मोकळं आभाळ.. भाग २९
पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, आकाशने इतका त्रास देऊनही रेवतीने त्याला माफ केलं होतं. पूर्वीचं सारं विसरून तीने आकाशच्या नोकरीसाठी अभ्यंकरसरांजवळ शब्द टाकला होता. अभ्यंकर सरांना रेवतीच्या या वागण्याचं कौतुक वाटलं. फक्त रेवतीच्या शब्दांखातर त्यांनी आकाशची त्यांच्या कंपनीच्या नव्याने सुरू होणाऱ्या युनिटसाठी प्रोडक्शन विभागासाठी नेमणूक केली. आता पुढे..
मोकळं आभाळ.. भाग २९
अभ्यंकरसरांनी आकाशला त्यांच्याच नव्या युनिटमध्ये नोकरी दिली. आकाश आभार मानून निघुन गेला. रेवतीच्या आणि अभ्यंकर सरांच्या कृपेने त्याला नोकरी मिळाली होती. थोड्या दिवसांसाठी का होईना पण आता त्याच्या डोक्यावर आता छप्पर होतं. त्याने गावी त्याच्या आईला फोन करून नोकरी मिळाल्याची बातमी सांगितली. रेवतीने पुन्हा एकदा त्याच्यावर उपकार केलेले पाहून आईला गहिवर आला. ती स्फुदूंन स्फुदूंन रडू लागली. त्याने आईला शांत व्हायला सांगितलं. आणि फोन ठेवून दिला. आता आकाश एक कर्मचारी बनून इमाने इतबारे काम करत होता.
अभ्यंकर सरांनी रेवतीला फोन लावला आणि आकाशला कामावर रुजू केल्याची बातमी सांगितली. रेवतीला आनंद झाला. ती त्यांचे आभार व्यक्त करत म्हणाली.,
“सर, खूप खूप धन्यवाद.. तुम्ही त्यांना कामावर ठेवून त्यांच्यावर खूप मोठे उपकार केलेत.” - रेवती
“रेवती मॅडम, तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का?” - अभ्यंकरसर
“हो बोला न सर”- रेवती
“ज्या माणसाने तुम्हाला इतका त्रास दिला.,मनस्ताप दिला., कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यात अडकवलं, त्या व्यक्तीच्या नोकरीसाठी तुम्ही माझ्याकडे शब्द टाकलात. का मॅडम? अशा व्यक्तीला तुम्ही इतक्या सहजपणे कसं माफ करू शकता?”- अभ्यंकरसर
“सर आकाश आणि त्यांचे कुटुंबिय जे वागले ते त्यांचं कर्म.. आपणही तसेच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय? आणि सर क्षमा करणारी मी कोण? मी आता राग, लोभाच्या पलीकडे गेलेय सर, आणि परमेश्वर सर्व पाहत असतो. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माची फळं मिळत असतात. आमच्यात कधी प्रेमाचं नातं रुजलंच नाही तर वाईट कशाचं वाटून घेऊ? माणुसकीच्या नात्याने मी माझं काम केलं. आणि तुम्हीही त्याच माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत केलीत. बस्स इतकंच.. बाकी काही नाही.” - रेवती हसून म्हणाली.
“ ग्रेट! असा विचार तुम्हीच करू शकता..” हसून अभ्यंकर सरांनी उत्तर दिलं. आणि मग थोडा वेळ बोलून झाल्यावर त्यांनी फोन ठेवून दिला.
अभ्यंकरसरांनी फोन ठेवून दिला. पण त्यांच्या मनात मात्र रेवतीचे विचार पिंगा घालू लागले.
“किती सरळ साधी विचारसरणी! किती निर्विकारपणे ती बोलून गेली. कोणी कसंही वागो आपण मात्र आपला मार्ग सोडायचा नाही. इतकं सहज सोप्प करून टाकलं तिने! तिचा हाच स्वभाव मनाला स्पर्शून जातो. तिचा विचार करायला भाग पाडतो”
अभ्यंकरसर स्वतःशीच बडबडले. इतक्यात त्यांची आई, शालिनीताई त्यांच्या केबिनमध्ये आल्या.आपल्याला मुलाला विचारात मग्न झालेलं पाहून म्हणाल्या,
“येऊ का रे आत? कसला विचार करतोय इतका?”
“अग आई तू, ये ना! अशी अचानक कशी आलीस. तब्बेत ठीक आहे न तुझी? सकाळी बोलली असतीस तर सोबत नसतो का आलो आपण?”
अभ्यंकर सर जागेवरून उठत आईला खुर्चीत बसवत म्हणाले.
“अरे, वाटलं सर्वांना भेटून यावं, तुझ्यासोबत लंच करावा. म्हणून आले”
शालिनीताईं हसून म्हणाल्या. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि नेहमीप्रमाणे आजही शालिनीताईं आपल्या मूळ पदावर आल्या. त्यांनी अभ्यंकरसरांसमोर त्यांच्या लग्नाचा विषय काढला.
“बाळ, सगळं आता छान स्थिरावलं आहे. आता तुझ्या लग्नाचा विचार करायला हरकत नाही ना! किती मुली पाहिल्या. पण तुला एकही पसंत पडली नाही. काय घाई आहे? असं म्हणून तू नेहमी टाळत राहिलास. हे बघ बाळ, माझ्या मागे माझं आजारपण लागलंय. तुझा भरलेला संसार एकदा डोळे भरून पाहिला की मी डोळे मिटायला मोकळी होईन.” - शालिनीताई
“आई, प्लिज असं बोलू नकोस ग! तुला काहीही होणार नाही. मी तुला काही होऊ देणारच नाही” - अभ्यंकरसर
अभ्यंकरसरांच्या डोळ्यांत पाणी आलं.
“त्याचं बोलावणं आलं की जावंच लागतं बाळ, ते कोणाला चुकलंय का? की थांबवता आलंय का? पण तरीही तू आता लग्न करायला हवं. तुला कोणी आवडत असेल तर सांग मला. मी पुढची बोलणी करेन”
शालिनीताईं हसून म्हणाल्या. त्यांच्या या वाक्याने अभ्यंकर सर थोडेसे बावरले. आणि स्मित हास्य करत म्हणाले,
“आई, तू विषय काढलाच आहेस तर मला तूला एक गोष्ट सांगायची. हो मला एक मुलगी आवडते. तसं तर ती मला खूप आधीपासून आवडायची. पण हल्ली थोडं जास्त प्रकर्षाने जाणवू लागलं आहे. आणि मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे”
हे ऐकून शालिनीताईंना खूप आनंद झाला.
“अरे व्वा! खूपच छान गोष्ट आहे ही.कोण आहे मुलगी? नाव काय तिचं? कुठे राहते? काय करते? मी लगेच तिच्या घरी जाते आणि लग्नासाठी मागणी घालते” - शालिनीताई
शालिनीताईंचा उत्साह ओसंडून वाहू लागला. आपल्या मुलाच्या लग्नाच्या कल्पनेने त्यांना नवीन स्फुरण चढलं. आणि त्यांनी अभ्यंकरसरांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला.
“अग आई थाम्ब! किती प्रश्न..जरा धीराने घे..सांगतो सगळं तुला. आई आम्ही दोघे गेली सहा-सात वर्षे झाले असतील एकमेकांना ओळखतो. आणि तुही तिला ओळखते. आई, तिचं नाव आहे रेवती. तुला आठवते का? ती आपल्या इथे फॅशन डिझायनर म्हणून काम पाहत होती.पण आता तिचा स्वतःचा बिझनेस आहे. आणि तुही तिच्या उद्योगात भांडवल गुंतवणूकदार आहेस”
अभ्यंकर सर आईला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होते. पण या गोष्टीला खूप वर्ष झाली होती. त्यामुळे शालिनीताईंना नीट आठवत नव्हतं. मग अभ्यंकर सरांनी रेवतीची सर्व कहाणी शालिनीताईंना सांगितली. त्यांनीही शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घेतलं. रेवती घटस्फोटीता आहे ही गोष्ट त्यांना रुचली नव्हती. काही क्षण शांततेत गेली. कोणीच काही बोलत नव्हतं. एक दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या,
“बाळ, रेवती चांगली असेलही. एकट्या स्त्रीने समाजात राहणं तसं सोप्प नाही रे. ते दुःख काय असतं हे माझ्यापेक्षा कोण समजू शकेल? तिच्या धैर्याला मी मनापासून दाद देते. पण घटस्फोट का झाला? तुला माहीत आहे का? दोन्ही बाजू तू नीट तपासून पाहिल्या आहेस का? त्यात ती महाराष्ट्रीयन नाही. गुजराती कुटुंबात वाढलेली. तिथल्या चालीरीती, पध्दती वेगळ्या.. आपले रीतीरिवाज तिला समजतील का? आपल्या कुटुंबात ती सामावून जाईल का? लग्नासारखा मोठा निर्णय असा घाईत घेणं योग्य नाही. तू नीट विचार केला आहेस का?”
शालिनीताईं आपल्या मुलाला समजावण्याच्या सुरात बोलत होत्या. यावर अभ्यंकरसर म्हणाले,
“आई, मी तिला खूप वर्षांपासून ओळखतो आहे. तिचा नवरा आकाश तिला खूप त्रास देत होता. तिच्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. माहेरून पैसे आण म्हणून जाच करत होता. या त्रासाला कंटाळून तिने घटस्फोट घेतला. इतकं सगळं होऊनही तिने पुन्हा त्याच्या नोकरीसाठी माझ्याकडे शब्द टाकला. कोणत्या मुलीने केलं असतं आई? आपल्या दुसऱ्या युनिट मध्ये आकाश काम करतो तू त्याला विचारू शकतेस. पण माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. आई, खरंच ती खूप चांगली मुलगी आहे. मला खात्री आहे, ती मला समजून घेईल., आपल्या घराला, कुटुंबातील माणसांना आपलं करेल. आई, पण मी अजून तिला काहीच विचारलं नाही. ती या लग्नाला तयार होईल का? मला नाही माहीत ग!”
थोड्या चिंतेच्या स्वरात अभ्यंकरसर बोलून गेले.
“ठीक आहे, तुला योग्य वाटत असेल तर माझी काय हरकत असणार आहे? संसार तुम्हा दोघांना करायचा आहे. त्यामुळे तुमच्या दोघांचेही मत महत्वाचे आहे. तू चिंता करू नकोस मला तिच्या घरचा पत्ता दे.. मी लवकरच तिला भेटून तिचं मत विचारून घेते. आणि मग पुढच्या गोष्टींच्या तयारीला लागते.”
शालिनीताईंनी जणू यावेळीस अभ्यंकर सरांचं लग्न उरकण्याचा विडाच उचलला होता. इतक्या दिवसांनी आईच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहून अभ्यंकर सरांनाही खूप आनंद होत होता.
काही दिवसांनी शालिनीताईंनी रेवतीला फोन करून भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. भेटीचं कारण माहीत नव्हतं पण तरीही त्या भेटायला येणार म्हटल्यावर रेवतीलाही आनंद झाला.
रेवतीला सांगितल्याप्रमाणे शालिनीताईं आपल्या ड्राइव्हर सोबत पुण्यात आल्या. ड्राइव्हरला पत्ता नीट समजावून सांगण्यासाठी त्यांनी रेवतीला फोन केला. रेवतीने त्याला पत्ता समजावून सांगितला. आणि मग ड्राइव्हर शालिनीताईंना घेऊन तिच्या घराच्या दिशेने निघाला. रेवतीला त्यांच्या येणाची पूर्व कल्पना होतीच. म्हणून मग तिने त्या दिवशी ऑफिसमधलं काम पटकन आवरलं. वरिष्ठांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. आणि ती घरी आली. रेवतीने आधीच अभ्यंकरसरांशी बोलून जेवणातल्या त्यांच्या आवडीनिवडी विचारून घेतल्या होत्या. दुपारच्या जेवणाची साग्रसंगीत तयारी केली. दुपारच्या जेवणात तिने शालिनीताईंच्या आवडीचे पदार्थ बनवले होते.
इतक्या वर्षांनी कोणीतरी वडीलधारी व्यक्ती रेवतीच्या घरी येणार होती. सासू सासरे, आईवडील हे तर खूप आधीच दुरावले होते. त्यामुळे रेवतीसाठी आजचा दिवस खूप खास होता. त्यांच्या आशीर्वादाने ती सुखावणार होती. न्हाऊन निघणार होती.
थोड्याच वेळात शालिनीताईंची गाडी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आली. ड्राइव्हरला गाडीत बसवून त्या रेवतीच्या घरी पोहचल्या. दारावर ‘रेवती कांकरिया’ या नावाची पाटी दिसली. त्यांनी दारावरची बेल वाजवली. रेवतीने दरवाजा उघडला. रेवतीने हसून त्यांचं स्वागत केलं. आत यायला सांगितलं. सुहास्यवदनी रेवती पाहता क्षणीच शालिनीताईंच्या मनात घर करून गेली. मरून रंगाची कॉटन सिल्क साडीत रेवती अजूनच छान दिसत होती. स्वच्छ, टापटीप, नीटनेटकं घर पाहून शालिनीताईंना खूप प्रसन्न वाटलं. आपल्या मुलाची निवड चुकली नाही त्यांच्या मनाने कौल दिला.
रेवतीने सरबत बनवून आणलं आणि मग सरबत घेता घेता दोघींच्या गप्पा सुरु झाल्या.रेवती अभ्यंकरसरांचं तोंड भरून कौतुक करत होती. त्यांनी तिला वेळोवेळी कशी मदत केली हे सांगत होती. शालिनीताईंही तिचं बोलणं कौतुकाने ऐकत होत्या. गप्पांच्या ओघात कधी कसा वेळ निघून गेला. दोघींनाही समजलं नाही.
“चला आई, बराच वेळ झाला. तुमच्या जेवणाची वेळ टळून जायला नको.औषध घ्यायचं असतं ना तुम्हाला? मला अभ्यंकरसरांनी सांगितलं आहे बरं का? ड्राइव्हरकाकांनाही जेवायला वर बोलूया का? तुम्ही फोन करता का त्यांना?” असं म्हणत रेवती किचनमध्ये गेली आणि जेवणाची पुढची तयारी करू लागली.
शालिनीताईंनी ड्राइव्हरला फोन लावला आणि जेवणासाठी वर बोलावून घेतलं.
शालिनीताईंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांच्या मुलानंतर पहिल्यांदाच कोणीतरी त्यांना ‘आई’ म्हणून संबोधलं होतं. मन आनंदाने भरून आलं. सुनेच्या रुपात घरभर वावरणारी लेक त्यांना दिसू लागली. तिच्या नुपुरांची किणकिण त्यांच्या कानात हृदयात साठत होती. रेवतीने जेवणात बटाट्याची भाजी, श्रीखंड पुरी, वरणभात, कोशिंबीर, पापड, लोणचं असा साग्रसंगीत बेत केला होता.
रेवतीच्या हातचं जेवण जेवून शालिनीताईंनी तृप्त झाल्या. सर्वांची जेवणं आटोपली. जेवल्यानंतर पुन्हा ड्रायव्हर कारमध्ये जाऊन बसला. बोलता बोलता रेवतीने भांडी घासून घेतली. किचन ओटा आवरला. आणि पुन्हा दोघी हॉलमध्ये येऊन गप्पा मारत बसल्या. रेवतीने त्यांना औषधांची आठवण करून दिली. शालिनीताईंनी औषधं घेतली.
शालिनीताईंनी बोलता बोलता ज्या कामासाठी त्या आल्या होत्या तो विषय काढला,
“रेवती, आज मी तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम घेऊन आलेय. मी माझ्या मुलाकडून तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं. आज त्याच्या प्रत्यय आला. रेवती, तुझ्यासारख्या इतक्या गुणी मुलीच्या वाट्याला तसं आयुष्य का आलं? खरंच मलाच ईश्वराला जाब विचारावांसा वाटतोय बघ. होय बाळ, मला तुझ्या भूतकाळाबद्दल पूर्ण कल्पना आहे.
रेवती, माझा मुलाचा निर्णय चुकीचा नव्हता. त्याची निवड योग्यच होती. तू मला आई म्हणालीस खुप छान वाटलं. तुझ्या हातचं जेवून तृप्त झाले. अन्नपूर्णा वसते तुझ्यात. आणि त्याच लक्ष्मीच्या सोनपावलांनी तू आमच्या घरी यावंस असं मला वाटतं. रेवती मी तुला माझ्या मुलासाठी लग्नाची मागणी घालायला आलेय. मला तुला माझी सून बनवून घरी घेऊन जायचं आहे पण तुझ्यावर कोणतीही सक्ती नाही. पूर्ण विचार करून उत्तर दे.”
शालिनीताईंच्या या बोलण्यावर रेवती अवाक होऊन त्यांच्याकडे पाहू लागली. तिच्यासाठी हे सारं अनपेक्षित होतं.
पुढे काय होतं? रेवती कोणता निर्णय घेते? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा