मोकळं आभाळ.. भाग २८
पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, नोकरी मागण्यासाठी आलेला युवक दुसरा तिसरा कोणीही नसून आकाश होता. उद्योगात झालेल्या नुकसानीमूळे त्याची अशी दयनीय अवस्था झाली. घरदार, जमीन जुमला सर्व संपत्ती लयास गेली होती. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. त्याची सर्व कर्मकहाणी ऐकून झाल्यावर माणुसकीच्या नात्याने रेवतीने त्याला मदत करायचं ठरवलं. तिने अभ्यंकर सरांना फोन लावला आणि आकाशबद्दल सांगितलं. आता पुढे..
मोकळं आभाळ.. भाग २८
रेवतीने आकाशला अभ्यंकरसरांचं व्हिझिटिंग कार्ड दिलं. आणि त्यांना भेटायला सांगितलं होतं.रेवतीशी बोलल्यानंतर अभ्यंकरसर विचार करू लागले.
“कशी ही मुलगी! त्याच्यासारख्या माणसावर इतकी आत्मीयता का? इतक्या सहजपणे आकाशला कसं माफ करू शकते? कुठून येतो तिच्यात इतका समंजसपणा? त्याने दिलेला त्रास, वेदना सगळं विसरून त्याच्यासाठी माझ्याकडे नोकरीसाठी शब्द टाकते कमाल आहे हिची! कसा शमवू शकते ती त्या रागाचा, संतापाचा उद्रेक? इतकी निर्विकार होऊन कसा निर्णय घेऊ शकते?”
अभ्यंकर सरांना रेवतीचं खूप आश्चर्य वाटलं. आणि कौतूकही.. एकदम ते विचारात गढून गेले. त्यांना रेवती आणि त्यांची पहिली भेट आठवली. जेंव्हा रेवती पहिल्यांदा त्यांच्याकडे कामानिमित्त भेटायला आली होती. इतकी सुंदर असूनही तिच्यात कोणताही गर्व नव्हता. किती नम्रपणे ती बोलत होती. आपल्या घटस्फोटाच्या कोर्टकेससाठी लागणाऱ्या सुट्टी बाबत ती सांगायला आली होती. रजेच्या बदल्यात ती तिच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी येऊन आपलं काम संपवणार होती. किती आस्था होती तिची स्वतःच्या कामावर! कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता तिने प्रामाणिकपणे सर्व सत्य सांगितलं होतं. तिच्या विषयी कोण काय बोलतंय? या गोष्टींचा विचार न करता ती फक्त तिचं नेमून दिलेलं काम जीव ओतून करत होती. तिचा हाच प्रामाणिकपणा, हिच सचोटी अभ्यंकर सरांना खूप आवडली होती. तिचा तोच निरागस स्वभाव त्यांना भावला होता. आणि आज रेवती यशाच्या शिखरावर विराजमान असूनही तिच्या मनात कोणताच गर्व नव्हता. गगनात उत्तुंग भरारी घेत असताना तिच्या डोक्यात हवा गेलेली नव्हती. आजही तिचे पाय जमिनीवरच होते. याचं त्यांना खूप कौतुक वाटलं.
“इतकी सरळ साधी मुलगी तिच्यासोबत का ईश्वराने इतकं वाईट घडवलं असेल? का इतका संघर्ष तिच्या वाट्याला दिला असेल? पण म्हणतात ना! परमेश्वर सुखदुःख देऊन आपली परीक्षा पहात असतो. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे त्याचीच किमया असते. घडणाऱ्या वाईट घटनेतही त्याचे शुभसंकेत लपलेले असतात. म्हणूनच कदाचित ईश्वराने रेवतीला दुःख देऊन तिच्या संयमाचीच परीक्षा घेतली होती जणू!दुःखाच्या आगीत तोलून सुलाखून निघाल्यानंतरच तिचं तेज उजाळून निघालं होतं ”
अभ्यंकरसर विचारात मग्न झाले. आपल्या भूतकाळातल्या आठवणीत गुंग झाले.
वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी अभ्यंकर सरांचं पितृछत्र हरपलं. त्यांच्या आईने म्हणजेच शालिनीताईनी मोठया कष्टाने त्यांना वाढवलं होतं, शिकून सवरून मोठं केलं होतं. आई आणि वडिलांच्या दोन्ही भूमिका निभावताना शालिनीताईंची दमछाक झाली होती. त्याचमुळे वयाच्या मनाने ते खूप लवकर लहानाचे मोठे झाले होते. लवकर शहाणपण आलं होतं. जबाबदारीची जाणीव झाली होती. अभ्यंकरसर नेहमी त्यांच्या आईला खूप जपत. ते आपल्या आईचा शब्द कधीही मोडत नसत. आईचा प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी आज्ञाच जणू! शालिनीताईंनी आजवर केलेल्या कष्टाला कशाचीच तोड नव्हती. म्हणूनच शालिनीताई अभ्यंकरसरांसाठी त्यांचं सर्वस्व होती.
शालिनीताईंनी अभ्यंकरसरांच्या लहानपणी सुरू केलेल्या छोट्याशा लघुउद्योगाचं आता वटवृक्षात रूपांतर झालं होतं. हळूहळू आईला घरकामात मदत करता करता आता ते त्यांच्या आईसोबत उद्योगातही लक्ष घालू लागले. शालिनीताईंही आता वृद्धत्वाकडे झुकत चालल्या होत्या. वयोमानानुसार आजारपणं, औषधोपचार मागे लागलं होतं. त्यामुळे शालिनीताईंनी उद्योगाची जबाबदारी आपल्या मुलावर सोपवून उद्योगातून निवृत्ती घेतली.
वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी अभ्यंकरसर एम. डी. झाले. इतक्या लहान वयात कंपनी योग्य रीतीने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. या आधीही आपल्या आईसोबत राहून त्यांनी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दुःखाशी, संकटांशी फार जवळून मुकाबला केला होता. त्यामुळे ती जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडत होते. आईच्या आजारपणात नियमीत औषधोपचार, तिची काळजी घेणं ते न कंटाळता करत. दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचं राहूनच गेलं. स्वतःचा प्राधान्यक्रम नेहमीच खालचा राहिला. आणि त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष झालं. वयाची तिशी ओलांडली तरी अजून त्यांनी लग्नाचा विचार केला नव्हता. शालिनीताईंना ती एक गोष्ट फार त्रास देत होती. आणि लग्नासाठी त्या अभ्यंकरसरांच्या सारख्या मागे लागल्या होत्या. आणि ते त्यांना काहीतरी कारण देऊन टाळत होते.
अभ्यंकरसर नेहमी सर्व कामगारांची काळजी घेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वेळोवेळी एच आर डिपार्टमेंटला सूचना देत असत. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीपासून ते इतर सुविधा उपलब्ध करण्यापर्यंत ते स्वतः जातीने लक्ष देत असत. आणि म्हणूनच अभ्यंकरसर सर्व कामगारांमध्ये लाडके डायरेक्टर होते. रेवतीला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या, मदत करणाऱ्या अभ्यंकरसरांनी खूप कष्टातून हे साम्राज्य उभं केलं होतं. आणि त्याचमुळे त्यांना रेवतीबद्दल विशेष आपुलकी, कणव वाटत होती.
फोनची रिंग वाजली आणि ते भानावर आले. आकाशचा फोन होता. त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी मुंबईच्या ऑफिसमध्ये भेटायला यायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी आकाश रेवतीने दिलेल्या पत्त्यावर पोहचला. एका मोठ्या कंपनीच्या भव्य प्रवेशद्वारापाशी येऊन थांबला. व्हिझिटर्स रजिस्टर मध्ये सिक्युरिटीने एंट्री करून घेतली. फोन करून त्याने अभ्यंकर सरांना कळवलं आणि मग त्यांच्या सांगण्यावरून आकाशला आत जायला सांगितलं. स्वागतकक्षेत थोडा वेळ बसल्यानंतर रिसेप्शनिस्टने त्याला अभ्यंकरसरांच्या केबिनकडे बोट दाखवत तिकडे जायला सांगितलं.
“मे आय कम ईन सर?”
केबिनच्या दरवाज्यावर टकटक करून अर्धवट उघडत आकाशने आत येण्याची परवानगी मागितली.
अभ्यंकरसरांनी त्याला आत बोलून समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. आणि त्याचे सर्टिफिकेट्स पाहण्यासाठी मागितले. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.
“ मि. आकाश, रेवती मॅडम माझ्याशी तुमच्याबद्दल बोलल्या आहेत. आणि मी तुमचे सर्टिफिकेट्स पण पाहिले. सर्व ठीक आहे. प्रोडक्शन विभागातला तुमचा अनुभव सुद्धा दांडगा आहे. माझ्या कंपनीच्या नुकत्याच सुरु झालेल्या माझ्या नवीन युनिटसाठी मला प्रोडक्शन पाहण्यासाठी एका व्यक्तीची गरज आहे. मी तुम्हाला तिथे नोकरी देऊ शकतो. पण हे फिल्ड, तुमच्या अनुभवाच्या क्षेत्रापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तुम्हाला नव्याने सर्व गोष्टी शिकाव्या लागतील.”
अभ्यंकरसरांनी आपलं बोलणं थांबवत आकाशकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. आनंदाने नोकरी मिळणार या आशेने डोळे चमकले.
“सर, आपले खूप उपकार होतील. माझी शिकण्याची पूर्ण तयारी आहे. पण मला खरंच या नोकरीची खूप गरज आहे”
आकाशने त्यांच्यासमोर हात जोडले आणि तो आर्जवे करू लागला.
“मि. आकाश, आभार मानायचेच असतील तर रेवती मॅडमचे माना. त्यांच्या शब्दाखातर मी तुम्हाला ही ऑफर देत आहे. तुमच्या खाजगी आयुष्याशी आमच्या कंपनीचा काही संबध नाही. आणि त्याचा तुमच्या नोकरीवरही काहीही परिणाम होणार नाही. पण रेवती मॅडम आणि आमच्या कंपनीचे फार जुने ऋणानुबंध आहेत. अगदी त्या इथे नोकरी करत होत्या तेंव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यामुळेच त्यांच्याबद्दल, तुमच्याबद्दलही मला सर्व आधीपासून माहीत आहे. म्हणून मला एक प्रश्न तुम्हाला विचारावांसां वाटतोय. रेवती मॅडमसारख्या एका चांगल्या स्त्रीच्या आयुष्यात तुम्ही दुःखाचे काटे पेरलेत. काय मिळवलंत तुम्ही? त्यांच्यासारखा जोडीदार तुम्ही गमावून बसलात स्वतःच्या चुकीमुळे”
आकाशने शरमेने मान खाली घातली. त्याला त्याची चूक कळून चुकली होती. पण आता वेळ निघून गेली होती. हातातून निसटून गेलेले क्षण परत आणता येत नव्हते. हताशपणे उघड्या डोळ्यांनी पाहत राहण्याखेरीज त्याच्याकडे दुसरा मार्गच शिल्लक नव्हता. त्याच्या नजरेतला पश्चाताप अभ्यंकर सरांनी अचूक टिपला. आणि ते म्हणाले,
“एनी वे, झालेल्या गोष्टी बदलता येत नाही. आता तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आणि प्रामाणिकपणे, मन लावून आपलं काम करा. सॅलरी आणि पुढच्या फॉर्मलिटीज एच आर डिपार्टमेंट पाहून सांगतील तुम्हाला. बरं, राहण्याची काय सोय केलीय? रेवती मॅडमकडून मला सर्व समजलं आहे ”
“काही नाही अजून तरी” अस म्हणून आकाशने नकारार्थी मान हलवली.
“तिथे आपल्या कंपनीचे गेस्टरूम आहे. तुमची दुसरीकडे सोय होईपर्यंत काही दिवस तुम्ही तिथे राहू शकता. आणि तुमची सोय होईल तेंव्हा तुम्ही जा. ठीक आहे ना!”
अभ्यंकरसर हसून म्हणाले.
“बेस्ट ऑफ लक मि. आकाश! उद्यापासून तुम्ही कंपनी जॉईन करू शकता” असं म्हणून त्यांनी आकाशच्या हातात हात मिळवला. आकाशला खूप आनंद झाला होता. मनोमन रेवतीचे आणि अभ्यंकरसरांचे आभार मानून तो तिथून निघून गेला.
पुढे काय होत ?पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः
© निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा