Login

मोकळं आभाळ भाग २०

ही एक सामाजिक कथा..एका स्त्रीच्या संघर्षाची..

मोकळं आभाळ.. भाग २०

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, रेवतीला लिटिल वर्ल्ड कंपनीची खूप मोठी ऑर्डर मिळाली. त्या कंपनीच्या नेहमीच्या प्रक्रियेप्रमाणे ओंकार व्हीझिट साठी रेवतीच्या युनिट पहायला आला. रेवतीला ओंकारच्या स्वभाव खूपच विचित्र आणि विक्षिप्त वाटला. पण कंपनीच्या नफ्याचा विचार करून तिने सगळे विचार झटकून टाकले. ३० नोव्हेंबरपर्यंत रेवतीला ऑर्डर पूर्ण करायची होती. त्यानुसार तिने आराखडे आखायला सुरुवात केली. आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग २०

रेवतीने कामाला सुरुवात केली. कापड मागविण्यात आलं. रोजच्या उत्पादनाचं प्लॅनिंग करण्यात आलं. तीन शिफ्ट मध्ये काम सुरू झालं. दिवस रात्र युनिट जागं राहू लागलं.. ही ऑर्डर पूर्ण करणं तिच्यासाठी खूप महत्वाचं होऊन बसलं होतं. तिचे सहकारी, कंपनीतले स्त्री कामगारवर्ग सर्वजण तिला सहकार्य करत होते. सर्वांनाच ही ऑर्डर पूर्ण करून देण्याच्या ध्यासाने पछाडलं होतं. रेवती स्वतः लक्ष घालत होती. त्यांना प्रोत्साहन देत होती. रोजच्या ‘लिटिल वर्ल्ड’ च्या उत्पादनाचा अहवाल ओंकारला देत होती. त्याचबरोबर मुंबईच्या ऑफिसला अभ्यंकरसरांनाही कळवत होती. एकदा अभ्यंकरसर पुण्यात येऊन कामाची परिस्थिती पाहून गेले होते. रेवतीचा उत्साह, तिचा आत्मविश्वास थक्क करून टाकणारा होता. अभ्यंकरसरांना तिचं खूप कौतुक वाटलं होतं. तिची धडपड वाखाणण्याजोगी होती. 

कामानिमित्त ओंकारचं रेवतीच्या युनिटला जाणं येणं वाढलं. ओंकारच्या विचित्र आणि लहरी स्वभावाची प्रचिती रेवतीला पुन्हा पुन्हा येत होती. कामाचं टेन्शन आणि ओंकारचा विक्षिप्त स्वभाव रेवती भांबावून गेली होती.  कधी कॉल, कधी मेलवरून ती रोजच्या कामाचे अपडेटस ओंकारला कळवत होती. वरचेवर रेवतीचंही त्याच्या कंपनीत जाणं होऊ लागलं. 

कामाचा वेग वाढला होता. चोवीस तास युनिट सुरू असूनही काम उरकत नव्हतं. खूप कमी अवधी शिल्लक होता. रेवतीला खूप टेन्शन येत होतं. रेवती तहान भूक हरपून गेल्यासारखं काम करत होती. सर्वजण  अविश्रांत परिश्रम घेत होते. ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. ३० तारीख जसजशी जवळ येत होती तसतसं कामाचा ताण वाढत होता. ऑर्डर पूर्ण होण्याच्याच मार्गावर होती पण नेमका एक घोळ झाला. फॅब्रिक सप्लायरने वेगळं कापड पाठवलं. रंगामध्ये फरक दिसत होता. फॅब्रिक परत पाठवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सगळी मेहनत पाण्यात जाणार होती. वेळेत ऑर्डर पूर्ण नाही झाली तर!!  या चिंतेने तिला ग्रासलं होतं. काय करावं? रेवतीला काहीच समजेना. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी तिला कस्टमर कडून अवधी वाढवून मागायला सांगितलं. 

रेवती काळजीत पडली कारण ओंकारच्या स्वभावाची तिला चांगलीच कल्पना आली होती. त्याला सबबी चालत नाहीत इतकं तर नक्कीच उमजलं होतं. पण तरीही यातून मार्ग काढणं गरजेचं होतं.  

“एकदा भेटून सद्यस्थिती समजावून सांगू. बघू ऐकून घेतात का? ऐकलं तर ठीक नाहीतर त्यांनी दिलेल्या रक्कमेचा चेक परत देऊ आणि फक्त मटेरियलचा खर्च मागून घेऊ” 

रेवती नाराजीने स्वतःशीच पुटपुटली आणि ओंकारला फोन केला., 

“हॅलो सर, रेवती बोलतेय”

“येस प्लिज, बोला” - ओंकार

“सर, आपल्या ऑर्डरच्या संदर्भात बोलायचं होतं. मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊ का? भेटून सविस्तर बोलता येईल” - रेवती

“हो.. का नाही.! तुम्ही दुपारी १२ वाजता या. म्हणजे सविस्तर बोलता येईल आणि आपल्याला लंचही सोबत घेता येईल” - ओंकार 

“नो..नो.. सर लंच नको. इथे अजून बरीच महत्त्वाचे कामे पूर्ण करायची आहेत. तुमच्याशी बोलून मी निघेन लगेच” - रेवती

“ ठीक आहे तुम्ही या तर आधी. मग ठरवू आपण काय ते?” 

ओंकारने इतकं बोलून फोन ठेवून दिला. आपल्या पर्सनल सेक्रेटरीला बोलवून रेवतीच्या मीटिंग बद्दल सांगितलं आणि तो म्हणाला,

“कृतिका, त्या रेवती मॅडम येणार आहेत. महत्वाची मीटिंग आहे. माझ्या बाकीच्या मीटिंग्स रद्द करू टाक. उद्याची तारीख कळव त्यांना. ठीक आहे.. यु मे गो नाऊ” 

कृतिका हो म्हणून तिथून बाहेर पडली आणि आपल्या पुढच्या कामाला लागली. 

दुपारी रेवती बरोबर १२च्या ठोक्याला ओंकारच्या ऑफिसमध्ये पोहचली. थोडा वेळ स्वागतकक्षेत बसली.  तशी ती वेळेच्या बाबतीत खूपच वक्तशीर होती. रेवती मनातून थोडी धास्तावली होती. डोक्यात विचारांची गर्दी होऊ लागली.

“ऑर्डर पूर्ण होऊ शकणार नाही म्हटल्यावर ओंकारची प्रतिक्रिया कशी असेल? मला वेळ वाढवून देईल का? की रागवेल मला? माझंच चुकलं.. मी माझ्या युनिटची उत्पादन क्षमता एकदा तपासून घ्यायला हवी होती. खरंच चुकलंच माझं.. पण आता काय उपयोग! ओरडा तर खावा लागणारच!” 

रेवती तिच्याच विचारात मग्न असताना रिसेप्शनिस्टने तिला आवाज दिला. 

“सरांनी  तुम्हाला आत बोलावलं आहे. तुम्ही जाऊ शकता” 

तिने स्मित हास्य करत आत जायला सांगितलं. रेवतीनेही हसून धन्यवाद केलं आणि ती ओंकारच्या केबिनच्या दिशेने वळाली. 

“मे आय कम इन सर” 

केबिनचा दरवाजा अर्धवट पुढे ढकलत रेवती म्हणाली. 

“येस प्लिज” 

ओंकार ने तिला आत यायला सांगितलं आणि तिच्याकडे एकटक मुग्ध होऊन पाहतच राहिला. आज गुलाबी रंगांच्या सलवार कुर्त्यात रेवती अतिशय मोहक दिसत होती. मोकळे भुरभुरणारे केस, काळेभोर डोळे,  ओठांवर किंचितशी गुलाबी रंगाची लिपस्टिक, गळ्यात नाजूकशी चेन, हातात सोन्याचं सुंदर नक्षीकाम केलेलं ब्रेसलेट तिच्या सौन्दर्यात अजूनच भर घालत होतं. भानावर येत त्याने रेवतीला बसायला सांगितलं. रेवती त्याला काहीशी चिंतीत वाटत होती. त्याने रेसिईव्हर उचलून कानाला लावला आणि म्हणाला,

“दोन कॉफी आत पाठवून द्या” 

आणि लगेच रिसिव्हर खाली ठेवत रेवतीकडे पाहून बोलू लागला

“बोला मॅडम, का इतकी तातडीची मीटिंग बोलावलीत? काही महत्वाचं काम होतं का?” 

पुन्हा रेवतीला थोडं विचित्र वाटलं. 

“न विचारता गृहीत धरून कॉफी सांगून मोकळा झाला. बहुतेक याला कोणाला विचारायची  सवयच नाही. जाऊ दे.. ज्या कामासाठी आलोय ते बोलून घेऊ”

असा विचार करून तिने बोलायला सुरुवात केली.

“सर, ठरलेल्या वेळेप्रमाणे तुमची ऑर्डर पूर्ण होतच होती. थोडंच काम बाकी होतं. पण अचानक एक घोळ झालाय. फॅब्रिक सप्लायरने चुकीचं फॅब्रिक पाठवलं. ते परत पाठवून नवीन फॅब्रिक यायला दोन दिवस तरी लागतील. मी आजच ते फॅब्रिक परत पाठवून नवीन मागवून घेतेय. मला चार दिवसांचा वेळ द्याल का? मी चार दिवसातही ऑर्डर पूर्ण करते”  

रेवतीने भीतभीत आपला मुद्दा मांडला. रेवतीचं बोलणं संपलं आणि ओंकार एकदम चिडून बोलला,

“मिस. रेवती मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. मला ऑर्डर वेळेत पूर्ण करून हवी आहे. तुमच्या आश्वासनावर मी पुढे माझ्या क्लायंटला शब्द दिलाय. आता मी त्यांना काय सांगू? तुम्हाला जमणार नव्हतं तर आधीच सांगायचं न! मी दुसऱ्याला ऑर्डर दिली असती ना!“

ओंकार संतापाने बडबडत होता. त्याचा तो रुद्रावतार पाहून रेवती खूप घाबरून गेली. त्याने कृतिकाला फोन केला,

“कृतिका, ती ‘सोनाली किड्स वेअर’ची ऑर्डर फाईल घेऊन ये आत. लवकर ये” 

ओंकारचा चिडलेला स्वर ऐकून कृतिका घाबरून लगेच फाईल घेऊन आत आली. तिच्या हातातून फाईल खसकन ओढून घेतली. आणि तो फाईलमध्ये  पाहू लागला. एकदम त्याचा चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. स्वतःच्या कपाळावर हात मारून घेत त्याने जीभ चावली आणि म्हणाला, 

“सॉरी रेवती मॅडम, माझ्याकडूनच तारखेचा घोळ झाला. ३० डिसेंबर च्या ऐवजी मी तुम्हाला ३० नोव्हेंबर सांगितली. इक्स्ट्रीमली सॉरी..! ” 

आणि तो मिश्कीलपणे हसू लागला. 

आता मात्र रेवतीचा पारा गगनाला भिडला. जागेवरून खाडकन उठून उभी राहिली. रागाने चवताळून म्हणाली,

“नॉट फेअर सर, धिस ईज नॉट अ प्रोफेशनल वे.. तुमच्या या घोळामूळे तुम्हाला कल्पना नाहीये मला किती त्रास झालाय. माझ्या कामगारांना दिवसरात्र काम करावं लागलं. जास्तीतजास्त महिला कामगार काम करतात माझ्या कंपनीत. किती त्रास झाला असेल त्यांना! घर आणि कंपनीचं काम दोन्ही सांभाळताना! आय एम व्हेरी सॉरी सर!.अशा अनप्रोफेशनल व्यक्तीबरोबर मी काम करू शकणार नाही. एवढी ऑर्डर मी पूर्ण करते त्या नंतर आपला काहीही संबंध राहणार नाही. ओके गुड बाय..हॅव अ नाईस डे..”

रेवती रागाने आपली पर्स उचलून निघू लागली. इतक्यात शिपाई कॉफी घेऊन आत आला. 

ओंकार उठून उभा राहिला. रेवतीला शांत करण्याच्या स्वरात एकदम नरमाईने बोलू लागला,

“मिस. रेवती खरंच मनापासून सॉरी. माझ्या चुकीमुळे तुम्हाला जो मनस्ताप झाला मी समजू शकतो. त्याची भरपाई मी करू शकतो आपण पुन्हा रेट रिवाइस करू. मी रेट वाढवून दयायला तयार आहे. सो प्लिज कुल डाऊन.. प्लिज कॉफी घ्या”

“नकोय मला कॉफी.. आणि मिस्टर, समोरच्याला काही ऑफर करताना त्याची अनुमती घ्यायची असते. स्वतःच्याच मर्जीप्रमाणे ऑर्डर करायची नसते.इतकंही समजत नाही का तुम्हाला. बी प्रोफेशनल.. बाय मी निघते.. बरीच कामे आहेत मला”

“हो..हो.. पुढच्या वेळीस नक्कीच लक्षात ठेवेन. तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच ऑर्डर करणार नाही. पण आता तुम्ही शांत व्हा” 

ओंकार तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

पण रेवती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.  रेवती प्रचंड संतापली होती. केबिनचा दरवाजा धाडकन आपटला आणि ती केबिनच्या बाहेर आली. तिच्या मागोमाग ओंकारही आला. रेवतीला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण रेवती खूप चिडली होती काहीही न ऐकता ती कम्पनीच्या बाहेर पडली. 

इतक्यात तिला तिच्या मागे कृतिका येताना दिसली. 

पुढे काय होतं? रेवती आणि ओंकारचा वाद मिटेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©निशा थोरे

0

🎭 Series Post

View all