मोकळं आभाळ.. भाग १७
पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, रेवतीच्या चांगल्या कामाची तिच्या कंपनीने दखल घेऊन तिला त्याचा मोबदला देण्याचं ठरवलं. पुण्यात नवीन युनिट सुरू करून त्याची पूर्ण जबाबदारी तिला देण्याचं ठरवलं. रेवतीला लवकरात लवकर तिचा निर्णय कळवायला सांगितला.रेवतीला मागे घडलेला सुरेंद्रचा किळसवाणा प्रकार आठवला आणि ती पूर्णपणे हादरून गेली होती. निर्णय घेताना तीची द्विधा मनस्थिती झाली होती. आता पुढे..
मोकळं आभाळ.. भाग १७
रेवती घरी जाण्यासाठी निघाली. आपल्या नेहमीच्या लोकल ट्रेन मध्ये शिरली. आज रेवतीला विंडो सीट मिळाली होती. लोकल ट्रेन मध्ये विंडो सीट मिळवणं म्हणजे खरंच खूप भाग्याची गोष्ट!! जणू खूप मोठा विजय मिळाल्याचा आनंद! रेवती विचार करू लागली. अनघाशीही तिचं बोलणं झालं होतं. ‘काय निर्णय घ्यावा?’ ती संभ्रमात पडली.
जुन्या जखमांवरची खपली निघत होती. आठवणी वेदना बनून भळभळून वाहू लागल्या. शेखरचं बोलणं आठवू लागलं. शेखर आकाशचा बालपणीचा गावाकडचा मित्र.. विवाहित, सुंदर पत्नी आणि एक गोंडस मुलीसोबत तिच्याच परिसरात राहत होता. रेवतीला माहेर, सासर दोन्ही तुटलं होतं. सर्वांनी तिच्याशी नातं तोडून टाकलं होतं. रेवतीला आईवडिलांची, सासुसासऱ्यांची आठवण यायची. ती शेखरला त्यांची ख्वालीखुशाली विचारत असायची. शेखर गावाकडची, सासुसासऱ्यांची, तिच्या आईवडिलांची वरचेवर खुशाली कळवायला घरी यायचा. कधी आपल्या पत्नीला आणि मुलीला घेऊन यायचा. तर कधी एकटाच यायचा. थोडा वेळ बसून निघून जायचा.
त्यादिवशीही असाच शेखर एकटाच घरी आला. चहापाणी झालं. गप्पा झाल्या. सगळ्यांची ख्वालीखुशाली सांगून झाली. आणि तो घरी जाण्यास निघाला. रेवतीने ढोकळा बनवला होता. तिच्या मनात आलं,‘थोडं डब्ब्यात घालून शेखरच्या घरी देऊया’ ती स्वयंपाकघराच्या दिशेने वळत म्हणाली,
“भावोजी ढोकळा बनवला आहे. थोडा वहिनी आणि परीला डब्ब्यात घालून देते. घेऊन जा घरी”
तिला थांबवत शेखर म्हणाला,
“नको वहिनी, डब्बा नको. भावनाला मी तुमच्याकडे आलोय हे माहीत नाही. डब्बा घेऊन गेलो तर तिला समजेल मी तुम्हाला भेटतो ते. तिला नाही आवडत मी इथे आलेलं. उगीच संशय घ्यायची आणि घरात कलह व्हायचा. तुम्हीपण नका सांगू तिला”
शेखर चाचपडत बोलत होता.
रेवतीला आता उमजू लागलं होतं. नेहमी डब्यात पदार्थ घालून द्यायचं म्हटलं की शेखर टाळाटाळ करायचा. सबबी द्यायचा. आता खरं कारण तिला समजलं होतं. मनातला राग उफाळून आला होता तरीही शांतपणे रेवती शेखरला म्हणाली,
“भावोजी भावनाला तुम्ही इथे येण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पुन्हा माझ्या घरी येऊ नका.अशीही सगळी नाती संपलीत. आपुलकीने जोडलेली नाती असावीत असं वाटत होतं. पण आता तेही नकोय. भावना सोबत तिची इच्छा असेल तरच या नाहीतर तुमचं माझ्या घरी हे शेवटचं येणं”
रेवतीच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं.शेखर मुकाट्याने खाली मान घालून निघून गेला. रेवती विचार करू लागली.
“भावना माझी मैत्रीण तरीही तिला माझा प्रॉब्लेम वाटावा? का माझ्यासोबत? नवऱ्याने टाकलेली म्हणून मी वाईटच असणार म्हणून आधीच समाजाने ठरवून टाकलंय. नेहमी बोलणाऱ्या शेजारच्या बायकांनी माझ्याशी बोलणं कमी केलं. मला पाहून दुसऱ्या दिशेने निघून जातात. त्यांचे नवरे आपल्या बायकांच्या समोर बोलायचं टाळतात. आणि एकटी असली की गप्पा मारायला येतात. का मला अशी वागणूक? एकटी स्त्री खरंच चारित्र्यहीन असते? मग अशा जगात मी कशी वावरणार?”
तिचे तिलाच प्रश्न पडत होते. प्रश्नांची शृंखला तुटत नव्हती.
“मला जर हे सगळं चित्र बदलायचं असेल तर आधी माझी जुनी ओळख पूसायला हवी. विवाहित असूनही मी एका विधवेचं जीणं जगतेय. ते सर्व सोडून द्यायला हवं आता. ‘रेवती पारेख’ ही ओळख खोडून टाकली पाहिजे आणि पुन्हा बॅचलर आयुष्याला ‘रेवती कांकरिया’ या नावाने सुरुवात करायला हवी. मला हे शहर, ही माणसं सर्वांपासून दूर जायला हवं. नव्या शहरात माझी नवी ओळख बनवायला हवी..हो सरांनी मांडलेला प्रस्ताव मान्य करायला हवा.तरच माझी नवी ओळख बनेल”
विचारांच्या तंद्रीतच रेवती घरी पोहचली. घरी आल्यावर अनघाशी फोनवर बोलून घेतलं. आणि तिने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी रेवतीने तिचा पुण्याला जाण्याचा निर्णय एम.डी. ना कळवला. पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटलं.
“एवढी मोठी बढती उगीच मिळाली का? इतकी वर्ष आम्ही काम केलं आम्हाला नाही मिळाली ते..एवढा मोठा फेव्हर कोणी असंच करेल का? दालमे कुछ काला है।, अरे भाई, मुझे तो पुरी दालही काली दिखाई दे रही है”
लोकांची बोलणी तिच्या कानी पडत होती. टोमणे ऐकू येत होते. हशा पिकत होत्या पण रेवतीने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.
“ध्येयाच्या दिशेने जाताना वाटेवर अशी कुत्री भुंकणारच”
तिला हे चांगलंच ठाऊक होतं. रेवतीने अनघा आणि तिच्या आई बाबांचा निरोप घेतला. तिने मोजकंच सामान सोबत घेतलं. उरलेलं समान अनघाच्या घरी परत पाठवून दिलं. आणि ती पुण्याला आली.
एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली. ‘रेवती पारेख ते रेवती कांकरिया’ हा उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला. डोळ्यांत नवी दिशा, नवी स्वप्नं, नवी आशा घेऊन रेवतीचं नवीन शहरात आगमन झालं. पुण्यातलं वातावरण मुंबईपेक्षा खूप वेगळं होतं. प्रसन्न होतं. कंपनीने तिच्या राहण्याची सोय केली होती. युनिटच्या आसपासच्या परिसरात तिला राहण्यासाठी फ्लॅट दिला होता.
युनिटची संपूर्ण जबाबदारी तिला सांभाळायची होती. नवीन जागा, नवीन लोक सर्वांशी मिळतंजुळतं घेऊन काम पूर्ण करायचं होतं. नवीन लोकांना कामावर घ्यायचं होतं. नवीन जागा भरायच्या होत्या. सगळं शून्यातून उभं करायचं होतं. रेवतीला एकटीच्या खांद्यावर शिवधनुष्य पेलायचं होतं.
कंपनीने आधीच पूर्ण सेटअप करून दिला होता. यंत्रसामुग्री जागच्या जागी स्थापित केली होती. रेवतीने कामाचा आराखडा आखला. डिझाईन, कटिंग, स्टीचिंग, प्रेसिंग, पॅकिंग, मार्केटिंग, सेल्स, अकाउंट्स सगळ्या डिपार्टमेंट मध्ये कामगार भरायचे होते. रेवतीने वर्तमानपत्रात जाहिरात दिली. मुलाखतीच्या प्रक्रिया सुरू झाल्या. माणसं निवडली गेली. जवळपास राहणाऱ्या गरजू बायकांना शिवणकामासाठी बोलवण्यात आलं. चांगल्या कटिंग मास्टरांची निवड करण्यात आली. संपूर्ण सेटअप बसला. पुण्यात मुंबईसारख्या लोकल ट्रेनची धावपळ नव्हती. युनिट पुणे शहरापासून बरंच दूर होतं म्हणून मग रेवतीने कामगारांना ने-आण करण्यासाठी बसची सोय करण्यात आली. आणि कामाला शुभारंभ झाला.
एक शुभ मुहूर्त पाहून काम सुरू झालं. डिझाईन डिपार्टमेंट मध्ये नवीन लोकांकडून नवीन संकल्पना,नवीन डिझाईन्स जन्म घेऊ लागली. कटिंग मास्टरांकडून रंगबिरंगी कापड कापले जाऊ लागले. लहान मुलींचे सुंदर छान कपडे शिवून टेबलवर येऊ लागले. पॅकिंग होऊन माल युनिटच्या बाहेर जाऊ लागला. डिझायनिंग पासून ते अकाउंट्स पर्यंत रेवती प्रत्येक विभागात स्वतः लक्ष घालू लागली. ऑर्डर्स मिळवण्यासाठी स्वतः बाहेर पडू लागली. तिने बनवलेल्या मालाला बाजारात मागणी येवू लागली. रेवतीच्या कष्टाचं चीज होऊ लागलं होतं. रेवती खुश होती कारण तिची मेहनत रंगरूपाला येऊ लागली होती. मुंबईच्या कंपनीत रेपोर्ट जाऊ लागला. तिची प्रगती खरंच थक्क करणारी होती. कोणत्याही कामात रेवतीने हात घालताच ते काम पुर्णत्वास जात होतं. कंपनीच्या मालकांनी मंजूर केल्याप्रमाणे तीच्या पगारात पन्नास टक्के वाढही करून दिली.
महिला कामगारांमध्ये ती खूपच आवडती मॅडम झाली. रेवती त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप झाली. त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करू लागली. ‘रेवती कांकरिया’ ची सर्वांची लाडकी ‘रेवती ताई’ झाली.
पुन्हा एकदा सगळं छान सुरळीत सुरू झालं. रेवती दिवसरात्र काम करत होती. यंत्रावत झाली होती. पुण्यात आल्यानंतर रेवती अधिक स्वावलंबी झाली. तिच्यात निर्णय घेण्याची क्षमता आली. एक जबाबदार अधिकारी झाली. अधून मधून ती अनघाला फोन करायची. अनघाही रेवतीला मिळालेल्या यशामुळे खुश होती.
रेवतीने पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. गर्दी, रहदारीच्या धकाधकीच्या आयुष्यापासून तिला दूर जायचं होतं. पुण्यात शहरापासून दूर असलेल्या, निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर, छोटासा प्लॅट पाहिला. आकाशने दिलेल्या पाच लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केलं. आणि स्वतःचं, हक्काचं घर बुक केलं.
पण तरीही अजूनही प्रश्न तसाच होता. जगाच्या पाठीवर कोठे ही जा सर्व स्त्रियांची कथा सारखीच. मग ती विधवा असो, घटस्फोटीता असो, वा कोणी परित्यक्ता असो किंवा लग्न न झालेली एकटी रहाणारी स्त्री असो प्रत्येंकीची कहाणी थोड्या फार फरकाने सारखीच.. आजूबाजूला राहणाऱ्या तिच्या शेजारच्या बायका कधी गंमतीने, कधी मुद्दाम खोचकपणे तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारू लागल्या.
रेवती त्यांच्या प्रश्नांना टाळू लागली.कधी चिडून..कधी हसून..
आणि एक दिवस रेवतीच्या आयुष्यात तो आला..एक झंझावात.. एक हसरा धबधबा..
कोण होता तो? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा