डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४७) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४७) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
प्रभृती शुद्धीवर आली तेव्हा ती राजमहालातील एका दालनात होती. ती राजमहाल पहिल्यांदाच पाहत होती. तिने त्या दालनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; पण झटका लागल्याने ती मागे सरकली. दालनाला प्रचंड शक्तीकवचाने संरक्षित करण्यात आले होते. आपण इथे कसे आलो हे तिला आठवतच नव्हते. मोहिनींच्या राजकुमारीला दालनात कैद करायचे सामर्थ्य कोणाच्यातच असणे शक्य नव्हते. ती विचारांच्या गर्तेत बुडाली होती. तोच ती वर वर खेचली जाऊ लागली. आपण तलावाखाली आहोत हे तिला ज्ञात झाले होते; परंतु आपल्याला नियंत्रित करण्याची ताकद कोण्या मोहिनीत कशी काय आली ह्याचा विचार ती करत होती. ती तलावाच्या पाण्यातून बाहेर आली होती. सर्व मोहिनी मान खाली घालून उभ्या होत्या. प्रभृतीने पाण्यातून येताना डोळे मिटून घेतले होते. तिने डोळे उघडताच तिला समोर सर्व मोहिनी दिसत होत्या. ती जोरात तलावाच्या काठी फेकली गेली. तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. तिला वेदना जाणवली होती. सर्व मोहिनी तिला सांभाळायला पुढे पाऊल टाकणार, तोच आवाज आला.
“थांबा. मागे व्हा. कोणीही एक पाऊलही पुढे टाकायचे नाही.”
आवाज आसमंतात गुंजला होता. दुर्धरवनात तिचा आवाज कितीतरी दिवसांनी घुमला. तिचा आवाज कितितरी क्षण हवेत निनादत होता. या आवाजाची ताकद प्रभृतीला लगेच दिसली.
मधुरिमा! मोहिनींच्या अप्रतिम सौंदर्याची आणि अमाप शक्तीची मूर्तिमंत प्रतिकृती, मोहिनींच्या अदृश्य साम्राज्याची अभिषिक्त राज्ञी तिथे उपस्थित होती. तिचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी अंतिम शब्द होता. त्या आपल्या जागेवरच नतमस्तक होऊन हात जोडून खाली बसल्या. वृक्षाला जोरात आपटलेली प्रभृती सावरत उभी राहिली. ती कोण आहे हे प्रभृतीच्या लक्षात आलेले नव्हते; पण साऱ्या मोहिनींना तिच्यापुढे नतमस्तक पाहून तिच्या हळूहळू ध्यानात आले, की ही मधुरिमा असणार आहे. तिच्या एका वाक्याने त्या लाखो मोहिनींपैकी एकही जण प्रभृतीकडे न पाहता मान खाली घालून बसल्या होत्या. मधुरिमाचा राजवेश लुप्त झाला होता. ती ज्या वेशात निघून गेली होती, त्याच वेशात परत आली होती. तिच्या डोळ्यांत अंगार दिसून येत होता. ती आपली नाजूक पावले टाकत प्रभृतीजवळ येत होती. ती प्रभृतीसमोर येऊन उभी राहिली. चित्रांत पाहिलेली मधुरिमा जवळून पाहताना प्रभृती हरवली होती.
“माता.”
“राज्ञी. आम्ही आपल्या राज्ञी आहोत, माता नाही.”
मधुरिमाच्या मुखातून कठोर स्वरात शब्द बाहेर पडले.
“आपण असे का बोलत आहात?”
मधुरिमाने एकच क्रुद्ध नजर तिच्याकडे वळवली. तसे प्रभृतीचे स्वर कंठातच राहिले आणि तिची मान खाली झुकली होती. मधुरिमा हळूहळू चालत पुढे आली. जमिनीवर पडलेला कमरबंद तिने उचलला. रागिणीच्या अस्तित्वाची ती शेवटची खूण होती. ती त्या कमरबंदाकडे अशी पाहत होती, जणू तिने तिचे सर्वस्व गमावले असावे. खरेच ती सर्वस्व होती तिचे! जन्मापासून तिची ढाल म्हणून जन्माला आलेल्या तिच्या सहकारी मोहिनींपैकी एक असणारी रागिणी, तिच्यासाठी फार अनमोल होती. तिच्या जन्मापासूनच्या प्रत्येक घटनेची, तिच्या अनेक वर्षांच्या संघर्षाची, तिच्या प्रत्येक लढ्याची ती साक्षीदार होती. तिला गमावणे म्हणजे मधुरिमासाठी आपल्या मातेला गमावण्याइतके दुःखदायक होते. तिच्या निळ्याशार डोळ्यांत रक्तवर्णी रंग पसरत होता. ती आपला क्रोध रोखणार नाही हे सर्वांना माहित होते. सर्वांच्याच नजरेत प्रभृतीबद्दल चिंता दाटली होती; पण मधुरिमाच्या नजरेसमोरही जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. ती चालत चालत पुन्हा तलावाकाठी आली. तलावात तिने तो कमरबंद सोडला. तलावाचे पाणी उसळून आले होते. क्षणार्धात तो कमरबंद पाण्यात अदृश्य झाला.
“मला माफ कर, रागिणी. मी तुझी अपराधी आहे. माझ्याप्रती तुझ्या राजनिष्ठेने आज तुझा जीव घेतला. माझ्या आज्ञेचे पालन करता करता तू स्वतः मृत्यूला स्वीकारलेस, हे मी कधीच विसरणार नाही. आज मी स्वतःला धन्य मानते, की मला तुझ्यासारखी सखी आणि राजनिष्ठ सेनापती लाभली. तुझे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही. हे तुझ्या राज्ञीचे नाही, तर तुझ्या प्राणप्रिय सखी मधुरिमाचे वचन आहे. तू माझी ढाल बनलीस; पण मला तुझे संरक्षणही करता आले नाही. मात्र तुला न्याय देणे याशिवाय दुसरे कर्तव्य आतातरी माझ्यासमोर नाही. मला क्षमा कर.”
मधुरिमाचे अश्रू तलावाच्या पाण्यात पडत असतानाच तलावाचे पाणी प्रचंड वेगाने उसळत होते. काही काळाने मधुरिमाने आपली क्रुद्ध नजर मागे वळवली. मधुरिमा परतली होती आणि तेही पौर्णिमेच्या आधी घडले होते. संकेत दिल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी तिचे वनात येणे नक्कीच काहीतरी विपरीत घडवून आणणार होते; पण नक्की काय, ह्याबद्दल ती सोडून सगळेच अनभिज्ञ होते. मधुरिमा उठली व चालत चालत मोहिनींपाशी आली.
“वनप्रदेशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. मी गेल्यापासून काहीच योग्य घडलेले नाही हे आता लक्षात येतेय. कदाचित माझे जाणे मोहिनींसाठी श्राप बनला, एक नवा अध्याय नाही. आज मोहिनींचे राजसिंहासन पुन्हा अभिषिक्त होणे आवश्यक आहे.”
“राजकुमारींच्या अभिषेकाची तयारी झाली आहे.”
अलकानंदा शांतपणे म्हणाली.
“मी म्हणाले की राजसिंहासन पुन्हा अभिषिक्त होणे आवश्यक आहे. तिचा राज्याभिषेक आवश्यक आहे असे मी म्हटलेले नाही.”
मधुरिमा शांतपणे म्हणाली.
“म्हणजे? आपणांस काय सुचवायचे आहे कृपया स्पष्ट करावे.”
अरुंधतीने न समजून विचारले.
“मी अजून जिवंत आहे. मी जिवंत असताना राजसिंहासनाला इतर कोणाचीही गरज नाही. मला चिरंजीवी आयुष्याचे वरदान आहे. माझी इच्छा होईपर्यंत माझा मृत्यू होणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे आपणाला इतर कोणालाही अभिषेक करण्याची आवश्यकता नाही.”
सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरलेला होता. मधुरिमाचे पुन्हा राजसिंहासनावर विराजमान होणे मोहिनींच्या हिताचे होते. ती असताना एकाही मोहिनीला धोका पोहचू शकत नाही, हे सर्वजणी जाणून होत्या. तिच्या ताकदीची सीमा नाही, हे सत्य मोहिनींचे सर्वात मोठे संरक्षण होते.
“नचिकेत, सिद्धांत. माझ्या समोर या.”
मधुरिमाने त्यांच्याकडे पाहिले. इतका वेळ थरथरत उभ्या असणाऱ्या त्या दोघांकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते. ते अक्षरशः भीतीने थरथरत होते. हे विश्व त्यांनी आधीही पाहिले होते; पण हा थरार ते पहिल्यांदाच पाहत होते. त्यांना जाणवले होते ही मधुरिमा ती नाहीच आहे, जी त्यांच्यासमोर आधी आली होती. ते तिच्यासमोर येऊन उभे राहिले. तिने अरुंधती आणि वैजयंतीकडे दृष्टिक्षेप टाकला. तसे अरुंधती आणि वैजयंतीही आदिरा आणि ताहिराला घेऊन तिच्यासमोर आल्या. काही वेळापूर्वी शुद्धीत आलेली ताहिरा कशीबशी तिच्यासमोर उभी होती. ते पाहून मधुरिमाने तिला बसण्याचा इशारा केला. ती कठोर जरूर होती; परंतु क्रूर नव्हती.
“संकट तुमच्या खूप समीप आहे. त्यामुळे मला असे वाटते, की तुम्ही आमच्यासोबत येथेच निवास करावा.”
मधुरिमा त्या सर्वांकडे पाहत म्हणाली. त्या सर्वांनी होकारार्थी मान डोलावली. तसेही तिचा आदेश तिच्याच साम्राज्यात धुडकावून लावणे त्यांना शक्य नव्हते. अरुंधती आणि वैजयंती तर तिच्या बोलण्यालाच आदेश मानून धारण करणाऱ्या तिच्या राजनिष्ठ मोहिनी होत्या.
“मधुरिमा, तू परत आलीस. खूप बरं वाटलं.”
नचिकेत भावुक होऊन म्हणाला. अचानक त्याच्या लक्षात येऊन त्याने जीभ चावली. सर्व मोहिनी त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत होत्या.
“माफ करा, राज्ञी.”
तो पटकन म्हणाला.
“तुम्ही मला मधुरिमा म्हणू शकता. मी तुमची राज्ञी नाही.”
मधुरिमा स्मितहास्य करत म्हणाली. तिचे स्मितहास्य पाहून मोहिनींनी सुटकेचा निश्वास सोडला. एकूणच ती शांत होती. अरुंधतीने आदिरा आणि ताहिराला इशारा केला. त्या दोघीही एकसाथ पुढे झाल्या व त्यांनी तिच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला.
“याची आवश्यकता नाही.”
“देवी, मी आपल्याला काही विचारू शकते का? जर तुमची परवानगी असेल, तरच विचारेन.”
आदिराने थोडे भीतभीतच विचारले.
“विचार.”
“आपण प्रचंड शक्तिशाली आहात आणि आपल्यात दैवीशक्ती आहे असं मॉम म्हणत होती. मग आपण त्या शक्तीने ताहिराला वाचवू शकत नाही का?”
आदिरा पाणावलेल्या डोळ्यांनी विचारत होती. तिच्या भावना मधुरिमा समजू शकत होती.
“अगदीच असे नाही. मी तिला वाचवू नक्कीच शकते; पण त्याला काही बंधने आहेत. तिने काळ्या शक्तीची साथ दिली आहे आणि तिच्या हातून तिच्याच वंशाच्या युवराज्ञीच्या हत्येचे कारण बनण्याचे पातक घडले आहे. मी तिला मानवरुपात वाचवू शकेन; परंतु ती मोहिनी बनणे किंचित वेदनादायक आहे.”
“राज्ञी, अगदी मानवरूपही चालेल. काहीही करून तिला वाचवा.”
अरुंधती हात जोडत म्हणाली. याउलट वैजयंती मात्र शांत होती. रक्तिमाचा मृत्यू आपल्या मुलीमुळे झाला आहे, ही गोष्ट अजूनही तिच्या मनातून गेलेली नव्हती. ती स्वतःला राजवंशाची अपराधी मानत होती.
“निःशंक रहा अरुंधती. मी तिला हानी पोहचू देणार नाही.”
मधुरिमा मात्र शांतपणे त्यांना आश्वस्त करून तिथून निघून गेली. ती ताहिरावर किंचितही रागावली नव्हती. तिच्याकडून घडलेला अपराध पूर्णतः अज्ञानातून घडलेला होता, याची तिला जाणीव होती.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा