Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५२)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

तिकडे गुहेच्या सीमेपर्यंत पोहोचलेली मधुरिमा अरुंधती आणि वैजयंतीकडे पाहून हसत म्हणाली,

“तुमच्या कन्या मोहिनींच्या निष्ठावान अनुयायी होणार आहेत. आता वेळ समीप आली आहे एक नव्या उदयाची!”

        तिच्या बोलण्याचा अर्थबोध अरुंधती आणि वैजयंतीला झाला नाही. मात्र मधुरिमा दूरवर पाहत सूचक हसत होती. मधुरिमा आणि त्या दोघींनी गुहेत प्रवेश केला. त्यांना परत आलेले पाहून तक्षिकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल दाटले होते. काय घडले हे जाणून घ्यायची उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती.

“काय झाले काही मार्ग सापडला?”

“हो, आम्हांला मार्ग सापडला आहे.”

अभिताने उत्तर दिले.

“मलाही तिथे काहीही हानी झाली नाही. मोहिनी अजूनही त्यांच्या राजकन्येच्या मृत्यूच्या शोकात आहेत. कदाचित आक्रमणाची हीच वेळ आहे.”

अर्णव म्हणाला.

“पौर्णिमेला चार दिवस बाकी आहेत. त्याआधी हे होणे गरजेचे असेल ना? पौर्णिमेच्या रात्री मोहिनींच्या शक्तींची तोड नसते असे ऐकले आहे.”

अभिताने सूचकपणे म्हटले.

“हो, आता केवळ चार दिवस शेष आहेत. तुम्ही काय मार्ग शोधला ते सांगा. मग पुढे काय करायचे, ते मी ठरवेन.”

तक्षिका शांतपणे म्हणाली.

“तुम्हाला माहितच असेल, की मोहिनींचे ते वन त्यांच्या शक्तींनी संरक्षित आहे. शक्तीकवच त्यांच्या प्रदेशाच्या चहूबाजुनी वेढलेले आहे; परंतु त्या शक्तीकवचाला एक छिद्र आहे. वनातील एका ठिकाणी काही वृक्षांच्या मधील भाग संरक्षित नाही. तिथून कोणीही त्या वनात प्रवेश करू शकते.”

अभिता म्हणाली. तक्षिकाच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य पसरले होते. तिला जे हवे होते, ते तिला गवसले होते.

“तुम्ही पुन्हा वनात जा व कोठेतरी सुरक्षित जागा हेरून लपून बसा. उद्या सायंकाळी सर्वांनी त्या गुप्त द्वाराजवळ या. म्हणजे मला प्रवेश करायला अडचण येणार नाही.”

तिघांनीही तिच्या आज्ञेचा स्वीकार करत पुन्हा वनाकडे प्रस्थान केले.

“तक्षिका, तुझ्या वनातल्या प्रवेशाचीच तर मी वाट पाहतेय. तुझा हा प्रवेश माझ्या मोहिनींच्या आयुष्यातील शेवटच्या संकटाचा अंत ठरणार आहे.”

अभिता हसत म्हणाली. वनात परत येताच त्या तिघीही आपल्या मूळरूपात आल्या. अलकनंदाने त्यांना तिथे घडलेला प्रसंग सांगितला. मधुरिमा अर्णवजवळ जाऊन उभी राहिली.

“तू मोहिनींना फारच कमकुवत समजलास असे दिसतेय. मोहिनींच्यात जितकी शक्ती सामावली आहे, तितकी तुमच्या सारख्या काळ्या विद्येच्या उपासकांमध्ये आणि मांत्रिकांमध्ये कोठून येणार? स्वतःच्या स्वार्थासाठी तू स्वतःच्या मुलीवरही वार करायला मागे-पुढे पाहणार नाहीस. ह्याला अशाच अवस्थेत राहू द्या.”

“राज्ञी, जर ताहिरा नसती... म्हणजे तिने तो शक्तीचा प्रयोग केला नसता, तर आपण त्याला रोखू शकत नाही का?”

आदिराने नेहमीच्या कुतूहलाने विचारले. प्रश्न परत सुरू झालेले पाहून अरुंधतीने डोक्यावर हात मारला.

“नक्कीच रोखू शकतो, आदिरा. एक सिद्ध मोहिनी त्याला नक्कीच रोखू शकते; पण तुमच्यासाठी ती अतिशय कठीण आणि जवळजवळ अशक्य गोष्ट होती. कारण तुम्ही अजूनही तुमच्या ताकदी सिद्ध केलेल्या नाहीत. तरी तुम्ही हे केलेत ह्याचे मला कौतुक आहे.”

मधुरिमा त्या दोघींच्याही मस्तकांवरून हात फिरवत म्हणाली.

“आदिरा, तूही आता तुझ्या इतर शक्ती आत्मसात करून घेणे गरजेचे आहे.”

अलकनंदा हसत म्हणाली.

“आज मोहिनींच्या राजधर्मासाठी तुम्ही आपल्या तुटपुंज्या शक्तीही नेटाने वापरून सज्ज झालात. जसे दुष्कर्मांचे फळ प्राप्त होते, तसे चांगल्या कर्मांचेही होते.”

मधुरिमा गूढपणे म्हणाली. अर्णवपासून लांब जात तिने सर्व मोहिनींना एकत्र केले.

“मात्र त्यापूर्वी खूप मोठा खेळ पूर्ण व्हायचा आहे. उद्या सायंकाळी तक्षिका या वनात प्रवेश करणार. चक्रव्यूह नीट रचणे आवश्यक आहे. तिचा मृत्यूचक्रात प्रवेश होणे गरजेचे आहे.”

“राज्ञी, आपण जे करायला सांगितले आहे त्याने तर तक्षिका केवळ सीमारेषा ओलांडून आत येईल. ती तलावापर्यंत येण्याचा धोका पत्करेल का?”

वैजयंतीने शंका व्यक्त केली.

“ती आतापर्यंत डोळे झाकून विश्वास ठेवतेय; पण ती त्याच कपटी मांत्रिकाची कन्या आहे. तलावाजवळ मृत्यूचक्राचे निर्माण असू शकते, याचा अंदाज तिला असणार. ती तलावापर्यंत येणार नाही.”

मधुरिमाने उत्तर दिले.

“मग आपण काय करणार आहोत?”

पद्मिनीने कुतूहलाने विचारले.

"वेळ आली आहे, की मोहिनी आपल्या विद्येतील सर्वांत शक्तिशाली विद्येचा अवलंब करतील. आतापर्यंत आपण केवळ आपल्या नजरेतल्या मोहिनीचा वापर केला; पण आता वेळ आली आहे.”

             सर्वजणींच्या चेहऱ्यावर विलक्षण चमक आली होती. सर्वात शक्तिशाली विद्येचा अवलंब त्या सर्वजणी प्रथमच करणार होत्या. वर्षांपूर्वी शिकलेल्या सर्वात मोठ्या संरक्षण विद्येचा अवलंब असा कधी होईल याचा कोणाला हासभासही नव्हता; पण मधुरिमाच्या शब्दांनी आदिरा आणि ताहिरा गोंधळल्या होत्या.

“म्हणजे आपण काय करणार आहोत?”

आदिराने न राहवून विचारलेच.

“जे काही करणार आहोत, त्यात तुम्ही नसणार आहात. तू आणि ताहिरा महालाच्या बाहेर पडायचे नाही.”

मधुरिमा त्यांच्याकडे पाहत म्हणाली.

“असे का? आपणाला आमच्या योग्यतेवर शंका आहे का?”

आदिराने मधुरिमाला उलट प्रश्न केला. सर्व मोहिनी तिच्याकडे हिला कुठून नवे खूळ सुचत आहे, अशा नजरेने पाहत होत्या.

“आदिरा, राज्ञीनी आज्ञा दिली आहे. तुझे मत विचारले नाही. त्यांना उलट प्रश्न करण्याइतपत आपली योग्यता नाही. आपली मर्यादा ओळखून राहणे शिका. राज्ञींच्या निर्णयाला आव्हान द्यायचे नाही.”

अरुंधती रागात म्हणाली.

“परंतु यावेळेस त्यांना कारण समजणे आवश्यक आहे, अरुंधती. आदिरा, ऐक. मोहिनी त्यांच्या सर्वात मोठ्या शस्त्राचा म्हणजेच मायाजालाचा प्रयोग करणार आहेत. मायाजाल हे सर्वात प्रभावी शास्त्र आहे. त्या मायाजालात सारेजण खेचले जातील. या मायाजालाचा कोणताही प्रभाव मोहिनींवर पडणार नाही; परंतु सिद्धांत आणि नचिकेत त्याने मोहित होऊन बाहेर पडू शकतात, जे की त्यांच्या जीवाला हानिकारक असू शकते.”

“आमच्या लक्षात आले राज्ञी, की आम्हांला काय करायचे आहे.”

आदिरा हसत म्हणाली. प्रसन्न नजरेने त्यांच्याकडे पाहत मधुरिमाने दूरवर पाहिले. तिचे मधुर हास्य पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. त्या दोघींचा समजूतदारपणा तिला कुठेतरी प्रभृतीची तीव्र आठवण करून देत होता; परंतु सर्व विसरून ती आपल्या हास्यामागे आपली वेदना सहज दडवून उभी होती. दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा करत होती.

___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all