Login

मोहोर प्रेमाचा भाग - एक

आकर्षण तात्पुरतं असतं प्रेम मात्र कायमं टिकतं.
मोहोर प्रेमाचा
भाग-एक
@ ज्योती सिनफळ
तेजसला आज ऑफिसला रविवारची सुट्टी होती म्हणून तो सकाळी निवांत उठला. मस्त गरम गरम पोह्याचा नाश्ता करुन तो टीव्ही बघत बसला. दुपारच्या जेवणासाठी आईने केलेल्या फिशकरीवर आडवा हात मारून दुपारी त्याने मस्त ताणून दिली.

संध्याकाळी त्याचा मित्र महेशच्या फोनने त्याला जाग आली. महेश तेजसचा बालपणीचा मित्र. थोड्या रागातच तेजसने महेशचा फोन उचलून त्याला दोन तीन शिव्या दिल्या आणि म्हणाला,

“काय रे मश्या आज एक दिवस मला झोपायला मिळतो. ते पण तुला बघवत नाही का? मी फोन उचलत नाही तरी तू सारखा फोन करुन माझी झोपमोड का करत आहेस?”

“तेज्या पटकन तयार होऊन घराच्या खाली ये. आपल्या दोघांना बाहेर जायचे आहे.”
त्यावर तेजस झोपमोड झाल्यामुळे महेशला
रागाने म्हणाला,

“अरे यार मश्या बाहेर जाण्यासाठी तू माझी झोपमोड केलीस. मी कुठेही येणार नाही. मला एकच रविवार मिळतो झोपायला. तू जा एकटा बाहेर फिरायला.”

“मला काही माहित नाही.‌ मी पंधरा मिनिटात तुझ्या घराखाली येतो आहे. मागच्या महिनाभर माझ्यामागे लागला होतास ‘तुच माझी राणी’ हे नाटक बघायचं आहे. त्याच नाटकाची तिकिटे मिळाली आहेत. तुझी आवडती अभिनेत्री मोनाचे नाटक आहे ते. किती मुश्कीलीने तिच्या नाटकाची तिकिटे मी मिळवली आणि तू नाही म्हणतोस.”

मोना अभिनेत्रीचे नाव ऐकताच तेजस ताडकन उठला आणि महेशला म्हणला,

“आधी नाही का सांगायचे मुर्खा? मी दहा मिनिटात आवरुन पाच मिनिटांत खाली येतो आणि धन्यवाद लेका तू माझ्यासाठी मोना अभिनेत्रींच्या नाटकांचे तिकिट मिळविलेस.”

तेजस आवरुन हॉलमध्ये येतो आणि त्याच्या आईला म्हणाला,

“आई मी महेशबरोबर नाटकाला चाललो आहे. माझे रात्रीचे जेवण नाहीए.”

हे ऐकताच तेजसची आई त्याच्यावर चिडली आणि त्याला म्हणाली,

“तेजस तुझे हे नेहमीचे आहे. मला सकाळी म्हणाला होतास संध्याकाळी तू, मी आणि बाबा सिनेमाला जाणार आहोत आणि तिथुन मग बाहेर जेवायला. किती दिवसांनी आपण एकत्र वेळ घालवणार होतो आणि मी पण निवांत होते रात्री स्वयंपाक बनवायला लागणार नाही म्हणून आणि आता ऐनवेळी तू सगळा प्लॅन बदललास.”

“अग मम्मा, एवढी का चिडतेस. सॉरी ग. तू आणि बाबा जा ना सिनेमाला आणि जेवायला. माझी आवडती अभिनेत्री मोनाचे ‘तुच माझी राणी’ ह्या नाटकाची तिकिटे दोन महिने झाले मिळली नाही, ती आज महेशला मिळाली.”

“त्या मोना अभिनेत्रीचे नाटक बघायला चाललास का तू? सावकाश जा रे आणि रात्री जास्त उशीर करु नको घरी यायला.”

“हो ग मम्मा लवकर येईल मी घरी. तू आणि बाबा पण जाऊन या ठरल्याप्रमाणे सिनेमा बघायला आणि बाहेर जेवायला. आपण पुढच्या रविवारी नक्की एकत्र वेळ घालवूया. बाय बाय.”

तेजस पटकन आवरुन घराच्या खाली येऊन महेशची वाट बघत थांबला. तेजसला नाटकात, सिनेमात काम करणारी अभिनेत्री मोना खूप आवडायची. तिचे प्रत्येक नाटक व सिनेमा तो बघत असे. ‘तुच माझी राणी’ हे मोनाचे नाटक दोन महिन्यापूर्वीच पुण्यातील नाट्यगृहात आलं होत पण नाटक खुप छान असल्यामुळे ते‌ कायमच हाऊसफुल्ल असे. म्हणून त्याची तिकीट तेजसला एवढे दिवस मिळाली नाही.

तेजस घराखाली येऊन दहा मिनिटे झाली तरीपण महेश आला नाही म्हणून रागाने तेजस महेशला फोन लावणार तेवढ्यात महेश तिथे आला.

तेजस परत महेशला म्हणाला,

“धन्यवाद मश्या तू माझा खरा मित्र आहेस.”

“एवढं मस्का लावायची गरज नाहीए. तुझ्यासाठी अजुन एक सरप्राइज आहे. ते नाटक संपल्यावर मी तुला सांगेल. त्यासाठी मला पार्टी हवी.”

“हे काय सांगायची गरज आहे का? आज माझा लकी दिवस आहे. एकाच दिवशी दोन सरप्राइज मिळली आहे मला. आधी मोनाच्या नाटकाची तिकिटे तुला मिळाली आणि आपण ते‌ नाटक पहायला चाललो आहोत. एवढ सुंदर सरप्राइज तू मला दिलेस आणि अजून एक सरप्राइज देणार आहेस. गर्लफ्रेंड वैगरे मिळाली का तुला ?”

“काहीही काय बोलतोस तेजस. त्यापेक्षाही छान सरप्राइज देणार आहे मी तुला बघच तू.”

“बघूया नाटक संपल्यावर तुझे सरप्राइज. किती वाजता आहे नाटक आणि कुठे आहे?”

“बालगंधर्वला आहे नाटक. सात वाजता.”

तेजसने घडाळ्यात बघितले आणि महेशला म्हणाला,

“अरे महेश जोरात चालव की गाडी साडेसहा इथेच वाजले.”

“अरे रस्त्यावर ट्रॅफिक बघ किती आहे?काळजी करु नको आपण वेळेत पोहोचू."

तेजस आणि महेश सातला पाच मिनिटे असताना बालगंधर्व नाट्यगृहात पोहचल्यावर महेशने पटकन गाडी पार्किंगमध्ये लावली आणि ते दोघेजण पटकन नाट्यगृहात पोहचले. ‘तुच माझी राणी’ नाटकात मोनाची भुमिका बघण्यात तेजस एवढा गुंतला की नाटक संपल्यावरही तो मोनाच्याच विचारात नाट्यगृहाच्या बाहेर पडला.

महेश नाटक संपल्यावर तेजसला म्हणाला,

“तेजस चल तुला अभिनेत्री मोनाची ओळख करुन देतो.”

“काही काय बोलतोस मश्या. ती एवढी मोठी अभिनेत्री आपल्याला कशी काय भेटेल?”

महेश तेजसला घेऊन मोनाच्या ड्रेसिंग रुमपाशी पोहोचला आणि तिथे तिच्या सेक्रेटरीशी काहीतरी बोलला. सेक्रेटरी आत जाऊन थोड्यावेळाने बाहेर आला आणि महेश व तेजसला आत जायला सांगितले.

महेश आणि तेजस मोनाच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहचल्यावर. मोनाने महेश व तेजसला हॅलो केले आणि या बसा म्हणाली.

महेशने मोनाला ‘हॅलो’ म्हटले पण तेजस नुसता मोनाकडे बघतच बसला. तेव्हा महेशने त्याला हलवले तेव्हा तेजस हडबडुन मोनावरची खिळलेली नजर दुसरीकडे वळवत मोनाला सॉरी व नंतर हॅलो म्हणाला.

त्यावर मोना हसली .

महेश मोनाला म्हणाला,

“मी रुपेशचा मावसभाऊ. खुप छान काम करता तुम्ही. हा माझा मित्र तेजस तुमचा खुप मोठा फॅन आहे. तुमचे प्रत्येक नाटक व सिनेमा तो बघतोच.”

“अरे व्वा! धन्यवाद. काल आला होता रुपेशचा फोन. मी आणि रुपेश कॉलेजमधील मित्र. किती दिवसात आम्ही भेटलोच नाही. हल्ली सगळेजण आपापल्या व्यापात. त्यामुळे फक्त मोबाईलवरच बोलणे होते.”

त्यावेळी तेजस थोडं सावरुन मोनाला म्हणाला,

“खरचं तुम्ही खुप छान काम करता. मला तुम्ही खुप आवडता. आज तुम्हाला प्रत्यक्षात भेटून, तुमच्याशी बोलून माझे बऱ्याच दिवसाचे स्वप्न पूर्ण झाले. धन्यवाद तुम्ही आज आम्हाला भेटला त्यासाठी. तुमच्यासोबत एक सेल्फी काढू‌ शकतो का?”

“अरे का नाही?”

मोना लगेच तेजस आणि महेशच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उभी राहिली आणि तेजसने आपल्या मोबाईलमधून मोनासोबत दोन, तीन सेल्फी काढले.

महेश मोनाला म्हणाला,

“चला आता आम्ही निघतो, बाय आणि परत एकदा धन्यवाद तुम्ही आम्हाला भेटला म्हणून.”

महेश निघाला म्हणून तेजसला पण निघावे लागले पण त्याचे मन होत नव्हते तिथुन निघायचे.

महेश आणि तेजस गाडी पार्किंगमध्ये आल्यावर तेजस महेशला म्हणाला,

“मश्या आधी नाही का सांगायचे मला आपण मोनाला भेटणार आहोत?” चांगला तयार होऊन आलो असतो मी.”

“अरे मग सरप्राइज कसे राहिले असते ते
आणि छान दिसत होतास तू. चल आता मला पार्टी दे.”

तेजस अजूनही मोनाच्या आठवणीत रमला होता.

तेजस आणि महेश निसर्ग हॉटेलमध्ये जेवायला गेले. तिथे महेश इतर गप्पा मारत होता. पण तेजस काहीच बोलत नव्हता. तेव्हा महेश त्याला म्हणाला,

“तेजस काय झाले तू एवढा शांत का आहेस? मीच मघापासून एकटाच बोलत आहे. मी तुला एवढे छान सरप्राईज दिले. तू कसल्या विचारात आहे.”

---------------------------------------
-------------------------क्रमश:..
मोहोर प्रेमाचा
भाग - एक
@ज्योती सिनफळ

तेजस कसला विचार करत असेल?
पुढच्या भागात नक्की वाचा.

🎭 Series Post

View all