Login

मोक्ष -भाग 2

भयकथा
भेसूर दिसणाऱ्या आत्याबाई पुरुषोत्तमरावांकडे पाहून कितीतरी मोठ्याने हसत होत्या. त्यांचं रूप अधिकच लोभसवाणं दिसत होतं.
"पुरुषोत्तमराव, तुम्हाला शिक्षा होणार." असे म्हणत त्या एकदम नाहीशा झाल्या.

अचानक गाडी थांबली तशी जानकी दचकून जागी झाली. आपण पाहिलं ते स्वप्न होतं, भास की सत्य? या विचाराने तिचा थरकाप उडाला.
-----------------------------------------

आत्याबाईंचं निष्प्राण कलेवर पाहून जानकीच्या पोटात खड्डा पडला. लक्ष्मीबाईंनी धावत जाऊन आपल्या नणंदेच्या पायाला घट्ट मिठी मारली.
"वन्स, काय केलंत हे?" इतका त्रास होत होता तर मन मोकळं करायचं. काहीतरी मार्ग निघाला असता. इतकं मोठं पाऊल उचलायची काय गरज होती?" असं म्हणत त्या रडू लागल्या.
त्यांचं बोलणं ऐकून शेजार - पाजारच्या बायका यमुनेच्या सासुबाई, सावित्रीबाईंकडे पाहत आपापसांत कुजबूज करू लागल्या.

तशा सावित्रीबाई मोठमोठ्याने रडू लागल्या. आपल्याला किती दुःख झालंय हे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यांकडे रागाचा एक कटाक्ष टाकून लक्ष्मीबाई बाजूला जाऊन बसल्या.

गर्दीत कोणीतरी म्हणालं, "तयारी झालीय. खूप उशीर झाला. आता न्यायला हवं."

इतका वेळ कुठेच न दिसणारे पुरुषोत्तमराव एकदम पुढे आले. त्यांना पाहून नीळकंठ दात - ओठ खात केशवने हात धरलेल्या अवस्थेत तसाच उभा होता.

यमुनेला नेताच सावित्रीबाईंचा पवित्रा अचानक बदलला. शेजारी -पाजारी निघून गेले होते. आता केवळ घरच्याच स्त्रिया शिल्लक होत्या. काही झालंच नाही अशा अविर्भावात आत जाऊन स्नान आटोपून त्या काही वेळातच बाहेर आल्या.

"रात्री -अपरात्री आपल्या सुनेस घरातून बाहेर काढताना काहीच कसं वाटलं नाही? इतक्या उलट्या काळजाच्या असाल असं वाटलं नव्हतं." लक्ष्मीबाईंचा स्वर शांत असला तरी त्यांचा आवाज चढला होता.

"कायमची गेली ती. आता आपला संबंध संपला म्हणायचा." सावित्रीबाई पदर खांद्यावर ओढत तितक्याच शांतपणे म्हणाल्या. "बाकी दिवस कार्याला यावं लागेल तुम्हाला. रीत सोडून चालायचे नाही ना. मग माघारी लोकं बोलायला कमी करायची नाहीत."

हे ऐकून लक्ष्मीबाई संतापाने उठत म्हणाल्या, "कसली रीत पाळता बाई? माझ्या नणंदेच्या मरणाला तुम्ही जबाबदार आहात. याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल." त्या जानकीला घेऊन वाड्याच्या मुख्य दरवाज्यापाशी आल्या.
"पुरुष मंडळी मागाहून येतील. आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही." त्यांनी सावित्रीबाईंकडे एक नजर टाकली.
"या जन्माचे भोग या जन्मातच भोगावे लागतात." लक्ष्मीबाई ओरडून म्हणाल्या. त्यांचा गोरापान चेहरा रागाने लालबुंद झाला होता. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. तिरीमिरीत त्या गाडीत जाऊन बसल्या आणि मागोमाग जानकीही गाडीत चढली.
--------------------------------------

नारायणराव, केशव आणि नीळकंठ उशीरा घरी आले. लक्ष्मीबाई सोप्यात सुन्न बसून होत्या. तर गडी माणसे तिथेच त्यांच्या बाजूला बसली होती.
नारायणरावांना पाहून अखेर लक्ष्मीबाईंचा बांध फुटला. तोंडावर पदर घेऊन त्या बराच वेळ रडत राहिल्या.
नारायणराव आपल्या पत्नीच्या शेजारी बसले. पण त्यांना धीर देण्याची त्यांची मनस्थिती नव्हती.
"आऊच्या बाबतीत जे झालं तेच माझ्या यमुनेच्या बाबतीत घडलं. "आऊ गेली अन् धाकटी बहीण असली तरी पोटच्या मुलीप्रमाणे मी यमुनेचा सांभाळ केला. पण मी कमी पडलो..कमी पडलो रे." केशव आणि नीळकंठ आपल्या वडिलांना सावरायला पुढे धावले.

आजवर वडिलांच्या डोळ्यांत कधीही अश्रू न पाहणाऱ्या नीळकंठाने मनोमन शपथ घेतली. 'आत्याबाईंच्या मारेकऱ्यांचा छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.'
----------------------------------------

"राव, आपण लग्न कधी करायचं?" अमोली आपल्या केसांतल्या गजऱ्याशी चाळा करत म्हणाली.

"काय गडबड ही? अमोली, माझ्या बायकोला जाऊन अजून दहा दिवसही झाले नाहीत."
राव तिला जवळ ओढत म्हणाले.

"गडबड मला नाही, पण तुम्हालाच असल्यासारखी दिसते. एक बोलू का? यमुनाबाई मनाने खूप चांगल्या होत्या. गावातल्या सर्व बायका त्यांच्याबद्दल चांगलंच बोलतात. त्या गेल्या हे फार वाईट झालं." अमोलीच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं.

"तुम्ही का रडता आहात? यमुना आमची पत्नी होत्या. खरंतर त्या गेल्याचं दुःख आम्हाला व्हायला हवं. पण इथं सगळं भलतचं घडतंय." राव हातात पेला घेत म्हणाले.

"नको..आज नका घेऊ. मग तुमचा तुमच्यावर ताबा राहत नाही. काही उलट -सुलट घडायला नको राव. मन आणि बुद्धी काही दिवस ताब्यात ठेवा म्हणजे झालं."

"वा! अगदी यमुनेसारखं बोलायला लागलीस." पुरुषोत्तमरावांनी अमोलीच्या केसांतला गजरा हलकेच सोडवला.

"राव..नको. एकदा का दिवस -कार्य झालं की मानाने मला घरी घेऊन चला. पण आत्ता नको. माझी शपथ आहे तुम्हाला." अमोली बाजूला होत म्हणाली.

"आम्ही शपथ वगैरे तसलं काही मानत नाही. हे ठाऊक नाही की काय तुम्हाला?" राव तिचा हात हातात घेत म्हणाले.

"तुम्ही आज काहीच ऐकायचं नाही असंच ठरवलं आहे तर."

"तुमच्यासारखी नावाप्रमाणे 'अमूल्य' देणगी नजरेसमोर असताना आम्ही ब्रह्मदेवाने सांगितले तरी ऐकणार नाही." राव पडदे ओढून घेत म्हणाले.
--------------------------------------------

"कुठे होतात?" सावित्रीबाई रात्री उशीरा आलेल्या पुरुषोत्तमरावांना विचारत होत्या.
ते काहीच बोलत नाहीत हे पाहून त्या आपल्या लेकाच्या जवळ आल्या.
"कुठे होतात ते कळलं. अजून बायकोला जाऊन दहा दिवस सुद्धा झाले नाहीत. तोवर हे असले प्रकार! राव, तुमची धर्मपत्नी गेली याचं तरी भान बाळगा. लोक काय म्हणतील?"

"लोकांना बोलायला कुठलेही विषय चालतात आणि आमचा जीव आहे म्हंटलं त्यांच्यावर."

"राव, कोणासमोर बोलता आहात याचं काही भान आहे का? आई आहोत आम्ही तुमची. लग्न झालं तरी तुमचे हे धंदे सुरू होते. किती समजावलं. पण त्यात काही सुधारणा नाही. यमुना गेली त्याला तुम्ही कारणीभूत आहात." सावित्रीबाई पहिल्यांदाच आपल्या सुनेची बाजू घेऊन बोलत होत्या.

"काय बोलता हे? कोणी ऐकलं तर खरं वाटेल. यमुनेला तुम्ही किती त्रास दिलात हे अख्ख्या गावाला माहिती आहे. बारा वर्षे छळून शेवटी जीव घेतलात तिचा. आधीच पोटी मूल नाही म्हणून ती उदास असायची. त्यातच तुमची ही अशी वागणूक! पण बिचारी सुटली म्हणायची. सुनेचा इतका कळवळा होता तर जपायची होती तिला. तुम्ही तिला जरा माया दिली असती तर आज ती जिवंत असती."

"थाड..." सावित्रीबाईंची बोटं रावांच्या गालावर उमटली.

"आम्ही चुकलो हे मान्य आहे. पण एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीवर अन्याय केलात तुम्ही. सदाचारी स्त्रीला जीवे मारण्याचा घोर अपराध.." राव तडक आपल्या खोलीत निघून गेले.

हे सारं मुख्य दरवाजातून ऐकणारा नाथा थरथरत उभा होता. 'म्हणजे, समदं गावं जे बोलत होतं, ते खरं आहे तर. रावांनी आणि आईसाहेबांनी वहिनी साहेबांना फसवलं म्हणायचं.' नाथा आल्या पावली निघून गेला.

'तुम्ही आमच्यापेक्षा वरचढ निघालात राव. पत्नी असता तिच्याशी व्यभिचार करून दुसऱ्या स्त्रीशी संग!! शी..बोलायला देखील लाज वाटते. आमचा लेक म्हणवून घेण्याची पात्रता नाही तुमची. आम्ही तिला छळलं ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे. पण सासूचा मान कधीही मोठाच असतो हे तुम्ही सगळे विसरलात वाटतं.'
स्वतःशी बोलत खांद्यावरला पदर नीट करत सावित्रीबाई स्वयंपाक घरात आल्या. गेले नऊ दिवस घरात अन्न शिजलं नव्हतं. तिथलं उदासवाणं वातावरण पाहून त्या पंतांच्या खोलीत आल्या.

"आलात? या. दोन घटका आमच्यासोबत इथे बसलात तर मनाला फार बरं वाटेल. सुनबाई गेल्याचं खरंच वाटत नाही. सतत त्या आमच्या सेवेस हजर असायच्या. हाताला धरून जेवायला घेऊन यायच्या. आमची ही अवस्था अशी. धड उभं राहता येत नाही की भराभर चालायला येत नाही. आम्हाला पोटच्या लेकीप्रमाणे जीव लावला होता त्यांनी. एक सांगू?" पंत डोळे बारीक करत म्हणाले.

"हम्म. आम्ही नाही म्हणालो तर सांगणार नाही आहात का?" सावित्रीबाई पंतांच्या चेहऱ्याकडे निरखत म्हणाल्या.

"ठीक. या घरात तुमचा शब्द प्रमाण मानला जातो. मग आम्ही असलो काय आणि नसलो काय!
पण ऐका, असं वाटतं जणू सुनबाई अजून या घरातच आहेत. कधी कधी त्यांचा वावर इथेच आसपास असल्याचा भास होतो." पंत दबक्या आवाजात म्हणाले.

"काहीतरीच तुमचं. नाही त्या कल्पनांना मनात थारा देऊ नका. त्या गेल्यात हे सत्य स्वीकारा आता."

"मी म्हणतो ते खरं आहे सावित्री. अहो, अजून त्यांचं दिवस -कार्य झालं नाही. ते कसं रितीनुसार व्हायला हवं. आत्म्याला मुक्ती मिळायचा उद्याचा दहावा दिवस." पंत बोलता बोलता कशाचा तरी वेध घेत होते.

इतक्यात राव जिन्यावरून धावत - पळत खाली आले.
"आई, पंत, कोणी आहे का तिकडे?"
त्यांचा आवाज ऐकून सावित्रीबाई लगबगीने बाहेर आल्या.

"इतकं झालं तरी काय?"

"ते वरच्या खोलीत.." रावांना घाम फुटला होता.

"पुरुषोत्तमा, नक्की झाले तरी काय?" पंत काठीच्या आधाराने सावकाश बाहेर येत म्हणाले.

"पंत, अहो वर ती आहे.."

"कोण? शुद्धीत आहात ना तुम्ही? चला, काय झालं ते पाहू." सावित्रीबाई जिना चढून वर आल्या. राव आणि दोन गडी माणसं त्यांच्या मागोमाग आली. राव दबकून चालत होते. भीतीने त्यांची पार गाळण उडाली होती.