मोकळं आभाळ.. भाग १९
पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, रेवतीने संपुर्ण लक्ष आपल्या उद्योगात घातलं होतं. कंपनीचा नफा कसा होईल यावर तिने लक्ष केंद्रित केलं. ‘लिटिल वर्ल्ड’ या पुण्यातल्या नामांकित कंपनी सोबत तिची मीटिंग होती. ओंकार दवे या युवकाची रेवतीची भेट झाली. रिक्षा पकडण्यासाठी दोघांत वादविवाद झाला. रेवती दुसरी रिक्षा पकडून मीटिंगसाठी पोहचली. कम्पनीच्या एम. डी. च्या रुपात त्याच युवकाला पाहून तिला खूपच आश्चर्य वाटलं. ‘लिटिल वर्ल्ड’ च्या मीटिंगमध्ये रेवतीने दिलेलं प्रेझेन्टेशन सर्वांना आवडलं. आणि त्या कंपनीची मोठी ऑर्डर रेवतीच्या कंपनीला मिळाली. रेवतीला खूप आनंद झाला. आता पुढे..
मोकळं आभाळ.. भाग १९
रेवती आज खूप आनंदात होती. खूप मोठी ऑर्डर मिळाली होती. डोक्यात विचार चक्र सुरू झाले. पुढचं नियोजन कसं करायचं? या आरखड्यांची मांडणी मनात घोळू लागली. रेवतीने मुंबईच्या ऑफिसमध्ये अभ्यंकरसरांना मिळालेल्या नवीन ऑर्डर बद्दल सांगितलं. त्यांनाही खूप आनंद झाला आणि तिची धडपड पाहून रेवतीचं कौतुकही वाटलं.
रेवतीला ‘कधी एकदा ऑफिसमध्ये पोहचतेय आणि ही आनंदाची बातमी सर्वांना सांगतेय!’ असं झालं होतं. इतक्यात तिचा मोबाईल वाजला. तिने मोबाईल पाहिला. नंबर ओळखीचा नव्हता. कोणत्यातरी क्लायंटचा असेल असा विचार करून तिने कॉल घेतला. समोरून एक व्यक्ती बोलत होती.
“ हॅलो मिस रेवती, मी ओंकार बोलतोय”
“हॅलो सर, बोला न” - रेवती
“मॅडम, आमच्या कंपनीच्या नेहमीच्या प्रक्रियेनुसार ऑर्डर दिल्यानंतर आम्ही सप्लायरच्या कंपनीत जाऊन त्यांच्या कंपनीचा सेटअप पाहतो. ते ऑर्डर पूर्ण करू शकतील की नाही याची खात्री करून घेतो. त्यानुसार मला तुमच्या कंपनीचा सेटअप पाहायला यायचं आहे. तुम्ही इतकी मोठी ऑर्डर पूर्ण करू शकाल का? हे पाहूनच तुमची ऑर्डर कन्फर्म केली जाईल. 'परचेस ऑर्डर' आणि आपल्या ठरलेल्या नियमानुसार पन्नास टक्के ऍडव्हान्स दिला जाईल आणि बाकीचे ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल. कधी येऊ विझिटला? उद्या चालेल? नाहीतर मी एक काम करतो आज संध्याकाळीच चार वाजता येतो., त्या निम्मिताने आपली पुन्हा भेट होईल. ओके बाय फॉर नाऊ.”
असं म्हणत त्याने रेवतीला काहीही बोलू न देता फोन ठेवलाही! रेवती फक्त ऐकतच राहिली.
“काय विचित्र माणूस आहे हा! एकतर अवांतर बोलत असतो. समोरच्याला बोलण्याची संधीच देत नाही. असं कुठे डायरेक्ट जातात का विझिटला? प्रोफेशनल आहे का हे वागणं? अँपॉईंटमेंट नाही कोणतीही परवानगी नाही आणि त्यानेच डायरेक्ट मीटिंग ठरवून टाकली! जसं काय मी यांच्यासाठी फ्री बसलेलीच आहे! विचारण्याची पद्धत असते की नाही! देव जाणे! अजून किती सहन करावं लागणार आहे या माणसाला!”
ती मनातल्या मनात बडबडत होती. रेवतीला ओंकारच्या वागण्याचं खूप आश्चर्य वाटत होतं.
“चला लवकर ऑफिसला पोहचलं पाहिजे. मीटिंगची तयारी करावी लागेल. सर्व कामगारांना साफसफाई, स्वच्छतेची काळजी घ्यायला सांगितलं पाहिजे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.. म्हणून तरी युनिट छान ठेवायला हवं”
रेवतीने विचार केला आणि ती लगबगीने ऑफिसकडे जाऊ लागली.
रेवती ऑफीसला पोहचली. तिने सर्व डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, सुपरवायझर्सना आपल्या केबीमध्ये बोलावून घेतलं. रेवतीला त्या सर्वांना संध्याकाळच्या मीटिंग बद्दल सांगायचं होतं. तिने बोलायला सुरुवात केली.,
“आज मी तुम्हांला एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी बोलवलं आहे. आजची माझी ‘लिटल वर्ल्ड’ सोबतची मीटिंग यशस्वी झाली. त्या कंपनीला आपल्या ड्रेसेसचे पॅटर्न्स खूप आवडले आहेत. आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. त्या कंपनीचे एम. डी. आज संध्याकाळी आपल्या कंपनीत विझिटला येणार आहेत. तुम्ही सर्वांनी कामगारांना साफसफाई, स्वच्छता या बाबतीत लक्ष द्यायला सांगा. कामगारांचे युनिफॉर्म, कॅप, ग्लोज, मास्क या साऱ्या गोष्टीं मला साफ क्लीन हव्यात. ही ऑर्डर आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्या सर्वांचं भवितव्य त्यावर अवलंबून आहे. चला कामाला लागूया”
रेवती आणि सर्व सहकारी तिच्या केबिनच्या बाहेर पडले. सर्वांनी आपपल्या विभागाची साफसफाई करून घेतली. स्वतः रेवतीही त्यांच्या सोबत त्यांना मदत करत होती. सगळं आवरून स्वच्छ झालं. रेवतीने स्वतःचा अवतार आवरला. चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. हलकासा मेकअप केला. त्यानंतर तिने शिपायाला सांगून पुष्पगुच्छ आणून ठेवला. स्नॅक्स मागवून ठेवलं आणि ते सर्वजण पाहुण्यांची वाट पाहु लागले.
संध्याकाळ झाली. चार वाजून गेले होते. अजून पाहुणे आलेले नव्हते. रेवती थोडी विचारत पडली,
“किती वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा! की दुसरी काही अडचण असेल? काय झालं असेल? पत्ता सापडला असेल ना.! की कॉल करून पाहू?”
तिचे तिलाच प्रश्न पडत होते.
साधारण संध्याकाळी पाचच्या सुमारास युनिटच्या बाहेर एक आलिशान कार येऊन थांबली आणि कार मधून ओंकार आणि त्याची सेक्रेटरी खाली उतरले. गेटवरच्या सिक्युरिटीने रेवतीला त्यांच्या येण्याची सूचना दिली. रेवतीने आपल्या सहकाऱ्यांना सूचित केलं. सर्वजण स्वागतकक्षेत एकत्र आले. ओंकार आणि त्याची सेक्रेटरी आत येताच रेवतीने पुष्पगुच्छ देत हसून स्वागत केलं. ओंकार तिच्याकडे पाहतच राहिला.
“किती छान दिसते यार ही! साधी राहणीमान असूनही अजिबात कृत्रिमता नाही हिच्या वागण्या बोलण्यात! फारच सुंदर!!”
त्याच्या मनाने कौल दिला. पुष्पगुच्छ स्वीकारून तो आता आला. अगदी चंचल वाऱ्यासारखा तो इकडून तिकडून पूर्ण युनिटभर वावरत होता. रेवतीला सूचना देत होता. सगळं युनिट पाहून झाल्यानंतर रेवतीने त्या दोघांना केबिनमध्ये येण्याची विनंती केली.
“मिस रेवती, हाऊसकिपिंगकडे तुम्हाला अजून लक्ष दयायला लागेल. ऍडव्हान्स शिलाई मशीन्स वाढवाव्या लागतील. मशनरी मेंटेनन्स कडे जास्त लक्ष द्या. वुई वॉन्ट क्वालिटी वर्क नॉट क्वांटिटी.. कामगार वाढवा. इतक्या लहान सेटअप मध्ये तुम्ही आमची ऑर्डर वेळेत कशी पूर्ण करणार? मला ऑर्डर वेळेत पूर्ण करून हवीय. ३० नोव्हेंबर पर्यंत सगळा माल आमच्या फॅक्टरीत पोहचला पाहिजे. रोज मला तुमच्या फॅक्टरीत तयार होणाऱ्या आमच्या कंपनीच्या उत्पादनाचा अहवाल दिला पाहिजे. बाय मेल, बाय कॉल, बाय मेसेज एनीथिंग बट आय वॉन्ट डे टू डे रिपोर्ट्स. गेटिंग माय पॉईंट? ”
ओंकार अवांतर बडबडत होता. सूचना देत होता. त्याच्या मागे मागे फिरताना रेवतीची दमछाक झाली होती. ३०नोव्हेंबर ही तारीख ऐकताच ती जवळजवळ किंचाळलीच.,
“काय ३०नोव्हेंबर! कसं शक्य आहे सर? आज १५ तारीख आहे आणि पंधरा दिवसात कसं शक्य आहे?”
“ते मला माहित नाही. तो तुमचा प्रश्न आहे. मला वेळेवर मालाची डिलिव्हरी हवीय. नो एक्सक्यूजेस”
ओंकार तिला फक्त सूनवतच होता. त्याने त्याच्या सेक्रेटरीकडे पाहिलं. तिने पटकन बॅगेतून पंचवीस लाखाचा धनादेश रेवतीपुढे सरकवला.
“ठरल्याप्रमाणे हा ऍडव्हान्सचा चेक उरलेला मालाची पूर्ण डिलिव्हरी झाल्यानंतर. ओके मिस. रेवती, आता आम्ही निघतो. तुम्ही फक्त मालाची डिलिव्हरी वेळेत मिळेल इतकी काळजी घ्या. ओके, बाय, नाईस टू मीट यू. सी यू”
असं म्हणून तो निघून गेलाही.. रेवतीला थॅंक्यु म्हणण्याची सुद्धा संधी दिली नाही. रेवती अवाक होऊन जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या प्रतिकृती पाहतच राहिली.
“काय माणूस आहे हा! झंझावात जणू!! आला काय गेला काय! किती भुर्रकन निघून गेला! कसं होणार देव जाणे! विक्षिप्तच थोडा! जाऊ दे, आपल्याला काय ऑर्डर पूर्ण करायची बस, व्यावसायिक रिलेशन्स जपावेच लागतील ना, आता ही ऑर्डर कशी पूर्ण होईल या कडे लक्ष देऊ”
रेवती विचार करू लागली. थोडी चिंतातूर झाली. एवढी मोठी ऑर्डर इतक्या कमी वेळात कशी पूर्ण करणार? डोक्यात विचार येऊ लागले. तिने पुन्हा एकदा सर्व कामगारांना एकत्र बोलावलं. रेवती काय सांगेल? याची सर्वांनाच उत्सुकता होती, रेवतीने बोलायला सुरुवात केली.,
“ गुड एव्हनिंग फ्रेंड्स, मला हे सांगायला खूप आनंद होतोय की, ‘लिटील वर्ल्ड’ च्या एम.डी. ची व्हीसीट यशस्वी झाली. आपल्या कम्पनीला ‘लिटील वर्ल्ड’ कडून खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. आजवरची ही सर्वात मोठी ऑर्डर असणार आहे. यामूळे आपल्या कम्पनीला पर्यायाने आपल्यालाही खूप मोठा फायदा होणार आहे. ही ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर मी आपल्या साहेबांशी अभ्यंकर सरांशी तुमच्या सर्वांच्या पगारवाढीबद्दल बोलणारच आहे. तो पर्यंत सर्वांनीच सहकार्य करा. आपल्याला दिवस रात्र एक करून काम करावं लागेल ३०नोव्हेंबर पर्यंत ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. मला माहित आहे की, हे कठीण आहे पण अशक्य मुळीच नाही. चला तर मग लागू कामाला. करणार ना सहकार्य मला आणि कंपनीलाही?”
सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या. रेवतीने हसून सर्वांचे अभिनंदन केलं.
“आज मी कापड ऑर्डर करते. सर्वांच्या कामाचं नियोजन करते. उद्यापासून आपल्याला खूप जोमाने कामाला सुरुवात करायची आहे. आज लवकर घरी जा आणि उद्यापासून खूप जास्त काम करायचं आहे. नव्या जोमाने, नव्या उत्साहाने! चला आपपल्या कामाला सुरुवात करूया.”
इतकं बोलून झाल्यावर तिने सर्वांचा निरोप घेतला. आणि रेवती पुढच्या कामाचं वेळापत्रक आखू लागली
पुढे काय होतं? रेवती ही ऑर्डर पूर्ण करू शकेल? पाहूया पुढील भागात.
क्रमशः
निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा