Login

मोकळं आभाळ भाग २५

ही एक सामाजिक कथा एका स्त्रीच्या संघर्षाची..

मोकळं आभाळ.. भाग २५

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, ओंकारने रेवतीला कंपनीचा सेटअप बसवण्यासाठी खूप मदत केली. वर्षभरातच आपल्या कठोर परिश्रमाने रेवतीने गारमेंट्सच्या औद्योगिक क्षेत्रांत आपला जम बसवला होता. आणि थोड्याच दिवसांतच रेवतीने नव्याने सुरू केलेल्या उद्योगाला भरभराटीचे दिवस आले. ओंकारच्या मनात तिच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी रेवतीला भेटायला बोलावलं. आपल्या खाजगी आयुष्यात घडलेल्या घटनांमूळे तो स्त्री जातीचा द्वेष करू लागला होता. पण रेवतीच्या येण्याने त्याच्या आयुष्यात परिवर्तन आलं होतं. ओंकारने रेवतीला त्याच्या मनातलं प्रेम व्यक्त केलं आता पुढे.. 


 

मोकळं आभाळ.. भाग २५

ओंकार तसाच गुडघ्यावर बसून राहिला होता. रेस्टॉरंटमधले आजूबाजूला बसलेले लोक मात्र त्याचा वेडेपणा पाहून गालातल्या गालात हसत होते. त्याच्या अनपेक्षितपणे प्रपोज करण्याच्या पद्धतीने रेवती गोंधळून गेली होती.  क्षणार्धात रेवतीच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. ओंकारविषयी असलेल्या मैत्रीच्या जिव्हाळ्याचं रूपांतर आता तिच्या रागात होऊ लागलं होतं. तीला प्रचंड राग आला होता. तरीही शांत स्वरात रेवती म्हणाली,

“ओंकार, काय करतोयस हे? हा बालिशपणा शोभतो का तुला? तू एका मोठ्या कंपनीचा एम.डी. आहेस हे विसरू नकोस. आधी उठून उभा रहा” 

ओंकार जागेवरून उठून उभा राहिला. रेवती आपला संताप आवरत म्हणाली,

“ओंकार तू समजतोस तसं काहीच नाही. माझं तुझ्यावर मुळीच प्रेम नाही.  वुई आर जस्ट फ्रेंड्स. आणि आता तुझ्या या वागण्याने तू ती मैत्रीही संपवून टाकलीस. ओंकार या क्षणापर्यंत मी तुला माझा चांगला मित्र समजत होते पण   तुही इतर पुरुषांसारखाच निघालास. स्त्रियांना गृहीत धरणारा. आजच्या नंतर मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. आपलं मैत्रीचं नातंही संपलं. गुड बाय मि. ओंकार दवे. ही आपली शेवटची भेट.. छान आठवण भेट दिलीस, कायम लक्षात राहिल. वन्स अगेन थॅंक्यु सो मच फॉर गिविंग मी सच ग्रेट एक्सपीरियन्स. गुड बाय.” 

रेवतीने पर्स उचलली आणि रागात तडक रेस्टॉरंटमधून बाहेर पडली. ओंकार रेवतीला आवाज देत राहिला.पण ती न ऐकताच निघून गेली. रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून तिने गाडी बाहेर काढली. कार भरधाव वेगाने त्याच्या नजरे समोरून  भुर्रकन निघून गेली. ओंकार हताशपणे हातातल्या अंगठीकडे बघत स्तब्ध उभा होता. त्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती शेवटी तेच घडलं. रेवती मैत्रीचं नातं तोडून निघून गेली. 

“नसतं विचारलं तर बरं झालं असतं निदान मैत्री तरी राहिली असती. माझंच चुकलं” 

ओंकार स्वतःलाच दोष देऊ लागला. त्याने कॉफीचं बिल चुकतं केलं आणि तो घरी निघाला. वाटेत असताना त्याने रेवतीला खूप वेळा कॉल्स केले पण तिने फोन उचलला नाही. मेसेज केले. तिने एकही रिप्लाय दिला नाही. त्याला खूप अपराधी वाटू लागलं होतं. विचारांच्या तंद्रीत तो घरी पोहचला. 

रेवतीची कार भरधाव वेगाने  घराच्या दिशेने धावू लागली. रेवतीला काहीच सुचत नव्हतं डोळ्यांतला पाऊस कोसळत होता. जुन्या आठवणी फेर धरून डोळ्यासमोर नाचू लागल्या. त्या आठवणींनी ती अस्वस्थ झाली. भावनांचा उद्रेक झाला. 

विचार करता करता रेवतीची कार सोसायटीच्या आवारात येऊन थांबली. तिने कार पार्क केली आणि ती तिच्या मजल्यावर पोहचली. दरवाजाला लटकणारं कुलूप काढलं. घरात प्रवेश करताच धाडकन मुख्य दरवाजा आपटला. पटकन ती बाथरूममध्ये गेली. तिने आसवांना वाट मोकळी करून दिली. फ्रेश होऊन बाहेर आली. मोबाईल पाहिला तर ओंकारचे खूप सारे मेसेज आणि मिस्ड कॉल्स पडले होते. तिने त्याकडे चक्क दुर्लक्ष केलं. 

डोकं सुन्न झालं होतं. ओंकारच्या वागण्याचा तिला खूप मनस्ताप होत होता. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आकाशने दिलेला त्रास आठवू लागला. भावेशचं तिच्याशी लगट करणं आठवलं. सुरेंद्र आणि शेखरचं वागणं आठवलं. पुरुषांच्या त्या घाणेरड्या नजरा, हेतुपुरस्सर केलेले इशारे, बायकांनी दिलेली तुच्छतेची वागणूक सारं काही डोळ्यासमोर फिरत होतं. पुन्हा त्या जगात तिला जायचं नव्हतं. 

“का असं केलंस ओंकार? तू एकमेव होतास रे माझा जवळचा मित्र. आता मनातल्या व्यथा कोणाला सांगू? का इतकी सुंदर मैत्री तोडलीस? का असा विचित्र विचार तुझ्या मनात आला? की तुही स्वार्थी निघालास. अनघा नंतर तूच तर होतास माझ्या सुखदुःखाचा साक्षीदार! का असं वागलास?”

रेवतीचं मन आक्रंदत होतं. स्वतःशीच बडबडत असताना एकदम तिला अनघाची आठवण झाली. लगेच तिने अनघाला फोन करून घडलेला सारा वृतांत सांगितला. अनघाने शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ती म्हणाली,

“रेवा, आधी शांत हो बघू. रडणं थांबव. तुझं सारं म्हणणं मी ऐकलं. आता मी काय सांगते ते ऐकून घे. रेवती, पहिल्या मीटिंगपासून ते आता पर्यंतचा तुमच्या दोघांचा प्रवास नीट आठवून बघ, आजवर ओंकार कधी तुझ्याशी चुकीचं वागलाय? कधी वाईट बोललाय? नाही ना! वेळोवेळी त्याने तुला प्रोत्साहन दिलं. नवीन धंदा सुरू करता यावा म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न केले. तुला कंपनीचा पूर्ण सेटअप बसवून दिला. तुझ्या सोबत कठीण प्रसंगात उभा राहिला. अजून काय हवं असतं ग एका मुलीला आपल्या जोडीदाराकडून? जी व्यक्ती तुझ्या सदैव सावली सारखी पाठीशी असते तिच व्यक्ती आयुष्याचा योग्य जोडीदार असू शकते. मला ओंकारचा प्रामाणिकपणा स्पष्ट दिसतोय. त्याचं तुझ्याविषयी असलेलं प्रेम खोटं नाही. खूप चांगला मुलगा आहे तो. त्याला नकार देण्यापूर्वी तू विचार करायला हवा होतास”

अनघा पोटतिडकीने बोलत होती. रेवती डोळे पुसत म्हणाली,

“अनघा, तुला माझा भूतकाळ माहीत आहे ना! तरीही तू असं बोलतेस?” 

“मग काय झालं रेवा? तुलाही आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. नवीन सुरुवात करण्याचा हक्क आहे. आयुष्याला नवीन दिशा देण्याची गरज आहे. आज तू तरूण आहेस काही वाटणार नाही. पण उद्या वय वाढत जाईल. उतारवयात जोडीदाराची नितांत गरज भासते ग! सगळ्याच पुरुषांना तराजूच्या एकाच पारड्यात तोलणं  बंद करशील का राणी? - अनघा 

“ओंकारला माझा भूतकाळ माहीत नाही म्हणून तो हे सर्व बोलतोय. आणि मी एक घटस्फोटीता. त्याला खूप छान, सुंदर मुलगी भेटेल. मी का त्याचं आयुष्य उध्वस्त करू?  माझ्याशी लग्न केल्यावर समाज त्याला सुखाने राहू देईल का?” - रेवतीने उत्तर दिलं. 

अनघा तिला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. पण रेवती तिच्या निर्णयावर ठाम होती. अजून थोडा वेळ बोलून रेवतीने फोन ठेवून दिला. झोप लागत नव्हती. विचार करता करता बरीच रात्र उलटून गेली होती. आणि मग केव्हातरी पहाटे तिचा डोळा लागला. 

जाग आली तेंव्हा सकाळचे सात वाजून गेले होते. तिने भराभर आवरायला सुरुवात केली. रेवती ऑफिसला पोहचली. आपल्या कामात व्यस्त झाली.  पूर्वीची हसणारी रेवती आता गंभीर वाटू लागली. ऑफिसच्या कामात तिने स्वतःला गुंतवून टाकलं. एखादया यंत्रासारखी ती वावरत होती. ओंकार रोज फोन करत होता पण ती दुर्लक्ष करत होती. पुढे कित्येक दिवस ती ओंकारशी बोलली नव्हती. भेटली नव्हती. मेसेज केले नव्हते.

दिवस सरत होते. रेवतीचा अबोला ओंकारला सहन होत नव्हता. तिच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत होता. तो अगदी वेडापिसा झाला होता. रेवती फोन घेत नाही  म्हटल्यावर त्याने तिला भेटायचं ठरवलं.ऑफिसमध्ये हया विषयावर बोलणं त्याला योग्य वाटलं नाही. आणि म्हणून त्याने रेवतीच्या घरी जाऊन भेटायचं ठरवलं. कारचे कागदपत्रे ट्रान्सफर करताना रेवतीने त्याला तिच्या घरचा पत्ता दिला होता. त्याने पत्ता पुन्हा एकदा नीट तपासून पाहिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिच्या घरी पोहचला. दारावरची बेल वाजली.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. ऑफिसला सुट्टी असल्याने रेवती निवांत बिछान्यात पहुडली होती. दारावरच्या बेलचा आवाज ऐकून रेवती उठली. दरवाजा उघडला. 

“ओंकार तू इथे!” 

समोर ओंकारला पाहून रेवती हडबडून गेली.  तिने नाईट ड्रेस घातला होता. त्या गुलाबी नाईट ड्रेसमध्येही ती मोहक दिसत होती. ती जरा जास्तच संकोचली. काय करावं तिला उमजेना? हो नाही करता करता तिने त्याला आत यायला सांगितलं. ओंकार काहीही न बोलता आत येऊन हॉलमध्ये बसला. हॉलमधल्या आजूबाजूच्या गोष्टी न्याहाळत होता. रेवतीने घराचं इंटिरिअर छान केलं होतं. छोटंसं पण नीटनेटकं आणि स्वच्छ घर पाहून त्याला छान वाटलं. ती पटकन आत बेडरूममध्ये आली. तोंडावर पाणी शिंपडलं. नाईट ड्रेस बदलून सलवार कुर्ता घातला. आणि पिण्याच्या पाण्याचा ग्लास घेऊन ती बाहेर आली. 

‘घरी आलेल्या पाहुण्याला मग तो शत्रू का असेना! त्याला प्यायला पाणी तरी द्यायचं असतं’ हे संस्कार ती विसरली नव्हती. 

“ओंकार, तू इथे का आला आहेस?” 

रेवतीने प्रश्न केला.

“मग काय करू? तू माझे कॉल्स उचलत नाहीस. मेसेज बघत नाहीस. आणि जरी पाहिलास तरी रिप्लाय देत नाही. काय समजू मी? का अशी वागतेस? तोच जाब विचारायला मी आलोय”- ओंकार

“पण तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? माझं तुझ्यावर प्रेम नाही. आणि आपल्यात मैत्रीही नाही राहिली. हे त्याच दिवशी तुला मी स्पष्टपणे सांगितलं होतं. तरी का मग फोन करतोस? का मेसेज करतोस?” - रेवती

“कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्या अंतापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत राहील. तुझं असो किंवा नसो!” - ओंकार

“प्लिज तू इथून जा. मला सोसायटी मध्ये चर्चा नकोय. मी स्वतःसाठी काही नियम आणि अटी घालून घेतल्या आहेत.   तुझं इथे येणं माझ्या नियमांत बसत नाही.  प्लिज तू जा”-  

रेवती 

“ठीक आहे तुला त्रास होणार असेल तर मी नाही थांबत. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी लगेच जाईन” - ओंकार

“ तुझ्या नकाराचं कारण सांग. मी चांगला मुलगा नाही? की तुला दुसरं कोणी आवडतं? मला उत्तर दे मी जातो”- ओंकार

“नाही तसं काही. तू खूप चांगला मुलगा आहेस. पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत” 

रेवतीचे डोळे ओसंडून वाहू लागले. 

“ अग पण का? काही कारण तर सांग. लग्न करू शकत नाही म्हणजे? असं काय घडलंय नेमकं?” 

रेवती काहीच उत्तर देत नाही म्हटल्यावर ओंकार चिडून बोलला. 

त्याच्या प्रश्नांची सरबत्ती चालूच होती.  शेवटी रेवती वैतागून म्हणाली,

“मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत कारण माझं लग्न झालंय. मी घटस्फोटीता आहे. मला नवऱ्याने सोडून दिलंय. मला प्रत्येक पुरुषात माझा  नालायक, नीच नवरा दिसतो. हुंड्यासाठी मारहाण करणारा, संशयी, पदोपदी अपमान करणारा, घरात कोंडून ठेवणारा, पत्नीला फक्त भोगवस्तू म्हणून पाहणारा हिंसक नवरा मला जाणवतो. बहीण भावाच्या पवित्र नात्याला कंलकीत करणारा, सहज उपलब्ध होणारी स्त्री म्हणून पाहणारा तो पाशवी पुरुष मला दिसतो.म्हणून  प्रत्येक पुरुषाचा मी तिरस्कार करते ओंकार. कदाचित तू खूप चांगला असशील. पण शेवटी एक पुरुषच ना! तुही तसाच असशील. मला पुन्हा त्या नरकात जायचं नाही. मी तुझ्याशी कदापिही लग्न करणार नाही. समजलं तुला? मिळालं तुला तुझं उत्तर? मग जा आता.” 

रेवती मटकन खाली सोफ्यावर बसली. आणि धाय मोकलून रडू लागली. ओंकार अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिला. त्याचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. खळखळून हसणाऱ्या चेहऱ्यामागे इतकं भयानक दुःख दडलं होतं.  रेवतीचे उद्गार ऐकून ओंकारच्या पायाखालची जमीन सरकली होती. 

त्याने रेवतीच्या खांद्यावर हात ठेवला. टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास पुढे करून त्याने रेवतीला पाणी पाजलं. तिला शांत व्हायला सांगितलं. मग रेवतीने रडत रडत आपली संपूर्ण कर्मकहाणी ओंकारला सांगितली. ओंकार शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. त्याच्याही डोळ्यांत पाणी दाटून आलं. स्वतःच्या दुःखाला कुरवाळत असताना आपल्यापेक्षाही जास्त दुःखी माणसं या जगात आहेत हे त्याला पहिल्यांदाच जाणवलं. 

पुढे काय होतं? रेवतीची कहाणी ऐकल्यावर ओंकार तिचा स्वीकार करेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे..

0

🎭 Series Post

View all