Login

मोक्ष - भाग 4

भयकथा

"रावांचं लग्न झालं आहे हे आम्हाला आधी ठाऊक नव्हतं आणि माफ करा, पण तुमच्या आत्याबाईंना मुलं नव्हतं म्हणून त्यांना वाटतं आम्ही त्यांना मूल द्यावं.

"ह्या.. काहीही बोलू नका. तुम्ही बोललात आणि आम्ही विश्वास ठेवला." नीळकंठ उपहासाने हसत म्हणाला." विचार करा, इतकी वर्षे आत्याबाईंना मूल नव्हतं आणि तुम्ही रावांच्या संगतीत गेले अनेक महिने असाल. मग तुम्हास अजून का..

मग म्हणायचं दोष रावांमध्ये आहे! कदाचित हे आत्याबाईंना ठाऊक असेल आणि पुरुषी अहंकारामुळे रावांनी ते मान्य केलं नसावं आणि म्हणूनच आत्याबाईंनी जीव दिला असावा." नीळकंठ काहीसा विचार करत म्हणाला.

हे अगदी खरं होतं. अमोली विचारात पडली. 'गेले कित्येक महिने आपण रावांच्या सहवासात अनेक रात्री घालवल्या. एक वेळ मान्य करू, यमुना बाईंमध्ये दोष होता. पण तसाच दोष माझ्यात असू शकत नाही.'

"अं..हे खरं आहे. मी माझ्या वडिलांच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते. आज ते या जगात नाहीत. पण अगदी सच्चा माणूस होता तो. खाजगी बात सांगायची झाली तर माझी आई कोण होती? हे देखील मला ठाऊक नाही. आई -वडील म्हणून गांगोजीनींच माझा सांभाळ केला. त्यांच्या इतर कुटुंबीयांची सुद्धा आम्हास माहिती नाही."

"या खाजगी बाबतीत आम्हाला पडायचे नाही. बऱ्या बोलाने रावांपासून दूर व्हा. त्यांच्या कर्मानुसार मिळणाऱ्या शिक्षेमध्ये तुम्ही भागीदार होऊ नये इतकंच वाटतं आम्हाला. येतो मी." नीळकंठ उठून उभा राहत म्हणाला.
"एक बोलू? तुम्हाला रावांशिवाय आणखी चांगलं माणूस मिळालं असतं."

"राव आमच्या आयुष्यातला एकमेव माणूस. या आधीही कोणी आलं नाही आणि नंतरही येणार नाही. मानलं, आमच्या वयात अंतर अधिक आहे. मात्र आधार वाटला की माणूस वयाचाही विचार करत नाही म्हणायचं."

"तुम्ही साधारण माझ्या वडील बंधूंच्या वयाच्या वाटता म्हणून सबुरीचा सल्ला देतो. आम्ही इथे येऊन गेलो हे रावांना कळता कामा नये. नाहीतर त्यांच्या नकळत तुमची रवानगी कुठे होईल हे मात्र सांगता येणार नाही." नीळकंठ मागे न पाहता भराभर निघून गेला.
------------------------------------------

"भाऊजी, कुठे गेला होतात?" दरवाज्यात नीळकंठाला पाहताच जानकी पुढे आली.

"महत्त्वाचं काम होतं. दादा आला?"

"हो. केव्हाचे आलेत हे. तुमचीच वाट पाहत होते."
तिचं बोलणं पूर्ण होतं न होतं तोवर नीळकंठ दादाच्या खोलीत शिरला.
---------------------------------------

संध्याकाळच्या वेळी दार वाजलं तशी अमोली भानावर आली.
"काय गं! अजूनही अंधारात का बसलीस? दिवाबत्तीची वेळ केव्हाच टाळून गेली." अमोलची सखी आत येत म्हणाली. तिनेच आत येऊन देवासमोर दिवा लावला. अमोलीच्या वडिलांच्या तसबिरीला फुल घातलं.
"कसला विचार करतेस? रावांचा?" नर्मदा अमोली जवळ बसत म्हणाली.

"हम्म म्हणजे नाही. एक विचारू? म्हणजे ही खाजगी बात कुठेही बोलायची नाही. आधी माझ्या गळ्याची शपथ घे." अमोली नर्मदेच्या आणखी जवळ जात म्हणाली.

"आता गं? यासाठी तुझी शपथ कशाला घेऊ मी? वचन घे. मी कुठेही काहीही बोलणार नाही." नर्मदा.

"बरं, ऐक तर. रावांच्या पहिल्या पत्नीला म्हणजे यमुनेला गेली अनेक वर्षे मूलबाळ नव्हतं आणि रावांना आमच्याकडून मूल हवं होतं. पण.. अमोली बोलताना अडखळली.

"पण काय?"

"अगं, आता तुझ्यापासून काय लपवायचं? रावांच्या सहवासात गेले कित्येक महिने राहिलो आम्ही. मात्र आमचीही कूस उजवली नाही. याचा अर्थ लक्षात येतोय का तुझ्या? म्हणजे समजा उद्या - परवा आमचं रावांशी लग्न झालं तर आमचीही अवस्था यमुना बाईंसारखीच होणार." बोलता बोलता अमोलच्या चेहऱ्यावर घाम डवरला होता.
हे ऐकून नर्मदाच्या चेहऱ्यावर आश्चर्य जमा झालं.
"काहीतरीच काय बोलतेस हे?"

"खरंतर समाज किंवा रावांच्या घरचे आमच्या लग्नाला मान्यता देतील की नाही यात शंकाच आहे. शिवाय ते मगाशी आले होते ना, नीळकंठ राव ते सुद्धा असंच म्हणाले."

"कोण आलं होतं?" नर्मदा इकडे - तिकडे पाहत म्हणाली.

तशी अमोली आपली जीभ चावत म्हणाली, "आता तुझ्या गळ्याची शपथ! कोणालाही यातलं काहीही कळता कामा नये."

नीळकंठ आल्यापासून काय काय म्हणाला ते अमोलीने नर्मदाच्या कानावर घातलं आणि हे सारं नर्मदा आ वासून ऐकत राहिली.
"त्यांना तुझ्या घरचा पत्ता कसा काय ठाऊक झाला?"

"गावात कोणीतरी सांगितला असेल. आता आमचं नातं तसं लपून राहिलं नाही म्हणायचं. पण का कोणास ठाऊक? त्या नीळकंठरावांशी आमचं काहीतरी नातं असावं असं मनाला सारखं वाटतंय."

"तुम्ही आणि तुमचे मनसुबे! या दोन्ही गोष्टी तुमच्याकडेच ठेवा. राव यायची वेळ झाली आता मला निघायला हवं." नर्मदा उठत म्हणाली.

"उद्या येशील ना?" अमोली तिच्याकडे टक लावून पाहत म्हणाली.

"हो तर. आम्ही तुमची जिवलग सखी आहोत. तुम्हास सोडून आम्ही जाणार तरी कुठे?" साडीच्या पदराचे टोक आपल्या बोटाला गुंडाळत नर्मदा नाटकीपणे म्हणाली.

हे ऐकून अमोलीला हसू आलं.
-----------------------------------

राव आले तसे निघून गेले. अमोलीला मात्र रात्रभर झोप लागली नाही. पहाटे डोळा लागला. पण कोणीतरी जवळ बसल्यासारखे जाणवल्याने तिने पटकन् डोळे उघडले तर पलंगाच्या टोकाशी यमुनाबाई बसल्या होत्या. त्या एकटक तिच्याकडे पाहत होत्या. जणू त्यांना काहीतरी बोलायचं असावं.
"तू..तुम्ही इथे!"
अमोलीला घाम फुटला होता.

तरीही यमुनाबाई काहीच बोलल्या नाहीत. नुसत्या हसऱ्या चेहऱ्याने त्या अमोलीकडे पाहू लागल्या.
आता मात्र अमोली चांगलीच घाबरली. तिचे हातपाय थरथरायला लागले. घशाला कोरड पडली आणि भीतीने हृदयाचे ठोके इतके वाढले की तिची शुद्ध हरपली.

सकाळी जाग आली तेव्हा नीळकंठ, केशव आणि नारायणराव अमोलीच्या घरात बसले होते. नर्मदा तिच्या शेजारी बसून तिला वारा घालत होती.
"नीळकंठ, तुम्ही इथं?" अमोली उठायचा प्रयत्न करत म्हणाली.

"हो. हा माझा मोठा भाऊ केशव आणि हे माझे वडील."

"तुम्ही सगळे आत कसे आलात? दरवाजा तर बंद होता."

"मी आले तेव्हा दरवाजा नुसता पुढं केला होता. येऊन बघते तर तू निपचित पडली होतीस. चेहऱ्यावर पाणी मारलं तेव्हा जरा हालचाल केलीस अन् आत्ता काही वेळापूर्वी हे तिघे आलेत." नर्मदा म्हणाली.

"दरवाजा लावायची मी कशी विसरले? यमुनाबाई दरवाजा उघडून आत आल्या की त्यांनीच दरवाजा उघडला! त्या इथं आल्या होत्या. पण त्या तर गेल्या.. मग इथे कशा येतील?" अमोली एकटीच भराभर बोलत होती.

"अगं, कोण आलं होतं?" नर्मदा तिला हलवत म्हणाली.

"यमुनाबाई. या इथं बसल्या होत्या. एकटक माझ्याकडे बघत होत्या." अमोली घाबरून म्हणाली.

खरंतर कालचं नीळकंठ आणि केशवचं बोलणं ऐकून नारायणराव अमोलीला जाब विचारण्यासाठी आले होते. पण तिची अवस्था पाहून त्यांना तिला काय बोलावं हेच सुचत नव्हतं.
"बाई, तुम्ही विश्रांती घ्या. आम्ही नंतर येऊ." नारायणराव नाराजीने उठत म्हणाले.

"जाब विचारायला आलात ना? मग न विचारता चाललात? मी चुकले खरंच. एकवार मला माफ करा." अमोली हात जोडून म्हणाली. "तुमच्या यमुनाबाई काल आल्या होत्या. अगदी आमच्या जवळ बसल्या होत्या. त्यांना काहीतरी बोलायचं असावं. पण भीतीने आमची उडालेली गाळण तुम्ही पाहिली.."

"त्या इथे का येतील?" केशव पुढे होत म्हणाला.

"तुमचा विश्वास बसत नसला तरी हेच सत्य आहे." अमोली.

"खरंतर एका परक्या बाईच्या घरी येणं आम्हास शोभत नाही. पण वेळ प्रसंग असा आला की आम्हाला तुमच्या घरची पायरी चढावी लागली. आता विषय निघालाच आहे तर बोलतो. तुमच्या आणि पुरुषोत्तमरावांच्या या असल्या नात्यामुळे आमच्या यमुनाबाईंचा जीव गेला हेच खरं.
काल जेव्हा आम्ही हे ऐकलं तेव्हा आमच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पुरुषोत्तमरावांना हे शोभत नाही आणि एक स्त्री असूनही तुम्ही दुसऱ्या स्त्रीच्या मनाचा विचार केला नाही याहून अधिक खेदाची गोष्ट कोणती?" नारायणराव येरझाऱ्या घालत म्हणाले. त्यांचे डोळे आग ओकत होते.

"आमचं चुकलं. खरंच चुकलं. रावांचं लग्न झालंय हे आम्हाला मुळीच ठाऊक नव्हतं आणि जेव्हा हे आम्हाला समजलं तेव्हा रावांनी आमच्याकडून मूल हवं अशी मागणी केली. माफ करा. या वडील माणसांशी बोलण्याच्या गोष्टी नव्हेत. पण.."

"ते पण वगैरे सोडा आता. आमच्या यमुनाबाई तुमच्यामुळे आम्हाला कायमच्या सोडून गेल्या. त्याची भरपाई तुम्ही करू शकणार आहात? आता बऱ्या बोलाने रावांचा नाद सोडा." केशव शांतपणे म्हणाला.

बराच वेळ विचार करून अमोली पुढे म्हणाली,
"माझ्या वडिलांच्या शपथ घेऊन सांगतो आम्ही, या जगात रावांशिवाय आमचं दुसरं कोणीही नाही. त्यांना सोडून आम्ही जाणार तरी कुठे? अगदीच असहाय्य, एकटे आहोत आम्ही." बोलता-बोलता अमोली आपल्या वडिलांच्या तसबिरीकडे पाहत म्हणाली.
एवढ्यात नारायणरावांचे लक्ष अमोलीच्या वडिलांच्या तसबिरीकडे गेलं आणि त्यांना खूप मोठा धक्का बसला.
"हे तुमचे वडील!" आश्चर्य, शंका, कुतूहल, राग अशा अनेक भावना नारायणरावांच्या मनात फेर धरू लागल्या.

"हो. आमची आई कोण होती हे आम्हास ठाऊक नाही. पण हेच आमचे वडील, गंगोजी. त्यांनी म्हणे लग्न न करण्याची शपथ घेतली होती. पण ती मोडली आणि लग्न केल्याविना आमचा जन्म झाला. आता जगाला तोंड कसे दाखवावे? म्हणून आम्ही इतकी वर्ष याच घरात एकाकीपणे काढली. माझा जन्म झाला अन् आई गेली. मग यांनीच माझा सांभाळ केला." अमोली उठत म्हणाली.

"गंगाधर.."
अमोलीने सांगितलेले ऐकूनही न ऐकल्यासारखे करत नारायणरावांनी त्या तसबिरीवरून हात फिरवला. त्यांचा स्वर गहिवरला होता.
"गेली अनेक वर्ष तुझी वाट पाहिली. कुठे कुठे शोधलं नाही तुला! पण तू मात्र स्वतःला दिलेलं वचन मोडलंस. एकदा येऊन या मोठ्या भावाला भेटला असतास तर असा काय फरक पडला असता? काही काळ मी रागावलो असतो, चिडलो असतो. पण पुन्हा तुला आपल्या घरात जागा, स्थान नक्कीच दिलं असतं रे." नारायणराव गहिवरल्या स्वरात म्हणाले.

केशव, नीळकंठ आणि अमोलीला काहीच कळत नव्हतं. ते तिघे एकमेकांकडे आणि नारायण रावांकडे पाहत होते.

"या तुझ्या पोरीची आणि आमची अशी भेट व्हावी? वेळ कोणती, प्रसंग तरी कोणता?" नारायण रावांनी डोक्याला हात लावला. उभ्या जागी ते मटकन खाली बसले. त्या तसबिरीकडे पाहून ते रडत होते आणि हसतही होते.
--------------------------------------------

इकडे सावित्रीबाई वाड्यात प्रवेश करत्या झाल्या. तसा राग विसरून लक्ष्मीबाई त्यांना सामोऱ्या गेल्या.
"बसावं. आत्ता कसं येणं केलंत?"

क्रमशः

🎭 Series Post

View all