मोहिनी स्मार्त एकादशी
संपुर्ण वर्षात २४ एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आणि वेगळे महत्व आहे.
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी स्मार्त एकादशी म्हणतात. एकादशीला पौराणिक महत्व प्राप्त आहे.
एकादशी केल्याने सहस्त्र गो दान तसेच अश्र्वमेध यज्ञ केल्यावर जितकं पुण्य लाभतं त्याच्या अधिक पुण्य एकादशीचा उपवास केल्याने लाभतं.
मोहिनी एकादशी २०२३ ची तारीख आणि शुभ मुहूर्त
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी तिथी सुरू - ३० एप्रिल २०२३
एकादशी वेळ -संध्याकाळी ०८.२७
शुक्ल पक्ष एकादशी तिथी समाप्त : ०१ मे २०२३ रात्री १०.०७
उदय तिथीनुसार ०१ मे रोजी मोहिनी एकादशीचे व्रत केले जाईल.
मोहिनी एकादशी २०२३ व्रत पारायण वेळ
उपवासाची वेळ - २ मे रोजी सकाळी ५.५७ ते ८.३१
धर्मग्रंथांनुसार, समुद्र मंथनावेळी जेव्हा समुद्रातून अमृत कळस बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांमध्ये यावरुन वाद सुरू झाला. तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली. यावेळी राक्षसांचे लक्ष विचलित करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला. यानंतर सर्व देवतांनी अमृतपान केले आणि तृप्त झाले. या दिवशी वैशाख महिन्याची एकादशीची तिथी होती, म्हणून तिला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले. या दिवशी विष्णूदेवांच्या मोहिनी अवताराची पूजा आराधना केली जाते.
कथा अशी की,
पौराणीक मान्यतेनुसार एकादशीच्या विविध कथा सांगीतल्या जातात. मोहिनी एकादशीची कथा श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितली होती. कथा अशी आहे की, युधिष्ठिराने देवकीनंदनास प्रश्न केला वैषाख महिन्यातील एकादशीला काय नाव आणि त्याची काय कथा आहे. हे कान्हा कृपया ही कथा सांगावी. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले धर्मराज मी जी कथा सांगतो आहे ती वशिष्ठ ऋषिंनी मर्यादा पुरूषोत्तम रामाला सांगितली होती. एक वेळा रामाने वसिष्ठानां प्रश्न केला गुरूवर्य एखादे असे व्रत सांगावे की, ज्यामुळे पापमुक्ती मिळेल आणि सर्व दुखांचा विनाष होईल. मी सीते पासून दूर झालो त्यानंतर नेहमी दुख, निराशा जाणवते.
श्रीरामांनी केले मोहिनी एकादशी व्रत
श्रीरामांच्या या प्रश्नावर वसिष्ठ ऋषी प्रसन्न झाले आणि श्रीरामांना म्हणाले हा उत्तम प्रश्न आहे. तुमची बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. त्यांनी सांगितले की, वैषाख महिन्यात येणारी एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. ही एकादशी केल्याने सर्व पापमुक्त होतात, तसेच दुखाचा विनाश होतो. मोह, माया यातून मुक्ती मिळते. जर कामुक भावना, मोह माया, यांपासून दूर रहायचं असेल तर मोहिनी एकादशी व्रत अतीउत्तम आहे.
आणखी एक कथा
सरस्वती नदीजवळ भद्रावती नावाचे एक सुंदर नगर होते. राजा धृतिमान जो भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता तो या ठिकाणी राज्य करत होता. त्याला पाच पुत्र होते, त्यापैकी धृष्टबुद्धी नावाचा पाचवा मुलगा अत्यंत वाईट कर्म आणि अनैतिक कृत्यांमध्ये गुंतला होता. हे सर्व पाहून राजा धृष्टिमानाने आपल्या मुलाचा त्याग केला. आता धृष्टबुद्धी जगण्यासाठी डाकूू बनला. एकदा जंगलात भटकत असताना त्याला कौंदिन्य ऋषींचा आश्रम दिसला. वैशाख महिन्याची वेळ होती आणि कौंदिन्य ऋषी स्नान करीत होते. त्यावेळेस कौंदिन्य ऋषींच्या अंगावरील काही तुषार धृष्टबुद्धीच्या अंगावर उडाले. ऋषीच्या महात्म्यामुळे धृष्टबुद्धीला आपला दुष्ट कर्मांची जाणीव झाली आणि त्याने कौंदिन्य ऋषींना भूतकाळात केलेल्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी याचना केली. यासाठी ऋषींनी त्याला मोहिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले जेणेकरून त्याची पापांपासून मुक्तता होईल. एकादशीच्या दिवशी धृष्टबुद्धीने एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने केले. उपवासाच्या प्रभावाने त्याची सर्व पापे धुतली गेली आणि तो विष्णुलोकात पोहोचला.
©® राखी भावसार भांडेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा