Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४३)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४३) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई


            जंगलात आज प्रातःकाळ झाल्यापासून रक्तिमा यज्ञ करण्यास बसली होती. तिला काहीही झाले तरी नियम भंग न करण्याची तंबी देऊन, इतर मोहिनी काहीशा दूर अंतरावर आपापली कामे करत होत्या. प्रभृती आजही त्या वृक्षाखाली बसून तलावात निरखत होती. सूर्यास्त होत आला होता. प्रभृती आपल्या नेहमीच्या वृक्षाच्या खाली निजण्यासाठी शय्या सज्ज करीत होती. त्या राजकन्या असल्या तरी त्या पात्र होईपर्यंत, त्यांना महालात प्रवेश नव्हता. सर्व मोहिनींनी महालात जाण्याचे रहित केले. आज सर्वजणी तलावाजवळ जमिनीवर निजणार होत्या. कारण त्यांच्या युवराज्ञीचे अनुष्ठान अखंड व्हावे. रक्तिमाच्या कानावर कोण्या मोहिनीच्या किंकाळीचा आवाज येत होता. तिने नेटाने यज्ञ सुरू ठेवला होता; पण युवराज्ञी म्हणून तिला कोणीतरी नावाने पुकारत होते. तिने डोळे उघडले व ती धावतच जंगलाची सीमारेषा ओलांडून बाहेर गेली. अमावस्येच्या रात्रीने खेळ साधला होता. पूर्ण शक्ती जागवण्याआधीच रक्तिमा एका नव्या मृत्यूचक्रात खेचली गेली होती. आता एकतर तिचा मृत्यू होणार किंवा ती मृत्यूचक्र संपवणार हे निश्चित होतं. रक्तिमा धावत जंगलाच्या सीमेबाहेर आली व त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. तो आवाज जंगलाबाहेरील एका काळ्या कातळाच्या प्रदेशातून येत होता. ती तिथे पोहोचली. तिथे एक मुलगी मरणासन्न अवस्थेत पडली होती. तिचीही सावली दिसत नसल्याचे पाहून रक्तिमाला खात्री झाली, की हीसुद्धा मोहिनी आहे. रक्तिमा तिला हात देणार तोच ती गुहेत पाठमोरी खेचली गेली. काय घडतंय हे कळायच्या आत ती आत खेचली गेली होती.

______________________

             सूर्यास्त झाला होता. नचिकेतने पुस्तक सुरुवातीपासून वाचायला सुरुवात केली. काही पाने वाचल्यावर त्याला अरुंधतीने ठेवलेला बुकमार्क दिसला. ह्यापुढचे पुस्तक तिनेही वाचलेले नाही हे लक्षात घेत त्याने पुढे वाचायला सुरुवात केली.

       आज प्रात:काळापासून आमचे मन आम्हांला व्यथित करत आहे. काही दिवसांपूर्वीच माता आणि तिच्या सहकाऱ्यांनी अग्निप्रवेश केला. त्यांचे कार्य समाप्त झाल्यावर त्या आनंदाने विलीन झाल्या. आम्हीही कधीतरी अशाच विलीन होऊ; पण आमच्या जबाबदाऱ्या अजून संपल्या नाहीत. आमच्या मोहिनींवर काहीतरी विक्राळ आणि मोठे संकट येणार असे जाणवते आहे. म्हणून आम्ही आज आमच्या पुत्रीचा, मधुरिमाचा यौवराज्याभिषेक करणार आहोत. आमची मधु लहान असली, तरी दैवी आहे. येणारे संकट तिच्यावरच असू शकते. त्यामुळे आम्ही आमच्याकडील सर्व मुख्य शक्ती तिला प्रदान करु. अर्थात तिच्याकडून त्या सर्व अनुष्ठानाने सिद्ध करून तिचा राज्याभिषेक झाला, की मग आम्ही सामान्य मनुष्यात परिवर्तीत होऊ. आमची मधू मोहिनींचे रक्षण करायला समर्थ आहे. त्यामुळे तिला अभिषेक करवून घेणे आम्हांला अत्यंत आवश्यक वाटतेय.

नचिकेतने जे पाहिलं त्याने त्याला धक्का बसला होता. पुढील अक्षरं लालभडक रंगात जणू काही रक्ताळलेली असावी अशी उमटत होती. ती कर्णिकाच्या मृत्युनंतरची घटना होती. ती एका राज्ञीने नाही तर सामान्य मानव रुपातल्या कर्णिकाची कथा होती.

           आज मला त्या पाप्यांनी छळाने मारले. माझ्या समोर माझ्या शिवांशचा मृत्यू झाला आणि शोकव्याकुळ मला त्यांनी मागून वार करून संपवले. शलाका, विक्रमदेव, शाश्वती, दिग्विजय आणि मांत्रिक सूर्यभान हे माझे अपराधी आहेत. मी माझ्या मधूला काही पूर्णपणे सांगूही शकले नाही. माझा रक्ताळलेला हात हातात घेऊन ती रडत होती. मला माहित आहे मी अजून मुक्त झालेले नाही. मी जिवंत आहे. फक्त शरीराने नाही. माझ्या मधूच्या डोळ्यात प्रचंड रागाचा उद्रेक मी पाहिला.

***

             आज माझ्या मृत्यूला काही वर्षे पूर्ण झाली. मधूची मधुरिमा होण्यापर्यंतचा सारा प्रवास मी पाहत होते. तिने आपल्या शक्ती जागवल्या आहेत. तिच्याकडे माझ्यापेक्षाही अफाट शक्ती आहे. काही मी दिलेल्या, तर काही दैवी, तिच्या अशा शक्ती आहेत. इतर कुठल्याही मोहिनीला शक्य नाही अशी कालचक्राला, नियतीला आपल्यासमोर झुकवण्याची ताकद तिच्यात आली आहे. तिने आखलेल्या मृत्यूचक्राला काळ साथ देईल. ती माझ्या मृत्यूचा सूड घेईल असा मला विश्वास आहे.

नचिकेत भारावून ते वाचत होता.

             आज प्रतिशोधाचे चक्र पूर्ण झाले. मधूने त्यांचा विदारक मृत्यू घडवून आणला. माझ्या मृत्यूचा राग तिच्या नसानसांत भिनला होता. माझ्या पाठीत खंजीर खुपसताना, ते विचलित झाले नव्हते. अगदी तसेच माझ्या मधूचे हात थरथरले नाहीत. आज मी आसमंतात विलीन होईन. शिवांश आणि मी आज तृप्त मनाने मुक्त होऊ. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील, मधू.
अखंड चिरंजीवी भव!

नचिकेत झपाट्याने सगळं वाचत चालला होता. पुढील अक्षरे नीलवर्णी होती. गडद निळ्या रंगात उमटलेली ती अक्षरे वाचून नचिकेत जवळजवळ भानावर आला होता. मधुरिमाने अरुंधतीला दिलेल्या संदेशातील शब्द तिथे उमटले होते. प्रलयाची कल्पना दिली होती आणि अरुंधतीला जागं होण्याचा इशारा दिला होता.

___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all