मोकळीक भाग … २
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
“जाऊन आलास का नवीन घरी? कुठपर्यंत आलंय काम? ह्या लोकांच्या मागे लागावं लागतं, त्याशिवाय कामं होतं नाहीत. कधी मिळणार ताबा?” लग्नाला चार महिने झाले तरी जागा ताब्यात मिळाली नव्हती. तिकडे राहायला जायची काहीच चिन्ह दिसत नव्हती म्हणून उषाताई अधून मधून अमोलकडे विचारपूस करायच्या.
“लवकरात लवकर शिफ्ट व्हा” आडून आडून आरतीला सुचवायच्या.
“अमोल कधीपर्यंत मिळेल रे आपल्याला पझेशन?” कधी रहायला जायचं आपण?” एक दिवस न राहून आरतीने विचारले.
“एवढी घाई काय आहे?”
“घाई मला नाही, तुझ्या आईला झाली आहे. सारखं विचारत असतात.”
“सर्वोदय नगर किती लांब आहे, माहीत आहे ना! मी तो ब्लॉक राहण्याच्या दृष्टीने घेतलाच नव्हता. किती लांब पडेल आपल्याला. स्टेशनला यायचं तर बस, रिक्षाशिवाय पर्याय नाही. बस गावभर फिरून येणार. शेअर रिक्षा जरी केली तर एकवेळेचे तीस रुपये लागणार. ट्रॅफिकमध्ये अडकणार ते वेगळं. नुसता वेळ आणि पैश्याचा अपव्यय.” सध्याच राहतं घर स्टेशनच्या अगदी जवळ होतं. पाच सात मिनिटात चालत जाऊन ट्रेन पकडता येण्याजोग्य होतं. त्यामुळे लांब रहायला जायचं ही कल्पना अमोलला पचनी पडत नव्हती. एवढ्या लांब रहायला जायचं त्याला मूर्खपणाच वाटत होतं.
आरती हॉस्पिटलमध्ये जॉबला असल्याकारणाने तिला कधी नऊ ते साडेपाच ड्यूटी असायची तर कधी बारा ते साडेआठ जावं लागायचं. निघे निघे पर्यंत नऊ वाजायचे, ट्रेन मिळून घरी येईपर्यंत दहा तर कधी साडेदहा वाजायचे. स्टेशन जवळच घर तिच्या नोकरीच्या दृष्टीने सोयीचं होतं, सतत रहदारी असायची वाहता रस्ता होता. सर्वोदय नगर शहराच्या बाहेर आड वाटेला असल्याने तसा शुकशुकाट असायचा. रात्रीच्या वेळी पटकन रिक्षा मिळायच्या नाहीत. एवढ्या लांब रहायला जायचं तिलाही टेन्शन आलं होतं.
“रहायला जायचं नव्हतं मग घेतलंस तरी कशाला?” आरती अमोलावर चिडली होती.
“इन्व्हेस्टमेंट म्हणून. तो एरिया हळूहळू डेव्हलप होतोय, भाव वाढले की विकून टाकायचा विचार आहे.”
“जवळपास का नाही घेतलंस?”
“रेट काय चालू आहे माहिती आहे ना! भाव गगनाला भिडलेत. माझ्या बाबांनी तीस चाळीस वर्षापूर्वी ही जागा घेतली म्हणून त्यांना जमलं. प्राईम लोकेशनला घर घेणे सध्या तरी माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.”
“पटतंय रे तुझं म्हणणं, पण आईंला कोण समजणार. रहायला कधी जाताय? सारखी भूणभूण सुरू असते त्यांची.”
“मी बोलतो आईशी. तू टेन्शन घेऊ नकोस.” अमोलने अश्वस्थ केल्याने आरती निश्चिंत झाली.
दोन तीन दिवसांनी नवीन जागेत रहायला जाणे कसं गैरसोयीचे आहे, दोन वर्षाचा मेंटेनन्स अँडव्हान्समध्ये दिल्याशिवाय पझेशन मिळणार नाही. लग्नाच्या खर्चामुळे बजेट गडबडले त्यामुळे मधले काही पेमेंटचे हप्ते चुकले. सगळे पैसे एकहाती दिले तरच बिल्डर चावी देणार आहे. अमोलने आईला सगळे समजावून सांगितले.
अमोल स्पष्ट बोलल्यामुळे आरतीला हायसे वाटले. तंग झालेले वातावरण काहीसे निवळले.
“ठीक आहे. भाड्याने जागा घ्या आणि वेगळे रहा.” अमोल, आरतीला निक्षून सांगत उषाताईंनी थोड्या वेळातच शांतता भंग केली.
‘स्वतःच्या हक्काच्या घरात एकवेळ समजू शकते पण भाड्याने जागा घेऊन वेगळे रहा’ हा काय प्रकार आहे, एकुलत्या एक लेकाला, सुनेला घराबाहेर काढण्यामागे काय स्वार्थ आहे आरतीला कळतं नव्हतं. ती बुचकळ्यात पडली होती.
अमोलने आईच्या हट्टापुढे हात टेकले. वेगळे होण्याशिवाय पर्याय नाही हे त्याला कळून चुकले.
“हा अट्टाहास कशासाठी?” अखेरीस अशोकरावांनी कडक शब्दात विचारले.
“मला झालेला त्रास माझ्या सुनेला होऊ नये” अशोकरावांकडे रागाने बघत “तुम्ही यात पडू नका” म्हणत उषाताई आपल्या खोलीत गेल्या.
क्रमशः
©® मृणाल महेश शिंपी.
टीम - सुप्रिया
टीम - सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा