चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)
शीर्षक: मोक्षदा (भाग-१)
"आम्हाला नको ही तुमची बहीण... अपशकुनी आहे ही! हिच्यामुळे... हिच्यामुळे माझा मुलगा मेला. आधी स्वतःच्या बाळाला गिळले नि आता माझ्या मुलाला..." मोक्षदाची सासू रागातच बोलत होती.
मोक्षदा मात्र काही न बोलता फक्त ऐकत होती आणि डोळे अश्रू टिपत होते. आक्रोश करायचा असला तरी तिचे ऐकून घेणारे तिथे कोणीच नव्हते. तिच्या सासूचा मुलगा तिचाही नवराच होता. प्रेम होते तिचे त्याच्यावर... कोणत्या आईला आपलेच मूल गमावून आनंद होईल? कोणत्या बायकोला नवरा मरण पावल्याचा आनंद होईल? कोणत्या स्त्रीला तिचा संसार उध्वस्त होऊ द्यावासा वाटेल? पण तिची बाजू कोणीच समजून घेत नव्हते, किंबहुना समजून घेण्याचा प्रयत्नही करत नव्हते. फक्त आरोप केले जात होते आणि ती निर्विकारपणे टोमण्यांचे, आरोपांचे प्रहार झेलत होती. बराच वेळ बडबड करून शेवटी तिच्या सासरचे लोक तिला तिच्या माहेरी सोडून निघून गेले.
तिच्या भावाने सुस्कारा घेतला आणि तिला घरात घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात त्याचे त्यांच्या घराभोवती जमलेल्या गर्दीकडे लक्ष गेले. शेजारी अजूनही तिथेच उभे होते.
"काय आहे? तमाशा सुरू आहे का? तोंड वर करून येऊन जातात पाहायला... घरी टी.व्ही. आहे ना? ती पाहा लोकांच्या घरात डोकावण्यापेक्षा!" रागातच निलेशने शेजाऱ्यांंना ऐकवले.
शेजारी ओशाळून निघून गेले. तो त्याच्या बहिणीला घेऊन आत आला. तिला तिच्या खोलीत घेऊन गेला व तिला पलंगावर बसवले.
"ताई, काळजी करू नको कशाची... मी आहे ना. जे झाले ते झाले. कोण, कधी, कोणत्या वळणावर साथ सोडेल याची शाश्वती नसतेच म्हणून सांभाळ स्वतःला. नको कशाचा विचार करूस. मी तुझ्यासाठी जेवायला आणतो." असे म्हणून तो खोलीतून बाहेर जाऊ लागला.
"मला काही नको. भूक नाही मला." ती बोलली.
"चार घास खा. गेल्या काही दिवसांत काय अवस्था केलीस तू स्वतःची... चार घास खा. भाऊजी असते तर त्यांना तरी आवडले असते का? म्हणून स्वतःसाठी नाही तर निदान त्यांच्यासाठी जेव थोडीशी..." जड आवाजात बोलून तो निघून गेला.
इकडे स्वतःच्या नवऱ्याचा उल्लेख होताच तिला परत तिचे अश्रू अडवणे जमले नाही. हुंदका दाटून आला आणि ती रडायला लागली. निलेशच्या पावलांची चाहूल लागली तसे अश्रू पुसले तिने...
त्यानंतर निलेशच्या आग्रहाखातर कसेबसे ताटात वाढलेले जेवण जेवली ती आणि ताटाला नमस्कार केला. परत एकदा तिच्या भावाने तिची समजूत काढली आणि तिला झोपायला सांगून, दार ओढून घेत त्याच्या खोलीत निघून गेला.
"अहो, मी सहन करणार नाही तुमच्या बहिणीला... विधवेची सावली भरल्या घरात नको." खोलीत पाऊल ठेवताच प्राजक्ता— त्याची बायको त्याच्यावर बरसली.
"काय बोलतेस तू, तुला तरी कळत आहे का? आपले लग्न ताईशिवाय शक्य नव्हते. तुझ्या आई-बाबांनी ताईच्या शब्दाला मान ठेवून होकार दिलेला आणि तू अशी बोलतेस? ते सोड, लग्नाआधी ती तुझ्या मैत्रिणीसारखीच होती ना... किती छान जुळायचे तुमचे! किती काळजी असायची तुला तिची. मग आता काय झाले? तूच अशी वागलीस तर तिने कोणाकडे पाहावे? तू तरी समजून घे तिची अवस्था..." निलेश प्राजक्ताला समजावत म्हणाला.
"काय समजून घेऊ आणि का समजून घेऊ? मला नाही समजून घ्यायचे काहीच. मला ती नको आहे. मला माहीत नाही काहीच... मैत्रिणीसारखी होती मैत्रीण नाही आणि मैत्रीण असली तरी काय झाले? आधी ती वांझ झाली आणि आता विधवा झाली आहे. तिच्या अस्तित्वाने माझ्या संसाराची राखरांगोळी झालेली मला चालणार नाही. शिवाय आता मी गरोदर आहे, माझ्या गर्भावर हिची कुदृष्टी पडता कामा नये." प्राजक्ताने तिच्या पोटावर हात ठेवून निलेशला बजावले.
"अगं..." निलेशला सुचेनासे झाले होते तरीही तिला समजावण्याचा प्रयत्न करणार होताच की तिने त्याला थांबवले.
"काय अगं? बालपणी तुमच्या आई-बाबांचा अपघात झाला, त्या अपघातात एकटी तुमची बहीणच वाचली. लग्नाला पाच वर्षं झाले होते तरी मूल-बाळ होत नव्हते तिला. नवसाने मुलगा झाला तर अपघातातच बिचाऱ्या आठ महिन्याच्या मुलाला गमावले. त्याच्यासह तीसुद्धा होती; पण तुमच्या बहिणीला काहीच झाले नाही आणि आता स्वतःच्या नवऱ्यालाही गमावले तेही अपघातात; पण तुमच्या बहिणीच्या केसालाही धक्का लागला नाही. आणखी किती कौल हवे तुम्हाला? ती तिच्यासाठीच भाग्यवंत आहे, इतरांसाठी ती काळ आहे. तिच्या सभोवती वावरणाऱ्या लोकांना गिळते ती... तुमची बहीण आपला संसारही उद्ध्वस्त करेल हो. मला तरी कुणाची काळजी आहे? मीही कोणासाठी म्हणतेय? तुम्हाला किंवा आपल्या बाळाला काही झाले तर माझे कसे होईल? मी नाही तिच्यासारखी धीट... मी नाही पाषाणहृदयी! मी नाही जगू शकणार एकटी! मला माझा संसार हवा, मला आपले बाळ सुखरूप हवे अहो..." आता ती रडतच बोलत होती.
"शुशऽ शांत हो, अशी रडू नकोस आणि ताण घेऊ नकोस. मी बोलतो ताईशी. मी काढतो मार्ग. काही होणार नाही मला आणि आपल्या बाळाला. तू आता झोप बघू... जागरण योग्य नाही तुझ्यासाठीही आणि आपल्या बाळासाठीही..." तिचे अश्रू पुसून तो तिला मिठीत घेत म्हणाला.
मिठी सोडवून ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, "नाही तुम्ही आधी काय तो निकाल लावा. मला फूस लावू नका. माझा निर्णय झालाय मला नको आहे ती आपल्या घरात... आताच्या आता तिला जा म्हणा तुम्ही..."
गरोदरपणात तिला जास्त त्रास होऊ नये म्हणून तात्पुरता विषय थांबवला होता त्याने; पण कदाचित प्राजक्ताला ते आधीच कळले होते. म्हणून तिने तिचा निर्णय ऐकवला होता.
"अगं वेळ तरी बघ... आता सायंकाळ होत आलीये. लवकरच रात्र होईल. असे कसे तिला जायला सांगू. आजची रात्र थांब, उद्या सकाळीच तिला जायला सांगतो मी." निलेश म्हणाला.
"नक्की? तुम्ही मला वेड्यात नाही ना काढणार? मी परत सांगते, मला नको आहे ती इथे... म्हणून तुम्ही तेच करणार आहात जे मी तुम्हाला सांगतेय." प्राजक्ता तिच्या मतावर ठाम होती.
"ह्म्म." निलेशने विचार करत हुंकार भरला.
"आपल्या बाळाची शपथ?" तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले आणि तो गप्प झाला.
"अहो... बोला ना..." ती परत म्हणाली.
"हो, आजचीच रात्र ती इथे आहे." नाईलाजाने त्याने होकार दिला कारण त्याला कळले होते की प्राजक्ता तिचा निर्णय बदलणार नाही. त्यात ती गरोदर होती. गरोदरपणात स्त्रिया भावूक होतात, ताण सहन करू शकत नाहीत याची कल्पना होतीच. म्हणून तिच्या हट्टाला तो नकार देऊच शकला नाही.
"ह्म्म." आता तिने मोकळा श्वास घेतला. त्यानंतर त्यांनी जेवण केले आणि नेहमीप्रमाणे नऊ वाजता ते झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जाग आली. ठरल्याप्रमाणे भाऊ गेला बहिणीला घराबाहेरचा रस्ता दाखवायला तिच्या खोलीत पण ती तिथे नव्हतीच. त्याने खोलीत शोधाशोध केली पण ती दिसलीच नाही. तेवढ्यात त्याला टेबलवर एक चिठ्ठी दिसली. त्याने परत चौफेर नजर फिरवली, मात्र त्याची निराशाच झाली. शेवटी ती चिठ्ठी उचलली आणि त्याने वाचायला सुरुवात केली. जसजसा तो वाचत होता तसतसे त्याचे डोळे मोठे होत होते.
तेवढ्यात प्राजक्ता तिथे आली.
"काय हो, कुठे आहे तुमची बहीण आणि हे काय? काय वाचत आहात?"
"ताई गेली घर सोडून रात्रीच... ताईने काल रात्री आपला संवाद ऐकला कदाचित म्हणून ती आपल्या संसाराला दृष्ट लावणार नाही असे लिहून निघून गेली." निलेश भावूक होत म्हणाला.
"काय सांगता? म्हणजे नक्की गेली ती?" तिच्या आवाजात जरा आनंदच झळकत होता.
"हो. मी शोधले सगळीकडे, नाहिये ती इथे." तो म्हणाला.
"ह्म्म मग आता तुम्ही शोधाशोध करू नका. स्वेच्छेने गेलीये ना ती..." प्राजक्ता फक्त स्वतःचा स्वार्थ पाहत होती.
"अगं पण..." निलेशला अजूनही ते पटत नव्हते.
तो मोक्षदाला दुसरीकडे राहण्यासाठी आग्रह करणार असला तरी तिच्या राहण्याची सोय तो स्वतः करणार होता. त्याने काल रात्रीच तो विचार केला होता; पण मोक्षदा निमूटपणे निघून गेली होती.
क्रमशः
.......
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
.......
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा