Login

मोक्ष - भाग 3

भयकथा

"यमुना! ती होती इथं."

"उगीच काहीतरी बोलू नका. त्या कशा येतील इथे? त्या गेल्या राव, अगदी कायमच्या." सावित्रीबाई किंचित हसत म्हणाल्या.

"नाही. ती आहे इथेच. नवं लुगडं नेसून या, या पलंगाजवळ उभी होती ती. माझ्याकडे पाहून हसत होती. तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. मात्र कपाळावर कुंकू लावलं नव्हतं की अंगावर दागदागिने काही, काही नव्हतं." राव थरथरत होते.

"अहो, आभास होता तो. गेलेली माणसं कधी परत येत नसतात. एक पत्नी म्हणून तुमच्या मनात त्यांच्यासाठी खचितच जागा होती. ती असणं साहजिक आहे राव त्यामुळे असा भास तुम्हाला झाला असावा. चिंता करू नका. मनातल्या विचारांची जळमटं दूर फेकून द्या आणि शांतचित्ताने झोपा." सावित्रीबाई खाली आल्या. पंत त्यांचीच वाट पाहत होते.

"काय झालं?"

"काही नाही. सुनबाईंचा भास झाला त्यांना." सावित्रीबाई पुन्हा हसत म्हणाल्या. "मगाशी तुम्हीही हेच म्हणाला होतात ना? अहो, राव शुद्धीत असतातच कुठे? हे सारे मनाचे खेळ आहेत. गेलेली व्यक्ती परत कधी येत नसते." सावित्रीबाई खोलीत येऊन पलंगावर निजल्या.
पंत मात्र बराच वेळ कसल्याशा विचारात बाहेरच सोप्यात बसून होते.

इकडे पुरुषोत्तमरावांना झोप म्हणून येत नव्हती. त्यांच्या नजरेसमोर यमुनेचा मगाचसा हसरा चेहरा तरळत होता. मधेच त्यांना अमोलीची आठवण येत होती. उजव्या कुशीवर वळताच पुन्हा एकदा त्यांना यमुनेचा भास झाला. आता पुरुषोत्तम रावांना झोप येणं शक्यच नव्हतं. मनातल्या मनात राम नामाचा जप करत, भीतीने कितीतरी वेळ ते पलंगावर तसेच बसून राहिले. उद्यापासून पेल्याला हात देखील लावायचा नाही. असं ठरवल्यानंतर मग कुठे त्यांच्या मनाला थोडी शांतता मिळाली.
------------------------------------------

नारायणराव, केशव, नीळकंठ, पुरुषोत्तमराव, पंत अशी सर्व मंडळी घाटावर जमली होती. बराच वेळ वाट पाहूनही पिंडाला कावळा शिवत नव्हता.
अखेर गुरुजी म्हणाले, "दर्भाचा कावळा करू. किती वेळ वाट पाहणार?"

"आत्याबाईंची कुठलीशी इच्छा मागे राहिली असणार. त्याशिवाय असे का व्हावे?" केशव रडक्या स्वरात म्हणाला.

"खरं आहे. त्या पुरुषोत्तमरावाला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही." नीळकंठ रागाने थरथरत म्हणाला.

"ही ती वेळ नव्हे नीळकंठा." केशव त्याला समजावत म्हणाला.
अचानक काहीतरी सुचल्याने नीळकंठ पिंडाला नमस्कार करण्यासाठी पुन्हा पुढे आला.

"तुमच्या नमस्काराने काय साध्य होणार आहे?" पुरूषोत्तमराव पुढे होत म्हणाले.

"ते बघालचं." नीळकंठ नमस्कारासाठी खाली वाकला.
'काकासाहेबांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.'
असं म्हणायला आणि कावळा शिवायला एकच गाठ पडली.

"राव पुढे सरकले. असं काय म्हणालात नीळकंठ? सर्वांनी नमस्कार करून देखील कावळा शिवत नव्हता आणि तुमच्या बोलण्याने असं काय घडलं?"

"ते तुम्हाला काय सांगायचं? काकासाहेब! झालं ते झालं. त्यासाठी आपली कर्म धड असावी लागतात."

"नीळकंठ, शांत रहा. ही बोलण्याची वेळ आणि ठिकाण नव्हे." नारायणराव.

"मग कधी बोलायचं? सगळं माहीत असूनही गप्प राहायचं? का? आमच्या आत्याबाईंचा हकनाक बळी गेला. का गेला, कोणामुळे गेला? हे शोधून काढायला नको?"

"ते तर शोधूच आपण. पण आत्ता जरा शांत रहा."
केशव त्याला समजावत म्हणाला.

नीळकंठाचे बोलणे ऐकून रावांना घाम फुटला.
"पुरुषोत्तमराव, सावरा स्वतःला. जे घडलं ते विसरता येणार नाही. पण का घडलं याचा शोध घ्यायला हवा ना." नारायणराव पुरुषोत्तमांच्या पाठीवर थोपटत म्हणाले.
-------------------------------------------

"बोल, तूच घेतलेस ना दागिने? त्या दिवशी यमुनेला तळ्यातून बाहेर काढताना तूच पुढे होतास म्हणूनच असे वाटते तुलाच त्या दागिन्यांबद्दल काही माहिती असावी. बोल नाथा, नाहीतर.."

"म्या न्हाई घेतले दागिने अन् कशापायी घेऊ ते? बाईसाहेब माझ्या थोरल्या भनीसारख्या होत्या. मग म्या असं का करेन?"

"सावित्री, नाथा खरं बोलतोय. पिढ्यान् पिढ्या ते आपल्याकडे गडी म्हणून राबत आहेत. इनाम - इतबारे चाकरी करत आहेत. तो असलं
काहीही करणार नाही." पंत सावित्रीबाईंना समजावत म्हणाले.

"तुम्हास काय कळतं? आज बाजारात त्या दागिन्यांची किंमत किती आहे, याची तरी कल्पना आहे का? मग याने दागिने घेतले नाहीत तर ते गेले कुठे?" सावित्रीबाईंना काहीच कळत नव्हतं.
"बरं, लक्ष्मीबाईंना याबद्दल विचारावे म्हंटल तर त्यांच्याकडील मंडळी इतक्यात इथे आली नव्हती आणि यमुनेस माहेरी जाऊन खूप दिवस उलटून गेलेले.
रावांनी त्या बाईस तर दिले नसतील ना? असं असू शकतं. पुरुषोत्तमरावांची मती कधी फिरेल, याचा काही नेम नाही."

इकडे लक्ष्मीबाई आणि जानकी त्या दागिन्यांच्या थैलीकडे टक लावून पाहत होत्या.
मोठं मंगळसूत्र, पाटल्या, तोडे, नथ, चिंचपेटी, साज, ठुशी, कंठी असे प्रकारचे अनेक दागिने त्यात होते.
"यातील बरेचसे दागिने आऊंचे होते. बाकी ह्यांनी वन्सच्या लग्नासाठी बनवून घेतले होते. जानकी, अजूनही माझा विश्वास बसत नाही गं. वन्स खरचं आल्या होत्या की केवळ दागिने इथे सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची त्यांची शेवटची इच्छा होती? सावित्रीबाईंना यातलं काही कळता कामा नये. एकतर वन्स इथे आल्या होत्या हे त्यांना पटायचे नाही आणि आपल्यावर चोरी केल्याचा आळ यायचा!" आपल्या सासुबाईंचं बोलणं ऐकून जानकीने मान डोलावली.

"अहो, त्या दागिन्यांच नेमकं काय करायचं?" नारायणरावांकडे पाहत लक्ष्मीबाई म्हणाल्या.

"यमुनेच्या सांगण्यानुसार याची वाचता कोठेही करू नका. सद्यस्थितीत हे इथेच राहू द्या. काळ, वेळ पाहून ठरवू, काय करायचं ते." नारायणरावांनी तूर्तास या विषयावर पडदा पाडला.

"मी लग्न करून आले त्यावेळेस आऊ नुकत्याच गेल्या होत्या. वन्स अगदी लहान होत्या. ह्यांचे सख्खे बंधू, गंगाधरबुवा ह्यांच्याहून साधारण दोन एक वर्षांनी मोठे असतील. त्यांचं लग्न काही झालं नव्हतं. कारण त्यांनी लग्न करणार नाही अशी कसलीशी शपथ घेतली होती म्हणे. मग वाड्याची सगळी जबाबदारी आमच्यावर येऊन पडली.

अचानक एक दिवस गंगाधरबुवा घरातून निघून गेले. ते कधीच परत आले नाहीत. कोणी म्हणत होतं त्यांनी घरोबा केला, तर कोणी म्हणत होतं ते कायमचे निघून गेले. बरीच शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा मागमूस कुठेही लागला नाही." लक्ष्मीबाई जानकीला माहिती पुरवत होत्या.

"कशाला त्या जुन्या गोष्टी उगाळता? आपल्या घराण्याला जणू असा शापच असावा. ध्यानीमनी नसताना आऊ गेली. मग बुवा आणि आता यमुना." नारायणरावांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.
-----------------------------------------

"नाथा, काही उणी -अधिक माहिती?" नीळकंठ नाथाच्या घरात आत येत म्हणाला.

"सरकार, यमुना वहिनींच्या दागिन्यांसाठी आई साहेबांनी आमच्यावर आळ घेतला. आम्ही गरीब असलो तरी असलं काही करणार न्हाई." नाथा आपल्या दोन्ही कानांवर हात ठेवत म्हणाला.

"ते आम्हाला ठाऊक आहे. आणखी काही नवीन वार्ता?"

बराच वेळ नाथा काहीच बोलला नाही. काय सांगू आणि कसं सांगू हेच त्याला कळत नव्हतं. "आईसाहेबांनी आपल्या सुनेस किती छळलं, हे समद्या गावाला माहिती हाय."

"पण याबाबत आत्याबाईंच्या तोंडून एक अक्षरही कधी निघालं नाही." नीळकंठ.

"सरकार, घरची लेक आपल्या सासरच्या अवस्थेचं वर्णन माहेरी कधीच करत न्हाई. पण अख्खं गाव म्हणतं, राव आणि ती बाई.. हे पटतं नव्हतं बघा. नाही म्हंटल तरी वहिनीसाहेब आणि रावांच्यात वाद व्हायचे. पण केवळ रावांमुळेच! वहिनीसाहेब या वादाच्या प्रसंगी नेहमी शांत असायच्या. त्या दिवशी नेमकं काय झालं हे ठाऊक न्हाई. पण वहिनीसाहेबांना बहुदा त्या बाईची कुणकुण लागली असावी." नाथा स्वतःशी बोलत होता की नीळकंठाशी हेच समजत नव्हतं.

"काय? कोण बाई? तिचा आणि रावांचा काय संबंध?" नीळकंठ जागेवरून उठून उभा राहिला.

"समदी म्हणत्यात, लग्न केलं न्हाई पर ती त्यांची दुसरी बायको हाय म्हणून."

"कोण? तिला काही नाव वगैरे असेल की नाही? आणि हे खरं सांगतोस ना? नाहीतर मीच खात्री करून घेतो. चल, ती कुठे राहते ते सांग." नाथाने अमोलीचा पत्ता सांगितला. तसेच तिच्या आणि रावांच्या बाबतीत आणखी बरीच माहिती दिली.

नाथाने सांगितलेल्या रस्त्यावरून जाताना काही ओळखीच्या खुणा नीळकंठाला दिसू लागल्या.
मोठं शिवार अन् त्यात एकुलतं एक घर. आजूबाजूला दाट वस्ती नव्हतीच मुळी. सूर्य मावळतीकडे झुकला होता. 'अंधार पडायच्या आत इथून निघून जायला हवं.' मनातल्या मनात बोलत नीळकंठाने त्या घराचा दरवाजा वाजवला.

"कोण?" काही क्षणानंतर आतून आवाज आला.

यावर काय उत्तरादाखल नीळकंठाने पुन्हा त्याने दार वाजवले.

"कोण आहे! काही नाव -गाव आहे की नाही?" अमोलीने दरवाजा उघडला.

समोर साक्षात मूर्तिमंत सौंदर्य पाहून नीळकंठ क्षणभर भान हरपून गेला. गोरी पान कांती, कमनीय बांधा, अंगावर हिरवी नाजूक- नक्षीदार सोनेरी काठाची साडी, केसांत मळलेल्या गजऱ्याचा सुवास दार उघडताच नीळकंठाच्या अवती -भोवती रुंजी घालू लागला.

"कोण तुम्ही?" रुक्ष आवाजाने तो एकदम दचकला.
"मी..ते तुम्हाला काय करायचं? आलेल्या पाहुण्यांना घरात घ्यायची पद्धत आहे की नाही?"

"ओळख पटल्याशिवाय आत या असं आम्ही कसं म्हणणार?" अमोली दार अडवून उभी राहत म्हणाली. "या वक्ताला काय काम काढलंत?"

"आम्ही नीळकंठ. यमुना आमच्या आत्याबाई लागत होत्या म्हणजे तुमचे राव नात्याने आमचे काकासाहेब लागतात." या उत्तराने निळकंठ येथे का आला असावा याची काहीशी कल्पना अमोलीला आली. त्याच्या थेट बोलण्याने तिच्या भुवया आश्चर्याने वर चढल्या.

"आत यावं."

अमोलीने घर अगदी सुबक ठेवलेलं होतं. "एकट्याच राहता की काय इथे? भीती वाटत नाही?" नीळकंठ इकडे तिकडे पाहत म्हणाला.

"भीती कशाची! आमच्याकडे असं काय आहे ज्यामुळे आम्हास भीती वाटावी? जे होतं ते आधीच लुटलं गेलं आहे. मग भीती वाटण्यासारखं उरलं तरी काय?" तिच्या उत्तराने नीळकंठ अस्वस्थ झाला.

"राव तुमचे कोण लागतात?" तो थेट मुद्द्यावर येत म्हणाला.

"कोणीच नाही."

"मग त्यांनी इथे येण्याचं कारण?"

"त्यांना वाटतं म्हणून येतात."

"असं! कोणत्या नात्याने येतात ते इथे?"

"आमच्या नात्याचं नाव अजून ठरलं नाही. ते ठरलं की तुम्हाला बोलावणं धाडू. या तुम्ही आता." अमोली दरवाजाकडे हात दाखवून म्हणाली.

"आम्ही असं ऐकलं की राव आणि तुमचे संबंध.."

"बस् म्हणाले ना. तुम्ही या आता." अमोलीच्या डोळ्यात अंगार पेटला होता.

"तुमच्यामुळेच आमच्या आत्याबाई जीवाला मुकल्या. याची काही तरी चाड ठेवा. हे तुम्हा दोघांचे अनुचित संबंध कदाचित त्यांना माहिती झाले असतील आणि म्हणूनच त्यांनी जीव दिला." नीळकंठ न थांबता एकसारखं बोलत होता.

"याचा दोष आमच्या माथी का मारता? चूक तर रावांची आहे. त्यांचं पाऊल वाकडं पडलं नसतं तर ही वेळच आली नसती." अमोली.

"अस्स! मग त्यांचं पाऊल वाकड पडलं म्हणून तुम्हीही आपलं पाऊल वाकड्या दिशेने का टाकलंत?" नीळकंठाच्या या प्रश्नावर अमोली निरूत्तर झाली.

क्रमशः

🎭 Series Post

View all