Login

मोकळं आभाळ भाग १५

ही एक सामाजिक कथा एका स्त्रीच्या संघर्षाची..

मोकळं आभाळ.. भाग १५

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, रेवतीच्या ऑफिसमध्ये तिचे सहकारी तीच्याशी विचित्र वागत होते. पण रेवतीने त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं होतं. रेवतीच्या घटस्फोटाचा निकाल लागला. न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला. नुकसानभरपाई म्हणून आकाशने रेवतीला पाच लाख रुपये देण्याचे न्यायालयाने आदेश दिला. आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग १५

जजसाहेबांनी निकाल सुनावला. रेवतीच्या अश्रूंची बरसात होऊ लागली. अनघाने आनंदाने तिला घट्ट मिठी मारत तिचं अभिनंदन केलं. ती म्हणाली,

“रेवा, जिंकलीस यार..!  खूप अभिनंदन रेवा!”

अनघाच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळत होते. 

रेवती स्तब्ध बसून होती. डोळ्यातलं पाणी झरत होतं. तिने कृतज्ञपणे अस्मिता मॅडम कडे पाहिलं.त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली.  डोळ्यांतलं पाणी त्यांचं आभार मानू पाहत होते. शब्दांची गरजच उरली नव्हती. तरी रेवती सद्गदित होऊन म्हणाली,

“अस्मिता मॅडम, तुम्ही माझ्यासाठी देवासारख्या धाऊन आलात. मला न्याय मिळवून दिला. कसे पांग फेडू तुमचे? या जन्मात तरी त्याची उतराई होणं शक्य नाही. सत्याचा विजय निश्चितच होतो. न्यायदेवता मुळीच आंधळी नाही. ती कोणताच भेदभाव न करता निर्णय देते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तुम्ही ते करून दाखवलंत. खूप खूप धन्यवाद मॅडम” 

रेवती बोलत होती. अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. अस्मिता मॅडम आनंदाने उत्तरल्या.,

“रेवती मॅडम, तुम्हाला न्याय मिळवून देणं माझं कामच होतं ते. आभार कशाला? एक दोन दिवसात बाकीच्या उरलेल्या प्रक्रिया पूर्ण होतील. आणि घटस्फोट होऊन जाईल. तुम्ही जिंकलात मॅडम.. तुमचे मनापासून अभिनंदन.!“ 

अस्मिता मॅडमचे आभार मानून रेवती आणि अनघा आनंदाने कोर्टाच्या बाहेर पडल्या. अनघानेही तिचं अभिनंदन केलं. जवळच्याच कॅफेमध्ये जाऊन छोटीशी पार्टी करत हा आनंद साजरा केला. त्यानंतर रेवतीचा निरोप घेऊन अनघा आपल्या घराकडे परतली. 

रेवती घरी पोहचली. मनसोक्त रडून घेतलं. अगदी पोटभर.एका बंदिवासातून तिची सुटका झाली होती. आता ती मोकळा श्वास घेऊ शकणार होती. 

काही दिवसांनी रेवतीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली.आकाशलाही सुटका हवी होती.केस लढवण्यात वेळ कोणाकडे होता? त्याने पाच लाख रुपयांचा धनादेश न्यायालयात सुपूर्द केला. आणि दोघे कायमस्वरूपी वेगळे झाले.वकिलांनी सर्व कागदपत्रं नीट तपासून आपापल्या अशिलाला देऊन टाकली. रेवतीने कागदपत्रं आपल्या ताब्यात घेतली. अस्मिता मॅडमना त्यांच्या ठरलेल्या फी च्या रक्कमेचा धनादेश देऊ टाकला.. आणि अस्मिता मॅडमचे हे उपकार ती कधीच विसरू शकणार नव्हती.

रेवतीने पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केली. एका नवीन प्रवासाचा शुभारंभ झाला होता. भूतकाळाला मागे सारून भविष्याच्या दिशेने आगेकूच करत होती. आताशीक कुठे ती मोकळा श्वास घेऊ लागली होती. तिने सारख रडणं आत्ता सोडुन दिल होतं. तिचं विश्व बदलत होतं. सतत होणारी तिची चिडचिड कमी झाली होती. तिने स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं. पूर्ण लक्ष कामावर केंद्रित केलं. रेवतीमध्ये एका नवा आत्मविश्वास जागा झाला होता. तो आत्मविश्वास तिच्या कामात, बोलण्या वागण्यात दिसत होता. जणू एक नवीन चैतन्य आलं होतं! रेवतीच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या खळखळून हसण्यात दिसू लागला होता. तिच्यातला बदल सर्वांनाच  जाणवत होता. आणि म्हणूनच की काय सगळ्यांनी मिळून तिच्या सुखाला सुरुंग लावायचं ठरवलं जणु! इतक्यात रेवतीचा संघर्ष कसा संपेल? अजून तिला खूप सहन करायचं होतं. वेदनेचा प्रवास अजून संपला नव्हता. अजून तिला खूप काही पाहायचं होतं., खूप काही सहन करायचं होतं.  

पण पौर्णिमेच्या चंद्राला जसा अमावस्येच्या शाप असतो तसा खळखळून हसण्याला सुद्धा असतो. दुसर्‍याचा आनंद सहन होत नाही अशी माणसं तिच्या आनंदावर विरजण पाडायला आजुबाजूला होतीच.


 

रेवतीच्या घटस्फोटाची बातमी संपुर्ण ऑफिसभर पसरली होती. चर्चेला उधाण आलं. तिच्याकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्यासाठी जणू तिच्या माथी ʼसहज उपलब्ध' असा शिक्का बसला होता

सोसायटीतल्या बायकांना दुसऱ्यांच्या घरात जास्त इंटरेस्ट. त्यांचे चर्चेचे चे विषय तर एकदम भन्नाट असायचे. आमक्याचा मुलाच तमक्याच्या मुलीसोबत सूत,  शेजारची रीना लिव्ह इन रेलेशनशिप मध्ये, सासू सासरे दीर नणंद नवरा कसे वाईट अगदी रंगवून चघळण्याचे सगळे विषय. रेवतीला हे मुळीच आवडायचं नाही. नवरा हा विषय निघाला की तिला त्रास व्हायचा. त्यांचं एकमेकींच्या नवऱ्यावरून ऐकमेकींना चिडवणं तिला अपूर्णत्वाची जाणीव करून द्यायचं. सगळं असूनही रितेपणाची जाणीव व्हायची. हळदीकुंकू,मंगळागौर सुवासिनींच्या प्रत्येक शुभकार्यात तिला मुद्दाम टाळलं जायचं. 

म्हणून मग रेवतीने तिचं कव्हरेज क्षेत्रच बदलून टाकलं. ती कपड्यांच्या रंगसंगती, कलाकुसरीच्या विश्वात रमत होती. तिच्या कल्पकतेमुळे कंपनीलाही भरपूर नवीन ऑर्डर्स मिळत होत्या. कंपनीच्या व्यवसायाची उलाढाल वाढली होती. रेवतीच्या कामाचा व्याप वाढला होता. पण ती तिच्या कामात कायम व्यस्त असायची. एखादया यंत्रासारखी ती फक्त काम करायची. बाकी कशाचंच तिला भान नव्हतं. रेवतीच्या या कष्टाची, प्रामाणिकपणे काम करण्याची तिच्या कंपनीच्या मालकाने दखल घेतली.  

एक दिवस तिला एम. डी. च्या सेक्रेटरीचा फोन आला. टेबलवरचा इंटरकॉमचा  बझर खणाणला. हातातली फाईल बाजूला ठेवत रेवतीने रिसिव्हर उचलून कानाला लावला,

“रेवती मॅडम, सरांनी तुम्हाला कॉन्फरन्स रूम मध्ये बोलावलं आहे. सर्व एम. डी. सोबत मीटिंग आहे. लवकर या”

“ हो आलेच” असं म्हणून रेवतीने फाईल ठेवून दिली. डायरी घेऊन ती कॉन्फरन्स रूमच्या दिशेने निघाली.

 “काय काम असेल?” हा विचार करतच रेवती कॉन्फरन्स रूमसमोर उभी राहिली. आतमध्ये येण्याची परवानगी घेऊन  रेवती आत गेली. समोर कंपनीचे सर्व डायरेक्टर्स बसले होते. दहा डायरेक्टर्सना एकत्र पाहून रेवती थोडी धास्तावली होती. त्यांनी तिला बसायला सांगितलं. 

समोरची खुर्ची पुढे ओढून “थँक्यु सर” असं म्हणत रेवती खुर्चीत बसली. 

कंपनीच्या एम.डी.नी बोलायला सुरुवात केली. 


 

पुढे काय होतं? रेवतीला कोणत्या नवीन संकटाला सामोरं जावं लागेल? ते पाहूया पुढील भागात…

क्रमशः

© निशा थोरे

0

🎭 Series Post

View all