मोकळं आभाळ.. भाग २६
पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, ओंकारने त्याच्या मनात रेवतीविषयी असलेल्या प्रेमाबद्दल तिला सांगितलं. रेवती खूप उद्विग्न झाली. तिने ओंकारला स्पष्टपणे नकार दिला. आणि मैत्रीही तोडून टाकली. तिच्या नकाराचं कारण शोधण्यासाठी ओंकार रेवतीच्या घरी आला. संतापून रेवतीने त्याला ती घटस्फोटीता असल्याचं सांगून तिची कर्मकहाणी ओंकारला सांगून टाकली. ओंकारला ते सारं ऐकून खूप मोठा धक्का बसला आता पुढे..
मोकळं आभाळ.. भाग २६
रेवती अजूनही रडत होती. ओंकारने एक दीर्घ श्वास घेतला. काय बोलावं! त्याला समजत नव्हतं. रेवतीला शांत करत तो म्हणाला,
“रेवती, आय अँम रियली सॉरी! माझ्यामूळे तुला खूप त्रास झाला. जुन्या जखमांवरची खपली निघाली आणि जखम वाहू लागली. रेवती कधी कधी जखमांनाही वाहू द्यावं ग!. वेदनेचा निचरा होतो. मळभ दूर होतं. मग सारं स्वच्छ निरभ्र दिसू लागतं. तुझ्या वेदना जरी मला वाचता आल्या नाही तरी मी त्या वेचण्याचा प्रयत्न करेन. यापुढे मी कधीही तुझ्या भूतकाळातल्या गोष्टींबद्दल एक चकार शब्दही बोलणार नाही. मी तुला वचन देतो.”
बोलता बोलता ओंकार क्षणभर थांबला. आवंढा गिळत पुढे बोलू लागला,
“रेवती, जाता जाता मी तुला फक्त इतकंच सांगेन. तुझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींमूळे काहीच वाईट परिणाम झाला नाहीये. माझ्या मनातलं तुझं स्थान तसच अबाधित आहे, कायम राहील. माझं तुझ्यावर असलेलं प्रेम यःकिंचितही कमी झालं नाही. उलट ते द्विगुणित झालंय. तुझ्या घटस्फोटीता असण्याने त्या प्रेमाला मुळीच धक्का लागत नाही. तुझ्याविषयी मला रास्त अभिमान वाटू लागला आहे. पण मी तुला जबरदस्ती करणार नाही. तू हवा तितका वेळ घे. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या होकाराची वाट पाहीन. रेवती, पण माझ्यासाठी एक करशील? हे मैत्रीचं नातं तोडू नकोस. रोज नाही पण कधीतरी बोलत जा. जुन्या गोष्टी विसरून आनंदाने जग. तूझ्या आनंदातच माझा आनंद आहे. चल मी निघतो. बाय काळजी घे”
असं म्हणून त्याने रेवतीचा निरोप घेतला. रेवती ओंकारच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. बराच वेळ डोळ्यांतले अश्रू वाहत राहिले. ओंकारचे शेवटचे विधान तिच्या मनात पुन्हा पुन्हा घोळत राहिले. तो वाट पाहणं थांबवणार नव्हता. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तो तिचा होकार मिळवण्याचा प्रयत्न करणार होता. क्षणभर तिला ओंकारच्या संयमी स्वभावाचा हेवा वाटला. रेवतीने अश्रू पुसले मनातली जळमटं साफ केली.
“तुझ्याकडून काय अपेक्षा केली त्याने? कधीतरी बोलत जा. बस्स..इतकंच.. किती नितळ मन रे तुझं ओंकार! माझ्याबद्दल इतकं सारं समजल्यानंतरही तू तसूभरही बदलला नाहीस ना मनात काही किंतु! ना तुझा विश्वास कमी झाला! किती चांगला आहेस रे तू! मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत पण आपल्यातली मैत्री अशी अबाधित राहील..कायम”
रेवतीचा स्वतःशीच मौनातला संवाद चालू होता. ओंकारविषयी तिच्या मनात असलेली सारी किल्मिषं गळून पडली. तो आता तिचा एक गुणी मित्र होता. अगदी जिवाभावाचा..
रेवती उठून उभी राहिली. मनाशी पक्का निर्धार केला. तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहचायचं होतं. स्वतःची ओळख बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागणार होते. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. रेवतीने आपले संपूर्ण लक्ष रेवती गारमेंट च्या उन्नतीवर केंद्रित केलं. नव्या जोमानं सुरुवात झाली.
ऋतूचक्र वेगाने फिरत होते. वर्षामागून वर्षे सरत होती. बघता बघता पाच वर्षे भुर्रकन निघून गेली. ‘रेवती गारमेंट’ या नावाने लावलेलं रोपटं पानांफुलांनी बहरू लागलं. रेवतीच्या उद्योगाची व्याप्ती वाढू लागली. कंपनी वृद्धिंगत होत होती. फार कमी अवधीत ‘रेवती गारमेंट’ ची यशस्वी घौडदौड सुरू होती. ’रेवती गारमेंट’चं नाव कपड्यांच्या बाजारात निनादू लागलं. ओंकार आणि अभ्यंकरसर अधूनमधून तिच्याशी फोनवर बोलत असत. बरंवाईट चौकशी करत असत. रेवतीही वरचेवर फोन करायची. उद्योगात येणाऱ्या चढउतारांविषयी विचारविनिमय करायची. त्यांच्या या क्षेत्रातल्या अनुभवांचा रेवतीला उपयोग होत होता. ओंकार कायम तिच्या सोबतच होता. तिला नवनवे कॉन्टॅक्टस मिळून देत होता. अडीअडचणीत पाठीशी उभा राहत होता.
धंदा जोर धरू लागला. बाजारात तिच्या कंपनीने तयार केलेल्या कपड्यांना खूप मागणी येत होती. आता रेवतीला बिझनेससाठी जागा अपुरी पडू लागली. ग्राहकांना वेळेत उत्कृष्ट माल देण्यासाठी कुशल कामगार वाढवण्याची गरज होती. तिने ओंकारचा सल्ला घेतला. आणि त्याच्या सल्ल्यानुसार सध्याची असलेली भाड्याची जागा विकत घेण्याचा निर्णय घेतला. ओंकारने स्वतः जागेच्या मालकाशी चर्चा केली. जागेच्या बाजारभावाप्रमाणे त्याला योग्य ती किंमत देण्याचं कबुल केलं. जागेचा व्यवहार झाला. ऐंशी लाखाला व्यवहार ठरला. वीस टक्के रक्कम रेवतीला भरावी लागणार होती. रेवतीने आपले सेविंग्स, एफ डी. मोडून रक्कम गोळा केली. बाकीच्या ऐंशी टक्के रक्कमेचं बँकेकडून कर्ज घेतलं. नवीन बांधकाम सुरू झालं. पुढे तीन महिन्यांत दोन मजली इमारत उभी राहिली. पुढच्या कामासाठी प्रचंड खर्च होणार होता. ओंकार मदतीला धावून आला. त्याने तिच्या कंपनीत आपले पैसे गुंतवलेच पण त्याच बरोबर इतर गुंतवणूकदारांना योग्य परताव्याची हमी देऊन त्यांचा पैसा गुंतवला. पैसा गुंतवला गेला आणि कम्पनीच्या भरभराटीसोबत गुंतवणूकदारांना योग्य परतावा मिळत होता. ओंकारने अभ्यंकर सरांशी बोलून इतर यंत्रसामुग्रीसाठी त्यांची मदत घेतली.‘भांडवल गुंतवणूकदार’ म्हणून त्यांनीही त्यांच्या आईच्या नावाने आपली रक्कम ‘रेवती गारमेंट’ च्या उद्योगात गुंतवली. खरंतर या मदतीने रेवती कायम त्यांच्या ऋणात राहिली.
कालांतराने ‘रेवती गारमेंट’ हे नाव साऱ्या पंचक्रोशीत निनादु लागलं. अवघ्या दहा कारागिरांना घेऊन सुरू झालेली कंपनी आता शंभर कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबाचं पालन पोषण करू लागली. चांगली विश्वासू कर्मचारी कंपनीशी जोडले गेले. वेगवेगळे डिपार्टमेंट्स होत गेले. रेवतीच्या जबाबदाऱ्या विभागत गेल्या. भारतातल्या छोट्या मोठ्या राज्यात, शहरात, खेडोपाड्यात ‘रेवती गारमेंट’ अगदी घरोघरी पोहचलं होतं. बाजारात तिने डिझाइन केलेल्या ड्रेसेसना प्रचंड मागणी येऊ लागली. सुरुवातीच्या काळात लाख रुपयांची उलाढाल करणारी ‘रेवती गारमेंट’ आता कोट्यावधी रुपयांची उलाढाल करू लागली. अभ्यंकर सरांच्या कंपनीची वा ‘लिटिल वर्ल्ड’ या कंपनीची रेवती कधीच प्रतिस्पर्धी नव्हती. पण तरीही लघुउद्योजकांमध्ये रेवतीचं नाव मोठ्या सन्मानाने घेण्यात येऊ लागलं. महिला उद्योजक म्हणून औद्योगिक क्षेत्रात रेवतीचं कौतुक होऊ लागलं होतं.
जसजशी कंपनी वृद्धिंगत होत होती, तसतशी अकाउंट्स, मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, डिझाइनिंग, सॅम्पलिंग, अनेक विभाग बनून कर्मचारी संख्या वाढत होती. आपापल्या विभागाची जबाबदारी घेणारे वरीष्ठ अधिकारी नेमण्यात आले. आता रेवतीने आपलं लक्ष एक्स्पोर्ट क्लायंट्स वर केंद्रित केलं. आणि त्या अनुषंगाने पाऊलं उचलायला सुरुवात केली. परदेशातून कस्टमर्स कंपनीला भेट देण्यासाठी येऊ लागले. ओंकारच्या सल्ल्याने रेवतीने बाहेरच्या कस्टमर्सशी संलग्न राहण्यासाठी तिथल्याच एका सेल्स एजन्सीची नियुक्ती केली. तसा करार केला. हे सर्व ती ओंकारच्या मार्गदर्शनाखालीच करत होती. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी ओंकार आणि अभ्यंकर सरांशी चर्चा करायची. त्या कंपनीचा एजंट मि होमी भारतात आल्यावर इथल्या त्याच्या कंपनीने करार केलेल्या सगळ्या गारमेंट्सच्या क्लायंट्सना भेटून सॅम्पल्स घेऊन जाऊन तिथल्या ऑर्डर्स मिळून देण्याचं काम करायचा.
आणि एक दिवस ‘रेवती गारमेंट’ ला पहिली एक्स्पोर्टची ऑर्डर मिळाली. रेवतीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने घाईने ओंकारला फोन करून आनंदाची बातमी सांगितली. ओंकारलाही खूप आनंद झाला. अभ्यंकर सरांना या ऑर्डर बद्दल कळताच प्रचंड आनंद वाटला. रेवतीचं कौतुक वाटलं. एक्सपोर्टची पहिली ऑर्डर होती. परदेशातली कंपनी असल्याने लगेच विश्वास ठेवणं योग्य नव्हतं. ओंकारच्या सांगण्यानुसार रेवतीने समोरच्या कंपनीकडून ऍडव्हान्स पेमेंट घेतलं. आणि कामाला सुरुवात केली. एकीकडे उत्पादन सुरू होतं आणि दुसरीकडे एक्सपोर्टसाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर बाबी ती पूर्ण करत होती. एक्स्पोर्टची संपूर्ण प्रक्रिया तिच्यासाठी नवीन होती. रेवतीने सर्व कागदपत्रांची यादी तयार केली. कस्टम्सच्या सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण केल्या. आणि मग अवघ्या महिन्याभरातच एक्स्पोर्टची ऑर्डर पूर्ण झाली. सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण करत माल एकदाचा परदेशात ठरलेल्या वेळेत पोहचला. माल वेळेत मिळाल्याने समोरची कंपनीही खुश होती. आता प्रत्येक महिन्यात पंधरा ते वीस लाखाची त्या कंपनीची एक्स्पोर्टची ऑर्डर कन्फर्म झाली. परदेशातही रेवती गारमेंटने आपल्या नावाचा डंका वाजवायला सुरुवात केली.
हळूहळू रेवतीने परदेशातही आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मि. होमीच्या मदतीने ‘रेवती गारमेंट’ला अमेरिका, दुबई, चीन, इंग्लंड इथल्या बऱ्याच कंपनीतून ऑर्डर्स मिळू लागल्या. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत होता त्यामुळे तेही खुश होते. कामगार खुश असल्याने ते कम्पनीच्या भल्याचा विचार करत. महिला कामगार कधीही कामाचा कंटाळा करायच्या नाही. आपली कंपनी असल्यासारखं जीव ओतून काम करत असत. जास्त वेळ थांबून आपली कामे संपवूनच घरी जात असत. रेवतीला आपल्या कामगारांच्या बद्दल विशेष कणव होती. आपुलकी होती. आणि त्याचमूळे तिने कधीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. सदैव त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या सोबत राहायची. शक्य तितकी मदत करायची. त्यामुळे कामगारांनाही रेवतीबद्दल विशेष आपुलकी, आस्था प्रेम वाटू लागलं.
सर्व छान सुरळीत सुरू होतं. एक दिवस सिक्युरिटीच्या केबिन मधून रेवतीला फोन आला.
“मॅडम कोई बंदा सिर्फ आपसे मिलना चाहता है। काम के सिलसिले मे.। बहोत हात पैर जोड रहा है। आज एच आर की सुजाता मॅडम छुट्टीपे है और अकाउंट्सके सर भी बाहर गये है। क्या करू मॅडम? अंदर भेज दूँ ?”
रेवती कामात व्यस्त होती. त्यामुळे तिने जास्त खोलवर विचार केला नाही.
“कोण असेल? कोणी काम मागण्यासाठी आला असेल तर भेटूया. गरजू असेल तर कामावर ठेवता येईल. इतकी गयावया करतोय तर नक्कीच गरजू असेल.”
रेवती मनातल्या मनात बोलून गेली.
“ मेरे केबिनमे भेज दो! नाम क्या है उनका?” - रेवती
पुढचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सिक्युरिटीने फोन ठेवून दिला.
“काय वेडा आहे हा! नाव तरी सांगायचं ना! कठीण आहे. कोण नवीन सिक्युरिटी आहे काय? आलेल्या व्हिझिटर्स ना नाव, काम विचारून घ्यायचं इतकी समजत नाही का त्याला? अजून शिकाऊ आहे वाटतं. त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगायला हवं”
रेवती रिसिव्हर ठेवता ठेवता स्वतःशीच बडबडली. मागच्या कपाटातली फाईल घेण्यासाठी ती मागे वळाली. फाईलमध्ये डोकं खुपसून काहीतरी डिटेल्स ती पाहत होती.
इतक्यात तिच्या केबिनच्या दारावर टकटक झाली.
“मे आय कम ईन?”
“ येस प्लिज” - मागे वळून न पाहताच, फाईल मधून डोकं वर न काढता रेवतीने त्या व्यक्तीला आत येण्याची परवानगी दिली. पाठमोऱ्या रेवतीने खुणेनेच त्या व्यक्तीला बसायला सांगितलं. रेवती पाठमोरी असल्याने त्या व्यक्तीलाही तिचा चेहरा दिसला नाही. आणि तो बोलू लागला.
“मॅडम, मी फार आशेने इथे आलो आहे. मला नोकरीची खूप गरज आहे”
तो आवाज ऐकताच रेवती स्तंभित झाली. ओळखीचा आवाज होता तो. ती गर्रकन मागे वळाली. आणि समोर बसलेल्या व्यक्तीला पाहून एकदम तिचा चेहरा पांढरा फटफटीत पडला.
“तू आणि इथे?”
रेवती जवळजवळ किंचाळलीच.
कोण होती ती व्यक्ती? त्याला पाहून रेवती इतकी का घाबरली? पाहूया पुढील भागात..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा