डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४८) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
संध्याकाळ झाली होती. आज पुन्हा एकदा मोहिनींच्या साम्राज्यात आनंदाचा दिवस होता. सर्वजणी दुःखातून सावरून खूप आनंदी होत्या. नचिकेत आणि सिद्धांतही त्यांना मदत करत होते. प्रभृती मात्र एका बाजूला उभी राहून सर्व पाहत होती. इतक्या दिवसांनी मातेने यावे आणि आपल्याला असे दूर लोटावे, हे तिच्या सहनशक्तीच्या बाहेर होते. आल्यापासून मधुरिमा सर्वांशी प्रेमाने बोलली होती. मात्र तिने पुन्हा प्रभृतीकडे पाहिलेही नव्हते. तिच्याच शक्तीच्या अंशाच्या मोहापासून ती सहज विलग झाली होती. मात्र या सर्वांपासून अलिप्त ती स्वतःच्याच विचारांत मग्न होती.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४८) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
संध्याकाळ झाली होती. आज पुन्हा एकदा मोहिनींच्या साम्राज्यात आनंदाचा दिवस होता. सर्वजणी दुःखातून सावरून खूप आनंदी होत्या. नचिकेत आणि सिद्धांतही त्यांना मदत करत होते. प्रभृती मात्र एका बाजूला उभी राहून सर्व पाहत होती. इतक्या दिवसांनी मातेने यावे आणि आपल्याला असे दूर लोटावे, हे तिच्या सहनशक्तीच्या बाहेर होते. आल्यापासून मधुरिमा सर्वांशी प्रेमाने बोलली होती. मात्र तिने पुन्हा प्रभृतीकडे पाहिलेही नव्हते. तिच्याच शक्तीच्या अंशाच्या मोहापासून ती सहज विलग झाली होती. मात्र या सर्वांपासून अलिप्त ती स्वतःच्याच विचारांत मग्न होती.
‘नियतीने माझ्या वाट्याला काय लिहून ठेवले आहे? प्राणप्रिय अशा माझ्या मातापित्यांचा मृत्यू, राजकुमारी असूनही प्रतिशोधाच्या अग्नीत अनेक वर्षांची भटकंती, माझ्या अंशापैकी एकीचा माझ्यावर सूड उगवण्यासाठी केलेला कपटी वध, माझ्या प्राणप्रिय आणि मोहिनींच्या सेनापती रागिणीचा मृत्यू आणि आता माझ्या दुसऱ्या अंशाचे हे बेजबाबदार वर्तन! नियतीने माझ्या आयुष्याला मृत्यूचक्र जणू जोडून ठेवले आहे; परंतु मी काही चुकीचे करणार नाही. माझ्या रागिणीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि प्रभृतीच्या अपराधालाही मी क्षमा करणार नाही. कठोर आहे; पण अशक्य नाही. माझे हृदय मी विदीर्ण होऊ देणार नाही. कुठल्याही भावभावनेपेक्षा मी कायम राजधर्म उच्च मानला आणि तसेच मानत राहीन. आज अनेक गोष्टी उघड होतील. तक्षिका आणि अर्णवने माझ्या डोळ्यांत अश्रू पाहता यावेत म्हणून जो खेळ खेळलाय, त्याचा अंत मी करणार. शलाकासोबत जे झाले तेच आता तुमच्यासोबत व्हायची वेळ समीप आहे. आजपासून तुमच्या मृत्यूपर्यंतची प्रत्येक रात्र वैऱ्याची असेल!’
आज मधुरिमातील राज्ञीचा जणू पुन्हा नव्याने उदय झाला होता. कालचक्र पुन्हा तिच्या बाजूने उभे राहणार होते. पुन्हा रचला जाणार होता मृत्यूचा भयाण तांडव! मधुरिमा तलावातून बाहेर येत होती. तिने तलावाच्या बाहेर पाऊल टाकले तसे तिच्याभोवती तेजाचे वलय निर्माण झाले. तिची वस्त्रे राजवस्त्रांमध्ये परिवर्तीत झाली. फिकट निळ्या रंगाची पायघोळ वस्त्रे आणि त्यावर गडद निळ्या रंगाची कलाकुसर फार सुंदर दिसतं होती. आजही मधुरिमा तितकीच सुंदर दिसत होती, जितकी पहिल्या राज्याभिषेक समारंभाच्या वेळेस दिसत होती. मोहिनींना मृत्यूपर्यंत चिरकालीन आणि अनुपम सौंदर्याचे वरदान होते. तिने स्वतःच्या हातानेच राजमुकुट स्वतःच्या मस्तकावर ठेवला. सर्वजण तिच्यापुढे नतमस्तक झाले होते. तिने एकवार आभाळाकडे पाहिले. वनभाग सोडून इतर सर्वत्र घनघोर वादळी पाऊस पडू लागला. जणू तो तिच्या येण्याची वर्दी देत होता. राजसिंहासनावरून मधुरिमा उठली व ती चालत सर्व मोहिनींजवळ आली.
“बसा. आज मी खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तुमची संमती जाणून घ्यायला नाही, तर तुम्हांला कल्पना द्यायला येथे बोलावले आहे. रागिणी!”
मधुरिमाने हाक तर मारली; पण रागिणी नाही हे तिच्या काही क्षणांनी लक्षात आले. तिची अवस्था पाहून तिच्या इतर साथीदार मोहिनींच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. तिच्या एका हाकेवर हजर होणारी रागिणी आज तिथे नव्हतीच. इतर लाखो मोहिनी दुःखी चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होत्या. रागिणीला गमावण्याचे दुःख खरेच खूप मोठे होते.
“पद्मिनी, जंगलातील जवळपासच्या काही झाडांच्या फांद्या घेऊन ये आणि त्याच्या साहाय्याने येथे अग्निकुंड तयार कर.”
पद्मिनीने फांद्या गोळा करत अग्निकुंड सिद्ध करायला घेतले होते.
“मी गेल्यापासून इथे जीवन जणू विस्कळीत झाले आहे. तुम्ही सर्वांनी मिळून रक्तिमा आणि प्रभृतीला राजवंश म्हणून निष्ठेने वाढवलेत. तुमच्या शक्ती त्यांच्यापेक्षा अधिक असूनही त्यांच्यापुढे झुकून राहिलात. यावरून तुमच्या राजनिष्ठेचा प्रत्यय मला आला. मी त्याबद्दल तुमची आभारी आहे. राजवंशाच्या मृत्यूवरून मी अग्नितांडवही केला होता; परंतु एवढे सगळे झाल्यावर एका राजवंशाच्या उत्तराधिकाऱ्याचेही कर्तव्य बनते, की त्याने राजधर्माचे पालन करावे. प्रभृतीने आपल्या कर्तव्यांचे उल्लंघन केले आहे.”
मधुरिमा गंभीर स्वरात बोलत होती.
“माता, आमच्याकडून अनावधानाने...”
एवढा वेळ शांत असणारी प्रभृती बोलत होती, तोच मधुरिमाने तिला थांबण्याचा इशारा केला.
“जे काही झाले, ते मला ज्ञात आहे. मी फक्त तुम्हांला निर्णय सांगायला बोलावले आहे. राज्याच्या युवराज्ञीला मारणाऱ्यांसाठी मी मृत्यूचक्र रचणार; पण राज्याच्या सेनापतीच्या अपराध्याला काहीच शासन नाही? असे मी होऊ देणार नाही. तू चुकलीस प्रभृती आणि तुझा दंड निश्चित आहे. मोहिनींच्या राज्यात सर्वांना समान न्याय आहे.”
इतर सर्व मोहिनी आणि प्रभृती त्यांच्यासमोर गंभीर चेहऱ्याने बसलेल्या मधुरिमाकडे पाहत होत्या. त्यांना अजूनही तिच्या बोलण्याचा अर्थबोध झाला नव्हता.
“मृत्युदंड!”
मधुरिमा स्तब्ध चेहऱ्याने म्हणाली. तिचा आवाज वीज कडाडल्यासारखा सर्वत्र पसरला. कोणाचाच आपल्या कानांवर विश्वास होत नव्हता. ज्या अंशाला जन्म दिला, त्याच्यापेक्षा आणि ममतेपेक्षा राजधर्माला ती श्रेष्ठत्व देत होती. तिच्या चेहऱ्यावर खेद अथवा दुःखाची छटा दिसत नव्हती. चूक सामान्य मोहिनीकडून होवो वा राजकन्येकडून, न्यायमार्गावरून न हटण्याची तिची निश्चल स्थिती होती. रात्रीच्या घनघोर तिमिराने तिचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. ती परत म्हणाली,
“प्रभृती, तू राजकन्येला न शोभणारे लाजीरवाणे कृत्य केले आहेस. माझ्या अंशाकडून माझी ही कधीच इच्छा नव्हती. जितक्या वर्षांचे तुझे आयुष्य आहे, तितकी वर्षे रागिणी माझ्यासाठी दिवसरात्र झटली आहे. तिच्या मृत्यूबद्दल तुझा अंतिम दंड मृत्यूदंडच आहे. मोहिनींच्या राज्यात अग्निकुंडात प्रवेश हा अखेरचा दंड आहे. स्वतःहून अग्नीत प्रवेश कर.”
प्रभृतीच्या आणि इतर मोहिनींच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते; परंतु तिच्या आज्ञेपुढे शब्द फुटणे अशक्य बनले होते.
प्रभृतीच्या आणि इतर मोहिनींच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते; परंतु तिच्या आज्ञेपुढे शब्द फुटणे अशक्य बनले होते.
“प्रभृती, विलंब नको. माझा निर्णय बदलणार नाही.”
मधुरिमा उठून उभी राहत म्हणाली. मधुरिमा प्रभृतीच्या अगदी समोर आली. तिच्या नजरेतील अलिप्तता आणि प्रचंड क्रोध पाहून प्रभृतीने मान खाली झुकवली.
“माता, मला माझा अपराध मान्य आहे. अग्निकुंडात प्रवेश करणे हा मोहिनींच्या राज्यातील सर्वोच्च व अंतिम दंड आहे याबद्दल माता रागिणींकडूनच मला समजले होते. मी स्वतः अग्निप्रवेश करेन. जाण्याआधी मला माझ्या अपराधाबद्दल क्षमा करा.”
मधुरिमाच्या स्तब्ध होती. प्रभृतीने शेवटचे एकदा मधुरिमाकडे पाहिले आणि तिने स्वतः अग्नीत प्रवेश केला. ती सावली होती. अग्नीच्या तेजात विरून गेली. सर्व मोहिनी पाणावल्या डोळ्यांनी अग्निकुंडाकडे पाहत होत्या. आदिरा आणि ताहिरा तर रडकुंडीला आल्या होत्या; पण मधुरिमाच्या डोळ्यांत अश्रू नव्हते. ती मागे वळली.
“कर्तव्यापुढे भावना महत्वाच्या नाहीत. ह्यापुढेही कोणीही आपल्यातीलच कोणाशी वैरभाव ठेवण्याचा अथवा त्याच्या मृत्यूला कारण बनण्याचा प्रयत्न केला, तर त्यानेही दंड लक्षात ठेवावा.”
मधुरिमाने आपले हात खांद्याला समांतर आणले व ती वर वर जात आकाशात विरून गेली. ती दूरवर असणाऱ्या समुद्राकाठी आली होती. तिच्यातली राज्ञी आज जिंकली होती. मात्र आज एका मातेचे मन आपल्या अंशांच्या मृत्यूवर विलाप करत होते. तिच्या अश्रूंतून तिच्या भावना उचंबळून येत होत्या. तिने इतरांसमोर दाखवले नव्हते, तरी ती दुखावलेली होती; परंतु तिला जाणीव होती, की ती फक्त एका प्रभृतीची माता नव्हती. तिच्याच अपत्यांप्रमाणे असणाऱ्या तिच्या मोहिनींचीही ती माता होती. काही क्षण तिथे बसून ती निश्चयाने उठली. तिला मृत्यूच्या तांडवाचा आरंभ करायचा होता. शोक, विलाप, भावभावना एका क्षणात मागे सोडून तिच्यातली राज्ञी पुन्हा मोहिनींच्या रक्षणाला तयार झाली होती. आरंभ झाला होता एका नव्या मृत्यूचक्राचा!
___________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा