Login

मोकळं आभाळ भाग २१

ही एक सामाजिक कथा.. एका स्त्रीच्या संघर्षाची..


 

मोकळं आभाळ.. भाग २१

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, रेवतीला लिटिल वर्ल्ड कंपनीची खूप मोठी ऑर्डर मिळाली. त्यानुसार रेवतीने कामाला सुरुवात केली.  रात्रंदिवस काम सुरू होतं. ऑर्डर वेळेत पूर्ण होणारच होती पण ऐन वेळीस फॅब्रिकचा घोळ झाल्यामुळे आता ती ऑर्डर वेळेत  पूर्ण करणं शक्य नव्हतं. ओंकारला भेटल्यानंतर त्याच्याकडूनच तारखेचा घोळ झाला होता हे रेवतीला समजताच ती खूप संतापली आणि कंपनीच्या बाहेर पडली. आता पुढे..

मोकळं आभाळ.. भाग २१

रेवती रागाच्या भरात कम्पनीच्या बाहेर पडली. इतक्यात तिला तिच्या मागे कृतिका येताना दिसली. कृतिका तिच्याजवळ आली. ती काही बोलणार इतक्यात रेवती तिला रागाने म्हणाली,

“हे बघ कृतिका, तू तुझ्या बॉसबद्दल काही सांगायला आली असशील तर प्लीज मला काही सांगू नको. मी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. अजिबात वागण्या बोलण्याचे मॅनर्स नाहीयेत त्यांना. अशा अनप्रोफेशनल व्यक्ती बरोबर मी काम नाही करू शकत. सॉरी..” 

रेवतीचं बोलणं मध्येच थांबवत कृतिका म्हणाली,

“रेवती मॅडम, मी काहीही सांगायला आले नव्हते. तुम्ही घाईत बाहेर पडलात पण तुमचा मोबाईल केबिनमध्येच विसरून आलात. तोच दयायला मी तुमच्यामागे धावत आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समजता तसे ओंकारसर वाईट नाहीत ओ. काही कांगोरे आहेत त्यांच्याही आयुष्यात जे अजूनही कोणालाच माहीत नाही. अगदी मी त्यांची पर्सनल सेक्रेटरी असूनही..! मॅडम, सर्वांच्या अडीअडचणीत सर कायम धावून येतात. मान्य आहे की तापट आहेत पण मॅडम त्यांच्या इतकं प्रेमळ आमच्या  ऑफिसमध्ये कोणीच नाही. माझे बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांनीच आर्थिक मदत केली. आमच्या कंपनीतल्या कामगारांच्या हुशार मुलांना नेहमी शैक्षणिक मदत करतात. त्यांच्या अशा वागण्यामागे त्यांची काही कारण असू शकतात. ते कधीच कोणाला स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल बोललेले नाहीत किंबहुना त्यांना ते सांगणं  आवडतच नाही. त्यांच्या विषयी गैरसमज करून घेऊ नका. जाऊ द्या मॅडम. हा घ्या तुमचा मोबाईल. मी जाते. बाय सी यू.” 

असं म्हणत कृतिकाने रेवतीला मोबाईल दिला आणि ती तिथून निघून गेली. रेवतीने मोबाईल पर्समध्ये टाकला आणि ती तिच्या ऑफिसला निघाली. 

रेवती आपल्या विचारात गुंग झाली. ओंकारच्या आयुष्याबद्दल तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. प्रत्येक पुरुषांना एकाच चष्म्यातून पहायची तिला सवय लागली होती. त्यामुळे चांगल्या पुरुषांची प्रतिमा तिच्या मनातून पार पुसून गेली होती. विचारांच्या तंद्रीत रेवती आपल्या ऑफिसमध्ये पोहचली. पर्समधून मोबाईल बाहेर काढला, पाहते तर ओंकारच खूप सारे मिस्ड कॉल्स येऊन गेले होते. व्हाट्सअप्प वर  खूप सारे सॉरीचे मेसेज, इमोजी पाठवले होते. ते रडणाऱ्या बाळांचे इमोजी पाहून रेवतीला हसू आलं. 

“ओके ठीक आहे., आता मी ऑर्डर पूर्ण करते आणि दोन चार दिवसांत तुमच्याकडे पाठवून देते” 

रेवतीने ओंकारच्या मेसेजला रिप्लाय केला. 

“मला तुम्ही माफ केलंत का? नक्की?” पुन्हा ओंकारचा मेसेज आला.

“हो केलंय. आता आपण पुढच्या कामाचं पाहूया का?” रेवतीने रिप्लाय दिला.

“मग उद्या संध्याकाळी भेटून एक कॉफी घेऊया. नाही म्हणू नका. तुम्ही आलात तरच मी समजेन तुम्ही मला माफ केलंत” 

ओंकारचा मेसेज मोबाईलवर झळकला.

रेवतीला काही समजेना. 

“इतक्या विनवण्या करतोय जावं का? क्लायंट रिलेशन जपायचे असतील तर इतकं तुटकपणे वागणं बरोबर नाही”

तिने थोडा विचार केला. आणि

“हो ठीक आहे. येते मी. वेळ आणि ठिकाण मला मेसेज करा” 

असा मेसेज ओंकारला पाठवला. दुसऱ्या क्षणाला ओंकारचा रिप्लाय आला.  त्या मेसेजमध्ये त्याने वेळ आणि ठिकाण कळवलं होतं. “ठीक आहे” असं म्हणून रेवती आपल्या दुसऱ्या कामाला लागली. राहिलेली ऑर्डर पूर्ण करायची होती. तिने पुढच्या कामाचं नियोजन करायला सुरुवात केली. काम करता करता कधी संध्याकाळ उलटून रात्र झाली तिचं तिलाच समजलं नाही. 

बरीच रात्र झाली होती. रेवती घरी आली. स्वयंपाक करण्याचा तिला खूप कंटाळा आला होता म्हणून बाहेरून जेवण ऑर्डर केलं आणि अनघाला फोन लावला,

“हॅलो अनघा, कशी आहेस” रेवती बोलू लागली.

“मी छान, अन तू ठीक आहेस ना!., काम कसं चाललंय.. धावपळ होतेय ना ग.!” - अनघा उत्तरली

“ हो अनघा मी ठीक आहे. कामाचा व्याप वाढलाय न! थोडी धावपळ होणारच न. त्यात एक एक कस्टमर्स..! काय सांगू तुला! पण ठीक आहे. कामात व्यस्त असलं की छान वाटतं. तुला सांगू! आज एक गंमत झाली”

आणि रेवतीने अनघाला दिवसभरात घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आणि माफी मागण्यासाठी  उद्या संध्याकाळीच्या ओंकारने दिलेल्या कॉफीच्या ऑफर बद्दलही सांगून टाकलं. अनघा फोनवरच मोठमोठ्याने हसत सुटली. मग आपलं हसू आवरून रेवतीला म्हणाली,

“म्हणजे तुझा आजचा पूर्ण दिवस असा भांडणाचाच दिसतोय. रेवा, सोड सगळं. त्याने झाल्या घटनेची माफी मागितली ना! मग माफ कर. आणि जा उद्या.. रेवा, मागचं सर्व विसरून तू आता नवीन लोकांत मिसळून जायला हवं. नवे मित्र मैत्रिणी जोडायला हवेत.एकदम हा बदल शक्य नाही. पण हळूहळू जमेल तुला. आणि कोण जाणे! हीच सुरुवात असेल! ”

रेवतीला अनघा समजावून सांगत होती. 

“हो अनघा, मी जरूर प्रयत्न करेन” 

रेवतीने उत्तर दिलं. मग एकमेकांची, आईबाबांची विचारपूस करून झाल्यानंतर रेवतीने फोन ठेवून दिला. आणि ती जेवण करून झोपण्यासाठी खोलीत आली. बिछान्यात पडल्या पडल्या तिला अनघाचं बोलणं आठवत होतं किंबहुना पटत होतं. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रेवती ओंकारने ठरवलेल्या रेस्टॉरंटमध्ये वेळेवर पोहचली. ओंकार अजून आलेला नव्हता. रेस्टॉरंटच्या मॅनेजर ने पुढे येऊन तिचं स्वागत केलं. ओंकारने बुक केलेल्या टेबलकडे बोट दाखवत तो म्हणाला,

“या मॅडम, इथे बसा. ओंकार दवे सरांनी टेबल बुक केलंय. येतीलच ते.. पाणी आणतो. बिस्लरीचं पाणी थंड आणू की साधं?” 

रेवतीने हसून थॅंक्यु म्हटलं आणि साधं पाणी आणायला सांगितलं. इतक्यात समोरून तिला ओंकार येताना दिसला. डोळ्यांवर गॉगल, पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाच्या जीन्समध्ये खूपच रुबाबदार दिसत होता. लांबूनच त्याने तिला हसून हात हलवून ‘येतोय’ असं खुणेनेच सांगितलं. तो टेबलाजवळ आला. मंद परफ्यूमचा सुगंध दरवळला. 

“हाय, लूकिंग प्रिटी! खूप छान! बराच वेळ झाला का तुम्हाला येऊन? मला फार उशीर तर झाला नाही ना!” 

खुर्चीत बसत ओंकार म्हणाला. 


 

“ नो..नो.. इट्स ओके.. काही हरकत नाही” रेवतीने हसून उत्तर दिलं.

“किती गोड हसते यार ही! जणू मुक्तहस्ताने मोत्यांची उधळण करतेय. किती सिम्पल.. किती निरागस..!”

ओंकार मनातल्या मनात स्वतःशीच बडबडत होता. इतक्यात वेटर समोर येऊन उभा राहिला. त्याने ओंकार समोर मेनूकार्ड ठेवलं. भानावर येत ओंकार म्हणाला,

 “रेवती मॅडम काय घेणार आपण? काही खाणार? आणि हो आज तुम्ही सांगितल्याशिवाय, तुमच्या अनुमतीशिवाय मी काहीच ऑर्डर करणार नाही” 

या वाक्यावर तो मनमुराद हसला. रेवतीही गालातल्या गालात हसत होती. 

“व्हेज सँडविच आणि दोन कॉफी” रेवतीने वेटरला ऑर्डर दिली. ऑर्डर घेऊन वेटर तिथून निघून गेला आणि थोड्याच वेळात कॉफी आणि सँडविच घेऊन आला.


 

कॉफीचा आस्वाद घेत ओंकार आणि रेवती यांच्या गप्पा रंगू लागल्या. ओंकार भरभरून बोलत होता. आपल्या उद्योगाविषयी, भविष्याविषयी बरंच काही सांगत होता. 

“अरे किती वेगळा वाटतो हा! छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करून भडकणारा ओंकार खरा की हा माझ्या समोर बसलेला सळसळत्या चैतन्याचा झरा भासणारा, आनंदाचा धबधबा, मनमौजी दिसणारा ओंकार खरा!”

तिचा तिलाच प्रश्न पडला. 

जणू नव्याने ती ओंकारला भेटत होती. त्याचं ते आगळंवेगळं रूप पाहून रेवती आश्चर्यचकित झाली होती. शिष्ट वाटणारा ओंकार तिला नव्याने कळू लागला होता.  

रेवतीही ओंकारला स्वतःच्या उद्योगाविषयी, तिथल्या महिला कामगारांविषयी सांगत होती. उद्योगाच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठीचे तिचे प्लॅन्स सांगत होती.  रेवतीशी बोलताना ओंकार तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिचं बोलणं, तीच वागणं, तिचा आत्मविश्वास सारंच त्याच्या मनाला भुरळ घालत होतं.

बघता बघता बोलण्याच्या नादात संध्याकाळ कधी टळून गेली हे दोघांच्याही लक्षात आलं नाही.रेवतीने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे आठ वाजले होते. तिची घरी जाण्यासाठी चुळबूळ सुरू झाली.

“चला सर, आता मला निघायला हवं. बराच उशीर झालाय. खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून.” 

टेबलवरची पर्स उचलत रेवती म्हणाली.

ओंकारने वेटरला बोलवून बिल चुकतं केलं. आणि तो रेवतीला म्हणाला.

“तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला तुमच्या घरी सोडू का?”

“नाही सर, थॅंक्यु, पण मी रिक्षा करून जाईन” - रेवती

“रात्रीची वेळ आहे. मी सोडतो तुम्हाला. खरंच खूप छान वाटलं मॅडम, तुम्हाला भेटून..बऱ्याच वर्षांनी कोणासोबत तरी इतका छान वेळ घालवला. आजची ही संध्याकाळ कायम स्मरणात राहील.” - ओंकार

“मिस. रेवती एक विचारू का? आपण फ्रेंड्स बनू शकतो का?”  ओंकार चाचपडत उद्गारला.

“मला आवडलं असतं सर, पण आधी प्रोफेशनल रिलेशन जपूया. मैत्रीचं पाहू नंतर” 

रेवतीने हसून उत्तर दिलं. 

“किती गोड ग! इतकं निरागसपणे उत्तर दिलं की, रागवावं पण वाटत नाही.” 

तो मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटला. 

“ओके मिस.रेवती. टेक युअर टाईम. मला मुळीच घाई नाही. पण मग अहो जावो करण्याच्या ऐवजी नॉर्मल अरे तुरे करू शकतो का?” 

त्याने हसून रेवतीला प्रतिप्रश्न केला. 

इतकाही शिष्टपणा बरे नव्हे. असंही अहो जावो करण्याइतकं आमच्यात वयाचं जास्त अंतरही नाही”


 

रेवतीने  विचार केला आणि होकारार्थी मान डोलावली. 

थोड्याच वेळात दोघेही रेस्टॉरंटच्या बाहेर पडले. ओंकारने रेवतीला तिच्या सोसायटीच्या आवारात सोडून तिचा निरोप घेतला. भुर्रकन दूरवर जाणाऱ्या ओंकारच्या कारकडे ती पाहत होती. खूप दिवसानंतर रेवतीला आज प्रसन्न वाटत होतं. आजची संध्याकाळ दोघांच्याही मनात रेंगाळत होती.

पुढे काय होतं? रेवती आणि ओंकार यांच्यामध्ये मैत्रीचं नातं रुजेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे..

0

🎭 Series Post

View all