Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४६)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४६) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

             सर्वजणी ताहिराला उठवायचा प्रयत्न करत होत्या; पण ताहिरा मात्र बेशुद्धच होती. सर्वांचे चाललेले प्रयत्न राजकुमारी प्रभृती पाहत होती. वैजयंतीच्या चेहऱ्यावरून ती तिचीच मुलगी आहे, हेही प्रभृतीच्या लक्षात आले होते. दूरवर बसलेली प्रभृती ताहिराला अशा अवस्थेत बघून तिच्याजवळ आली. ती जवळ येताच सर्व मोहिनी दूर झाल्या. तिने ताहिराचा हात हातात घेतला. तिच्या स्पर्शात जणू जादू असावी तशी ताहिरा शुध्दीवर येऊ लागली. ही तिची ताकद आहे हे मोहिनींच्या लक्षात आले होते. तिने डोळे उघडून वैजयंतीकडे पाहिले.

“मॉम.”

“थांब हा बाळा. मी उठवते ना तुला. हळूहळू उठ.”

वैजयंती तिला हळूहळू सावरत म्हणाली. वैजयंतीच्या हाताला धरून ताहिरा उभी राहिली होती. तिने जवळ उभ्या असणाऱ्या आदिराला मिठी मारली.

“तुला माहित आहे का, आपण मोहिनी आहोत. मॉम आणि काकीही मोहिनी आहेत.”

आदिरा तिला कुतूहलाने सांगत होती.

“हं, मला माहित आहे.”

आपल्या स्वभावाविरुद्ध ताहिराचा आवाज एकदम गंभीर होता.

“ताहिरा, तू कुठे होतीस बाळा? तुला शोधायला म्हणून आम्ही इथे आलो होतो. अचानक कुठे गायब झालीस तू?”

वैजयंतीने चिंतीत स्वरात विचारलं.

“मॉम, त्या दिवशी जंगलातून कोणीतरी मला बोलवत होतं. मी आवाजाच्या मागे गेले, तर तिथे एक काकी होत्या. त्यांनी मला सांगितलं, की त्या मोहिनी आहेत आणि त्यांना एक दुष्ट चेटकिणीला मारायचं आहे. मी पुस्तकात वाचलं होतं, की मोहिनी चांगल्या शक्ती आहेत. त्यांना माझी मदत पाहिजे होती. त्यांनी मला जंगलाच्या बाहेर असणाऱ्या खडकावर उभं राहायला सांगितलं आणि युवराज्ञी म्हणून जोरात हाक मारायला सांगितली.”

           सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले होते. तिच्या तोंडून रक्तिमाचे नाव आलेले पाहून त्यांना रक्तिमाच्या हत्याऱ्याला शोधणे सहज शक्य होणार होते.

“मग मी तसं केलं. लाल रंगाचा ड्रेस घातलेली एक सुंदर मुलगी तिथे आली आणि ती मला मदत करायला पुढे येत होती. तेवढ्यात ती त्या काकीच्या गुहेत खेचली गेली. मग मीही उठून गुहेत गेले. तिथे नंतर मला कळलं, की ती काकी मोहिनी नव्हती आणि तिने ज्यांना मारलं त्या मोहिनींच्या युवराज्ञी रक्तिमा होत्या.”

            पुढे ताहिरा काही बोलणार तोच तिच्या जोरात कानाखाली बसली. त्या धक्क्याचे बळ एवढे होते, की ती जवळजवळ कोलमडून जमिनीवर कोसळली. तिच्या कानाखाली जिने मारलं, ती वैजयंती क्रुद्ध नजरेने तिच्याकडे पाहत होती.

“युवराज्ञीचा मृत्यू कोणाच्याही हातातून झाला असला, तरी त्याला कारणीभूत तू आहेस. माझ्या युवराज्ञीचा प्राण घेणाऱ्या कोणालाही मी माफ करू शकत नाही. मग ती माझी मुलगी असली, तरी हा अक्षम्य अपराध आहे.”

वैजयंती पुन्हा ताहिरावर हात उगारत म्हणाली. तिने उगारलेला हात मधेच रोखत अरुंधतीने तिला बाजूला खेचले. याक्षणी सर्व शांततेत घेणे आवश्यक होते. ताहिराची शारीरिक स्थितीही नीट दिसत नाही, हे अरुंधतीच्या लक्षात आले होते.

“शांत हो, वैजयंती. तिला पूर्णपणे बोलू दे. आपल्याला युवराज्ञीच्या हत्याऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.”

अलकनंदा वैजयंतीला समजावत म्हणाली. अलकनंदा आणि रागिणीने मिळून ताहिराला उठवले. ती रडकुंडीला आली होती. त्या ताहिराला पुढे काही बोलायला सांगणार, तेवढ्यात ताहिरा पुन्हा जोरात दूर फेकली गेली. उरलेसुरले अवसान सोडत ताहिरा बेशुद्ध पडली होती. सर्वजणी अवाक होऊन इकडेतिकडे पाहत होत्या. राजकुमारी प्रभृतीने मुठी वळल्या होत्या.

“तू आणि मोहिनी? अशा मोहिनीला जिवंत राहण्याचा काहीही अधिकार नाही, जिच्यामुळे मोहिनींच्या युवराज्ञीचा मृत्यू झाला. तू जरी प्रत्यक्षात काही केले नसलेस, तरी तुझ्या अप्रत्यक्ष सहभागामुळे आज रक्तिमा आपल्यात नाहीत. आम्ही क्षमा करणार नाही.”

              रागिणी धावतच प्रभृती आणि ताहिराच्यामध्ये आली. प्रभृतीच्या क्रोधाच्या मर्यादा तिला माहित होत्या. तिला सहसा क्रोध यायचा नाही आणि आला की विनाशाप्रत पोहोचल्याशिवाय ती सहज शांतही व्हायची नाही. इथे तर प्रश्न रक्तिमाचा होता.

“राजकुमारी, तुम्ही तिचे पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय वार करू शकत नाही. निष्पापाला मारणे मोहिनींच्या न्यायात बसत नाही. ताहिरा आधीच बेशुद्ध झाली आहे. आपण शांत व्हा.”

“रागिणी, तुम्ही बाजूला व्हा. आम्हांला आदेश द्यायची तुमची क्षमता नाही हे तुम्हीच आम्हांला समजावले आहे आणि राजकुमारीच्या आदेशाविरुद्ध जाण्याचा तुम्हांला अधिकार नाही.”

प्रभृती प्रथमच रागिणीचा एकेरी उल्लेख करत म्हणाली. तिचा राग पराकोटीला पोहोचला आहे, हे रागिणीच्या लक्षात आले होते.

“माझे म्हणणे तरी ऐकून घ्या.”

रागिणी प्रभृतीला रोखायला प्रयत्नांची शर्थ करत होती.

“रागिणी, आपण आमच्या आदेशाचे उल्लंघन करत आहात. आता तुम्ही बाजूला झाला नाहीत, तर आम्हांला वार तुमच्यावरही करावा लागेल आणि असे करण्यास आम्ही किंचितही कचरणार नाही.”

प्रभृती आपली क्रोधाने पेटलेली नजर रागिणीवर रोखत म्हणाली. रागिणीने बाजूला न होण्याचा निश्चय केला होता. कोणत्याही निष्पाप जीवाला मारणे योग्य नाही आणि आपण कधी कोण्या निष्पापा जीवाला मारायचेही नाही, हे ती विसरू शकत नव्हती. रक्तिमाच्या मृत्यूला अप्रत्यक्षरित्या जबाबदार असलेली ताहिरा समोर असल्याने प्रभृतीच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. राजकुमारीच्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या रागिणीकडे तिने क्रुद्ध नजरेने पाहिले. प्रभृतीने आपली सारी शक्ती एकवटली व रागिणीवर तीव्र शक्तीचा वार केला. रागिणी तो वार प्रतिवाराने थोपवू शकत होती. शेवटी ती मधुरिमाच्या सहकारी मोहिनींपैकी एक होती. तिच्या शक्ती प्रभृतीहून सध्यातरी जास्तच होत्या; पण तसे केल्याने प्रभृतीला हानी पोहोचणार होती, हे तिला ज्ञात होते. त्यामुळे तिने प्रतिवार केला नाही. ती शक्ती रागिणीच्या शरीरातून आरपार झाली. तिने आपल्या मुखातून बाहेर पडणारी किंकाळी ओठातच दाबली. सर्व मोहिनींनी धावतच कोसळणाऱ्या रागिणीला पकडले. अलकनंदा प्रभृती आणि ताहिराच्यामध्ये उभी राहिली. जे कर्तव्य रागिणीने पार पाडले, त्याची तिलाही कल्पना होती. रागिणीचा अंत आता निश्चित होता. मोहिनींच्या राजकन्येच्या शक्तींचा वार फुकट जाणार नव्हता. रागिणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते; पण ते अश्रू वेदनेचे नव्हते, तर ते आपण आपल्या कर्तव्याला मुकलो नाही ह्या आनंदाचे होते. ती जास्तीत जास्त काही क्षण प्राण रोखून धरू शकत होती. तिने प्रभृतीकडे पाहत हात जोडले. शेवटी ती त्यांच्या राज्ञीचा अंश आणि इतकी वर्षे तिच्या स्वतःच्या मुलीसारखी होती.

“राजकुमारी, सदैव अजिंक्य रहा. विजयी भव!”

              रागिणीने मान टाकली. तिचे उघडे डोळे अजूनही तृप्त मनाने आणि प्रेमाने प्रभृतीकडे पाहत होते. पूर्ण परिसर सुन्न झाला होता. काही क्षणांत रागिणीही धुरासमान आसमंतात विरून गेली. त्या किंकाळीने प्रभृती भानावर आली होती. आपल्या हातून काय झाले हे लक्षात यायला तिला वेळ लागला. रागिणी जिथे उभी होती, तिथे तिच्या कमरेतील कमरबंद तसाच पडून होता. प्रभृती धावतच तिथे गेली व तिने तो कमरबंद हातात घेतला.

“माता, परत या. आम्ही चुकलो. आम्ही काय केले ते आमचे आम्हांला कळले नाही. क्रोधात आम्ही आपल्यावर वार केला. आम्हांला क्षमा करा. अलकनंदा, इकडे या. रागिणी मातांना परत आणायचा उपाय सांगा. अलकनंदा, बोला ना. काय विचारत आहोत आम्ही?”

प्रभृती हमसून रडत होती. तिने आजपर्यंत रागिणीसाठी कधी माता म्हणून शब्द उच्चारला नव्हता; पण आज रागिणीला गमावल्यावर तिला तीव्र जाणीव झाली होती त्या मातेची, जिने तिला खरी माता नसूनही जीवापाड जपले होते.

“राजकुमारी, ते अशक्य आहे.”

अलकनंदा आपला अश्रूंनी भरलेला चेहरा खाली झुकवत म्हणाली.

“काहीही अशक्य नाही. काहीही नाही. हे त्यांनीच आम्हांला शिकवले होते. मोहिनींना काहीही अशक्य नाही. आम्ही खरेच माता रागिणीना गमावले का?”

प्रभृती अश्रूपूर्ण नेत्रांनी सर्व मोहिनींकडे पाहत विचारत होती. तिचा विलाप आभाळ भेदून जात होता. तिने ताहिराकडे पाहिले. ती तशीही शक्तीहीन दिसत होती. तिचा मृत्यूही जवळ आला होता. तिला दैवाच्या अधीन सोडून देण्याऐवजी आपण आपल्या अतिरेकाने रागिणीचा जीव घेतला, हे प्रभृतीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेले होते. तीही तिथेच मूर्च्छित पडली.


___________________________________
क्रमशः.

(सर्व प्रसंग, नावे, घटना पूर्णतः काल्पनिक आहेत. कथा केवळ मनोरंजनाकरिता लिहिलेली आहे.)

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all