डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४९) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
प्रातःकाळी मधुरिमा वनात परत आली होती. सर्व मोहिनी, नचिकेत आणि सिद्धांत अजूनही कालच्या घटनेतून बाहेर पडले नव्हते. आदिरा आणि ताहिरा तर मधुरिमाकडे थरारून पाहत होत्या. इतर मोहिनींची अवस्थाही काही वेगळी नव्हती. ती न्यायासाठी काळाहून क्रूर बनली होती.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४९) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
प्रातःकाळी मधुरिमा वनात परत आली होती. सर्व मोहिनी, नचिकेत आणि सिद्धांत अजूनही कालच्या घटनेतून बाहेर पडले नव्हते. आदिरा आणि ताहिरा तर मधुरिमाकडे थरारून पाहत होत्या. इतर मोहिनींची अवस्थाही काही वेगळी नव्हती. ती न्यायासाठी काळाहून क्रूर बनली होती.
“तुम्ही अजूनही दोन्ही राजकन्यांच्या दारुण अंताच्या घटनांतून बाहेर पडला नाहीत. राजकन्या नावाचे एक नवे पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात आले होते. त्यांच्यासोबत तुम्ही अनेक वर्षे व्यतीत केली आहेत, हे मी जाणून आहे. तरीही आता कठोर मनाने राजकन्या होत्या हेच सत्य तुम्हांला विसरून जायला सांगतेय.”
“क्षमा करा राज्ञी; पण आपणाला तरी त्यांना विसरणे शक्य होईल का?”
अलकनंदा मधुरिमाला चांगलेच ओळखून होती.
“नक्कीच अलकनंदा. मला कर्तव्यासमोर कधीच काहीच दिसले नाही आणि दिसणारही नाही. तुम्हीही स्वतःहून त्यांना विसरण्याचा प्रयत्न केला नाही, तर पुढची कामगिरी पूर्ण होणार नाही.”
“पण पुढची कामगिरी ही युवराज्ञीच्या मृत्यू संदर्भातच आहे ना?”
पद्मिनीने विचारले.
“युवराज्ञीच्या नाही. एका मोहिनीच्या मृत्यूसंदर्भात आहे असे लक्षात ठेवा. यापुढे या वनात रक्तिमा किंवा प्रभृती ह्यांच्यापैकी एकीचेही नाव तुमच्या कोणाकडून उच्चारले गेले, तर तो माझा वनातला शेवटचा दिवस असेल.”
त्यांच्याकडे पाठ फिरवून मधुरिमा सिद्धांत आणि नचिकेतला घेऊन राजमहालात आली.
“पाण्याखाली राहणे मानवासाठी शक्य नाही; पण हे माझ्या शक्तीने बद्ध साम्राज्य आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे येथे राहू शकता.”
मधुरिमा त्यांनाही निरोप देऊन निघून गेली. पूर्ण दिवसभर ती कुठे आहे, हे कोणालाही माहित नव्हते. रात्र होत असताना ती परत आली आणि तिने सर्व मोहिनींना एकत्र बोलावले.
“मी पुन्हा एकदा एका मोठा सापळा निर्माण करतेय; पण हे अपराधी त्यात सहज फसणार नाहीत. त्यामुळे योजना अधिकच गूढ आखली पाहिजे.”
सर्वजणी अगदी सज्ज झाल्या होत्या. सर्व योजना त्यांनी व्यवस्थित ऐकून घेतली. रक्तिमाचे अपराधी शलाकाचा मोठा मुलगा अर्णव आणि मांत्रिक सुर्यभानची कन्या तक्षिका हे आहेत हे कळल्यावर, पूर्वीचे वैर जागृत झाल्याप्रमाणे सर्वांच्या डोळ्यांत अंगार प्रकटला होता. सर्वांचीच नजर वैजयंतीकडे गेली होती; परंतु तिच्या नजरेत प्रेमभावना शिल्लकच नव्हती. युवराज्ञीच्या मृत्यूसमयी ममता विसरून स्वतःच्या मुलीला क्षमा न करू शकलेली ती... अर्णव तसे पाहता त्यांचा जुना वैरी होता. जुने वैर पुन्हा जागले होते. जुना सूड पुन्हा नव्याने घेतला जाणार होता. इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार होती; पण ते दोघे मात्र अजून ह्या गोष्टीशी अनभिज्ञ होते, की मधुरिमा परत आली आहे. मधुरिमाचा परतायचा कालावधी पुढच्या पौर्णिमेचा आहे हे त्यांना ज्ञात होते. आपल्या हातात अजून बारा दिवस असल्याच्या आनंदात ते आपला खेळ आखत होते. त्यांची मधुरिमाच्या दुसऱ्या अंशाला मारण्याची तयारी सुरू होती; पण जंगलाच्या मध्यभागात घडलेल्या अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यात कोणता परिणाम घेऊन येणार हे त्यांना ज्ञात नव्हते.
___________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा