Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४४)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४४) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

            पुढील पानावर तिचे चित्र पाहताच नचिकेतच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. जणू त्याच्या स्मृती पुन्हा नव्याने जागल्या होत्या.

“मधुरिमा.”

नचिकेतच्या तोंडातून अडखळत शब्द बाहेर पडले. त्यांची मधुरिमा त्यांना साद घालत होती. राजवंशाच्या रक्षणासाठी, मोहिनींच्या भविष्यासाठी साद घालत होती.
वेदश्री, सिद्धांत आणि अरुंधती घरी आले. अरुंधतीच्या खोलीत नचिकेत अश्रू ढाळत बसलेला पाहून ते तिघेही त्याच्याजवळ आले. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. त्याने त्यांना सर्व मजकूर सांगितला. सिद्धांतलाही आठवत होती ती रूपगर्विता मधुरिमा! वेदश्री आणि अरुंधती मात्र अजूनही साशंक होत्या.

“या सर्वांशी माझा काहीतरी संबंध आहे; पण काय हे मला कळत नाही.”

अरुंधती म्हणाली.

“मलाही हे सारं ओळखीचं वाटत आहे; पण नीट आठवत नाही.”

वेदश्रीचीही तीच अवस्था होती. नचिकेत आणि सिद्धांतने त्यांना त्या बंगल्यात आल्यापासून काय काय घडलं ते सांगायला सुरुवात केली. कारण ते मनुष्य होते. त्यांच्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टी त्यांना सहज आठवल्या होत्या. मात्र त्या दोघी मोहिनी होत्या. त्यांच्या राज्ञीच्या वक्तव्यानुसार दुर्धरवनाची सीमा ओलांडताच त्यांच्या स्मृती खोल विस्मृतीत गेल्या होत्या. एवढे सांगूनही त्यांना काहीच आठवत नव्हते. त्या आपल्या मोहिनी स्वरूपाची जाणीव विसरून बसल्या होत्या.

“दादा, आता आपण सगळे मिळून जंगलात जाऊ. मोहिनींच्या राजवंशाला अरुंधती आणि वैजयंतीची गरज आहे आणि आदिराही मोहिनी आहे.”

नचिकेत शांतपणे म्हणाला. अरुंधती आणि वेदश्रीपासून थोडं दूर येऊन नचिकेत सिद्धांतला सगळं सांगत होता. सिद्धांतचे डोळे विस्फारले गेले. अरुंधती खिडकीतून बाहेर बघत होती. तर वेदश्री म्हणजे वैजयंती पायाच्या अंगठ्याकडे टक लावून पाहत होती.

“आपण त्या वनात जाऊया.”

अरुंधती आणि वेदश्री एकत्रच म्हणाल्या. 

“आता आपल्या प्रश्नांची उत्तरे हे दुर्धरवनच देईल. आपण लगेच निघू.”

          आपले मनोदय अरुंधतीच्या मुखातूनच स्पष्ट झाल्याने सिद्धांत आणि नचिकेत आनंदी झाले होते. ते पाचही जण जंगलाच्या दिशेने जाऊ लागले.

_______________________________

           दुर्धरवनात हाहाकार माजला होता. युवराज्ञी रक्तिमा गायब झाल्या होत्या. मोहिनींच्या अफाट शक्तींनी सुरक्षित त्या वनप्रदेशात कोणा दुष्ट शक्तीचा मोहिनींच्या इच्छेशिवाय प्रवेश होणे अशक्य होते. याचा अर्थ युवराज्ञी स्वतः नियम मोडून वनाच्या सीमेबाहेर गेल्या आहेत हे सर्वांच्या लक्षात आले होते.

“अघटित! हे निव्वळ अघटित घडले आहे.”

अलकनंदा उत्तरली.

“काय झाले अलकनंदा?”

पद्मिनीने विचारले.

“युवराज्ञी शक्ती न जागवताच वनाबाहेर गेल्या आहेत. विरूध्द शक्ती अतिप्रबळ असली, तर त्यांना स्वतःचे संरक्षण करता येणार नाही.”

अलकनंदा व्यथित स्वरात म्हणाली.

“काळरात्र चालू आहे. अमावस्या उद्या सायंकाळी संपणार आहे.”

रागिणीही भयभीत झाली होती.

“आपल्याला युवराज्ञीच्या संरक्षणाला जावेच लागेल; पण त्यापूर्वी राजकुमारी प्रभृतींना यज्ञाकरिता बसावे लागेल. नाहीतर वनसीमाही असुरक्षित होतील.”

अलकनंदा लगेच म्हणाली. रागिणी धावतच प्रभृतीला शोधत झाडापाशी आली.

“राजकुमारी!”

रागिणीच्या आवाजात कंपने जाणवत होती. प्रभृतीने आपले मिटलेले डोळे उघडले.

“काय झाले? आपण इतक्या व्यथित का दिसत आहात, देवी रागिणी?”

रागिणीने तिला सर्व घटना समजावून सांगितली.

“नाही, आपण नाही. रक्तिमांच्या साथीला आम्ही जाणार. आमच्या भगिनीवर वार करण्याची इच्छाही कोणाला कशी होऊ शकते?”

ती रागारागातच मध्यभागात आली.

“राजकुमारी, आपण जाऊ शकत नाही. आपली कर्तव्ये आपण उल्लंघलेली राज्ञी मधुरिमांना पसंत येणार नाहीत आणि आपण यज्ञाकरिता बसला नाहीत, तर वनसीमाही असुरक्षित होऊन लाखो मोहिनींचा विनाश होईल.”

अलकनंदा तिला परिस्थितीचे गांभीर्य समजावत म्हणाली. शेवटी प्रभृती तयार झाली. अलकनंदाने तिला काहीही झाले तरी वनातून बाहेर न पडण्याची ताकीद दिली व बऱ्याच मोहिनी तिच्याभोवती घेराव घालून उभ्या राहिल्या. मोहिनींची एक तुकडी रक्तिमाच्या शोधार्थ वनातून बाहेर पडली.

___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all