चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)
शीर्षक: मोक्षदा (अंतिम भाग) (भाग-४)
भक्ती आणि ज्ञानेश गेल्यानंतर मोक्षदा विचारात हरवली. पुढे काही दिवस ती गांभीर्याने विचार करत राहिली. कालांतराने तिलाही पटले ते. मग काय चार-चौघांच्या साक्षीने त्यांनी कोर्ट मॅरेज केले. सार्थक अनाथच होता आणि मोक्षदालाही कोणता गाजावाजा नको होता म्हणून साध्या पद्धतीने तो लग्नसोहळा पार पडला.
सर्वकाही सुरळीत सुरू होते. प्रत्येक सण गुण्यागोविंदाने मोक्षदा, सार्थक, ज्ञानेश, भक्ती आणि श्री एकत्र साजरे करायचे. पाहता पाहता वर्ष सरले. मोक्षदाला दिवस गेले, भक्तीने खूप उत्साहात सर्वकाही सांभाळले. तिचा प्रत्येक लाड पुरवला, तिचे डोहाळे पुरवले. श्री तर तिला एक बहीण किंवा भाऊ मिळेल म्हणून भलत्याच आनंदात होती. कालांतराने मोक्षदा बाळंतीण झाली आणि बाळ सुखरूप जन्माला आले. तिच्या आनंदाला थारा नव्हती त्या क्षणी. ज्या मातृत्व सुखाला ती एवढी वर्षे मुकली होती, वांझ म्हणून तिला हिणवले गेले होते; पण आज तिच्या त्या व्रणावर फुंकर मारण्यासाठी तिचा बाळकृष्ण जन्मला होता. गोकुळाष्टमीला त्याचा जन्म झाला असल्याने त्याचे टोपण नाव कान्हाच ठेवले आणि असेच तिच्या कान्हाच्या लीला पाहता पाहता आणखी तीन वर्ष लोटले.
असेच एका रात्री मोक्षदा, सार्थक आणि त्यांचा कान्हा तिघेही निवांत झोपले होते. अचानक सार्थकचा फोन वाजला. दचकून दोघेही उठले. तो कॉल इस्पितळातून आला होता. बाप-लेकाची इमर्जन्सी केस आली होती आणि त्या दोघांना तात्काळ तिथे बोलावले होते. त्यांनी लवकरात लवकर आवरले. कान्हाला ज्ञानेशकडे सोपवून थोडक्यात त्याला इमर्जन्सी केसची कल्पना दिली. त्याच्यासाठी ते नवीन नव्हते. याआधीही रात्री-अपरात्री कान्हाला सोपवून ते कर्तव्यपूर्तीला जायचे. आजही तेच झाले.
त्यानंतर ते दोघे इस्पितळात पोहोचले. तिथे गेल्यावर कळले की अपघातात गंभीर जखमी झालेले बाप-लेक दुसरे तिसरे कुणी नसून तिचा सख्खा भाऊ निलेश आणि भाचा आहे. खूप धक्कादायक प्रकार होता; पण तिला सावरण्याखेरीज पर्याय नव्हता. तेवढ्यात तिला प्राजक्ता दिसली. तीदेखील थोडी जखमी होती पण फार गंभीर नव्हती आणि शुद्धीत होती.
प्राजक्ता तिला पाहून पळतच तिच्या जवळ आली. काहीही विचार न करता ती तिच्या पाया पडली आणि म्हणाली, "ताई, निलेश... तुमचा भाऊ... त्यांना वाचवा. माझा मुलगा अक्षय बेशुद्ध झालाय. खूप रक्त वाहत होते. ते दोघे काही न बोलता निपचित पडून आहेत. तुम्ही... तुम्ही त्यांचा जीव वाचवा. मी पदर पसरते पण त्यांना वाचवा... प्लीजऽऽ"
"वहिनी रडू नको, काहीच होणार नाही त्यांना. तू आधी तुझे चेकअप कर, मी ऑपरेशन थिएटरमध्ये जातेय. काही होणार नाही. शांत हो." तिला धीर देऊन ती लगेच निघून गेली. डोळ्यात अश्रू साचले होते. तिची अवस्था पाहून सार्थकने तिला सावरले.
दोघेही ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. खूप मोठा अपघात झाला असल्याने बराच वेळ शस्त्रक्रिया सुरू होती. कितीतरी तासांनी ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा बंद झाला आणि ते दोघे बाहेर आले.
"ताई... कसे आहेत हे? माझा मुलगा?" मोक्षदा दिसताच प्राजक्ता विचारू लागली.
"काळजी करण्याचे कारण नाही. ऑपरेशन यशस्वी झाले आहे. येतील दोघेही शुद्धीत काही तासांनी... रिलॅक्स." जरा चाचरतच पण थोडे धाडस करून तिच्या पाठीवर हलकेच थोपटत मोक्षदा म्हणाली. प्राजक्ता लगेच तिच्या गळ्यात पडून रडू लागली.
"ताई तुमचे उपकार झाले. मी तुम्हाला खूप त्रास दिला पण तुम्ही..." तिला परत हुंदका फुटला.
"लेट इट बी. सांभाळ स्वतःला." मोक्षदा कुठलेही वैर न बाळगता म्हणाली.
"तू बोल ह्यांच्याशी, मी पुढे जातो. ओक सरांनी बोलवले आहे तर जरा भेटून येतो. तू ये नंतर. आपला कान्हा उठला असेल एव्हाना. त्यात आपण त्याच्या नजरेपुढे नसलो तर दादा-वहिनी आणि श्रीला तो किती भंडावून सोडतो तुलाही माहिती आहे तर आपण सरळ तिकडेच जाऊ." सार्थक तिला म्हणाला.
"हो. तुझ्यासारखाच आहे तुझा मुलगा..." ती त्याला छेडत हळूच म्हणाली. एक क्षण तिथे प्राजक्ता आहे, हेही ती विसरली होती.
"हो मग किती चांगले जीन्स आहेत माझे. किती मनमोहक दिसतो माझा कान्हा." सार्थक हसत म्हणाला.
"त्याच्या रूपाविषयी नाही तर त्याच्या खोडकर स्वभावाविषयी बोलले मी. असो. जा तू, नुसते विषयाचे विषयांतर करतोस." ती हळूच फटका मारत म्हणाली. तो हसत निघून गेला.
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून ती एकटीच खुदकन हसली. पुढे पाहिले तर प्राजक्ता त्यांच्याकडेच पाहत होती. तिचा प्रश्नार्थक चेहरा पाहून ती म्हणाली, "सार्थक मोहिते, माझा नवरा."
"अच्छा. खूप छान आहे तुमची जोडी!" प्राजक्ता म्हणाली. मोक्षदा फक्त गालात हसली.
काही दिवसांनी निलेश आणि अक्षयच्या तब्येतीत सुधारणा झाली. पाहुणचार करायला ती आग्रहाने त्या दोघांना आणि प्राजक्ताला घरी घेऊन गेली. तिथे ज्ञानेश, भक्ती, श्री होते. ते तिघेही मोक्षदाला जराही अंतर देत नव्हते, तिच्याशी हक्काने वागत होते, ते पाहून निलेश आणि प्राजक्ताने एकमेकांकडे पाहिले.
तिच्याबद्दल प्राजक्ता काही काळापूर्वी खूप वाईट बोलली होती, नको ते आरोप केले होते; पण त्यातले काहीच खरे नव्हते. तिला एकप्रकारे घरातून हाकलून दिले होते. निलेशला मोक्षदाची काळजी असली तरी एकदाही त्याने मोक्षदाला शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. कारण कोणतेही असो पण सख्खा भाऊ असून त्यानेही त्या नात्याची जाणीव ठेवली नव्हतीच.
ज्ञानेशलाही संसार होता पण ना भक्तीला मोक्षदा कधी अपशकुनी वाटली, ना त्याला. ना तिच्या सहवासामुळे त्यांच्या संसारात विघ्न आले होते. शिवाय तिने जो नवा संसार उभा केला होता तो ही खंबीरपणे सुरळीत सुरू होता. नवरा, मूल आणि ती हे सुखी त्रिकोणी कुटुंब पाहून दोघांनाही स्वतःच्या विचारांची आणि काही काळापूर्वी घेतलेल्या निर्णयाची लाज वाटली.
निलेश आधीच पश्चात्तापाचा दाह सोसत होता. आता त्याला राहावले गेले नाही आणि त्याने तिचे पाय पकडून तिची क्षमा मागितली.
"ताई, मी चुकलो. मी ज्यावेळी तुला आधार द्यायला हवा होता त्याचवेळी तुला एकाकी पाडले. मी विसरून गेलो होतो की ज्या संसाराची शपथ देऊन मला प्राजक्ताने बांधण्याचा प्रयत्न केला तो संसार थाटायला तूच मदत केली होतीस. तू आयुष्यभर माझा विचार केला; पण मी स्वार्थी झालो होतो. स्वतःच्या भविष्याचा विचार करून तुझ्या वर्तमानाचा विचारच मी केला नाही. मला माफ कर." निलेश रडतच म्हणाला.
त्याने मोक्षदाला कितीही नाकारले असले तरी तिच्या मनात त्याच्या प्रती तिरस्कार कधी नव्हताच. शेवटी तिचा लहान भाऊ होता तो म्हणून तिने त्याची चूक पदरात घेतली आणि त्याचा हसतमुखाने पाहुणचार केला.
दुसऱ्या दिवशी नारळी पौर्णिमा होती. तिने नेहमीप्रमाणे ज्ञानेशला राखी बांधली. भक्तीने सार्थकला तर श्रीने छोट्या कान्हाला आणि अक्षयला राखी बांधली.
मोक्षदा हातात एक राखी घेऊन निलेशकडे पाहत होती. चाचरतच तिने निलेश आणि प्राजक्ताला विचारले, "राखी बांधू का?"
"ताई विचारू नकोस, हक्काने बांध. बरीच वर्षे या हाताला राखीचा सहवास नव्हता, तो तुझ्या राखीचीच वाट पाहत असावा कदाचित." निलेश म्हणाला.
तिने त्याला राखी बांधली; पण कित्येक वर्षानंतर आज पहिल्यांदा त्याला त्याच्या ताईने बांधलेल्या राखीची खरी किंमत कळली होती. तिला गरज होती तेव्हा त्याने पाठ फिरवली असली, तरी ती तिचे कर्तव्य कधीच विसरली नव्हती. त्याने तिचे रक्षण करणे नाकारले होते; पण जेव्हा तो जीवन-मृत्यूच्या दारात लोंबकळत होता तेव्हा तीच धावून आली होती आणि तिनेच त्याचे रक्षण केले होते. म्हणूनच पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने तिचा आशीर्वाद घेतला. त्याला रडताना पाहून तिलाही रडू आले आणि तिने त्याला मिठीत घेतले.
प्राजक्ताला आधीच पश्चाताप झाला होता म्हणून ती त्या दोघांना पाहून मंद हसत होती. ज्ञानेश, भक्ती, सार्थक यांना कल्पना होती मोक्षदाच्या संघर्षाची म्हणून त्यांचेही डोळे तिच्या डोळ्यांप्रमाणे वाहत होते पण चेहऱ्यावर समाधान आणि ओठांवर हलके स्मित होते.
समाप्त.
.......
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
.......
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा