Login

मोहोर प्रेमाचा भाग - चार

आकर्षण तात्पुरतं असतं प्रेम मात्र कायम टिकतं
मोहोर प्रेमाचा
भाग – चौथा
@ ज्योती सिनफळ
मोनाचे सगळे बोलणे ऐकून घेतल्यावर तेजस मोनाला म्हणाला,

“मॅडम तुम्ही तुमचा निर्णय सांगितला त्यावर मला काही बोलायचे आहे ते बोलू का?”

“हो बोला मिस्टर तेजस”

“मॅम धन्यवाद. तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणून तुम्ही मला हे सर्व काही सांगितले. तुम्ही माझे प्रेम स्वीकारु शकत नाही ह्याबद्दल माझी काही तक्रार नाही. मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करायलाच पाहिजे असं काही नाही. पण मॅम मला तुम्ही जश्या आहात तश्या आवडता आणि पुढेही आवडत रहाल. मॅडम तुम्ही जे मुद्दे सांगितले त्या सर्व गोष्टींचा विचार करुनच मी तुम्हाला लग्नाची मागणी घातली आहे. मला कल्पना आहे मी साधारण कुटुंबातील आहे. तुमचे कुटुंब माझ्यापेक्षा हायफाय सोसायटीतील आहे. दोघांच्या संस्कृतीमध्ये, आर्थिक गोष्टीत खुप फरक आहे. मॅम मला हेही माहित आहे की तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आणि आपण दोघांनी लग्न केले तर तुमच्या करीयरवर त्याचा वाईट परिणाम होईल. माझ्या आयुष्यात पण मला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागेल.‌ पण मॅडम आयुष्य जगण्यासाठी उत्तम करीयर, भरपूर पैसा हे हवेच पण ते असणे म्हणजे सगळे काही नाही ना. कधीतरी आयुष्यात निवांत क्षणी काही सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी आपल्या माणसांची गरज लागते आपल्याला. त्यावेळी हा पैसा, करीयर नाही येत मदतीला.”

“मॅडम आयुष्य जगण्यासाठी एकमेकांविषयी प्रेम आणि आस्था असेल तर बाकीच्या गोष्टी थोड्या कमी असल्यातरी चालते. तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या प्रेमात पडलो म्हणून असे फिल्मी डॉयलॉग बोलत आहे पण तसे काही नाही. माझे तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. मी तुमच्या कलेचा आदर करतो. पुढे कधी तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आणि आपण दोघांनी लग्न केले तर माझा तुम्हाला तुमच्या करीयरमध्ये पुढे जाण्यासाठी नेहमीच पाठिंबा असेल.‌ तुम्ही घराकडे लक्ष नाही देऊ शकला तर ती जबाबदारी मी आनंदाने घेईन. आपल्या घराची मी फरपट नाही होऊ देणार. कारण संसार एकाचा कधीच नसतो, दोघांचा असतो.”

“ह्या सर्व गोष्टी पुढच्या आहेत. मॅडम तुम्हाला पटत असेल तर आपण आधी एकमेकांशी मैत्री करू. एकमेकांसोबत वेळ घालवू. त्यामुळे आपल्या दोघांना एकमेकांचा स्वभाव, आचारविचार कळेल. त्यानंतर आपले स्वभाव, आचारविचार नाही जुळले तर आपण आपले‌ नाते इथेच थांबवू या.”

“मिस्टर तेजस तुम्ही तुमच्या वयापेक्षा खुपचं मॅच्यूअर आहात. माझ्याविषयी तुम्ही खुपचं सिरीयस दिसता. मी परत एकदा ह्याबाबतीत विचार करुन माझा निर्णय तुम्हाला कळवते. सध्या मी तुमच्याशी फक्त मैत्रीचे नाते नक्कीच ठेवेल. तुमच्यासारखा मॅच्यूअर मित्र मला माझ्या आयुष्यात असेल तर आवडेलच पण तुम्ही मी तुमच्याशी मैत्री केली म्हणून तुमच्यावर प्रेम करेलच असे‌ काही नाही.”

“ओके मॅम चालेल मला. आता आपल्यात फक्त निखळ मैत्रीचे नाते असेल. मी प्रेमाविषयी काही बोलणार नाही. चला मॅम मी निघतो आता आणि धन्यवाद तुम्ही माझे म्हणणे ऐकून घेतले आणि माझ्या मैत्रीचा स्वीकार केला.”

“ओके बाय तेजस.”

तेजस आनंदाने मोनाच्या घरातून बाहेर पडला आणि त्याने महेशला फोन लावून नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलावले. महेश आल्यावर त्याला मोनाच्या आणि त्याच्या भेटी मधल्या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यावर महेश त्याला म्हणाला,

“ग्रेट तेजस फायनली तू तुझ्या मनातील भावना मोनापर्यंत पोहोचवल्या. आता तुझे प्रेम पण तिने स्वीकारु दे ह्यासाठी तुला शुभेच्छा.”

“महेश मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे. मोना नक्की माझे प्रेम स्वीकारेल.”

इकडे मोनाची आई मोनाला म्हणाली,

“मोना मला वाटते तू‌ तेजसच्या प्रेमाचा स्वीकार करावास. खुप चांगला मुलगा आहे तो. तो तुला तू जशी आहे तशी स्वीकारायला तयार आहे. मान्य आहे मला तो तुझ्यापेक्षा दहा वर्षाने लहान आहे. पण त्याचे हे म्हणणे ही बरोबर आहे की आयुष्यात कधीतरी आपल्या मनातील गोष्टी बोलण्यासाठी आपले करीअर व पैसा उपयोगी येत नाही त्यावेळी आपल्या जीवाभावाच्या माणसांचीच गरज लागते. त्याच्यात मॅच्युरिटी खूप आहे.”

“आई तुझे म्हणणेही खरे आहे. मला पण तो जे बोलला ते पटले. पण त्याच्या प्रेमाचा स्वीकार करुन त्याच्यासोबत आयुष्य घालवायचे तर मला थोडा विचार करावा लागेल. आता त्याच्यासोबत मैत्री केली आहे तेव्हा त्याच्यासोबत वेळ घालवेल तेव्हा एकमेकांचा स्वभाव कळेल.”

मोनाने तेजसची फेसबुक फ्रेंन्ड रिक्वेस्ट स्वीकारली. ती आणि तेजस आता एकमेकांशी व्हाट्सअपवर गप्पा मारु लागले. मोनाचे सिनेमा व नाटकाच्या दौऱ्यामुळे तेजस आणि तिची महिनोंमहिने भेट होत नव्हती. जेव्हा कधी मोनाचे नाटक पुण्यात असेल तेव्हा तेजसची आणि तिची भेट जास्त करुन तिच्या घरीच होत असे. कारण बाहेर भेटणे मोनाला तिच्या फॅन्समुळे व मिडीयामुळे त्रासदायक होते.

तेजसचा सहवास आता मोनाला आवडू लागला. नाटक, सिनेमाचा दौरा संपवून कधी एकदा तेजसला भेटून त्याच्याशी गप्पा मारु असे तिला होई. पण अजूनही त्याच्या प्रेमाचा स्वीकार करायला तिचे मन तयार होत नव्हते.‌ मागच्या दोनतीन महिन्यांपासून मोनाचा तिच्या नाटकाच्या व सिनेमाच्या दौऱ्यासाठी देशविदेशात प्रवास चालू होता. त्यादरम्यान तिला तेजसची खुप आठवण येऊ लागली. तिचे कामात लक्ष लागत नव्हते. तिला सगळे काम सोडून तेजसला भेटायला यावे असे वाटू‌ लागले पण ते शक्य नव्हते आणि तेजसला पण त्याचे सर्व काम सोडून ये‌ सांगणे अवघड वाटत होते. त्यावेळी तिला जाणवले की आपण तेजसच्या प्रेमात पडलो आहे.

नाटक व सिनेमाचे दौरे संपवुन ती पुण्यात आल्यावर तिने तिच्या प्रेमाची कबुली आधी तिच्या आईला दिली आणि आईच्या गळ्यात रडून म्हणाली,

“आई मी तेजसच्या प्रेमात पडले आहे.‌ मी त्याच्याशिवाय नाही राहू शकणार. मी त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे. माझा निर्णय बरोबर आहे ना? मी कुठे चुकत नाही ना.”

“नाही बेटा. तुझा निर्णय योग्य आहे. तेजस चांगला मुलगा आहे. तो तुला सुखी ठेवेल. आता उशीर करु नकोस आपल्या मनातील भावना लवकर तेजसला सांग.”

मोनाने तेजसला फोन करून भेटायला बोलावले आणि तेजस आल्यावर त्याला म्हणाली,

“मिस्टर तेजस मी तुमच्या प्रेमात पडले आहे. तुमचे प्रेम आणि आस्था जिंकली. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत हे आता मला कळले. मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करत आहे.”

मोनाचे हे बोलणे ऐकल्यावर तेजसला काय बोलावे हे समजेना. आनंदाने त्याच्या डोळ्यात अश्रु आले आणि त्या आनंदात त्याने मोनाला मिठी मारली आणि म्हणाला,

“आय लव्ह यु मॅम. धन्यवाद तुम्ही माझे प्रेम स्वीकारले. मी आज खुप आनंदी आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावर प्रेम करेल.”

“मिस्टर तेजस आता मला मॅम नाही फक्त मोना म्हण.”

“मोना डार्लिंग, तू पण मला आता मिस्टर तेजस न म्हणता नुसतं तेजस म्हण.”

“ते सगळं ठीक आहे तेजस पण ह्या लग्नासाठी माझी एक अट आहे”

तिच्या ह्या वाक्याने तेजस आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला. तेवढ्यात तिथे मोनाची आई आली आणि त्या दोघांना म्हणाली,

“आता हा आनंद मी आणलेली मिठाई खाऊन द्विगुणित करा आणि तिने मोना व तेजसला मिठाई भरवली. आता लवकरात लवकर दोघेही लग्नाच्या बेडीत अडका. माझे तुम्हा दोघांना खुप खुप आशिर्वाद आहेत.”

मोनाच्या आईने भरवलेला मिठाईचा घास तेजसच्या घश्यातच अडकला. कसाबसा स्वतःला सावरत त्याने मोनाला विचारले,

“कसली अट?”

------------------------------------
----------------------क्रमश:.
मोहोर प्रेमाचा
भाग – चौथा
@ज्योती सिनफळ
मोनाची कोणती अट असेल
ह्या अटींमुळे त्यांच्या लग्नाच्या स्वप्नांवर मिठाचा खडा तर नाही ना पडणार.
वाचा पुढील अंतिम भागात.

🎭 Series Post

View all