Login

मोक्ष - भाग अंतिम

भयकथा

सावित्रीबाई शून्यात नजर लावून बसल्या होत्या.
राव गेल्यापासून त्यांनी अन्न - पाण्याचा त्याग केला होता.
"ती रावांना घेऊन गेली. आता आमचा वेळ भरली. भीती वाटते हो तिची. " आपल्याच बोलण्याने बाई दचकून उठल्या.
"आम्ही चुकलो पंत.. तुम्ही मात्र आमच्या चुका पोटात घालत आलात. आमचा अहंकार, संपत्तीचा हव्यास जिथे -तिथे आड आला. केवळ आमच्यामुळे या वाड्याची शान गेली, रया गेली. आता राव म्हणून कोणाला हाक मारायची? कोणावर हक्काने रागवायचं? जाब विचारायचा तरी कोणाला? आमच्याच वागण्याचा हरघडी पश्चाताप होतो आहे आम्हाला."

"सावित्री, असं नका बोलू. तुमच्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण? आधी सुनबाई गेल्या. मग पोटचा गोळा! आता तुम्ही जाण्याची भाषा केली तर आम्ही काय करावं? तुम्हाला होणारा पश्चाताप हीच तुमची शिक्षा आहे. जवळचं मनुष्य जातं तेव्हा मनाला किती यातना होतात!
त्या यातना, ते भोग भोगणं हीच तुमची सजा. वाट्याला आलेलं हे एकटेपण, भय, काळजी, दुःख सहन करणं हीच तुमची शिक्षा आहे." पंत रडवेल्या स्वरात म्हणाले.

"नको ही सजा. त्यापेक्षा मरण बरं पंत. मन नसत्या शंका -कुशंकांनी भरून गेलं आहे, पश्चातापाने पोखरलं आहे. आधार देणारं कोणी नाही अन् आपलं म्हणणार कोणीही नाही." सावित्रीबाई रडायला लागल्या.
"ती आली पंत.. बघा, ती जवळ येते आहे. नको यमुने, जा. आलीस तशी परत फिर." बोलता बोलता सावित्रीबाई खाली कोसळल्या. गडी माणसांनी वैद्यांना बोलावून आणलं. त्यांनी झोपेचं औषध दिलं तेव्हा कुठे बाईंना आराम पडला.
----------------------------------------------

"वन्स, काहीतरी खाऊन घ्या. झालं ते वाईट झालं. पण ते गंगेला मिळालं म्हणायचं. असं किती दिवस उपाशी राहणार आहात?" जानकी अमोलीच्या खोलीत येत म्हणाली.

"वहिनी, आमचं काय चुकलं? आम्ही केवळ हे नातं तोडायला गेलो होतो. पण घडलं भलतचं! राव आम्हाला सोडून गेले, अगदी कायमचे. आता ही सलही आमच्या मनाला टोचत राहील. सांगा, स्वतःला कसं माफ करू आम्ही?"

"यात तुमचा काय दोष? नशिबात जे लिहिलेलं असतं तेच घडतं. तेच आपलं दैव म्हणायचं. चला, खाऊन घ्या आधी." जानकी प्रेमळ स्वरात म्हणाली.

"ज्या माणसांना आम्ही जीव लावला तिच आम्हाला सोडून जातात. आमच्या नशिबी साधं प्रेमही असू नये? हे कसले दैव?"

इतक्यात नारायणराव आत आले. तशी जानकी खोलीतून बाहेर पडली.
"पोरी, खाऊन घे काहीतरी. गेले दहा दिवस उपाशी आहेस तू. आम्हाला वडील मानतेस ना? मग आमचं ऐकावं लागेल तुला. तुझ्यासाठी नक्की काय करू ते सांग."

"काका, हे घर, इथली माणसं, ही नाती अन् यातून मिळणारा आधार सगळं सगळं मिळालं आम्हाला. मात्र काकूसाहेबांनी मात्र आपलं मानलं नाही. ही खंत मनाला लागून राहील. पण यात त्यांची चूक ती काय? आमची ओळख नको तेव्हा अन् नको त्या ठिकाणी पटली. एकच मागणं मागतो आम्ही, या साऱ्यातून आमची सुटका करा. हे दुःख, ही सल आता सहन होत नाही."

हे ऐकून नारायणराव मागे सरकले.
"पोरी, असं बोलू नको. काळानुसार या दुःखावर पडदा पडेल."

त्याच वेळी नीळकंठ आत आला.
"ताई, असं बोलून आम्हाला परकं केलं तुम्ही."

"असं? मग तुमच्या, काकूसाहेबांच्या नजरेत आमच्याविषयी दिसणारा राग आम्हाला का जाणवतो? केशव दादा आमच्याशी बोलायला सुद्धा येत नाहीत अन् तुम्ही.."

"याचं उत्तर तुम्हाला ठाऊक आहे." नीळकंठ म्हणाला. त्याने समजूत घालून देखील ती जेवली नाही.

नारायणराव लक्ष्मीबाईंना सांगून थकले होते.
"पोर चुकली आहे. तिला माफ करून पदरात घ्या. आता आपणच आहोत तिचा आधार." पण त्या काही ऐकायचं नाव घेत नव्हत्या.

दोन दिवसांनी पंतांचं पत्र आलं. ते नेमकं लक्ष्मीबाईंच्या हाती पडलं. ते वाचून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
"कुठून आलं हे नसतं शहाणपण आणि ही हिंमत? म्हणतात, सावित्रीबाईंची तब्येत बरी नाही. अमोलीला इकडे पाठवून द्या. कुठल्या हक्काने पाठवायची तिला? ते काही नाही. आम्ही योग्य काय ते उत्तर धाडू."
लक्ष्मीबाई तिरीमिरीत कधी नव्हे ते अमोलीच्या खोलीत आल्या. पाहतात तर ती पलंगावर निपचित पडली होती.
"पोरी."

"कोण?" तिचा क्षीण आवाज ऐकून लक्ष्मीबाईंना गहिवरून आलं. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या. अनोळखी स्पर्श जाणवल्याने अमोली उठून बसली.
"तुम्ही आणि इथं?" लक्ष्मीबाईंना पाहून तिला मोठा धक्का बसला.

"हो. काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? दोन घास खाऊन घे. बघ, पंतांचं पत्र आलं आहे."

"काय म्हणतात ते?"

"सावित्रीबाईंची तब्येत ठीक नाही. आम्ही अमोली ला रावांची पत्नी म्हणून स्वीकारतो आहोत. तिला इकडे पाठवून द्या. आम्हाला ठाऊक आहे, ही पंताची नव्हे तर सावित्रीबाईंची कल्पना आहे. आता यांना आधार हवा आहे. माणसं जोडून ठेवली असती तर ही वेळच आली नसती.
मात्र आम्ही लगोलाग पत्र धाडून देऊ, हे कदापि शक्य नाही म्हणून. तू नको काळजी करू." लक्ष्मीबाईंच्या तोंडून हे बोल ऐकून अमोलीला काय बोलावं सुचेना.

"अशी काय पाहतेस? जे घडायचं होतं ते घडून गेलं. त्याची शिक्षा सर्वांनीच भोगली. पण झालं गेलं विसरून जाऊ अन् नव्याने जीवनाची सुरुवात करू. तुझ्या रूपाने आम्हाला एक लेक मिळाली असं समजू आम्ही. तुझ्यासाठी आमच्या पोटात माया होती. पण रागही तितकाच होता. आज मायेने रागावर मात केली म्हणायची."

इतका वेळ दाराआड उभी असलेली जानकी जेवणाचे पान घेऊन आत आली.
"वन्स, थोडं जेवून घ्या. आईसाहेबांचा आग्रह मोडू नका. काहीही झालं तरी घरची लक्ष्मी आहेत त्या."

हे ऐकून लक्ष्मीबाई काहीशा लाजल्या.
"आई मानतेस ना आम्हाला? मग आज जेवावं लागेल. नाहीतर वैद्यांना बोलावून औषध घ्यावी लागतील हं." त्यांनी एक घास घेऊन अमोलीला भरवला. तिने आनंदाने तो खाल्ला देखील. अमोलीच्या चेहऱ्यावर अमाप समाधान होतं. पण मनाला लक्ष्मीबाईंचं वागणं खरं की खोटं हेच समजत नव्हतं.

"मनात शंका आणू नको पोरी. आम्ही तुला मनापासून स्वीकारलं आहे. तू इथेच राहशील, आमच्याजवळ! हे घर, ही सारी माणसं तुझीच आहेत. आमच्या दोन लेकरांना बहीण मिळाली असं समजू आम्ही. जे भोग होते ते सरले असं समजायचं." लक्ष्मीबाई अमोलीचा चेहरा निरखत म्हणाल्या.

पाहता पाहता अमोलीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. "आई..." म्हणत ती लक्ष्मीबाईंना बिलगली अन् त्यांच्या मायेचा हात तिच्या पाठीवरून फिरू लागला.

तसे दरवाज्यात उभ्या असलेल्या नारायणरावांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी ते मुक्तपणे वाहू दिले. पाठोपाठ उभे असणारे केशव आणि नीळकंठ भरल्या डोळ्यांनी हा सोहळा पाहत होते.

'मोक्ष म्हणजे नक्की काय? तो मरणानंतरच मिळतो का? तर नाही..अपराधीपणाच्या, भयाच्या, चिंतेच्या तसंच आपलं अस्तित्व कोणीतरी नाकारत होतं या भावनेतून होणारी सुटका म्हणजेही मोक्ष नाही का? अन् आपल्याला कोणीतरी मनापासून स्वीकारलं आहे ही भावना त्याही पलीकडे जाऊन एक निराळाच आनंद देत असते.'
अमोलीच्या मनात हा विचार आल्यावाचून राहिला नाही. तिला रावांची आठवण आली.
'आपण त्यांना स्वीकारलं असतं तर? ते आज ह्यात असते. मात्र त्यांच्या कुटुंबात आमचा स्वीकार झाला नसता.'

आभाळ गच्च दाटून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल अशी स्थिती होती. मधूनच चमकणाऱ्या विजांचा कडकडाट ऐकून अमोली लक्ष्मीबाईंच्या कुशीत विसावली. त्याची ऊब तिला कितीतरी वेळ जाणवत होती. तिच्या डोळ्यांतून वाहणारे उष्ण अश्रू लक्ष्मीबाईंचे लुगडे भिजवत होते अन् त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंसोबत त्यांच्या मनातला राग, चीड वाहून जात होती. त्यांना आपल्या डोळ्यांसमोर लहानाच्या मोठया झालेल्या यमुनाबाईंची आठवण आल्यावाचून राहिली नाही अन् त्याचं आपल्या कुशीत विसावल्या आहेत असं समजून लक्ष्मीबाई आईच्या मायेने या आपल्या नव्या लेकीला गोंजारत राहिल्या, अगदी बराच वेळ.. एका आईच्या मायेने!