मोकळीक भाग … ३
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
“अमोल कुठे आहे? एकटीच आलीस? जाताना दोघे सोबत गेला होतात?” आरतीला एकटंच आलेलं पाहून उषाताईंनी दारातच टोकले.
“मित्रांना भेटायला गेला आहे. सांगून ठेवतो म्हणाला जागेचं. ओळखीत जागा मिळाली तर ब्रोकरेज वाचेल.” जागेसाठी वणवण करून वैतागलेली आरती विचारल्या तेव्हढ्याच प्रश्नाचं उत्तर देत सरळ आत गेली.
आरतीच चिडणं रास्तच होतं, जागा शोधायची, पैश्याची, गरजेच्या सामानाची जुळवाजुळव करायची काही खायचं काम नव्हतं या सगळ्याचं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. जास्त काही न विचारता उषाताईंनी चहा ठेवला. आरती फ्रेश होऊन तिच्या खोलीतून बाहेर यायची वाट बघू लागल्या.
बराच वेळ झाला तरी आरती काही बाहेर आली नाही अखेर उषाताईंच चहा, बिस्किटे घेऊन तिच्या खोलीत गेल्या. सासूबाईंना चहा घेऊन आलेलं पाहून गोंधळलेली आरती सावरून बसली.
“मी येणारच होते बाहेर” हातातला मोबाईल बाजूला ठेवत आरती म्हंटली.
‘कधी वेगळा रहा म्हणतात तर कधी थकून भागून घरी आलेल्या सुनेच्या हातात चहाचा कप देतात काय चाललं आहे ह्यांच्या मनात तेच कळत नाही’ आरती विचारत पडली होती.
उषाताईंच्या मनातही बरीच खळबळ मजली होती, बोलायचं तर बरंच काही होतं पण कुठून आणि कशी सुरवात करावी हे मात्र कळत नव्हतं.
“काय झालं आई, बरं वाटत नाही का? काही बोलायचं आहे का?“ उषाताईंची घालमेल आरतीनं बरोबर ओळखली.
आधीच उशीर झालायं अजून गप्प बसले तर नात्यातले अंतर वाढतच जाईल उषाताईंनी वेळ न घालवता बोलायला आपली कहाणी आपल्या सुनेला सांगायला सुरुवात केली.
“लग्न करून, मोठी सून म्हणून या घरात आले आणि लागलीच सगळी जबाबदारी खांद्यावर पडली. सासूबाईंनी कामातून अंग काढून घेतले असले तरी त्याची करडी नजर सतत सगळीकडे भिरभिरायची. हिरवी मिरची की लाल तिखट, ओलं खोबर की सुकं, छोट्यात छोटी गोष्ट त्यांना विचारून करावी लागायची. मी केलेली कुठलीच गोष्ट पटायची नाही. दोन लहान दिर शिकत होते, बाळंतपणासाठी नणंद आलेली होती. त्यावेळी आतासारखी मोठी जागा नव्हती पुढे पडवी असलेल्या दोन खोल्या होत्या. छोट्या जागेत माझी फार कुचंबणा व्हायची. ना कुठे जाता यायचं ना कपभर चहाला कोणाला बोलावता यायचं. साधं हळदीकुंकू करायचं तरी सासूबाई म्हणायचा शास्त्राच्या पाच बायका बोलवून उरकून टाक. जास्त फाफटपसारा नको. मनासारखं जगता आलं नाही, वागता आलं नाही, हौसमौज झाली नाही. ह्यांना कळत नव्हतं अशातला भाग नव्हता, पण सासूबाईंपुढे त्यांचही काही चालायचं नाही. माझी चिडचिड व्हायची, हे कामावरून आल्यावर वाद व्हायचे. काहीच निष्कर्ष निघायचा नाही गैरसमज मात्र व्हायचा. आई, भावांची जबाबदारी हे झटकू शकत नव्हते, हळूहळू मी ही जे वाट्याला आले आहे ते स्वीकारले. काही वर्षाने पाठोपाठ दोन्ही दीरांची लग्न झाली. जागेची अडचण लक्षात घेत त्यांनी लगेचच वेगळी चूल मांडली. सासूबाईंनी धाकट्या दोघी सुनांना कधीच कसली आडकाठी केली नाही. केली असती तरी त्या दोघींनी ऐकले नसते. धाकट्या दोघींना नोकरी करू दिली, ड्रेस घालू दिले, मला मात्र कायम बंधनात ठेवले. जो दबून राहतो त्याला अजूनच दाबलं जातं तेच माझ्या बाबतीत झालं. शिक्षण कमी, माहेरचा आधार नव्हता, परिस्थितीमुळे सोशिकपण आलं होतं त्याचच फायदा सगळ्यांनी घेतला. सासूबाई कधीच धाकट्या मुलांकडे रहायला गेल्या नाहीत, कायम इथेच राहिल्या. क्वचित कधी गेल्या तरी सकाळी जाऊन संध्याकाळी परत. त्या सगळ्यांना सणावारी इकडे बोलवायच्या, मला कामाला जुंपायच्या. मला माझा असा संसार कधी करताच आला नाही कायम त्यांचाच वरचष्मा असायचा.” उषाताईंना एकदम भरून आले. डोळ्याच्या कडा ओलावल्या.
सासूबाईंनी खूप सोसलं त्यांची व्यथा ऐकून आरतीलाही वाईट वाटतं होतं पण या सगळ्याचा आणि आपल्या वेगळं राहण्याचा काय संबंध हे मात्र कळतं नव्हतं कारण उषाताईंच्या सासूबाई आता हयात नव्हत्या, घरचं वातावरणही पूर्वी सारखं राहिलं नव्हतं.
क्रमशः
©®मृणाल महेश शिंपी.
टीम - सुप्रिया
टीम - सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा