Login

मोक्षदा (भाग-२)

मृत्यू हा अटळ आहे तो कधीही येऊ शकतो त्यावर कोणाचेही बंधन नाही पण मोक्षदाचा मरण पावला तर त्याला ती जबाबदार कशी काय? ही कथा आहे मोक्षदाच्या संघर्षाची... रक्ताच्या नात्यांची परीक्षा घेणारी, आपुलकीच्या नात्याची ताकद सांगणारी... समाजात वावरताना ज्या सामाजिक टीका सहन कराव्या लागतात त्याचे जिवंत प्रात्यक्षिक म्हणजे ही कथा...
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

(जलद कथालेखन)

शीर्षक: मोक्षदा (भाग-२)

"तुम्हाला कोण हवे आहे? आपले बाळ आणि मी? की तुमची मोक्षदा ताई? तुम्ही आज मला तुमचा निर्णय सांगा. तुमच्यासाठी आपले बाळ महत्त्वाचे असेल तर आपला संसार निवडा. नाहीतर तुम्हाला हवे ते करायला तुम्ही स्वतंत्र आहात." असे बोलून प्राजक्ता तावातच तिथून निघून गेली.

मोक्षदा तर घर सोडून निघून गेली होती, कुठे जात आहे हे न सांगता... शिवाय निलेशसाठी बहीण जितकी महत्त्वाची होती तितकेच महत्त्वाचे त्याचे बाळ आणि संसार! सरतेशेवटी सुस्कारा घेत त्याने त्याच्या बायकोला आणि बाळाला निवडले व ती चिठ्ठी मोक्षदाच्या कपाटातच ठेवून प्राजक्ताचा रुसवा काढायला तिच्या मागे निघून गेला.
.........

१२ तासांपूर्वी
वेळ- रात्री १० वाजता

मोक्षदा पाणी प्यायला खोलीतून बाहेर आली होती तेव्हा तिने नकळत निलेश-प्राजक्ताचा संवाद ऐकला. तिच्यामुळे तिच्या लहान भावाच्या संसारात खडे पडलेले तिला चालणार नव्हते. म्हणून तिने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. आधी एक चिठ्ठी लिहिली जेणेकरून निलेशने तिची इतरत्र शोधाशोध करू नये. त्यानंतर ते दोघे झोपल्यावर ती घरातून बाहेर पडली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने निलेशला कुलर-पंख्याच्या आवाजामुळे ती घराबाहेर गेली तरी कळले नाही.

बराच वेळ झाला होता. ती एकटीच अनवाणी पायाने चालली होती. चप्पल कधीचीच वाटेत तुटली होती पण ती थांबली नाही. कुठे जात आहे? कोणत्या मार्गाने जात आहे? याचे भान राहिले नव्हते. आता तर दोन्ही पायांतून रक्त वाहत होते पण तिला पर्वा नव्हतीच. अंधार बराच झाला होता. ती घरापासून खूप लांब आली होती. मनात प्राजक्ताचे आणि तिच्या सासूचे शब्द घोंघावत होते. त्याचाच विचार करत ती चालली होती. तेवढ्यात तिच्या समोरून भरधाव कार वेगाने आली. तिच्यात आणि कारमध्ये मोजकेच अंतर राहिले होते; पण कार चालकाने करकचून ब्रेक दाबले आणि गाडी थांबली. मोक्षदा थांबली नाही आणि तिथून जाऊ लागली.

दरम्यान कारचालक कारबाहेर आला आणि त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला, "ताई..."

तिच्या हाताला परपुरुषाचा स्पर्श होताच तिची तंद्री भंगली. त्याची हाक ऐकून तिला एक क्षण वाटले की निलेश असावा; पण तो स्पर्श निलेशचा वाटला नाही. ती वळली आणि तिने गोंधळून त्या व्यक्तीला पाहिले.

"मोक्षदा ताई, मी आहे ज्ञानेश." त्याने ओळख सांगितली पण त्यावेळी तिला प्रतिक्रिया देताच आली नाही कारण तिचे चित्त अजूनही थाऱ्यावर नव्हते.

तो पुढे म्हणाला, "ताई, काय झाले? ओळखले नाहीस का? अगं मी तुझा मानस भाऊ. आपण एकाच कॉलेजला होतो. मला तू तुझी पुस्तके मोफत दिली होतीस आणि माझ्या ॲडमिशनची फी भरून मला खूप मोठी मदत केली होतीस. नंतरही तू बरीच पाठ्यपुस्तके आणि अवांतर वाचनासाठी कथासंग्रह, कादंबऱ्या दिल्या होत्यास. वळणावळणाला तू माझी मदत केलीस. त्यामुळेच मी प्रगती करत गेलो. ताई, मी तुझा ऋणी आहे. आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळेच." बोलता बोलता तो भर रस्त्यात तिच्या पाया पडला आणि त्याला तिच्या पायाला झालेल्या जखमा दिसल्या.

त्याने तिला निरखून पाहिले तर डोळ्यांभोवती काळी वर्तुळे होती, चेहरा निस्तेज होता. त्याने लगेच काळजीने तिची विचारपूस केली. "ताई, काय झाले तुला? काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? आणि कुठे चाललीस तू एवढ्या रात्री? थांब मी घरी सोडतो तुला?"

"कोणत्या घरी? मला घर नाही." ती खिन्न स्वरात म्हणाली.

"असे काय बोलतेस? कोणतेही घर नसेल तर माझ्या घरी चल." असे म्हणून तो तिला कारकडे घेऊन जाऊ लागला.

"नाही स्पर्श करू नकोस मला." ती म्हणाली तसा तो दचकला आणि लगेच हात सोडला. त्याला वाटले की त्याने तिला हात लावल्यामुळे ती नाराज झाली असावी.

तो माफी मागणारच होता तेवढ्यात ती बडबडायला लागली. "मी काळ आहे, मी अपशकुनी आहे. मी लोकांना गिळून टाकते. माझी सावलीही अशुभ आहे. तू... तू जा. मी तुझ्यासाठी, माझ्या आई-बाबांसाठी, माझ्या बाळासाठी, माझ्या राहुलसाठी (राहुल—तिचा नवरा), निलेशसाठी, प्राजक्तासाठी, त्यांच्या बाळासाठी, सगळ्यांसाठीच मी काळ आहे. मी योग्य नाही, मी अशुभ आहे. मी वक्र दृष्टीची आहे. माझ्यामुळे सगळे मरण पावतात... माझे बाळ, माझा नवरा राहुल माझ्यामुळेच आज जिवंत नाहीत."

तिच्या शब्दांतून त्याला कळले की तिने आतापर्यंत काय सहन केले आहे म्हणून तिची मनोवस्था त्याला क्षणात कळली. तो लगेच तिला म्हणाला, "ज्या मोक्षदा ताईने माझ्या रूक्ष आयुष्यात सुखाची उधळण केली, नवे रंग भरले ती कधीच अपशकुनी वा अशुभ असूच शकत नाही. तू कधीच अपशकुनी नव्हतीस, ना आहेस, ना असशील. तू तर देवीचे स्वरूप आहेस."

"नाही, तुला कळत नाहिये. मी खरंच अशुभ आहे. मी... मी..." बोलता बोलताच तिला भोवळ आली.

ती बेशुद्ध होऊन खाली पडणार त्याआधी त्याने तिला पकडले. तिला नीट उचलले आणि कारमध्ये बसवले. बेशुद्धावस्थेतही ती त्याच वाक्यांची पुनरावृत्ती करत होती.

'ताई का स्वतःला दोष देत आहे? काय झाले असेल?' विचार करतच तो कार चालवत होता.

थोड्याच अंतरावर घर होते. काही वेळातच तो घरी पोहोचला. त्यानंतर तो तिला घेऊन आत गेला. त्याच्या बायकोने त्या दोघांना पाहिले आणि भुवया आकसून घेतल्या.

"अहो, आलात तुम्ही? आणि ह्या कोण? तुम्ही त्यांना हातांवर का उचलले आहे?" तिने काळजीने पुढे येत विचारले.

"सांगतो भक्ती, आधी त्या खोलीचे दार उघड." ज्ञानेश म्हणाला.

भक्तीने मान डोलावली आणि दार उघडले. तो मोक्षदाला आत घेऊन गेला. तिला पलंगावर नीट झोपवले. भक्तीचे एव्हाना मोक्षदाच्या पायांकडे लक्ष गेले होते. तिने लगेच हलक्या हाताने तिच्या पायांना मलम लावला.

"अहो, पातेल्यात थंड पाणी आणा, ह्यांना ताप आहे." भक्ती म्हणाली. तसा ज्ञानेश एका भांड्यात थोडे पाणी आणि एक सुती कापड घेऊन आला.

त्यानंतर त्यानेच मोक्षदाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. बऱ्यापैकी तिचा ताप कमी झाला होता. तिला विश्रांती मिळावी म्हणून त्याने तिच्या अंगावर अंथरूण पांघरले आणि भक्तीला इशारा केला. त्यानंतर दबक्या पावलांनी ते बाहेर गेले.

"अहो, त्यांच्यासाठी खिचडी करते. उठल्यावर त्या जेवतील तर बऱ्या होतील लवकर." भक्ती म्हणाली.

"ह्म्म. मी पण येतो." असा बोलून तो तिच्या मागे किचनमध्ये गेला. तिने त्याला जेवायला ताट दिले. तो जेवायला बसला तर ती तिच्या कामात गुंतली.

ती शांतपणे खिचडी शिजवत होती.

तेवढ्यात तो म्हणाला, "आता नाही प्रश्न विचारणार?"

"तुम्ही सांगतो बोललात ना... शिवाय त्यांची अवस्था पाहता या क्षणी माझ्या प्रश्नांपेक्षा मला त्यांची तब्येत महत्त्वाची वाटतेय." भक्ती म्हणाली.

"किती पुण्य केल्यावर तुझ्यासारखी गोड बायको मिळते, हे देवाला विचारावे लागेल एकांतात." किंचित हसत तो बोलला. ती त्यावर गोड लाजली पण लगेच डोळे बारीक करून पाहिले.

"अहो, तुमच्या आयुष्यात माझ्या आधी कोणी होते का?" एकाएकीच तिने विचारले.

"नव्हते कोणीही. तूच पहिली आणि शेवटची. आता देव जरी आला आणि त्याने बदलून देतो म्हटले तरी मी ऐकणार नाही बघ." तो म्हणाला.

"मग काळजी नाही." ती निश्चिंतपणे म्हणाली.

"कशाची? काय विचार सुरू आहे डोक्यात?" त्याने आता तिच्याकडे पाहत विचारले.

"ते... त्या ताई..." तिला आता कसे सांगावे ते कळेना.

"अरे देवा, तू पण ना... अगं ती जिवाभावाची ताई आहे माझी." तो कपाळावर हात मारत म्हणाला.

"ताई पण तुम्ही तर..." ती बोलता बोलता थांबली.

"हो मी अनाथ आहे; पण माझ्यासारख्या अनाथ मुलाला बहिणीचा लळा लावणारी ताई आहे ती... मी तुला बोललो होतो ना माझ्या मोक्षदा ताईबद्दल, हीच ती." त्याने आता सविस्तर माहिती दिली.

"अय्या हो का! पण त्या अशा, या अवस्थेत? पायाला किती जखमा आहेत. साडी पण जराशी चुरगळली आहे. तापही होता..." खिचडी शिजवून झाल्यावर हॉलमध्ये येत भक्ती म्हणाली.

क्रमशः
.........
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
0

🎭 Series Post

View all