मोकळीक भाग … १
ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2025
ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2025
“आता वेळ मिळाला वाटतं आईला फोन करायला. सासरी काय गेलीस तिकडचीच झालीस. आईला विसरलीस. कधीची बघते मी आता फोन करशील, नंतर करशील” मीनाताई लटक्या रागात आपल्या लेकीशी आरतीशी बोलत होत्या.
“सॉरी आई, जरा कामात होते.”
“अगं सॉरी काय त्यात. मी गमतीने म्हणाले. फार गर्दी होती का दवाखान्यात?” आरती हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब करत असल्याने आज पेशंट जास्त असतील याचा अंदाज बांधत मीनाताईंनी विचारले.
“गर्दी कसली. सुट्टीवर आहे मी.”
“काय झालं? तब्येत बरी आहे ना? घरी सगळं ठीक आहे ना?” कधी सुट्टी न घेणाऱ्या आपल्या मुलीने सुट्टी घेतली म्हंटल्यावर मीनाताईंनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
“भाड्याने जागा शोधतोय. सकाळ पासून एजंट बरोबर फिरतोय.”
“कोणासाठी?”
“आमच्यासाठी. मी आणि अमोल वेगळे राहतोय.”
“काय झालं? भांडलीस की काय सासूशी. सासूची अडचण व्हायला लागली का तुला? लगेचच आरे ला कारे करू नये. जरा नमतं घ्यावं.” मीनाताईंच्या स्वरातून काळजी डोकावत होती.
“मला नाही, माझ्या सासूबाईंनांच अडचण व्हायला लागली आले. त्यांनीच आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवलाय. वेगळं व्हा म्हणून आदेश दिलाय.” सकाळ पासून जागा शोधून वैतागलेली आरती संतापून बोलत होती.
“कारण काय? तुझ्या सासऱ्यांच काय म्हणणं आहे?”
“ठोस असं काहीच कारण नाही. आतापर्यंत सगळं गोडीगुलाबीत सुरू आहे. ना भांडण ना तंटा. माझ्या सासूच्या मनात काय चालू आहे तेच कळत नाही. सासऱ्यांच म्हणशील तर त्यांना फारसं आवडलेलं दिसत नाही, पण विरोधही केला नाही. तटस्थ भूमिका घेतली आहे त्यांनी. ”
आरती आणि अमोलचे विवाह मंडळातून स्थळ येऊन, पत्रिका बघून, रीतसर बघण्याचा कार्यक्रम होऊन लग्न झालेलं होतं. सासूच्या पसंतीनेच सूनबाईंचा गृहप्रवेश झाला होता. इंटरकास्ट, लवमॅरेज, घरच्यांच्या विरोधात जाऊन असा काही भाग नव्हता. अमोल एकुलता एक मुलगा होता. त्याच्या बहिणीचे अमृताचे दोन वर्षापूर्वी लग्न होऊन ती दुबईला सेटल झाली होती त्यामुळे आरतीला ना नंदेचा त्रास होता ना जावेचा जाच होता. सून, मुलगा, सासूसासरे चौकोनी छोटेखानी कुटुंब असल्यामुळे डेली सोपमध्ये असतात तश्या कटकारस्थानांना कुठे वावच नव्हता. बहुतांश घरात सासू सुनेचे भांडण कामावरून होते पण वॉशिंग मशीन असल्याने, इतर घरकामाला सरूमावशी येत असल्याने, स्वयंपाक सासूसुना मिळून समजून उमजून करत असल्याने भांड्याला भांड लागण्याचा प्रश्नच नव्हता. किराणा होम डिलिव्हरी होत होता तर भाजीपाला, किरकोळ वस्तू “मी आणतो, तेवढेच पाय मोकळे होतात” म्हणत सासरेबुवा हौशीने आणत होते. रहातं घर चार खोल्यांचं असल्यामुळे जागेचीही अडचण नव्हती. ना कधी उषाताईंचा आवाज वाढला होता ना कधी आरतीने उलट उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. साधं सोपं सरळ मार्गाने जाणारं कुटुंब आहे लांबून बघताना तरी वाटतं होतं. लग्न ठरल्या दिवसापासून अगदी काल परवापर्यंत आरतीच कौतुक करताना न थकणाऱ्या तिच्या सासूबाईंना उषाताईंना अचानक काय झालंय हे कोणालाच कळायला काही मार्ग नव्हता.
अमोलने लग्नाआधी सर्वोदय नगर येथे वन बी एच के बुक केला होता, पण त्याचा ताबा अजून मिळाला नव्हता. लग्न झाल्यावर अमोल आणि आरतीने तिकडे रहायला जावं अशी उषाताईंची इच्छा होती. बैठकीत त्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. त्यासाठी त्या लग्न लांबणीवर टाकायलाही तयार होत्या.
“बिल्डर सांगतात त्या तारखेला कुठे पझेशन देतात. आज देतो उद्या देतो म्हणता म्हणता चार सहा महिने निघून जातात त्यासाठी लग्न कशाला पुढे ढकलायचं. नवीन घर झाले की होतील तिकडे शिफ्ट तोपर्यंत इथे राहतील” अमोलचे काका, मामा घरातल्या सगळ्यांचच म्हणणं पडलं, आरतीच्या घरचेसुद्धा जास्त थांबायला तयार नसल्याने नाईलाजाने का होईना उषाताईंना नमतं घ्यावं लागलं. काही काळाकरता का होईना वेगळं रहायचंय हे वादळ शमलं. लग्न थाटामाटात, निर्वघ्नपणे पार पडलं.
“मी बोलू का तुझ्या सासूबाईंनी?”
“नको आई. त्या कशा रिॲक्ट होतील काही सांगता येत नाही. कदाचित अमोललासुद्धा आवडणार नाही.”
“लेकीच्या संसारात उगीच आपली लुडबूड कशाला?” मीनाताईंना आरतीचं म्हणणं पटलं. तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगून त्यांनी फोन ठेवला.
क्रमशः
©®मृणाल महेश शिंपी.
टीम - सुप्रिया
टीम - सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा