डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५४) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
तक्षिका मार्ग दिसेल त्याप्रमाणे पुढे येत होती. काही अंतर पुढे आल्यावर तिला दोन मार्ग दिसत होते. डावीकडील मार्गाने तिला जवळच असणारा तलाव दिसत होता, तर उजवीकडील मार्गाने वनाची पश्चिमेकडील सीमा दिसत होती. पश्चिमेकडील सीमेकडून बाहेर पडणे शक्य आहे, हे ती जाणून होती. मानसीही अचानक गायब झाल्याने काहीतरी चुकले असल्याचे तक्षिकाला जाणवले होते. तिने झपाझप पावले टाकत पश्चिम सीमेकडील मार्गावरून चालायला सुरुवात केली. त्या मार्गावरून ती किती वेळ पुढे जात होती, हे तिला समजायला मार्ग नव्हता. तिला पुन्हा दोन मार्ग दिसू लागले होते. पुन्हा डावीकडील मार्गाने तिला जवळच असणारा तलाव दिसत होता, तर उजवीकडील मार्गाने वनाची पश्चिमेकडील सीमा दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू जमा झाले होते. ती मनातून फारच थरारली होती. तरीही आताही तिने पश्चिमेकडील मार्ग निवडला व ती चालू लागली. बरेच अंतर चालल्यावर वातावरणातील कोंदटपणा कमी होऊन प्रसन्नता पसरल्याचे तिला जाणवले. ती त्या जंजाळातून सुटल्याच्या आनंदात खाली बसली.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ५४) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
तक्षिका मार्ग दिसेल त्याप्रमाणे पुढे येत होती. काही अंतर पुढे आल्यावर तिला दोन मार्ग दिसत होते. डावीकडील मार्गाने तिला जवळच असणारा तलाव दिसत होता, तर उजवीकडील मार्गाने वनाची पश्चिमेकडील सीमा दिसत होती. पश्चिमेकडील सीमेकडून बाहेर पडणे शक्य आहे, हे ती जाणून होती. मानसीही अचानक गायब झाल्याने काहीतरी चुकले असल्याचे तक्षिकाला जाणवले होते. तिने झपाझप पावले टाकत पश्चिम सीमेकडील मार्गावरून चालायला सुरुवात केली. त्या मार्गावरून ती किती वेळ पुढे जात होती, हे तिला समजायला मार्ग नव्हता. तिला पुन्हा दोन मार्ग दिसू लागले होते. पुन्हा डावीकडील मार्गाने तिला जवळच असणारा तलाव दिसत होता, तर उजवीकडील मार्गाने वनाची पश्चिमेकडील सीमा दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू जमा झाले होते. ती मनातून फारच थरारली होती. तरीही आताही तिने पश्चिमेकडील मार्ग निवडला व ती चालू लागली. बरेच अंतर चालल्यावर वातावरणातील कोंदटपणा कमी होऊन प्रसन्नता पसरल्याचे तिला जाणवले. ती त्या जंजाळातून सुटल्याच्या आनंदात खाली बसली.
“तक्षिका... नाही गुरुदेवी. आम्हालाही ज्ञान प्रदान करा. मोहिनींच्या विनाशाचे ज्ञान, नाही का?”
अलकनंदा छद्मी हास्य लेवून उभी होती. तक्षिकाने मान वर करून पाहिले. ती तलावाच्या परिसरात होती. निळेशार पाणी आणि त्यात हिरवट रंगांचे पानांचे प्रतिबिंब असणारे ते पाणी तिला ओळख पटवून देत होते. ती मोहिनींच्या सापळ्यात स्वतःहून चालून आली होती. मोहिनींनी रचलेले मायाजाल तिला शेवटी तलावापर्यंत खेचून घेऊन आले. तरीही तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.
“मोहिनींनो, आता माझ्या लक्षात आले की तुम्ही मायाजाल रचले होते; पण जिथे तुम्ही मला घेऊन आला आहात, तिथे माझ्या शक्ती पुन्हा परत येणार इतकेही तुम्हाला कळू नये याचे आश्चर्य वाटते.”
तक्षिका खळखळून हसत म्हणाली.
“आम्हांला शुल्लक समजताना आपल्या अपूर्ण ज्ञानाची जाणीव ठेव, तक्षिका.”
अलकनंदा कुत्सितपणे म्हणाली. अरुंधती मानसीच्या रूपातच पुढे आली. तिला पाहताच तक्षिका क्रोधित झाली.
“तूही ह्यांना सामील होतीस तर! मानसी, तुला अजून माहित नाही ह्या तक्षिकाची ताकद किती अफाट आहे.”
“तुझ्या ताकदीची महती कोणाला सांगत आहेस, तक्षिका? एका मोहिनीला? मी मानसी नाही, अरुंधती आहे.”
अरुंधती हे नाव ऐकताच तक्षिकाचे डोळे विस्फारले. शलाका, शाश्वती, विक्रमदेव, दिग्विजय आणि गुरुदेवांच्या मृत्यूच्या रचलेल्या खेळात हीसुद्धा मुख्य सूत्रधार होती हे तिला माहित होते. शेजारीच अर्णवला उभे पाहून ती चमकली. अर्णवच्या रुपात आपणापाशी एक मोहिनीच आली होती, हेही तिच्या लक्षात आले. अर्णवला आपण नाहक मारल्याचे जाणवल्यावर मोहिनींनी किती विचारपूर्वक हा डाव रचला आहे, ह्याची तिला जाणीव झाली.
“मायावी मोहिनींनो, आता मात्र तुम्ही हद्द केलीत. तुम्हालाही तुमच्या राजकन्यांच्या भेटीला पाठवायची वेळ आली आहे. तुम्ही मला मृत्यू देऊ शकत नाही. तुमच्यापैकी कोणीच सर्व शक्तींनी सिद्ध नाही हे मी जाणते. सज्ज रहा. तुमच्याच मायाजालात तुम्हीच मृत्यू पावणार आहात.”
तक्षिका अतीव क्रोधाने बोलत होती. ती पुढे काही करणार तोच तिच्या कानात एक धीरगंभीर आणि कठोर आवाज घुमला.
“ते आता शक्य नाही. वेळ टळून गेली आहे, तक्षिका. शलाकाच्या कृत्याची तू पुनरावृत्ती केलीस. मग मृत्यूचक्राचीही पुनरावृत्ती होणे निश्चित आहे.”
“मृत्यूचक्र? कोण म्हणाले? मी इतकी मूर्ख नव्हे. मला हे ज्ञात आहे, की तुमच्यापैकी कोणीच मृत्यूचक्र निर्माण करू शकत नाही. उगाच मला भुलवण्याचा प्रयत्न सोडून, स्वतःच्या जीवाची पर्वा करा.”
तक्षिका कडाडली.
“मांत्रिक सूर्यभानासारख्या कपटी मांत्रिकाची कन्या असूनही तुझी त्याच्याइतकी बुद्धिमत्ता नाही. मला ललकारणे तुझ्या हिताचे नाही.”
पुन्हा तोच आवाज वनात घुमला.
“मूर्ख मोहिनी, समोर ये आणि पहा तुझ्यासमोर कोण उभी आहे.”
तक्षिकाच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. तलावाच्या पाण्यातून एकच खळखळाट झाला. पाण्यात अग्नी पेटवल्याप्रमाणे पाणी उसळू लागले. क्षणात तो तलाव समुद्राच्या पाण्याहूनही खोल भासू लागला. तलावातून एक मोठा जलप्रवाह वर येत होता. त्सुनामीचा लाटेसारखा उसळणाऱ्या त्या जलप्रवाहात ती मोहिनी तलावातून वर येत होती. ती तक्षिकाला पाठमोरी अशी वर आली होती. तिने जमिनीवर पाऊल टाकले व ती तक्षिकाच्या दिशेने पुढे येऊ लागली. तिचा चेहरा प्रकाशझोतात आल्यावर तक्षिकाने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचा राग भीतीत बदलला होता.
“मधुरिमा? अशक्य!”
तक्षिका जवळजवळ किंचाळली.
“हो, मीच आहे. मधुरिमा म्हण किंवा अभिता म्हण.”
मधुरिमा क्रूर हसत म्हणाली. मधुरिमाचे ते शब्द तिच्या कानात वाऱ्यासारखे शिरताच, क्षणात गेले काही दिवस घडलेले प्रसंग तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले. एका अंगठीवर विश्वास ठेवून आपण हे केले. ती अंगठी आपल्या पित्याला मारणाऱ्या मोहिनींकडेही असू शकते, हा विचार आपल्या डोक्यात आला नाही याचे तिला आश्चर्य वाटले. अभिताकडे पाहताक्षणी आपण तिचे बोलणे ऐकत होतो, हा संमोहनाचा प्रकार असू शकतो याचा आपण विचारही केला नाही हेही तिच्या लक्षात आले. तिच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलत होते. मोहिनींच्या राज्ञीने तिला पटावरील प्याद्याप्रमाणे खेळवले होते.
“तू माझ्यासोबत खेळ खेळलीस. कपट करून आज आमच्यात सामील झालात?”
तक्षिकाच्या चेहऱ्यावरील भीतीयुक्त छद्मी हास्य पाहून मधुरिमाच्या नजरेत क्रोध उतरला होता.
“तक्षिका, मी तुझे ज्ञान ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. कपटी माणसाशी कपट करण्यात कसली लज्जा असणार? हो, मी खेळ रचला आणि तोही साधासुधा नाही. भयाण मृत्यूच्या तांडवात, मी रचलेल्या मृत्यूचक्रात तू उभी आहेस.”
मधुरिमा क्रोधित झाली होती. तक्षिकाचे उरलेसुरले अवसान गळून पडले होते. मधुरिमाच्या डोळ्यांचा क्षणाक्षणाला बदलणारा रंग पाहून ती निश्चल उभी होती.
“माझ्याशी वैर होते ना? बोल. माझ्याशी होते ना तुमचे वैर? मग मला येऊन मारायचे होते. माझ्यावर वार करायचा होता. माझ्याशी युद्ध पुकारायचे होते. माझ्या अंशाला मारण्याचे दु:साहस केलेसच कसे?”
मधुरिमाने वायूवेगाने पुढे येत एक झटक्यात तक्षिकाचा हात पडकला.
“ह्याच हातांनी माझ्या रक्तिमावर वार केलास ना?”
मधुरिमाची क्रूर, परंतु वेदनेने भारलेली किंकाळी आसमंत छेदत गेली. तिच्या हातातला खंजीर चकाकला. पाठोपाठ तक्षिकाच्या किंकाळीचाही आवाज आला. सर्व मोहिनी थरारून मधुरिमाकडे बघत होत्या. तिच्या चेहऱ्यावर आणि पूर्ण शरीरावर तक्षिकाचे रक्त उडाले होते. मधुरिमाने तक्षिकाला जोरात लाथ मारली. तशी ती प्रचंड वेगाने जमिनीवर आपटली. मधुरिमाचे डोळे आग ओकू लागले होते. तिच्या किंकाळीने संपूर्ण वन थरारून गेले. तलावाकाठच्या पूर्ण परिसरात अग्नी पेटला होता. सर्व मोहिनी तिच्या या विक्राळ रुपाला पाहून एका बाजूला उभ्या होत्या. आज तिच्यातली राज्ञी नाही, तिच्यातली माता तिच्या अंशांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेत होती. तक्षिकाने मरणासन्न अवस्थेतही काळ्या विद्येला आवाहन करण्याचा प्रयत्न केला. ते पाहताच मधुरिमा प्रचंड आवेगात उठली व तिने एकच लत्ताप्रहार तिच्यावर केला. मधुरिमाच्या प्रचंड ताकदीने ती जमिनीत लोटली गेली. तिने आपला प्राण सोडला होता. मधुरिमा गुडघे टेकून बसली होती. तिचे रक्ताळलेले डोळे पाणावले होते. रक्तिमासोबत प्रभृती आणि रागिणीच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले होते. कितीतरी वेळ ती तिथेच आक्रोश करत होती. काही वेळाने भावनावेग ओसरल्यावर तिने तलावात प्रवेश केला. साऱ्या आठवणी, सारे क्लेश उरात घेऊन जणू ते पाणी तिला शांत करत होते. ती तलावातून बाहेर आली तेव्हा ती प्रचंड तेजाने तळपत होती.
“तुम्ही घाबरून दूर का उभ्या आहात. सर्वांनी इथे या. (सर्वजणी तिच्यासमोर आल्या.) तुम्हांला मला काय विचारायचे होते, जे विचारण्यापासून मी तुम्हांला अडवले होते.”
“आपण इतकी वर्षे कोठे होतात राज्ञी? पौर्णिमेला परत येणार होतात, मग आधी येणे कसे शक्य झाले?”
अरुंधतीने विचारले.
“मी इथून कोसो दूर एका खंडहरात तपस्या करीत होते. मी ज्या मांत्रिकाला मारले त्याला त्याच्या काळ्या विद्यांचे वरदान होते, की त्याला मारणारा पंधरा वर्षे अज्ञातवास भोगेल आणि माझी पंधरा वर्षे त्याच दिवशी पूर्ण झाली ज्यादिवशी रागिणीचा मृत्यू झाला. पौर्णिमेपर्यंत येण्याचा तर मी फक्त इशारा दिला होता.”
मधुरिमाने ताहिराला समोर बोलावले व तिला तलावात प्रवेश करण्यास सांगितले. मधुरिमाच्या तेथील अस्तित्वामुळे तलावाचे पाणी अभिमंत्रित झाले होते. ताहिराने त्यात प्रवेश करताच तिला भयानक वेदना होऊ लागल्या. कितीतरी वेळ ती पाण्यात जखडली होती. जोरजोराने ओरडत होती. तिचा विलाप काळजाला साद घालत असला तरी हे तिच्या चांगल्यासाठी आहे, हे जाणून सर्वजणी शांत होत्या. काही क्षणांनी ती तशीच बेशुद्ध पडली. मधुरिमाने अलकनंदाकडे इशारा केला. ती ताहिराला घेऊन बाहेर आली व तिने ताहिराला वृक्षाच्या जवळ जमिनीवर ठेवले.
“ताहिरा काही काळाने शुद्धीवर येईल. तिच्या शरीरातल्या तामसी शक्ती बाहेर निघाव्यात म्हणून तिला वेदना द्याव्या लागल्या. तिला तिचे मोहिनीरूप पुन्हा प्राप्त झाले आहे. आता जाण्यापूर्वी मला आणखी एक निर्णय घ्यायचा आहे.”
“जाण्यापूर्वी? आपण पुन्हा कोठे जात आहात राज्ञी?”
अलकनंदाने विचारले. मधुरिमाने त्या सर्वांना तलावाकाठी उभे राहायला सांगितले व तिने पाण्यात प्रवेश केला. ती राजसिंहासनावर विराजमान झाली होती.
(आदिरा आणि ताहिराकडे पाहून..)
“मी मोहिनींची राज्ञी मधुरिमा. आज ताहिराला मी माझ्या बळाने मोहिनीरूप परत प्राप्त करून दिले आहे. मला खेद आहे, की माझ्या दोन्ही अंशांचा विदारक मृत्यू झाला. रक्तिमा अत्यंत कर्तव्यदक्ष होत्या; परंतु त्यांना कपटाने मारण्यात आले. प्रभृती ह्या अत्यंत टोकाचे निर्णय घ्यायच्या. त्या राजसिंहासनाच्या योग्य नव्हत्या. मी तुम्हां सर्व मोहिनींच्या साक्षीने आदिराला या राजवंशाची उत्तराधिकारी घोषित करते, तर ताहिराला या प्रचंड साम्राज्याची सेनापती. यापुढे उत्तराधिकारी तीच असेल जिची राजसिंहासनावर विराजमान होण्याची योग्यता असेल. पुन्हा तुम्हांला पराजित करू शकणारी अथवा तुमच्याहून श्रेष्ठ मोहिनी जोवर जन्माला येत नाही, तोवर हे साम्राज्य तुमच्या आधिपत्याखाली राहील. मी चिरंजीवी आहे. मी मोहिनींच्या साम्राज्यात चिरंतर राहीनच; पण राज्यकारभार तुमच्या हातात सोपवून... जेव्हा जेव्हा पुन्हा आपसांत वैरभाव होईल, तेव्हा तेव्हा मी तेथे असेन. मोहिनींच्या साम्राज्यावर कधी संकट आले, तर त्या संकटाला प्रथम मधुरिमाशी सामना करावा लागेल. निश्चिंत रहा. मी सदैव तुमच्यासोबत आहे. मोहिनींचं साम्राज्य चिरंतर, अखंड राहो!”
मधुरिमा हळूहळू राजसिंहासनावरून खाली उतरली. सर्व मोहिनींचे भारून आलेले डोळे तिने पाहिले. तिच्या डोळ्यांत ही अश्रू दाटले होते.
“मधुरिमा.”
नचिकेतने हाक मारली.
“रडू नका. नचिकेत, का रडत आहात तुम्ही सर्वजण?”
“तुला एक स्पष्टच विचारतो. क्षमा असावी. तू माझ्याशी विवाह करून कायमची इथेच राहू शकत नाही का?”
नचिकेत मान खाली घालूनच म्हणाला. कदाचित त्याला नकाराची कल्पना होतीच.
“तूच मला क्षमा कर, नचिकेत. मी आयुष्यात खूप काही सहन केले आहे. माझ्या मातापित्याचा या मनुष्यांच्या मोहापायी झालेला मृत्यू, माझ्या प्राणप्रिय रागिणीचा मृत्यू, रक्तिमा आणि प्रभृती या माझ्या अंशांचा मृत्यू... एक ना अनेक! एकाच जीवनात अनेक वर्षे सततची भटकंती आणि पंधरा वर्षे अज्ञातवास भोगला आहे. खरेतर माझे वय काय हेही मला माहित नाही. माझी कर्तव्ये पूर्ण झाल्यामुळे मी अग्निप्रवेश करणार होते; पण मी नसताना आणि कोणते संकट तुमच्यावर आले तर? म्हणून मी याच वनात किंवा दूरवर कोठेतरी अदृश्य रूपाने चिरंजीव आहे; पण प्रेम, विवाह, स्थैर्य या भावनांपासून मी सदैव अलिप्त आहे.”
ती वळली. सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहत होता. तिचे वनातील अस्तित्व खरेच खूप सुंदर होते. ती राज्ञी जरी असली, तरी ती मोहिनींना जीव का प्राण असे वागवायची. एका मोहिनीसाठी तिने आपल्या अंशालाही दंड दिला. ती योद्धा होती. रुपगर्विता होती. तितकेच तिचे भयाण रूपही होते. कर्णिकाची वाणी सत्य होती. तिच्यात तिच्या अशा शक्ती होत्या. तिने कालचक्राला आपल्यासमोर झुकायला भाग पाडले. तिने दोनदा भूतलावर मृत्यूचा तांडव मांडला आणि आताही ती जात होती, ते पुन्हा नव्याने परत यायलाच. वनातून आभाळाच्या दिशेने पायऱ्या दिसत होत्या. तिच्या अदृश्य खंडहराकडे जाणाऱ्या! तिने एकदा पाठमोरे वळून पाहिले. त्या नजरेत मी परत येईन असे आश्वासन होते. तिची हळुवार पावले त्या पायऱ्यांवर पडत गेली. मोहिनींची सर्वश्रेष्ठ राज्ञी मधुरिमा आपल्या पुढच्या प्रवासासाठी कधीच विरून गेली होती.
___________________________________ समाप्त.
___________________________________ समाप्त.
(कथा आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा.)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा