डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५१) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
त्याआधी तिथे वृक्षाला मायावी शक्तीने बांधून ठेवलेल्या अर्णवजवळ मधुरिमा आली.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५१) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
त्याआधी तिथे वृक्षाला मायावी शक्तीने बांधून ठेवलेल्या अर्णवजवळ मधुरिमा आली.
“तू कपटी आहेस. मायावी आहेस. माझ्या पूर्ण कुटुंबासोबत तू खेळ खेळलास.”
अर्णव रागात बोलत होता.
“आवाज बंद ठेव. राज्ञीवर आवाज चढला, तर तुझा हा जगातला अंतिम दिवस असेल.”
वैजयंती रागाने म्हणाली. ताहिरा तिच्याकडे चमकून पाहत होती. मोहिनींच्या संवादातून ही व्यक्ती आपले डॅड आहेत, हे तिला कळले होते; पण आपल्या मातेची पराकोटीची राजनिष्ठाही तिने पाहिली होती.
“वैजयंती, ती मृत्यूपूर्वीची धडपड आहे. करू दे. याचाही मृत्यू समीप आला आहे.”
मधुरिमाने त्याच्याकडे पाहिले. तो भयाने थरथर कापत होता. तिचे तीक्ष्ण डोळे चमकले. त्याला त्याचा मृत्यू तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. मधुरिमा अर्णवकडे तीक्ष्ण आणि भेदक नजरेने पाहत होती.
“माझ्याकडे असं पाहू नकोस. मी मृत्यूला घाबरत नाही आणि तुला तर नाहीच नाही. तू माझ्या मॉमला मारलं आहेस. तुलाही तसाच विदारक मृत्यू येईल.”
मधुरिमा हसायला लागली. तिचे मधुर हास्य विलक्षण भेसूर बनत चालले होते. सायंकाळ होत आली होती. मधुरिमाने एक क्षण अर्णवकडे पाहिले आणि ताडकन आपला पाय धरणीवर आपटला. तिची अप्रतिम सुंदर राजवस्त्रे काळ्याकभिन्न वेशात परिवर्तीत झाली होती. ती अतिशय भयाण दिसू लागली होती. घनघोर पाऊस सुरू झाला होता. तिचे निळवर्णीय डोळे काहीसे जांभळे दिसू लागले होते. तिच्या डोळ्यांत क्रूरतेची छटा होती.
“तुझ्या मातेला मी का मारले हे तुला माहित नाही. तरीही तू मला दोष देत आहेस. तुझ्या मातेला मी मारले होते ना? मग तुझे वैर माझ्याशी हवे होते. तुम्ही रक्तिमाचा जीव का घेतला? एकेकाळी तुझ्या मातेने मोहिनींच्या राज्ञीला, तर तू आणि तुझ्या गुरुदेवीने मिळून मोहिनींच्या युवराज्ञीला मारलेत. मृत्यूला घाबरत नाहीस ना तू? निरखून बघ. मृत्यू तुझ्यासमोर उभा आहे.”
खरेच तिचे रूप भयाण होत चालले होते. अर्णव पुरता घाबरला होता. ती खरोखर इतकी भयाण असू शकेल, हे तिच्या सुंदर मोहक रुपावरून वाटलेच नसते. तिचे डोळे त्याला भेदून आरपार जात आहेत, असा भास त्याला होत होता.
“मला माफ कर, मधुरिमा. एकवेळ सोडून दे. पुन्हा मी गुरुदेवीची साथ देणार नाही.”
“मृत्यू समोर आला तरी न घाबरणारा मृत्यूकडे वरदान मागत आहे, की त्याला जीवनदान द्यावे.”
तिचा स्वर कुत्सित होता. अर्णव थरथर कापत होता. मधुरिमा पुढे आली. तिने त्याची मान आपल्या एका हातात पकडत त्याला वर उचलले. तिच्या डोळ्यांत उमटलेले क्रूर भाव त्याच्या हृदयाचा थरकाप उडवत होते. अचानक काहीसे सुचल्यासारखे मधुरिमाने त्याला पुन्हा जमिनीवर आपटले.
“तुला या कटात तुझ्या गुरुदेवीने सामील केले ना? मग ठीक आहे. आता मी तुला मारणार नाही.”
मधुरिमा पाठमोरी वळली व तलावाकडे पाहत खूप वेळ काहीतरी विचार करत होती. तिने अर्णवला असेच सोडलेले पाहून सर्वजणी आश्चर्यचकित झाल्या होत्या. त्याला पुन्हा शक्तीने एका वृक्षाला बांधण्यात आले होते. मधुरिमा झर्रकन मागे वळली आणि अरुंधती व वैजयंतीला पाहून म्हणाली.
“चला, प्रस्थान करूया. आता त्या मांत्रिकाच्या कन्येची मृत्यूचक्रात आगमन करण्याची वेळ समीप आली आहे. अलकनंदा, तुम्ही सुरक्षा ठेवालच याची खात्री आहे.”
“नक्कीच राज्ञी.”
अलकनंदाने आपली भेदक नजर अर्णवकडे वळवली. अर्णव पूर्णतः गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. या सुंदर, मधुर चेहऱ्यामागे एक राज्ञी तो पहिल्यांदाच पाहत होता. मधुरिमा, वैजयंती आणि अरुंधतीने पुनश्च अनुक्रमे अभिता, मानसी आणि अर्णवचे रूप धारण करीत वनातून गुहेत जाण्यासाठी प्रस्थान केले. त्यांना गेलेले पाहून अलकनंदा आणि इतर मोहिनी पुढील कार्यास सज्ज झाल्या. राज्ञीच्या मनात अशा वेळेस काय असू शकते याची कल्पना तिला आली होती. तिला तिचे कार्य करायला जाणे आवश्यक वाटत होते; पण अर्णवला एकटे त्याठिकाणी सोडून जाणे धोक्याचे वाटत होते.
“आपण चिंता करू नये, देवी. आपण आपल्या कार्यासाठी प्रस्थान करा. मी इथे थांबेन. हा मानव इतका शक्तिशाली तर नक्कीच नाही, की मी त्याला रोखू शकणार नाही.”
आदिरा अर्णवकडे जळजळत्या नजरेने पाहत म्हणाली. अलकनंदाला माहित होते, की मधुरिमाच्या दोन्ही अंशांकडे विभिन्न आणि अत्युच्च शक्ती होत्या; पण त्यांना एक शक्ती कधीच सिद्ध करता आली नाही. एक शक्ती जी सर्वप्रथम मधुरिमाने आणि नंतर आदिराने सिद्ध केली होती. निसर्गाला आपल्याला ताकद द्यायला भाग पाडण्याची शक्ती! आदिरा ही अशी पहिली मोहिनी होती, जिने मधुरिमानंतर आभाळाकडे पाहून घनघोर पावसाला आवाहन करणे आणि स्वतःभोवती संरक्षक कवच निर्माण करणे या दोन कठोर शक्तींना सिद्धीस नेले होते. तिच्यात इतर शक्ती नव्हत्या. तसेच ती आत्मविश्वासूसुद्धा नव्हती; पण तीही एक शक्तिशाली मोहिनी होती. तिच्याकडे पाहून अलकनंदाने तिच्या प्रस्तावाला संमती दिली व तिने इतर काही मोहिनींसहित प्रस्थान केले.
“तुम्ही मला असे बद्ध करून ठेवू शकत नाही. माझ्यातही काळ्या शक्तींचा वास आहे.”
अर्णव हसत म्हणाला. अर्णवच्या ह्या रूपापासून सर्वचजणी अनभिज्ञ होत्या. अगदी मधुरिमासुध्दा! त्याचे डोळे क्षणात लालसर होऊ लागले. त्याला ज्या शक्तीने बद्ध करण्यात आले होती, ती शक्ती तुटली होती. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते व तो काही उच्चारण करीत होता. आदिरा विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहत होती. त्याच्यासमोर त्याच्याच भावाची मुलगी उभी होती; पण त्याला त्याची किंचितही पर्वा नव्हती. तो इतका काळ शांत होता, कारण मधुरिमाच्या असीम शक्तीपुढे सर्व काळ्या शक्ती विफल होत्या; पण आता ना मधुरिमा, ना तिच्या रक्षणाला सज्ज असणारी अलकनंदा वा पद्मिनी तिथे होती. आदिरा आणि हळूहळू शक्ती कमी होत जाणारी ताहिरा दोघीच तिथे उपस्थित होत्या. इतर मोहिनी होत्या, त्या अर्णवच्या अफाट ताकदीला रोखू शकणार नव्हत्या. काय घडतेय हे लक्षात आल्यावर अचानक वायूवेगाने ताहिरा तिथे धावत आली व ती आदिरासमोर उभी राहिली.
“आदिरा, तो प्रचंड काळ्या शक्तीचा प्रयोग करणार आहे. तू आपल्याभोवती शक्तीकवचाचे निर्माण कर.”
आदिराने क्षणाचाही विलंब न लावता शक्तीकवचाचे निर्माण केले. हे कवच कुठलीही शक्ती भेदू शकणार नव्हती; पण त्याला इथून निसटून जाऊ देणेही हितकारक नव्हते.
“आपण शक्तीकवचात राहिलो, तर जागेवरून हलू शकणार नाही आणि ह्याला वनातून बाहेर पडू देणे अयोग्य ठरेल.”
आदिरा चिंतीत झाली होती.
“तू चिंता करू नकोस. माझ्या शक्ती अजून संपुष्टात आल्या नाहीत आणि त्याने जिच्याकडून काळ्या शक्तीचे शिक्षण घेतले, मीही केवळ पाहून बरेच काही शिकले आहे.”
ताहिराच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. तक्षिकाने तिला शिष्य बनवले नसले, तरी तिने त्या दोघांना अनेक शक्तींचा प्रयोग करताना पाहिले होते. ते दोघे मोहिनींच्याच साम्राज्याचा भाग आहेत असा तिचा समज झाला असल्याने तिने उत्सुकतेने त्यांचे प्रयोग पाहिले होते. ती मोहिनी असल्याने तिला त्या शक्ती फार लगेच आत्मसातही झाल्या होत्या. अर्णवने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यांतून प्रचंड विनाशक शक्ती बाहेर पडत होत्या; पण त्यांना शक्तीकवच पार करता येत नव्हते. ते पाहून त्याने शक्तीप्रयोग थांबविला. त्याने वनातून बाहेर पडण्यासाठी इकडेतिकडे पाहिले. हाच तो योग्य क्षण आहे हे लक्षात घेऊन ताहिराने उच्चारण केले. तिचे डोळे पूर्णतः काळसर रंगात परिवर्तीत झाले होते. तिच्यासमोर तिचे डॅड नाही, तर घडणाऱ्या सर्व घटनाक्रमाला कारणीभूत असणारा मोहिनींचा अपराधी उभा होता. तिने डोळे उघडत अर्णवकडे पाहिले. एक प्रचंड शक्तीझोत त्याच्या छातीवर येऊन आदळला. जोरात किंचाळून तो खाली पडला. त्याचे शरीर जखडले गेले होते. तो जिवंत होता; परंतु त्याला हालचाल करता येत नव्हती. हे उच्चारण तक्षिकाला रक्तिमावर करताना ताहिराने पाहिले होते. आदिरा आणि ताहिरा शक्तीकवचातून बाहेर आल्या. ताहिराने आदिराला त्याच्याभोवती प्रचंड शक्तीकवच तयार करायला सांगितले. त्याच्या किंकाळीने वनाच्या उत्तर भागात गेलेल्या मोहिनी धावतच परत आल्या.
“काय झाले आदिरा? तुम्ही दोघी तिथे काय करत आहात?”
अलकनंदाने चिंतीत होऊन विचारले. आदिराने तिला सर्व घटना सांगितली. सर्वजणी ताहिराकडे साशंक नजरेने पाहू लागल्या होत्या.
“नाही, गैरसमज करू नये. मी काळ्या शक्तीची उपासक नाही. फक्त तक्षिकाच्या सान्निध्यात असताना ती म्हणत असलेले हे उच्चारण मी गुप्तपणे सिद्ध केले होते. मला तेव्हा कल्पना नव्हती, की ती मोहिनी नाही. ह्याचाच प्रयोग तिने युवराज्ञी रक्तिमांवर केला होता. आम्ही त्याला रोखले नसते, तर तो वनातून बाहेर गेला असता. म्हणून मला हा प्रयोग करावा लागला.”
अलकनंदा आश्चर्याने त्या दोघींकडे पाहत होती.
___________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा