Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५३)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५३) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

           प्रातःकाळ झाली होती. मधुरिमाच्या चेहऱ्यावर आज वेगळेच तेज दिसून येत होते. क्षणात ते पौर्णिमेच्या चंद्राचे तेज भासत होते, तर क्षणात तळपणाऱ्या सूर्याचे! एका अप्रतिम निश्चयाने तिची मुद्रा झळकत होती. सर्व मोहिनी आपापल्या कार्यासाठी सज्ज झाल्या होत्या. नचिकेत आणि सिद्धांतही तलावाकाठी आले होते.

“राज्ञी, आम्ही सज्ज आहोत. केवळ आपल्या पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे.”

पद्मिनी म्हणाली. मधुरिमाने डोळ्यांची अलगद उघडझाप केली.

“सिद्धांत आणि नचिकेत, मोहिनी आज इथे मायाजाल रचणार आहेत. त्या मायाजालाच्या प्रभावाने तुम्हीही मृत्यूचक्रात खेचले जाऊ नये, म्हणून आदिरा आणि ताहिरा तुमच्यासमवेत महालात राहणार आहेत.”

“तुम्ही निश्चिंत रहा देवी. आम्ही आपल्या आज्ञेचे पालन करू.”

नचिकेत नम्रपणे म्हणाला. मधुरिमाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. नचिकेतच्या चेहऱ्यावर अजूनही चिंता स्पष्ट उमटलेली दिसत होती. तो घाबरला होता. अनपेक्षित सगळ्या घटना घडताना पाहून कदाचित भीती निर्माण झाली होती. त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मधुरिमाच्या नजरेतून सुटली नव्हती.

“चिंता करू नकोस, नचिकेत. माझ्या एकाही मोहिनीला, तुम्हांला किंवा या वनातील माझ्या प्राणप्रिय पशुपक्ष्यांनाही मी इजा पोहचू देणार नाही. आपण सर्व सुरक्षितच राहू.”

             तिने आदिराकडे एकच दृष्टिक्षेप टाकला. आदिरा आणि ताहिरा त्या दोघांना घेऊन महालात जाण्यासाठी निघून गेल्या.

“मायाजाल सज्ज करायचे आहे. तुम्हांला माहित आहे, की आपण हे कसे करू शकतो. तर तुम्ही मला सांगा की तुमच्या मनात काय योजना आहेत?”

मधुरिमा तिच्या साथीदार मोहिनींकडे पाहत म्हणाली.

“राज्ञी, मी माझे मानसी रूप परत धारण करते. मानसी म्हणून मी वनाबाहेर तक्षिकाला मार्ग दाखवायला जाणार आहे. उत्तरेकडील भागात अलकनंदा व इतर मोहिनींनी जे शक्तीकवचाला छिद्र निर्माण केले आहे, तेथून तिला आत घेऊन यायची जबाबदारी माझी असेल.”

अरुंधती म्हणाली.

“राज्ञी, मी अर्णवच्या संरक्षणाची जबाबदारी घेते. माझे कार्य मी योग्य वेळेस पूर्ण करेन.”

पद्मिनी सूचकपणे म्हणाली.

“राज्ञी, आपण येईपर्यंत पूर्ण वनात सर्व मोहिनींसहित मी मायाजाल योग्यरीत्या रचेन. आपण आता आपल्या इच्छित स्थळी प्रस्थान करावे.”

अलकनंदानेही आपली योजना सांगितली. मधुरिमाने त्यांच्याकडे पाहून मानेनेच संमती दिली. आज रागिणी असती तर यातील बऱ्याच जबाबदाऱ्या स्वतः घेऊन ती सज्ज असती, या विचाराने तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सर्व मोहिनी आपापल्या जागी निघून गेल्या होत्या. वनाच्या त्या मध्यभागात लाखो मोहिनी तक्षिकाच्या स्वागताला सज्ज होत्या.

__________________________

           अरुंधती आणि वैजयंती, दोन्ही मोहिनी तक्षिकाजवळ पोहोचल्या होत्या. तक्षिकाही सज्जच होती.

“गुरूदेवी, आपण माझ्या मागोमाग या. सूर्यास्तापूर्वी आपल्याला त्या स्थळी जायला हवे.”

मानसी म्हणाली. तक्षिकाही अरुंधतीच्या मागोमाग वनाच्या उत्तर भागात आली होती. वनाच्या उत्तर भागात जणू खरोखरचे प्रवेशद्वार असावे अशा रीतीने दोन वृक्ष एकत्र आले होते. आत पाहता घनघोर जंगल दिसत होते. पहिल्यांदा तक्षिकाचे मन वनात प्रवेश करण्याबाबत साशंक झाले; परंतु मधुरिमा परत आल्यावर हा सूड अपूर्ण राहील हे मनात आल्याने, ती सज्ज झाली. तक्षिकाने आत प्रवेश केला तसे तिला काहीसे विचित्र जाणवले; परंतु काय हे अनाकलनीय होते. ती अजूनही मानसीच्या तथा अरुंधतीच्या मागून चालत होती. ती काही पावले पुढे आली तोच तिला मागून आवाज आला. अर्णव खंजीराने करत असलेला वार तिने सहजगत्या चुकवला होता. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटले होते; परंतु ते काही क्षणांत क्रोधाच्या बदलले.

“मूर्खा! तुला मी आश्रय दिला आणि तू मलाच मारायला निघाला आहेस.”

“हो गुरुदेवी. तुझ्याचमुळे मी या कटात सामील झालो व माझ्या आयुष्याची सर्वात मोठी चूक करून बसलो. माझा मृत्यू होण्यापेक्षा तू मरणे अधिक आवश्यक आहे.”

             अर्णवचे रूप धारण केलेली वैजयंतीने तक्षिकाच्या दिशेने खंजीर फेकला. अर्णवला मारण्याच्या रागात तक्षिकाने आपल्या शक्तींचे आवाहन केले; पण तिच्या शक्तींनी मायाजालात प्रवेश करताच तिची साथ सोडली होती. कारण ह्या मायाजालाच्या मागे रचलेल्या भयाण मृत्यूचक्रात तिने कधीच प्रवेश केला होता. शक्ती का एकवटत नाहीत इतका विचार करण्याइतपत वेळ तिच्याकडे नव्हता. शक्ती विफल ठरत असलेल्या पाहून ती अर्णवने फेकलेला खंजीर शोधायला मागे वळली. तेवढ्यात वायूवेगाने वैजयंती तिथून सहजगत्या एका वृक्षात सामावली. दुसऱ्या वृक्षात सामावलेल्या पद्मिनीने अर्णवला बाहेर ढकलले. तक्षिकाने खंजीर उचलला व अर्णवच्या दिशेने भिरकावला.

“गुरुदेवी, म...”

            अर्णव मधुरिमाचे नाव घेणार तोच तो खंजीर त्याचे काळीज चिरून आरपार निघून गेला होता. तिकडे तलावाकाठी उभ्या असणाऱ्या मधुरिमाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. अर्णवच्या कर्मांचा दंड त्याला जसा द्यायचा तिने ठरवला होता, अगदी तसेच झाले होते. मधुरिमा परत आली आहे हे कळण्याचा तक्षिकाचा शेवटचा मार्ग तिने स्वतः बंद केला होता. अर्थात याची तिला काहीच कल्पना नव्हती. तक्षिका त्याच्याकडे एक कुत्सित कटाक्ष टाकून पुन्हा मानसीकडे वळली; पण मानसीच्या रुपात असणारी अरुंधती केव्हाच वृक्षात सामावली होती. तक्षिका मनातल्या मनात घाबरली होती. तिची कोणतीही विद्या तिच्या कामी येणार नाही, हे तिच्या लक्षात आले होते; पण असे का होत आहे हे तिला कळत नव्हते. समोर उंच वृक्ष दिसत होते. ती मायाजालात पुरती फसली होती. तिने दिसेल त्या वाटेने आत जायचे ठरवले. मायाजाल तिला स्वतःकडे खेचण्यात यशस्वी झाले होते. मृत्यूचक्राच्या अंतिम टप्प्याकडे तिचा प्रवास कधीच चालू झाला होता. तिला याची कल्पना नव्हती; पण तिच्याही नकळत तिला या सूडाच्या अग्नीत खेचून आणणारी ती सूचकपणे हसत होती.

‘ये तक्षिका. तुझ्या भेटीची आतुरता आहे. पहिल्यांदा मोहिनींची राज्ञी कोणाच्या तरी येण्याची आतुरतेने वाट पाहतेय; पण हे भाग्य नाही, दुर्भाग्य म्हणून तुझ्यासमोर येणार आहे आणि फक्त मीच नाही तर आणखी कोणीतरी तुझी वाट पाहत आहे.
सुडाचा पेटलेला अग्नीही तुझ्या प्रतीक्षेत आहे.’

ती शांतपणे उभी होती.

___________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all