनाला लागेल असे बोलत होती. तो मुलगा रागाने बाहेर निघून आला. पुढचे काही क्षण आम्ही दोघेही एकमेकांना निरखत होतो. अचानक दचकल्यासारखे त्याने मला विचारले.

“कोण आहात तुम्ही? इतक्या कडक उन्हातही तुमची सावली कशी दिसत नाही?”

शिवांशने दचकून विचारले होते. ते ऐकून आम्ही दचकलो होतो. आम्ही जरी मोहिनींच्या राज्ञी असलो, तरी मोहिनींच्या जीवनाचे सर्व नियम आम्हांलाही लागू होते. त्यात आमचा जन्म मानवापासूनही झाला नव्हता. त्यामुळे सावलीची सावली कशी दिसणार होती? आम्ही जीव मुठीत घेऊन तिथून पळू लागलो. तो मुलगाही आमचा पाठलाग करत होता; पण आमच्या वेगाने पळणे त्याला अशक्य होते. आमच्यानंतर बऱ्याच कालावधीने तोही वनात आला.

“मी जवळजवळ जंगलाच्या मध्यभागात आलोय. हा मोहिनींचा प्रदेश आहे. आपणही मोहिनी आहात का?”

धापा टाकत त्याने आम्हांला विचारले.

“हो. आम्हीही मोहिनी आहोत. आपण आमचा इथवर पाठलाग करण्याचे कारण काय?”

“खरं सांगावं तर आपल्याला पहिल्यांदा पाहताक्षणीच माझे मन आपणाला समर्पित झाले होते. आपण कोण आहात या उत्सुकतेपोटी पाठलाग करत इथवर आलो.”

त्याने नम्रपणे सांगितले.

“आपल्याही मनात ह्या मानवाबद्दल प्रेमभावना उत्पन्न झाली नाही ना, कर्णिका?”

आम्ही दोघांनीही चमकून मागे पाहिले. मागे माता कमलिनी उभी होती.

“प्रथमतः आम्ही आपल्या आदेशाचे उल्लंघन केले याबद्दल आम्हांला क्षमा करा. सत्य सांगावे तर आमच्या मनातही त्यांच्याबद्दल प्रेमभावना निर्माण झाली आहे.”

आम्ही स्पष्टपणे सत्य सांगितले.

“ती एक मोहिनी आहे. तिच्याशी विवाह करण्याने तुमच्या दोघांच्याही आयुष्यात विपरीत परिणाम होऊ शकतात ह्याची कल्पना आहे का तुला? काहीही भोगायची तयारी आहे का तुझी?”

कमलिनीने शिवांशकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकत विचारले.

“हो देवी. आपण म्हणाल ते स्वीकारायची माझी तयारी आहे.”

शिवांशही निश्चयाने म्हणाला.

“ठीक आहे. तुम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे, तर मी अडथळा बनू शकत नाही. मुळात मोहिनींच्या राज्ञीच्या इच्छा आम्ही अपूर्ण ठेवू शकत नाही. फक्त तुम्हांला परिणामांची जाणीव करून द्यावीशी वाटते.”

माता कमलिनी शांतपणे म्हणाली.

“आपण हे स्वीकारलेत याबद्दल धन्यवाद.”

आम्ही मातेचे आभार व्यक्त केले.

“कर्णिका, एका मानवाबरोबर विवाह झाल्याने तुला मानवी देह प्राप्त होईल. तुझ्या शक्ती सदैव तुझ्याकडे राहतील; पण तुझे छायास्वरूप तुला सोडून निघून जाईल. तुला होणारी कन्यासुद्धा मोहिनीच असेल आणि ती पुढील राज्ञी झाल्यावर तू तिला तुझ्या साऱ्या शक्ती प्रदान करशील. त्यानंतर तू केवळ एक सामान्य मानव राहशील.”

माता कमलिनीने आम्हाला सर्व परिणामांची माहिती दिली.

“आम्ही हे परिणाम स्वीकारायला तयार आहोत.”

आम्ही परिणामांना होकार कळवला.

“शिवांश, आपल्याला सदैव ह्या राज्यातच राहावे लागेल. ह्या राज्याची सीमा आपण पार करू शकत नाही. कारण आपण कोण्या इतर मोहिनीशी नाही, तर मोहिनींच्या राज्ञीसोबत विवाह करणार आहात.”

“आपले सारे आदेश मला मान्य आहेत, माता.”

(सर्व मोहिनींना उद्देशून)

“विवाहाची तयारी करायला मला मदत करा. आज रात्री ह्या दोघांचा विवाह संपन्न होईल.”

माता कमलिनी म्हणाली. माता निघून गेली होती. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मित केले आणि परिणाम स्वीकारायला सज्ज झालो. त्याच दिवशी रात्री आमचा विवाह थाटामाटात संपन्न झाला.

***

            आज जवळजवळ तीन वर्षांनी आमच्या राज्यात नव्या मोहिनीचे आगमन होत आहे. आमची कन्या, मोहिनींची नवी राज्ञी, आज पौर्णिमेच्या दिवशी जन्माला आली आहे. आमची ही मनमोहक कन्या जन्मतःच नीलवर्णी नेत्र घेऊन जन्मली आहे. तिच्या डोळ्यांचे नवलच वाटावे इतके ते सुंदर व गहिरे आहेत. कोणीही पाहता क्षणी त्यात हरवून जावे. त्या नीलवर्णीय डोळ्यांत असणारी विलक्षण मोहिनी आम्हांलाही सतत तिच्याकडे खेचून न्यायची. तिला समवयस्क आणि तिच्या साथीदार म्हणून अनेक शक्तीपुंजांची निर्मिती केली गेली. त्यातील पाचजणी तिच्या साथीदार म्हणून निवडण्यात आल्या. त्या म्हणजे–अरुंधती, वैजयंती, अलकनंदा, रागिणी आणि पद्मिनी. या तिच्या प्रत्येक कार्यात तिला साथ देणार होत्या. प्रत्येक वेळेस तिची ढाल बनणार होत्या.

            पुस्तकावरील अक्षरे प्रातःकाळ होताच हळूहळू विरून जात होती. अरुंधती मात्र त्या पुस्तकात आपले नाव वाचून साशंक झाली होती. कुठेतरी आपला या घटनाक्रमाशी नक्कीच संबंध आहे, हे तिला ज्ञात झाले होते. तीही आता हे रहस्य जाणून घ्यायला सज्ज झाली होती.
___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all