डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५०) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
अर्णव गुहेत तक्षिका जिथे बसली आहे तिथे आला.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५०) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
अर्णव गुहेत तक्षिका जिथे बसली आहे तिथे आला.
“प्रणाम गुरुदेवी. आपणाला भेटायला कोणी दोन मुली आल्या आहेत.”
“सावधान अर्णव. त्यांना या गुहेचे स्थान कसे ज्ञात आहे? त्या मोहिनी तर नाहीत ना?”
तक्षिकाने चमकून विचारले.
“नाही देवी. त्यांच्या सावल्या दिसत आहेत.”
“मग त्यांना ह्या गुहेचा मार्ग कळलाच कसा? त्यांना आत घेऊन ये.”
दोन सुंदर वस्त्रे परिधान केलेल्या युवतींनी गुहेत प्रवेश केला. त्या दोघीही आळीपाळीने एकमेकींकडे आणि समोर बसलेल्या तक्षिकाकडे पाहत होत्या. काळीकभिन्न वस्त्रे परिधान करून तक्षिका तेथील एका खडकावर बसली होती. आपल्या तीक्ष्ण नजरेने ती त्या दोघींना न्याहाळत होती. साधी वस्त्रे परिधान करून, तिच्यासमोर मान झुकवून त्या उभ्या होत्या.
“कोण आहात तुम्ही? इथे कशाला आला आहात?”
“मी मानसी आणि ही माझी लहान बहीण अभिता आहे. आम्ही गुरू सुर्यभानांकडून विद्या शिकण्यासाठी लांबून आलो आहोत. गुरूंनी आम्हांला खूण म्हणून त्यांची ही अंगठी दिली होती.”
मानसीने ती अंगठी तक्षिकाच्या हातात दिली. आपल्या पित्याची अंगठी ओळ्खल्याने तक्षिकाने त्यांना बसायला सांगितले.
“गुरुदेव तुम्हांला कशाबद्दल ज्ञान देणार होते? भूतप्रेत, पिशाच्चविद्या की आणखी काही?”
“गुरुदेव आम्हांला मोहिनी नामक कोणाबद्दल तरी ज्ञान देणार होते. त्यांचे विश्व नेस्तनाबूत करायला त्यांना आमची मदत हवी होती.”
अभिताने म्हटले.
“तुम्ही मदत कशी काय करू शकाल?”
तक्षिका भुवया उंचावत म्हणाली.
“आम्ही साधारण मानवकन्या आहोत हे आम्हांला माहित आहे; पण गुरुदेव म्हणाले होते, की मोहिनींच्या राज्यात सामान्य मानवाला प्रवेश करायला काहीच समस्या नाही. त्यामुळे आमच्यायोगे ते मोहिनींचा नाश करू इच्छित होते.”
अभिताने पुन्हा उत्तर दिले. तक्षिका मनात अतिशय आनंदली. तिला जे हवे, ते जणू तिच्या नशिबाने तिच्यापर्यंत चालत आले होते. तक्षिकाने त्यांना गुहेतील एका बाजूची कळ दाबून जवळील महालात प्रवेश करण्याचा मार्ग दाखवला आणि त्यांना ज्ञान देईपर्यंत तिथेच निवास करायला सांगितले. महालाच्या बाहेर खूप मोठी बाग होती व महालाच्या गुप्तद्वाराकडे घेऊन जाण्यासाठी उंचच उंच जिने होते. या गुप्तद्वाराचे तोंड दुर्धरवनापाशी उघडेल हे लक्षात आलेली अभिता साधारण पायऱ्या किती असाव्यात याचा अंदाज घेत उभी होती.
“काय पाहत आहेस अभिता?”
“काही नाही. गुहेच्या समोरील मार्ग बंद झाला, तरी दुर्धरवनापर्यंत पोहोचायला हिच्याकडे मार्ग आहे, अरुंधती.”
अभिता म्हणाली.
“राज्ञी, आपल्याबद्दल तिला संशय आला नसेल असे कशावरून म्हणता आपण? आपण मानवस्वरूप नसतो, तर आपल्याही सावल्या दिसणे शक्य नव्हते.”
“विनाशकाले विपरीत बुद्धी! हे सर्वांच्या बाबतीत खरे होते. मांत्रिकाची अंगठी आपल्याकडे कुठून आली असेल हे समजण्याची तसदीही तिने घेतली नाही, यावरूनच तिच्या बुद्धीची आणि ज्ञानाची कुवत लक्षात येते. तसेही मोहिनींच्या संमोहनाला टाळणे या जगात कोणालाही शक्य नाही.”
अभिता हसत म्हणाली.
“अर्णव.”
मानसीने दचकून दुसरीकडे पाहत म्हटले. त्या दोघी बोलत असलेल्या कक्षाबाहेरून अर्णव जात होता. त्याने त्या दोघींचे बोलणे ऐकले होते. तो घाबरून त्या दोघींकडे पाहत होता. पाहता पाहता त्याने मधुरिमाच्या डोळ्यांत पाहिले आणि त्याला भोवळ आल्यासारखे जाणवले. तिची नजर ही तिची सगळ्यात मोठी ताकद होती आणि तिच्या नजरेकडे पाहणे ही आजपर्यंत सर्वांची सर्वात मोठी चूक होती.
“अरुंधती, तू ह्याला घेऊन त्या गुप्तद्वाराने ताबडतोब निघ व ह्याच्यावर पहारा म्हणून पद्मिनीला सज्ज राहायला सांग. तुझ्याजागी वैजयंतीला पाठवून दे आणि तू याच्या रूपात परत ये. तीही मानव आहे, त्यामुळे हे सहजशक्य होईल. जा, त्वरित प्रयाण कर. तक्षिका या महालात येत नसल्याने आपणाला काही धोका नाही; पण विलंब करू नकोस.”
अरुंधतीने अर्णवला घेऊन वनाकडे प्रयाण केले. काहीच वेळात वैजयंतीही तिथे हजर झाली. तिनेही मानसीचे रूप हुबेहूब धारण केले होते. काही वेळाने अर्णव परत आला होता. त्याच परत येणे आवश्यक होते. तो आला त्याने अभिता आणि मानसीला पाहिले. त्याने अभिताला पाहून नजरेनेच नमस्कार केला व तो राजमहालातून गुहेत निघून गेला. थोड्या वेळाने तक्षिकाने अर्णवला पुन्हा अभिता आणि मानसीला बोलवायला पाठवले. त्या गुहेत येताच त्यांना आपल्या मागून यायला सांगत ती गुहेतून बाहेर पडली. ती त्यांना वनाची सीमा ओलांडून वनाच्या मध्यभागातील सीमेपासून थोड्या दुरच्या परिसरात घेऊन आली होती.
“हे बघा. गुरुदेवांनी तुमच्या मदतीने मोहिनींचा नाश करायचे ठरवले होते ना? आपण आता तेच करणार आहोत. तुम्ही दोघी या जंगलात आत जायचे आहे. तिथे मोहिनी अदृश्य रुपात वावरतात त्यांना जाणवू देऊ नका, की तुम्हाला मी पाठवले आहे आणि त्यांचा नाश करण्यासाठी काही मार्ग सापडतो का शोधून तुम्हाला परत यायचे आहे. तुमच्याकडे पाच दिवसांचा वेळ आहे. त्याच्या आत तुम्हांला हे सर्व करायचे आहे.”
तक्षिकाने त्यांना सर्व काही नीट समजावून सांगितले.
“आपण म्हणता ते करायला आम्ही तयार आहोत; पण तुमचे शिष्य अर्णवसुद्धा मानव आहेत. मग ते का आत येत नाहीत?”
अभिताच्या रूपात असणाऱ्या मधुरिमाने कुतूहल दाखवत विचारले.
“त्या त्याच्यावर वार करतील.”
तक्षिका स्वतःच्याच विचारांत म्हणाली.
“अशी भीती का वाटते तुम्हाला? अर्णवनी त्यांचे काही बिघडवले आहे का?”
अभिता फारच खोचून प्रश्न विचारत होती.
“नाही; पण तो माझा शिष्य आहे, हे त्यांना माहित आहे.”
तक्षिका सावरून घेत म्हणाली.
“अर्णव, आपण आमच्यासोबत चला. आम्ही त्यांना तुमच्यापर्यंत पोहचू देणार नाही. थोडी फार मायावी विद्या आम्हीही जाणतो.”
अभिताचे बोलणे टाळणे गुरु तक्षिकाला योग्य वाटेना. तिच्या बोलण्यात विलक्षण माधुर्य होते. तिच्या नसानसांत कोणावरही अंमल करण्याची शक्ती होती. अर्णव त्यांच्यासोबत यायला तयार झाला. मधुरिमा परत आलेली नाही. त्यामुळे कोणतीही मोहिनी आपल्यावर अंमल करू शकत नाही, असा विश्वास तक्षिकाला होता; पण तिच्याही नकळत तिच्या मेंदूवर अभिताचा तथा मधुरिमाचा अंमल चढला होता. सुरू झाला होता तो खेळ, जो तक्षिकाला मृत्यूच्या खाईत लोटणार होता. अर्णवसोबत अभिता आणि मानसीने जंगलाच्या मध्यभागात प्रवेश केला. अदृश्य रुपात वावर करणाऱ्या मोहिनी त्यांच्यासमोर प्रकट झाल्या. तलावाकाठी येताच अभिता, मानसी आणि अर्णवने आपले मूळरूप धारण केले. त्या पुन्हा मधुरिमा, वैजयंती व अरुंधतीच्या रुपात आले. आता पुढच्या खेळीला सुरुवात झाली होती.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा